अस्सा फराळ सुरेख बाई... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

पोटपूजा
 

आनंदाचे आणि उत्साहाचे दिवस सुरू होत आहेत. ‘दिवाळी दसरा हातपाय पसरा’ असं म्हणण्याचे दिवस आहेत हे. पावसाळा संपलेला असतो. (यावर्षी तो जरा जास्तच लांबला.) वातावरण प्रसन्न. हिरवंगार. पिकं तरारलेली. विविध भाज्या, फळं मिळू लागलेली. वातावरण हळूहळू निवळत चाललेलं. हवाही गारवा देऊ लागलेली. दसरा, शरद ऋतूची चाहूल देतो. पाठोपाठ कोजागरी पौर्णिमा चांदण्याचा उत्सव घेऊन येते. शरद ऋतूच्याच काळात येणारी दिवाळी म्हणजे तर मोठाच सण. दिव्यांच्या आणि आकाशकंदिलांच्या रूपानं प्रकाशाचा उत्सव साजरा होतो. दिवसाप्रमाणं रात्रीही उजळून निघतात. रांगोळ्या, फटाके, नवीन कपडे आणि इतर खरेदी हे सारं असतंच. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. पोटपूजा केल्याशिवाय कोणत्याही सणाला अर्थ नाहीच. दिवाळीतली खाद्यंती तर एकदम खास. गोड, तिखट, खारे सगळ्या चवींचे पदार्थ आणि पक्वान्नं दिवाळीत केली जातात. महाराष्ट्रात दिवाळीला खास होणारे खमंग आणि चवदार पदार्थ म्हणजे चिवडा, भाजणीची चकली, शेव, कडबोळी, वेगवेगळे लाडू, अनारसे, करंज्या, सांजोऱ्या वगैरे... याशिवाय दिवाळीच्या चार दिवसांमध्ये काही घरी बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी असे ताजे पदार्थही मुद्दाम केले जातात. खवय्यांचा हा सर्वांत आवडता सण आहे...

अलीकडं बारा महिने चकल्या, लाडू, करंज्या वगैरे पदार्थ बाजारात मिळतात. त्यामुळं दिवाळीच्या खास फराळाचं तितकंसं कौतुक राहिलेलं नाही. शिवाय मुलांच्या आवडीही जरा बदलल्या आहेत. दिवाळीच्या फराळात त्यांना आवडणारे पदार्थ असतातच असं नाही. तरीपण घरोघरी दिवाळीत फराळाचे पदार्थ केले जातात. करायला नाहीच जमलं, निदान बाहेरून आणले तरी जातात. कारण आजकाल तयार वा आधी नोंदवून हे सारे फराळाचे पदार्थ सहजपणे मिळतात. अर्थात बऱ्याचजणी सुटी घेऊन, वेळ काढून दिवाळीच्या फराळाची आखणी करताना दिसतात. एक एक पदार्थ जमेल तसा करतात. शेवटी, स्वतः केलेल्या पदार्थांची चव चाखण्यातली मजा वेगळीच. या निमित्तानं स्वतःच्या पाककलेला आव्हानही मिळतं आणि ते यशस्वीपणे पार पाडल्याचा आनंदही निराळं समाधान देऊन जाणारा असतो. 

दिवाळीचा फराळ ही एक पारंपरिक गोष्ट आहे आणि बऱ्याच शतकांची परंपरा तिला आहे. संपूर्ण भारतात दिवाळीचा सण साजरा होतो आणि फराळाचे पदार्थही केले जातात. प्रत्येक प्रांतात या पदार्थांचं वैविध्य असतं. फराळाचे पदार्थ खाण्याकरिता काळही उत्तम. कारण हवा बऱ्यापैकी थंड असते. (मात्र आजकाल हवामान बदलामुळं यात तसा फरक पडला आहे.) तेल व तूप वापरून केलेले तळणीचे पदार्थ, गोडाचे पदार्थ हे पचवण्याची ताकद शरीरात असते. यामुळं थंडीशी सामना करायलाही बरं पडतं. एकूण दिवाळीत हे पदार्थ करणं आणि खाणं हे एक ‘शास्त्र’ असतं... दिवाळीच्या फराळाची परंपरा दुसऱ्या बाजूनं शेतीप्रधान वातावरणाशीही जोडलेली आहेच. शेतातली कामं जरा निवांत झालेली असतानाचा हा काळ. प्राचीन काळापासून फराळाचे उल्लेख सापडतात. अगदी उपनिषदाच्या काळापासून. ‘भोजनकुतूहल’ या अकराव्या शतकातल्या पुस्तकात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख आहे. तसंच भारतात आलेला जगप्रसिद्ध पर्यटक अल बेरुनी याच्या लिखाणात दिवाळीचा सण व त्याकाळात केले जाणारे पदार्थ याबद्दल त्यानं लिहिल्याचं दिसून येतं. दिवाळीचे पदार्थ, जे मराठी मुलखात होतात, ते सारेच मूळचे इथले मात्र नाहीत. त्यांची मुळं भारतभरात पसरलेली आहेत. तसं प्रत्येकच प्रदेशाची विशेष ओळख एखाद-दुसऱ्या खाद्यपदार्थामुळं असतेच. जसं रसगुल्ला म्हटलं, की बंगाल आठवतो आणि मोदक-पुरणपोळी म्हटलं की महाराष्ट्र. पण पुरणपोळीवर कर्नाटकही हक्क सांगतो बरं का... पण बरेच पदार्थ कित्येक शतकांपासून इथं होत असल्यानं, ते इथलेच होऊन गेलेत. 

