आहार हिरव्या ऋतूमधला... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 15 जुलै 2019

पोटपूजा
 

पावसाळी हवा आणि त्यातला गारवा यांचं एक आकर्षण मनाला नेहमीच वाटत असतं. पण त्याचवेळी पावसाळ्यामुळं होणारा त्रास मात्र नको असतो. मध्यंतरी पावसानं जो कहर मांडला होता, ती वेगळीच समस्या आहे, पण ती अटळ नाही. कारण ती केवळ निसर्गामुळं आलेली आपत्ती नाही. त्यात माणसाचा हात किती आहे, हे आपल्याला माहीतच आहे... पण त्या साऱ्या चर्चेत आपण नकोच जाऊया. आपण केवळ आपल्या जिभेची आणि अर्थातच पोटाची काळजी घेऊया. खरं तर, पाऊस काही सगळीकडंच एकसारखा पडत नाही. महाराष्ट्रातही तो ठिकठिकाणी कमीजास्त तीव्रतेनं पडतो. काही भागांना तर कायम तृषार्तच ठेवणारा असतो. पावसाच्या वातावरणात मनाला वाटतं छानसं खमंग, गरमागरम काहीतरी खावं. मग भजी, बटाटावडा वगैरे पदार्थ खुणावू लागतात. पण जिभेला ते खाण्याची ओढ लागली असतानाच, पावसाळी हवेत जरा जपूनच खाण्याचा सल्ला कोणी कोणी देत राहतं आणि मग हे पदार्थ खाताना मन जरा चाचरतंच (म्हणजे तरीही ते खाल्ले जातातच)... पण थोडी काळजी घेतली, तर आपल्याला या हवेत खावंसं वाटतं त्या चवीचं खाता येतं. मात्र त्यासाठी जिभेलाही वेगवेगळ्या चवी चाखायला शिकवलं पाहिजे. फार तळकट, पचायला जड असे पदार्थ वारंवार खाण्याऐवजी, पोटाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे काही पदार्थ करून, पावसाळा साजरा करता आला पाहिजे. रोज भजी-वडे खाल्ले, तर कसं चालेल? चातुर्मासाच्या संकेताप्रमाणं या काळात मांसाहार व मत्स्याहारही कमी केला, तर ते उपकारकच ठरतं. कारण तोही पचायला जडच. यासाठीच चातुर्मासात त्यावर नियंत्रण सांगितलंय. मासे पचायला हलके. पण तरी या काळात मासे न खाता, त्यांना निसर्गतः वाढू द्यावं, कारण तर पावसाळा, विशेषतः श्रावण महिना हा माशांच्या प्रजननाचा काळ; असा संकेत यामागं असल्याचा निर्वाळाही बरेचदा दिला जातो. 

एकूणच, भारतीय परंपरेनं सांगितलेली आहारचर्या समजून घेतली, तर सगळ्याच ऋतूंमध्ये हवामानाला आणि निसर्गाला अनुसरून आहारविहार ठेवण्याचा संदेश समजून येईल. त्यासाठी धार्मिक कृत्यांशी हे सारं जोडलं गेलं आहे. विशेषतः पावसाळी दिवसांमध्येच येणारे चातुर्मासाचे महिने आणि त्यावेळी करायची व्रतवैकल्यं किंवा पाळावयाचे काही संकेत हे आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं हितकारकच आहेत. मनाला आनंद देणारे सण आणि उत्सव या काळात येतात आणि त्याबरोबर आहारविहाराबाबतच्या बदलांच्या सूचनाही असतात. आजच्या बदललेल्या काळात आणि धकाधकीत त्या तंतोतंत पाळल्या जाव्यातच असा आग्रह नसावा. पण त्यांची दखल तरी घ्यायलाच हवी. कारण पावसाळी हवेबरोबर प्रकृतीला अपायकारक अशा गोष्टीही हवापाण्याबरोबर येत असतात. काही आजारही डोकं वर काढू शकतात. ऋतुमानानुसार निसर्गात होणाऱ्या बदलांमुळं शरीरही बदलत असतं. पावसाळ्यात पोटातला अग्नी मंद होतो आणि पचनाच्या समस्या उद्‌भवू शकतात. म्हणूनच या दिवसांत हलका आणि अल्प आहार घ्यावा. म्हणून ‘धान्यफराळ’ हे व्रत केलं जातं. म्हणजे धान्यं किंवा पिठं भाजूनच खाल्ली जातात. या हवेत आलं, लिंबू, लसूण हेही पदार्थ पथ्यकारक आहेत. चातुर्मासात लसूण वर्ज्य मानला जातो, पण आयुर्वेदानुसार पावसाळी हवेत लसूण फायदेशीरच ठरतो. 

