उन्हाळ्याचा उत्सव 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 10 जून 2019

पोटपूजा
 

असे हे जगाचे फिरे चक्र बाळा, 
हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा... 

वरील गाण्याच्या ओळींमध्ये वर्णन केल्याप्रमाणं, आपल्या अवतीभवतीचं ऋतुचक्र अविरत चालू असतं. पावसाळ्याच्या गारव्याची असोशीनं वारंवार आठवण करून देणारा उन्हाळा सध्या आपण अनुभवत आहोत. उन्हाळ्याशी निगडित अशा कैक गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच भावविश्‍वात आणि स्मरणात दडलेल्या असतात. रेंगाळत असतात. त्यातही किनारपट्टीच्या आणि किनाऱ्यापासून दूरच्या भागांमधल्या उन्हाळ्याचं स्वरूप वेगळं. कुठं कडक ऊन आणि कोरड्या हवेमुळं घशाला सतत पडणारा शोष. कितीही पाणी प्यायलं, तरी ते शरीरात जिरून जातं आणि नव्यानं तहान लागते. मुंबई-कोकणात दमट हवेमुळं अंगाला घामाच्या धारा लागतात. नुकतीच अंघोळ झाली असली, तरी घामामुळं शरीर ओलं होतं आणि पुन्हा पाण्यात शिरावंसं वाटतं... खरं तर घाम येणं, ही उन्हाळ्याच्या त्रासापासून बचाव करण्याची निसर्गाची योजना आहे. पण अर्थातच तीही नकोशी वाटतेच. कोरड्या हवेत राहणाऱ्यांना तिची सवय नसल्यानं, दमट हवेच्या प्रदेशात त्यांना जावंसंच वाटत नाही. त्यांना कोरड्या हवेतलं हवामानच मानवतं. ‘नको त्या घामाच्या धारा’ असं होऊन जातं. 

अशा गरम वातावरणातला आहारही बदलतो. बदलावासा वाटतो. गरम पदार्थांकडं वळावंसं वाटत नाही. थंड आणि पातळ पदार्थ खावेसे वाटतात. थंड पाणी आणि पेयं, सरबतं प्यावीशी वाटतात. यातून मग अनेकदा सर्दी, ताप, खोकला असे विकार मागं लागतात. शरीरातला कफ पातळ होतो. घशाला त्रास होतो, खवखव वाढते. मग थंड सेवन करण्यावर बंधनं येतात. त्यांची धास्तीच वाटते. शिवाय गरम पदार्थही उष्ण हवामानामुळं नकोसे वाटतात. भूकही मंदावते. थकवा वाढतो. उन्हाळ्याला तोंड देताना अतिथंड खाण्याचा उत्साह अंगाशी येतो. शिवाय वेगानं फिरणारा पंखा, एअरकंडिशनर, कुलर यांचा वापर वाढल्याचा फटकाही बसतो. खावंसं वाटत नाही, म्हणून आहारही जरा चमचमीत केला जातो. शिवाय सुट्यांचा हंगाम असल्यानं मुलांना जिभेला आवडणारे पदार्थच हवे असतात. उन्हात खेळणं, थंड पाणी पिणं आणि चटकमटक खाणं यामुळं मुलांनाही त्रास होऊ शकतो, होतोच. खरं तर आपल्या परंपरेनं घालून दिलेल्या आहार-विहाराचा स्वीकार, हाच उन्हाळ्यापासून बचाव करण्याचा उपाय ठरू शकतो. गुढीपाडव्यापासून उन्हाळ्याला तोंड देण्याची सुरुवात होते. जिरं, सुंठ, ओवा, साखर आणि सैंधव घालून केली जाणारी कडुलिंबाची चटणी शरीरातला कफ कमी करते. कफावर उपाय ठरणारा आणि भूक वाढवून पचन सुधारणारा सुंठवडाही याच काळात केला जातो. उन्हाळ्याचा अगदीच त्रास होत असेल, तर धणे-जिरे घातलेलं पाणीही अक्‍सीर इलाज ठरतं. चवीसाठी वाटल्यास त्यात थोडी खडीसाखर आणि किंचित सुंठाची पावडर घालावी. 

उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी कांद्याचा जेवणातला वापर वाढवला, तर उपयोग होतो. अतिशय उष्ण प्रदेशात कांदा फोडून डोक्‍यावर ठेवून वरून टोपी घालतात किंवा काहीतरी बांधतात. या काळात आहारही हलका अपेक्षित आहे. खूप तिखट, तळकट असे पदार्थ टाळलेले बरे. रसरशीत, ताज्या भाज्या या दिवसात फारशा मिळत नाहीत; पण भाज्यांचा समावेश आहारात असलाच पाहिजे. सकाळच्या नाश्‍त्यात पोहे, उपमा, भाताची पेज, असे पारंपरिक पदार्थ असले, तर उत्तमच. तांदळाच्या वा ज्वारीच्या पिठाची उकड, तांदळाचं वा मुगाचं घावन, आंबोळी, क्वचित थालिपीठ असे पदार्थही खायला बरे वाटतात. आहारात पुदिन्याचा वापरही अवश्‍य करावा. घरच्याघरी वेगवेगळी सरबतंही करता येतात. लिंबू, कोकम यांचं सरबत, कच्च्या व उकडलेल्या कैरीचं पन्हं, शहाळ्याचं पाणी, उसाचा रस (बर्फ घालू नये), पातळ ताक (यात किंचित मीठ, जिरे व धने पावडर घातली किंवा पुदिना-कोथिंबीर वाटून लावली, काकडी किसून घातली, तर चव येते व ते गुणकारीही ठरतं) अशी पेयं उन्हाळा तीव्र वाटू देत नाहीत. या दिवसांत आइस्क्रीमही खाल्लं जातंच, पण ते सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. कधीमधी घरी दुधापासून आइस्क्रीम केलं, तर उत्तमच. आंब्याचं आइस्क्रीम घरच्या घरीही छान होऊ शकतं. 

उन्हाळ्यावर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळे उपाय असतात. आहारात विशिष्ट पदार्थांचा समावेश केला जातो. ऋतुमानानुसार असे बदल केले जातात. उत्तरेकडंही खूप कडक उन्हाळा असतो. त्याला तोंड देण्यासाठी मग शिकंजी (किंचित काळं मीठ घातलेलं लिंबू सरबत), जिरं, आलं, पुदिना, काळं मीठ वगैरे घालून केला जाणारा जलजीरा, लस्सी अशा पेयांवर तिथं भर असतो. आपण उन्हाळ्यात सातूचं पीठ करतो आणि त्यात दूध व साखर-गूळ घालून खातो किंवा जरा पातळसर करून ते प्यायलंही जातं. सातूच्या पिठाचे लाडूही केले जातात. उत्तर प्रदेश, बिहार वगैरे भागातही सत्तूचं म्हणजे सातूचं पीठ करतात. गहू, चणाडाळ भाजून व त्यात डाळंही घालून सातूचं पीठ आपण करतो. तिकडंही तसं करतात, पण बिहारमध्ये चणे भरडून ते पाण्यात मिसळून प्याले जातात, त्या पेयालाही ‘सत्तू’ म्हणतात. कधी जवाचा वापरही यात केला जातो. सत्तू करताना, हरभरे तसेच किंवा किंचित उकडून घेऊन मिठात भाजून फोडले जातात आणि भाजलेले जिरे त्यात मिसळले जातात. मग दळून सत्तूचं पीठ घरच्या घरीच केलं जातं. बिहारचा लिट्टी चोखा हा कचोरीसारखा पदार्थही सत्तूचं पीठ वापरून केला जातो. दोन चमचे सत्तूच्या पिठात साखर घालून त्याचं गोड सरबत केलं जातं किंवा मग पुदिना, काळं मीठ इत्यादी घालून खारं सरबत केलं जातं. उन्हाळ्यात सत्तू पिऊन उष्णतेचा मुकाबला केला जातो. त्याच्या पौष्टिकतेमुळं शरीराला ताकदही मिळते. विकत मिळणारे चणे वापरूनही सत्तूचं पीठ घरी तयार करता येतं. घराबाहेर पडताना सत्तूचा घोल पिऊन निघालं, की मग उन्हाळी त्रासाची काळजीच नको. 

याच्या जोडीला घरी तयार केलेले पदार्थ, सरबतं, ताक-लस्सी यांचा वापर आहारात केला, तर उपयुक्त ठरतं. गरम हवेत फार मसालेदार वा तिखट पदार्थ खावेसेही वाटत नाही. अशावेळी ज्वारीच्या व भाताच्या लाह्या, पोहे, कुरमुरे असे हलके घटक वेगवेगळ्या स्वरूपात खाता येतात. कैरी, चिंच, आमसूल, दही, ताक यांचाही वापर यात करणं रुचीलाही मानवतं आणि ऋतूलाही. चिवडा, भेळ असं हलकं खाणं संध्याकाळी खायला बरं वाटतं. तर नाश्‍त्याला दहीपोहे, दूधपोहे रुचतात. फार भूक नसेल किंवा भरपेट साग्रसंगीत जेवण नको असेल, तर दहीपोहे दुपारच्या जेवणाच्या वेळीही खायला हरकत नाही. कोशिंबिरी, फणस, आंबा, जांभळं अशी फळंही उन्हाळ्यात खायला बरी वाटतात. पण तो काही मुख्य आहार नव्हे. फळांचा राजा आंबा घरोघरी ठाण मांडून बसलेलाच असतो. आंबा असला, की मग जेवणाच्या ताटात दुसरं काहीही चालतं... फार काही लागतही नाही. 

