खाऊच्या गोष्टी, गोष्टीतला खाऊ 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 11 मार्च 2019

पोटपूजा
 

खाण्यापिण्याच्या गोष्टी तर आपण नेहमीच करतो. पण देशोदेशीच्या गोष्टींमध्येही खाऊचा खजिना दडलेला असतोच. लहानपणी काऊचिऊच्या गोष्टी सांगून आईनं भरवलेलं असतं. मग ‘याचा घास’, ‘त्याचा घास’, असं करत, गोष्टीवेल्हाळपणे बोलत राहिलं, की त्या नादात मुलं जेवण संपवतात. कधी गोष्टींच्या वाटेवर भेटतो, तो आपण खात असलेला किंवा खात नसलेलाही खाऊ. या खाऊशी मग एक जाणीवेचं नातं जुळतं. गमतीत मिळणारे ‘धम्मक लाडू आणि चापट पोळी’, प्रवासाला निघताना सोबत बाळगायचे ‘तहान लाडू, भूक लाडू’.. भाषा आपल्याला असा वेगवेगळा खाऊ पुरवत असते. मग कधीतरी कुणी याचा अर्थ सांगतं, की प्रवासाला निघताना, काहीतरी खायला आणि पिण्यासाठी थोडं पाणी जवळ ठेवलं जातं, त्याला ‘तहान लाडू, भूक लाडू’ असं म्हणतात. खाण्याचं काहीतरी जवळ असलं, की मग प्रवासात अडकलं, तरी पंचाईत होत नाही. तसंच एखाद्याला साफ आणि ठाम नकार दिला गेला किंवा धुडकावून लावलं गेलं, तर त्याला ‘वाटाण्याच्या अक्षता लावल्या’ असं म्हणतात. एरवी ओवाळताना कपाळाला तांदळाच्या अक्षता लावल्या, तर त्या चिकटून राहतात, पण वाटाणे तसे चिकटत नाहीत; यावरून हा वाक्‍प्रचार आला. 

खादाडीचं उदाहरण असलेला महाभारतातला बकासूर. त्याची भूक कधी भागतच नाही. पांडव एकचक्रानगरीत राहत असतानाचा बकासुरवधाचा प्रसंग आहे. गाडाभर खाणं आणि एक माणूस, असं अन्न या राक्षसाला रोज लागायचं वगैरे तपशील ऐकताना किंवा वाचताना बालमनाला अचंबा वाटतो. भीम या बकासुराचा खाण्याचा गाडा घेऊन जातो आणि त्याच्याशी लढून त्याला संपवतो. ‘बकासुर आहेस का?’ असं यावरून एखाद्या खादाडाला म्हटलं जातं. ही एकचक्रानगरी म्हणजे आजच्या खानदेशातलं एरंडोल गाव, असं म्हणतात. पण उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढ जिल्ह्यातलं चक्रनगर व त्याचा परिसर हे बकासुराचं स्थान होतं, असं तिथं मानलं जातं. रामायण-महाभारतातली बरीच ठिकाणं अशी भारतभर विखुरलेली आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी रामायणातली पंचवटी, महाभारतातली एकचक्रानगरी, पद्मावती इत्यादी दिसतात... भीमाचं पोट आईच्या हातच्या खाऊशिवाय कधीच भरत नसे, त्याची गोष्ट पूर्वी आजोबांकडून ऐकली होती. त्याला खूप खायला घालूनही त्याचं पोट भरत नाही, पण कुंतीच्या हातचे पाच लाडू खाल्ल्यावर मात्र तो तृप्तीचा ढेकर देतो. अश्‍वत्थाम्याला आई पिठात पाणी कालवून दूध म्हणून देते, ही कथाही प्रसिद्धच आहे. 

लोककथांमधून आणि पंचतंत्रासारख्या कथांमधूनही माणसांच्या आणि प्राण्यांच्या माध्यमातून खादाडीचे संदर्भ आढळतात. चातुर्मासातल्या शुक्रवारच्या कहाणीत गरीब बहिणीला न विचारणारा, तिला अपमानित करून ताटावरून उठवणारा भाऊ आहे. तिला बरे दिवस येतात, तेव्हा मात्र तिला तो जेवायला बोलावतो. छान भरजरी वस्त्रं आणि दागिने ल्यालेली बहीण पाटावर न बसता, त्यावर आधी शालजोडी, मग एकेक दागिने ठेवते आणि या दागिन्यांवर अन्नाचे घास ठेवत राहते. भाऊ तिला याबद्दल विचारतो, तेव्हा ती म्हणते, ‘तू जिला जेवायला बोलावलंस, त्या लक्ष्मीलाच तर मी जेवू घालते आहे.’ भाऊ ओशाळतो वगैरे... ही कथा वाचताना वाईट वाटायचं. तर दुसरीकडं, ‘तिनं भात कालवला आणि घास सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला..’ वगैरे वर्णनं वाचताना मजाही वाटायची. ते ताट आणि खाद्यपदार्थांवर वाढलेले दागिने डोळ्यांसमोर उभे राहायचे... तशीच एक कहाणी, ‘खुलभर दुधा’ची. गावातल्या गरीब आजीबाईच्या घरच्या वासरांचं, मुलाबाळांचं खाणंपिणं झाल्यावर तिनं देवासाठी आणलेल्या उरलेल्या खुलभर दुधानं भरून जाणारा तो शंकराच्या देवळाचा गाभारा... 