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात काही वेगळ्या प्रकारच्या भाज्या उगवतात. त्या खाणंही पथ्यकारक असतं. निसर्गानं दिलेलं हे एक वरदानच होय. या भाज्या जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात, तर काहींमध्ये जस्त, तांबं, कॅल्शिअम हे घटक विपुल प्रमाणात असतात. करटोली, फोडशी, भारंगी, शेवग्याची कोवळी पानं-फुलं, टाकळा, कोरळ, शेवळं, मायाळू, कुवाळू या खास पावसाळी भाज्या. यातल्या काही तर जंगलात आपोआप उगवणाऱ्या रानभाज्याच आहेत. आदिवासी बाया या भाज्या शोधून बाजारात विक्रीसाठी आणतात. भाजीचा अळूही याच काळात भरपूर मिळतो. या आणि इतरही कितीतरी भाज्या या काळात थोडे दिवसच खायला मिळतात. त्यातही प्रादेशिक वैविध्य त्यात असतंच. मात्र यातल्या काही पावसाळी भाज्या कशा करायच्या, हे माहीत असावं लागतं. नाहीतर त्यापैकी खाजतात, तर काही कडूशार चवीच्या असतात. ही वैगुण्यं दूर करून त्यांचा आस्वाद घ्यायचा असतो. शेवळं ही भाजी तर खूपच लोकप्रिय आहे आणि तिची आस लागून राहिलेले तिचे भोक्ते असतात. ती करताना वाल, चणाडाळ वापरतातच. पण खिमा किंवा सोडे घालूनही ती केली जाते. शिवाय शाकाहारी घटक वापरूनच, पण मांसाहारी मसाला घालून शेवळं केली जातात. शेवळांचं कवित्व इतकं, की काहीजण पावसाळ्यात ती भरपूर प्रमाणात घेऊन, निवडून फ्रीझरमध्ये ठेवतात आणि मग नंतर केव्हातरी ती भाजी केली जाते. परदेशी गेलेल्या आपल्या मुलांसाठी किंवा तिथून भारतात कधीमधी परतणाऱ्या नातेवाईक पाहुण्यांसाठी करण्यासाठी म्हणूनही ती राखून ठेवली जातात... शेवळांसाठी अगदी जीव टाकणारी बरीच मंडळी असतात. 

पावसाळी दिवसांत चटकमटक आणि तळलेले पदार्थ खावेसे वाटतात, त्यावर मात्र नियंत्रण ठेवायला हवं. तव्यावर तेलात परतलेले पदार्थही तेवढेच खमंग लागतात, ते खावेत किंवा वाफवलेले वा उकडलेले चविष्ट पदार्थ आपलेसे करावेत. आलं, लिंबू, लसूण, मूग, मोसमी भाज्या यांचा वापर वाढवावा. श्रावणघेवडा, भेंडी, पडवळ, दुधी, मोठ्या काकड्या अशा भाज्या या काळात जास्त येतात. वालाच्या रोपाची कोवळी पानंही भाजी म्हणून शिजवली जातात. कुंडीत वाल पेरून अशी रोपंही मिळवणाऱ्या गृहिणी असतात. पावसाळा पुढं सरकतो, तशा वाटाण्याच्या कोवळ्या शेंगा, कोवळी गाजरं मिळू लागतात. अशा भाज्या या काळात आवर्जून खाव्यात. मक्‍याची कोवळी कणसं भाजून खाण्यातली मजाही या ओलसर हवेत लुटावी. गोड खावं, पण अतिगोड टाळावंच. गुळाचा वापर जास्त करावा. धान्यं व पिठं भाजून खाल्ली, तर ती पचायला हलकी पडतात. उसळी केल्या, तरी पातळ स्वरूपात कराव्यात, म्हणजे जड पडत नाहीत. कडधान्यांचं कढणही (काहीजण ‘कळण’ म्हणतात) करता येईल. भाज्यांचं सूप, रस्सा, सार असे पदार्थही या दिवसांत खायला बरे वाटतात. ऋतुमानाप्रमाणं पावसाळ्यातही भारतीय सणांना वेगवेगळे पदार्थ केले जातात. शेवया, रवा, गव्हले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या खिरी यावेळी केल्या जातात. नागपंचमीला केलं जाणारं पुरणाचं वाफवलेलं दिंडं, दिव्याच्या अवसेला केले जाणारे बाजरीच्या वा कणकीच्या पिठाचे दिवे, लाल भोपळ्याचे घारगे तसंच गोड थालीपीठ आणि या पदार्थांमध्ये केलेला गुळाचा वापर महत्त्वाचा. तसंच उपवास केले, तरी त्यात साबुदाणा आणि शेंगदाण्यांचा अतिवापर टाळला पाहिजे. पावसाळा सुरू झालाच आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी तब्येतही चांगली ठेवूया...   