उन्हाळा सुसह्य करणारा आहार असला, की मग त्याची धग आपल्याला त्रासदायक ठरत नाही. प्रत्येकच ऋतूचा सामना करताना त्या त्या गरजेनुसार आहारविहार ठेवणं फार गरजेचं असतं. उन्हाळ्याचाच उत्सव केला, की तो आनंदाची बरसात करणारच... 

चवदार दहीपोहे 
साहित्य : जाडे वा पातळ पोहे, दही, थोडंसं दूध, चवीनुसार मीठ व साखर, थोडं मेतकूट, कोथिंबीर, हिरवी वा लाल सुकी मिरची, फोडणीसाठी तेल, जिरं, हिंग. 
कृती : जाडे पोहे घेतले, तर ते रोवळीत घालून नळाच्या पाण्याखाली धुऊन बाजूला ठेवावे. पातळ पोहे घेतले तर ते नुसते चाळून तसेच वापरावे. पोह्याच्या प्रमाणात दही घेऊन त्यात पोहे कालवावे. दह्याबरोबरच थोडंसं दूधही घालावं. दही एकदम घालू नये, पोह्यात ते जिरून पोहे कोरडे होत जातात. एकावेळी पोहे भिजतील इतपत दही घालावं आणि कालवून झाल्यावर पुन्हा लागेल तसं दही घालावं. खाणाऱ्याच्या आवडीनुसार कमीजास्त दही घालून आयत्या वेळी कालवून देता येतं. कारण कुणाला जरा अळलेले पोहेच आवडतात, तर कुणाला ते जास्त ओलसर लागतात. चवीनुसार मीठ, साखर व थोडं मेतकूट घालावं. चिरलेली कोथिंबीर घालावी. तेलातच वा तुपात हिंग-जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. त्यात आवडीनुसार हिरवी वा सुकी लाल मिरची टाकावी. पोह्यावर फोडणी घालून नीट कालवावं. 
पर्यायी सूचना : पोह्याबरोबर ज्वारीच्या लाह्याही घातल्या, तरी चालेल. तसंच भाजलेले शेंगदाणे वा दाण्याचं कूट, किसलेली काकडी यांचा वापर केला, तर हे पोहे अधिक चविष्ट होतील. काकडीमुळं जिभेला गारवाही मिळेल. आवडत असेल, तर लसूण बारीक चिरून फोडणीत घालावा. छान लागेल. चवीत गंमत आणण्यासाठी वरून थोडीशी शेव वा फरसाणही घालायला हरकत नाही.

घरगुती सरबतं - कैरी, कोकम 
साहित्य : कैरी, साखर, पाणी, वेलची, आमसुलं, साखर, पाणी, जिरेपूड. 
कृती : १) कैरी किसून घ्यावी आणि बुडेल इतक्‍या पाण्यात दोन तास ठेवावी. नंतर हा कीस पिळून पिळून रस काढावा. साखर व वेलचीपूड मिसळावी आणि गरजेनुसार पाणी घालून सरबत तयार करावं. 
२) कैरी उकडून घ्यावी. गार झाल्यावर हातानं मऊ करावी आणि पिळून गर काढून घ्यावा. त्यात पाणी घालावं व सारखं करावं. वाटलं तर मिक्‍सरमध्ये घालून फिरवावं. साखर किंवा गूळ, वेलची पूड घालून पन्हं तयार करावं. 
३) आमसुलं किंवा कोकमं घरात असतातच. आठ-दहा आमसुलं थोड्या पाण्यात भिजत घालावीत. त्यातच अंदाजानं साखर घालून ठेवावी. दीडेक तास तरी ठेवावं. मग आमसुलं त्याच पाण्यात पिळून घ्यावीत. चवीपुरतं मीठ घालावं. साखर कमी पडत असेल, तर थोडी घालावी व हलवावं. थोडी जिरेपूडही घालावी. कोकम सरबत तयार आहे. आमसुलांच्या ताजेपणानुसार व रंगानुसार सरबताचा रंग येईल. तो लालचुटुक नाही आला, तरी हरकत नाही. घरच्याघरी केलेलं कोकम सरबतही तितकंच गारवा देतं व गुणकारी असतं. 
पर्यायी सूचना : लिंबू सरबताप्रमाणं ही तिन्ही सरबतं घरात असलेल्या गोष्टी वापरून करता येतात. उन्हाळ्याच्या काहिलीवर तेवढाच दिलासा ठरणारी आहेत ही सरबतं. कोकमाची फळं, म्हणजे रातांबे घरी आणून त्यापासूनही कोकम सरबत घरी करता येतं.

संबंधित बातम्या