विधा आणि दुविधा शाकाहाराच्या

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पोटपूजा
 

सध्या हिरवाईचे दिवस आहेत. पावसाळी भाज्या, रानभाज्या, उपासतापास, सणांची चाहूल आणि त्यानिमित्त केले जाणारे पदार्थ. या हवेत आरोग्याची जरा काळजी घ्यायची असल्यानं, हलक्‍या शाकाहारावर भर दिला जातो. शाकाहार आणि मांसाहार व मत्स्याहार याच्या गुणावगुणांची चर्चा नेहमी केली जाते. कधी कधी यावरून तीव्र मतभेदही होताना दिसतात. शाकाहार तेवढा ‘पवित्र’ आणि श्रेष्ठ आहे, असं मानणारे लोक आजही आहेत आणि या कथित ‘सोवळ्या’ प्रवृत्तीला नाकं मुरडणारेही कमी नाहीत. अशोक नायगावकरांची शाकाहारातली हिंसा टिपणारी गमतीशीर कविता उगाच काही रसिकांची दाद मिळवणारी ठरली नाही. शाकाहाराचा अतिरेक, समाजात भिंती उभ्या राहतील अशा वळणावर जातानाही दिसतो. शाकाहारींसाठी वेगळ्या वस्त्या किंवा गृहसंकुलं जणू राखीव ठेवण्याचा आग्रह खास करून मुंबईत दिसून येतो. यावरून वादंग आणि हमरीतुमरीवर येण्याचे प्रकारही घडतात. हे खरोखरच दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. वास्तविक शाकाहार ही जीवनपद्धती आहे, तशीच सामिष किंवा मांसाहारही. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ समजण्याचं कारण नाही. तो मूर्खपणा ठरेल. शाकाहारी व्यक्तीला मांसाहारी पदार्थ, त्यांचे वास इ. नको वाटणं हेही स्वाभाविक धरून चालू. पण आपली नापसंती तीव्रपणे व उघड उघड व्यक्त करण्याचा असभ्यपणाही केला जाऊ नये. काही (सगळ्या नव्हे) शुद्ध शाकाहारी माणसांना मांसाहाराचा तिटकारा असतो, त्यांना त्याचं दर्शन नको असतं, हे ते खाणाऱ्याला माहीत असतं. मुद्दामहून कोणी त्याचं प्रदर्शन मांडत नाही. पण त्याबद्दल सतत टोचत-बोलत राहिलं, तर त्याही लोकांना राग येणं, हेही स्वाभाविकच ना! (मांसाहार करणाऱ्यांपैकीही बहुतेकजणांना कोंबडी वा बकरा कापताना बघवत नाही.) त्यात आता शुद्ध शाकाहारी असं कोणी राहिलंय का, हेही तपासावं लागेल. विशिष्ट जाती वा कधी धर्मही, शाकाहारी असल्याचा संकेत असतो. पण आज कोणीही तेवढ्या काटेकोरपणे हे पळत नाही. अनेकजण मांसमच्छी खाऊ लागले आहेत. अंडी तर खूपच जण (बाकी शाकाहारी गटात मोडणारेही) खातात. अंडी शाकाहारी आहेत, मांसाहारी नव्हेत, हा युक्तिवादही जुनाच. महात्मा गांधीही परदेशात शिकायला असताना अंडी खात आणि अंडी म्हणजे मांसाहार नाही, अशी त्यांची समजूत होती. पुढे ती दूरही झाली. आता तर म्हणे, आमच्या कोंबड्यांना केवळ शाकाहारी आणि सात्त्विक खाद्य खायला घालतो, त्यामुळं त्यांना ‘शाकाहारी’ (?) दर्जा द्यावा; खरं तर त्यांना आयुर्वेदिकच समजलं जावं, असा युक्तिवाद केला जात आहे.
अर्थात हे मात्र मान्य करायला हवं, की शाकाहारात वैविध्य खूप असतं. एकच भाजी हरतऱ्हेनं करून दरवेळी तिला वेगळी चव देता येते. शिवाय मांसाहारी पदार्थांचा मसाला वापरून काही भाज्या केल्या जातात आणि त्यांचा चवीनं आस्वाद घेतला जातो. 
शाकाहारातले वादविवाद वगैरे बाजूला ठेवले, तरी ‘घासफूस’ खाणाऱ्यांमध्येही वैविध्य असतं. शाकाहाराच्याही वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्या बघितल्या, तर शाकाहारातल्या ‘उपजाती’ किती आहेत, ते लक्षात येतं. साधारणपणे भाज्या, दूध व दुधाचे पदार्थ, फळं, कंदमुळं, तृणधान्यं, कडधान्यं, सुकामेवा या गोष्टी शाकाहारात मोडतात. पण यातही भेद आहेत आणि काहीजण दूधदुभत्यालाही शाकाहाराबाहेर टाकतात. कारण शेवटी दूधही प्राणिजन्यच. तर अलीकडं शाकाहारापलीकडं ‘व्हेगन’ असा वर्ग आहे. ही मंडळी प्राण्याशी संबंधित असं दूध, चीज इत्यादीही खात नाहीत. मग जिलेटिनमध्ये प्राणिजन्य घटक असल्यानं त्याचा समावेश असलेले जेली वा इतर गोड पदार्थही व्हेगन लोक खात नाहीत. मधाचं सेवन करत नाहीत. काही व्हेगन्स हे फक्त जमिनीवर उगवलेल्या वनस्पतींवर आधारित घटकच खातात. काहीजण फार न शिजवलेलं अन्न खातात, नाहीतर त्यातलं सत्त्व नष्ट होतं, असं ते मानतात. अगदी कच्चेच घटक खाणारे लोकही असतात. 