उकडशेंगोळे 
साहित्य :
दोन-अडीच वाट्या ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, तिखट, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद, तेल, पाणी. 
कृती : ज्वारीच्या पिठात हळद, हिंग, चवीनुसार मीठ व तिखट घालून त्याचा भाकरीसारखाच गोळा मळावा. त्याला किंचित तेल लावावं. या पिठाचे लहान लहान गोळे करून घ्यावे आणि हे गोळे हातावरच लांबट करावेत. दोन टोकं जुळवून शेंगोळे करून बाजूला ठेवावेत. कडबोळी वेटोळ्याच्या आकारात केली जातात, तशीच पीठ लांबट करून तोंडं जुळवून केली जातात, तशा आकारात हे शेंगोळे करतात. 
गॅसवर एका पातेल्यात नेहमीसारखी मोहरी-जिरं-हिंग-हळदीची फोडणी करावी. त्यात थोडं तिखटही घालावं. तसंच लसणाच्या पाकळ्या त्यात ठेचून घालाव्यात आणि पाऊण ते एक लिटर इतकं पाणी घालावं. चवीनुसार यातही मीठ घालावं. फक्त ज्वारीच्या पिठात मीठ घातलं आहे, हे लक्षात असू द्यावं. हे पाणी चांगलं खळखळून उकळू द्यावं. आता शेंगोळ्यांपैकी दोन-चार घेऊन ते किंचित पाण्यात मिसळून या उकळत्या पाण्यात घालावेत. चांगलं मिसळल्यावर एकेक करून शेंगोळे आत सोडावेत. आच बारीक करून चांगलं उकळू द्यावं. शेंगोळे शिजल्याचा अंदाज घेऊन, पातेल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा. करताना पाणी कमी वाटलं, तर थोडं घालावं. शेंगोळे खाताना सूपसारखं खमंग चवीचं पाणीही सोबत हवंच. तरी आवडीनुसार पाण्याचं प्रमाण ठेवावं. वाडग्यात घेऊन, शेंगोळे वर तूप घालून खावेत. वाटल्यास कोथिंबीरही घालावी. 
पर्यायी सूचना : शेंगोळे करताना ज्वारीबरोबरच थोडं बेसन व गव्हाची कणीकही घालतात. तसंच फक्त कुळथाच्या, म्हणजेच हुलग्याच्या पिठाचेही शेंगोळे केले जातात. पावसाळ्यात लसणाचा ठसका असलेले हे गरमागरम वाफाळलेले शेंगोळे खाण्याची मजा काही औरच असते.

काकडीचा खमंग झुणका 
साहित्य : काकड्या, मूगडाळीचं भरड पीठ (चणाडाळीचं चालेल), चवीनुसार मीठ, तिखट, फोडणीसाठी मोहरी-जिरं-हिंग-हळद, तेल किंवा तूप. 
कृती :  काकड्या किसून घ्याव्या. जाडसर कीस केला तर उत्तमच. पातेल्यात मोहरी-जिरं वगैरे घालून फोडणी करून त्यात काकडीचा कीस घालावा व परतावा. काकडीत असलेलं पाणी जरा आळू द्यावं. ते आळत आलं, की त्यात मीठ, तिखट वगैरे घालून नीट हलवावं. मग चणाडाळ किंवा मूगडाळीचं भरड पीठ त्यात घालावं. काकडीच्या किसाइतकंच किंवा जरा जास्त पीठही चालेल. पीठ घालून नीट मिसळून घ्यावं व थोडं परतावं. थोडावेळ झाकण ठेवून पुन्हा परतावं आणि मग गॅस बंद करावा. 
वाटल्यास वर चिरलेली कोथिंबीर घालावी. भाकरी किंवा पोळीबरोबर हा झुणका छान लागतो. 
पर्यायी सूचना : याप्रकारे कांदा-टोमॅटो किंवा दुधीचाही झुणका करता येईल. पीठ जरा भरड असलं, तर बरं पडतं, नाहीतर बेसन किंवा कुठलं दुसरं पीठ बारीक असेल, तर काकडी वा दुधीसारख्या पाणीदार भाज्यांमध्ये ते जिरून जातं. तसंच खूपच जास्त प्रमाणात घालावं लागतं. तसंच यात भाजणीचं पीठ घातलं तरी चालेल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, तेव्हा हा पदार्थ करायला चांगला आहे. गार पावसाळी हवेत काकडीची कोशिंबीर करून खायला नको वाटत असलं, तर अशावेळी हा झुणका नक्कीच करावा.

संबंधित बातम्या