महाभारतातली कृष्ण-सुदाम्याची गोष्ट आणि आजही लोकांच्या बोलचालीत येणारे त्यातले ‘सुदाम्याचे पोहे.’ कृष्णानं प्रेमानं खाल्लेले हे पोहे, मैत्रीत अमीर-गरीब भेद नसतो सांगणारे. तर पांडवांना खजील करावं म्हणून दुर्योधन वनवासातल्या पांडवांकडं भोजनासाठी दुर्वासऋषींना पाठवतो. पर्णकुटीत काहीच शिल्लक नसतं. द्रौपदी कृष्णाचा धावा करते, तर तोही उपाशी असतो. घरातल्या थाळीला फक्त एक पान चिकटलेलं असतं. ते खाल्ल्यावर कृष्णाचं पोट भरतं आणि नदीवर गेलेल्या दुर्वासांना आणि शिष्यांनाही पोट भरल्याची जाणीव होते. ही ‘द्रौपदीची थाळी’ तेव्हापासून घरी कमतरता असूनही, पाहुण्यांचं स्वागत करणाऱ्या गृहिणीचं प्रतीक बनली. 

माकड, उंदीर आणि मांजर यांनी मिळून केलेली खीर. माकड व उंदीर अंघोळीला गेले असताना, मांजर उतावळेपणानं सगळी खीर खाऊन टाकते आणि साळसूदपणे कानावर हात ठेवते. मग नदीच्या पाण्यावर घागर पालथी घालून ते दोघं आपण खीर न खाल्ल्याचं सांगतात. मांजरावर पाळी येते, तेव्हा ती ‘म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’ असं घाबरत म्हणते, तशी ती घागर बुडते आणि मांजराची लबाडी उघडकीला येते. दुसऱ्या एका गोष्टीत दोन मांजरांमध्ये लोण्याच्या गोळ्यावरून भांडण होतं आणि माकडाला वाटणीसाठी नेमलं जातं. माकड तराजू आणून समान वाटप करू पाहतं आणि एका तागडीत जास्त लोणी झालं, की त्यातलं थोडं खाऊन दोन्हीकडचं लोणी सारख्या वजनाचं करण्याच्या मिषानं सगळंच लोणी संपवतं. 

लेकीकडं निघालेली म्हातारी आणि तिला अडवणारा वाघ. ‘लेकीकडं जाऊन, खाऊन पिऊन धष्टपुष्ट होऊन येते, मग तू मला खा,’ असं म्हातारी सांगते. परत येताना ती भोपळ्यात बसून येते आणि ‘चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक’ म्हणत, वाघासमोरून पसार होते. आठवायच्याच म्हटल्या, तर आणखी अशा कैक गोष्टी आठवतील. पूर्वी लहान मुलांसाठी रंगीत चित्रमय पुस्तकं मिळायची. त्यातलं एक आजही आठवतं, ज्यात मग संत्र्याच्या सालींचं छप्पर, हिरव्या पानांची दारं-खिडक्‍या वगैरे सशाच्या घराचं रंगीबेरंगी सचित्र वर्णन असायचं. ‘जादूचा लाडू टुण, टुण, टुण’ अशी गोष्ट असलेलं एक छोटेखानी पुस्तकही असंच मस्त होतं. भलामोठ्या गरगरीत अशा धावणाऱ्या पिवळ्याजर्द लाडूचं चित्र त्यावर होतं. 