मांसाहार न करणारे अहिंसेचं तत्त्व म्हणूनही तो खात नाहीत. आपल्याकडे मुख्यतः जैन धर्मीय मोठ्या संख्येनं या गटात मोडतात. अर्थात अलीकडं त्यांच्यापैकी काहीजण खातातही, पण उघडपणे नव्हे किंवा आपल्या घरी तर नक्कीच नाही. हॉटेलात जाऊन हे निषिद्ध खाणं खाणारे असे अनेकजण माहितीतले आहेत. (केवळ जैनधर्मीयच नव्हे, तर हिंदूंमध्येही अनेकजण असं करताना दिसतात.) जैन धर्मातली शाकाहाराची संकल्पना ही खूप काटेकोर आणि कडक आहे. जीवसृष्टीला दुखावून वा नष्ट करून तयार होणारे पदार्थ न खाण्याचा आणि आहाराप्रमाणेच विहारही असाच ठेवण्याचा संदेश हा धर्म देतो. म्हणूनच कांदे-बटाटे-लसूण, मुळं, कंद, मध, मश्रूम सारंच निषिद्ध. कारण ते जमिनीखाली उगवतं. अंजीर, उंबर, वड, या गटात मोडणाऱ्या झाडांची फळंही खाऊ नयेत, कारण त्यात किडे असू शकतात, हे तत्त्व. तर काहीजण, प्राणिजन्य असल्यानं दुधाचंही सेवन करत नाहीत. यीस्टमुळं पदार्थ आंबून त्यात जीवजंतू तयार होतात, त्यामुळं त्यांना बेकरीचे पदार्थही निषिद्ध असतात. वनस्पतींनाही शक्‍यतो त्रास द्यायचा नाही, हे पाळलं जातं, कारण त्यांनाही जीव असतोच. कांदे-बटाटे हे ‘अनंतकाय’ असतात, म्हणजे त्यात आणखी जीवनाची शक्‍यता असते. कारण त्याला अंकुर फुटू शकतात. मुळासकट भाज्या खाल्ल्या, तर ती त्या झाडाबाबतची हिंसा ठरते. शिळं अन्नही वर्ज्य, कारण त्यातही सूक्ष्म जिवाणू विकसित होतात. म्हणून मग दही, इडली, ढोकळा असे पदार्थही बादच. वाइन, बिअर व इतर अल्कोहोलिक पेयंही वरवर शाकाहारी वाटली, तरी आंबवण्याची प्रक्रिया व सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव त्यात असतोच, तेव्हा तीही वर्ज्यच. रात्रीच्या वेळी रांधू वा खाऊ नये, कारण त्यासाठी दिवा जाळावा लागतो आणि सूक्ष्म जंतू त्यात बळी पडतात, असं हा धर्म सांगतो. आजही कर्मठ जैन मंडळी सूर्यास्तापूर्वी जेवण करून घेताना दिसतात, ते यामुळे. शिवाय चामड्याच्या वस्तू न वापरणं, जीवजंतूंना पीडा होईल, याप्रकारे न चालणं, नाकाला जाळीदार मास्क लावणं, जेणेकरून जीवजंतू शरीरात शिरणार नाहीत वगैरेही आहेच. म्हणूनच पावसाळ्यात बाहेर न पडण्याचं व्रत जैन साधू पाळतात. जैनांप्रमाणं बौद्धांमध्येही शाकाहाराची महती सांगितली आहे. त्यातही वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्यानुसार आहाराबाबतचे नियम व संकेत निर्माण झाले आहेत. 
शाकाहाराचा मोठाच प्रभाव जैनांच्या आहारावर आणि पाककृतींवर आहे. त्यातही मग गुजराती, मारवाडी, बुंदेलखंडी, मराठी, कानडी, तमीळ अशा विविध ठिकाणच्या जैन लोकांच्या बहुविध पाकपद्धती आहेत. हॉटेलांमधूनही (जैन मंडळी बहुतेक करून शाकाहारी लेबल असलेल्या हॉटेलातच जातात) जैन पदार्थांची वेगळी यादी मेनूकार्डवर असते. त्या भाज्या किंवा डाळींमध्ये मग गाजर, बटाटे, बीट, कांदा, लसूण हे सगळे घटक वगळले जातात. म्हणून काही या पदार्थांचा स्वाद हरवतो, असं मुळीच नाही. त्यांचीही एक वेगळी खासियत असतेच. चवीनं खाणाऱ्याला त्यांची खुमारीही आवडणारीच असते. अर्थात दूधदुभतं, भाज्या किंवा जेवणाच्या वेळा याबाबत सगळेजण इतकं कडक पथ्य पाळत नाहीत. पण जैन धर्मानं घालून दिलेल्या शाकाहारविषयक दंडकांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी मोडतात. त्यामागची तत्त्वं काय आहेत, हे जाणून घ्यायला काय हरकत आहे? एरवी, ‘जीवो जीवस्य जीवनम’ हे तर आपण नेहमीच म्हणत असतो.  

पुदिन्याचे पराठे 
साहित्य : पुदिन्याची पानं, कणीक, लसूण, आलं, हिरवी मिरची किंवा तिखटाची पूड, हळद, हिंग, पाणी, तेल. 
कृती : पुदिन्याची पानं चिरून मिरची, लसूण व आल्याबरोबर वाटून घ्यावीत. कणकीत हा गोळा मिसळून त्यात चवीनुसार मीठ घालावं. मिरची घातली नसेल, तर तिखटाची पूडही कणकीत घालावी. हळद, हिंग व थोडं तेल टाकून कणकीचा गोळा भिजवावा. फार घट्ट करू नये. तवा तापत ठेवावा आणि कणकीचे छोटे गोळे करून पराठा लाटावा आणि तव्यावर तेल सोडून खरपूस भाजून घ्यावा. आवडीनुसार, चटणी वा सॉसबरोबर खाता येईल. 
पर्यायी सूचना : पिठात चणाडाळीचं पीठही घालता येईल. तसंच पुदिना उग्र वाटत असले, तर कोथिंबीरही त्याबरोबर वापरता येईल. लाटताना वरून तीळ भुरभुरले, तर चवही वाढेल आणि पोषणमूल्यही. एरवी मेथी वा पालकाचे पराठे केले जातातच. चटणीच्या व्यतिरिक्त पुदिना तेवढा खाल्ला जात नाही. म्हणून हे पराठे अधूनमधून करावेत. पुदिन्याची उग्र चव न आवडणाऱ्यांना हे पराठे नक्की आवडतील. याच पद्धतीनं शेपूचेही पराठे करता येतील. तेही पराठे छान लागतात.

मटकीची चटणी   
साहित्य :  दीड वाटी मोड आलेली मटकी, १ मोठा कांदा, पाव वाटी सोललेला लसूण, चवीनुसार मीठ, तिखटाची पूड, आल्याचा छोटा तुकडा. 
कृती : कांदा चिरून घ्यावा. मोड आलेली मटकी, कांदा आणि लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात किंवा मिक्‍सरवर जाडसर वाटून घ्यावं. त्यात मीठ व तिखटाची पूड घालावी. पुन्हा एकदा मिक्‍सरवर किंचित फिरवावं. चटकदार मटकीची चटणी तयार आहे. 
पर्यायी सूचना : या प्रकारची चटणी छान होते. कडधान्यं कच्चं खायला नको असेल, तर अगदी पाच-सात मिनिटं पातेल्यात पाणी घालून वर चाळणीत मटकी ठेवून वाफवून घ्यावी. शिजवू नये. जरा वाफवलं तरी पुरेसं आहे. गार झाल्यावर चटणी करावी. आवडत असेल, तर लिंबू पिळावं व किंचित साखर घालावी. या चटणीला वरून फोडणी दिली तरी चालेल. भाजी किंवा उसळीऐवजी अशी चटणी करून ती पोळी-भाकरीसोबत खाता येईल. हा चवबदल बहुतेकांना आवडेल. डब्यालाही हा पदार्थ चालेल. करायलाही सोपा आहे.  

जवस-कारळ्याची चटणी
साहित्य : जवस व कारळं वा खुरासणी प्रत्येकी प्रमाण एक वाटी किंवा आवडीनुसार. चवीनुसार मीठ, तिखटाची पूड. 
कृती : जवस व कारळं वेगवेगळं कोरडंच खमंग भाजून घ्यावं. या चटणीत मीठ व तिखट घालावं आणि मिक्‍सरवर आवडीनुसार बारीक करावं किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावं. 
पर्यायी सूचना : या चटणीत आवडीनुसार लसूण व थोडी चिंचही घालायला हरकत नाही. तसंच तीळ व शेंगदाणेही त्यात घालता येतील किंवा तीळ व दाणे एकत्र करून अशी चटणी करता येईल. कारळं व जवस यांची स्वतंत्र चटणीही केली जाते.

संबंधित बातम्या