अकबर-बिरबलाची आंब्याची गोष्ट. बादशाह व बेगम आंबे खातात आणि बादशाह आपल्या साली बेगमेच्या समोर टाकतो. ‘हिनंच सारे आंबे खाल्ले बघ,’ असं बिरबलाला म्हणतो. तेव्हा बिरबल काय ते ओळखून म्हणतो, ‘सरकारांनी तर सालीसकट आंबे खाल्लेले दिसतात..’ मस्करी अंगलट आल्यानं बादशाह निरुत्तर होतो. ती ‘बिरबलाच्या खिचडी’ची गोष्ट कोण विसरेल? थंडीच्या दिवसांत राजमहालासमोरच्या जलकुंडात रात्रभर उभं राहणाऱ्याला शंभर सुवर्णमुद्रांचं बक्षीस बादशाह जाहीर करतो आणि एका गरीब मनुष्याला ते करून दाखवल्यावरही, बादशाह मुद्रा देण्याचं नाकारतो. जलकुंडापाशी असलेल्या पेटत्या दिव्याची ऊब या माणसाला मिळाल्याचं कारण पुढं करतो. बिरबल त्या मनुष्याला दिलासा देतो. दरबारात नेहमीच्या वेळेला बिरबल जात नाही. अकबर बादशाह नोकराकरवी चौकशी करतो, तर समजतं, बिरबल खिचडी शिजवतो आहे, ती शिजल्यावरच तो दरबारात हजर होईल. दुपार उलटून गेली, तरी बिरबल येतच नाही. तेच कारण सांगत राहतो. शेवटी बादशाह स्वतः जातो, तर बिरबल पेटलेल्या चुलीसमोर बसलेला आणि बऱ्याच उंचीवर एका मडक्‍यात खिचडी शिजत असते. बादशाह बिरबलाच्या मूर्खपणाला हसतो व म्हणतो, ‘तुला एवढंही कळत नाही का, की खिचडीचं भांडं विस्तवापासून इतकं दूर असलं, तर ती शिजणार तरी कशी?’ त्यावर बिरबल उत्तर देतो, ‘दूरच्या दिव्याच्या उबेनं एखादा माणूस जसा रात्रभर पाण्यात उभा राहू शकतो, तशीच ही खिचडीसुद्धा शिजेलच की...’ बादशाह काय ते समजतो आणि गरीब मनुष्याला शंभर सुवर्णमुद्रा देऊन टाकतो. तेव्हापासून ही ‘बिरबलाची खिचडी’ प्रसिद्ध झाली आणि इथल्या भाषेत एक वाक्‍प्रचार होऊन गेली. खोटी आश्‍वासनं देण्याला ‘बिरबलाची खिचडी’ म्हणतात. 

गोष्टींमधील ही खाद्यभ्रमंती न संपणारी आहे, चिमणी आणि तांदळाच्या कोठारासारखी. ‘एक चिमणी आली, एक दाणा घेऊन गेली...’ आतले दाणे संपेपर्यंत हीच गोष्ट चालू राहणार.. अन्‌ दाणे संपत आले, तरी नवं पीक येतच राहणार! 

गाजराचे पराठे 
साहित्य :गाजरं, कणीक, मक्‍याचं पीठ, मीठ, तिखट, जिरं, तेल, काळे तीळ. 
कृती : गाजरं उकडून घ्यावीत. ती गार झाल्यावर हातानंच कुस्करावीत. त्यात चवीनुसार मीठ, तिखट घालावं. थोडं जिरं, तिखटाची पूड घालावी आणि पाणी न घालता, त्यात बसेल एवढी कणीक व मक्‍याचं पीठ घालून मळून घ्यावं. अगदीच लागलं, तर पाण्याचा हात लावावा. गोळा तयार करताना थोडं तेलही घालावं. तसंच काळे तीळ घालावे वा लाटताना वरून ते भुरभुरावे. पराठे लाटून गरम तव्यावर तेल वा तूप सोडून भाजून घ्यावे. 
पर्यायी सूचना : गाजराचे पराठे कच्च्या गाजराचेही करता येतील. गाजर किसून त्यात मीठ, तिखट इत्यादी घालून बाजूला ठेवून, मग त्यात कणीक वगैरे घालून लागलंच तर पाणीही घालून, गोळा बनवून पराठे करावे. गव्हाची कणीक नेहमीच खाल्ली जाते. तर मका, वेगवेगळ्या डाळींचं व सोबत थोडं तांदळाचं पीठ, थोडी धनेपूड यांचा वापर केला, तर चवबदल आणि पौष्टिकता मिळेल. गाजर उकडून, त्यात साखर व वेलची मिसळून, तूप सोडून केलेले गोड पराठेही छान होतात. मुलांना डब्यात देण्यासाठी हा खाऊ बरा पडतो.

गूळपापडीची वडी 
साहित्य : दोन वाट्या गव्हाची कणीक, अर्धा वाटी तूप, दोन वाट्या किसलेला गूळ, थोडं किसलेलं सुकं खोबरं, चवीसाठी वेलची पूड. 
कृती : तुपात गव्हाची कणीक मंदाग्नीवर खमंग भाजून घ्यावी. जरा गार होऊ द्यावी आणि मग त्यात किसलेला गूळ, वेलची पूड मिसळावी. हातानं मळून घ्यावी आणि हे मिश्रण थाळीत थापून त्याच्या वड्या पाडाव्यात. 
पर्यायी सूचना : गुळपापडीच्या या वडीत आवडीनुसार बदाम, अक्रोडाची पूड, चमचाभर भाजलेल्या मेथीची पूड, तुपात तळलेल्या डिंकाची पावडर असा मालमसालाही टाकू शकता. त्याचं प्रमाण पाहून गुळा-तुपाचं प्रमाणही वाढवावं लागेल. कणीक जरा जाडसर घेतली तर बरं. नेहमीचीही चालते.

संबंधित बातम्या