दिवाळीच्या पदार्थांनाही जी नावं पडली आहेत, ती कशी पडली असतील, असं वाटतं? दिवाळीतला खास पदार्थ म्हणजे, चकली. चकलीही दक्षिणेकडून आली असावी. आपण चकली म्हणतो, गुजराती व इतर काहीजण ‘चक्री’ म्हणतात. तसं पाहिलं, तर ते अधिक बरोबर आहे. कारण चकली असतेच चक्रासारखी गोल, गोल, वेटोळी... चकली म्हटलं, म्हणजे मराठी माणसाला आठवते ती भाजणीचीच चकली. तशा एरवी तांदळाच्या, ज्वारीच्या वगैरे चकल्या केल्या जातात. दक्षिणेकडं केले जाणारे तांदळाचे कडकडीत (साधे कुरकुरीत नव्हे) मुरुक्कू (शब्दाचा अर्थच वेटोळं) हाही चकलीसारखाच प्रकार आहे. चकरी, चक्रिका, चकुली अशीही तिची नावं आहेत. आजकाल तर काय, शेझवान चकलीही आली आहे. लोकांना जी चव आवडते, त्या चवीचे पदार्थ केले जातात. महाराष्ट्रातली चकली मात्र भाजणीचीच. ही भाजणीही प्रत्येकाची वेगळी. कुणी त्यात तांदूळ जास्त घालतात, तर कुणी चणाडाळ. कुणी हळद घालेल, तर कुणी घालणारच नाही. कारण मग तिचा रंग छान येत नाही. थालिपीठाच्या भाजणीची आणि चकलीच्या भाजणीची कृतीही वेगळी. त्यातले घटकही थोडेफार निराळेच. थालिपीठाच्या भाजणीत काही ठिकाणी कडधान्यं वापरतात, तर काही ठिकाणी डाळी. कडबोळीची भाजणी करतानाही असंच. यातही बहुतेकजण तांदूळ व कडधान्यं वापरतात. मुळात आपल्याकडं ‘अठरा धान्यांचं कडबोळं’ असंच म्हणतात. कडबोळी पुन्हा गोल चक्राकार आणि घोड्याच्या नालेसारखी उभट अशी दोन आकारात केली जातात. कर्नाटकात तांदूळ व चणाडाळीपासून करतात आणि त्याला ‘कोडुबळे’ म्हणतात. चकली कुरकुरीत तितकी चांगली, असं म्हटलं जातं. पण काही घरांत मुद्दाम मऊ चकली केली जाते. गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात सुप्रिया सुळे यांची मुलाखत झाली, त्यात त्यांनी ‘पवारांच्या घरात वर्षानुवर्षं मऊसर चिवट आणि अख्खी उलगडता येणारी चकली केली जाते व तीच सगळ्यांना आवडते,’ असं सांगितलं होतं. 

तर करंजी ही जुन्या काळात ‘शष्कुली’ म्हणून ओळखली जायची. तीही मूळची उत्तर प्रदेशातली, असं म्हणतात. तिकडं तिला गुजिया म्हणतात. छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पेडकिया, तर गुजरातेत घुघरा. इकडं ती करंजी झाली. गोव्यात नेवरी म्हणतात, तर आंध्र-तेलंगणात कज्जिकया. ओडिशात आणि महाराष्ट्रात करंजी म्हणतात. हा शब्द कसा आला, कल्पना नाही. पण करंजाचं जे झाड असतं, तिला येणाऱ्या शेंगांचा आकार करंजीसारखा असल्यामुळं हे नाव या पदार्थाला पडलं असावं, असं मनात येतं. करंज्याही ओल्या नारळाच्या, सुक्या खोबऱ्याच्या, ड्रायफ्रूट्सच्या, पुरणाच्या (कडबू) अशा विविध प्रकारे केल्या जातात. करंज्या मुरड घालून किंवा कातणानं कातरूनही केल्या जातात. वाटाणा, फ्लॉवर वगैरे तिखटाच्या करंज्या वेगळ्याच. नुसता गूळ घालून केले जाणारे कानवले किंवा कान्होले हा करंजीसारखाच एक प्रकार. 

अनारसेही प्राचीन काळापासून केले जातात. गंमत म्हणजे, अनारसे बिहार आणि महाराष्ट्र अशा दोनच ठिकाणी केले जातात. इकडं तरी ते फक्त दिवाळीत वा अधिकमासात केले जातात, पण बिहारमध्ये अनारसा हा खास प्रसंगीही केला जातो. अनारशाला संस्कृतात ‘अप्रुप’ असं म्हणतात.  

अनारसे अगदी निगुतीनं करावे लागतात. अनारसे कुणाला कुरकुरीत तर कुणाला मऊ आवडतात. शंकरपाळे खारे व गोड दोन्ही प्रकारात केले जातात. हे मूळचे शक्करपारे, म्हणजे साखरेचे तुकडे. पण मराठीत शंकराशी त्यांचं नातं जुळलं. हिंदीत मात्र शक्करपारे आणि नमकपारे असं गोड व खाऱ्या शंकरपाळ्यांसाठी वेगळे शब्द आहेत. 

कधी कधी प्रश्न पडतो, हा ‘फराळ’ शब्द कुठून बरं आला असेल? तर तो आला, ‘फलाहार’ या शब्दापासून! यातल्या अक्षरांची उलटापालट होऊन, ज्याला ‘वर्णविपर्यय’ म्हणतात, ‘फराळ’ हा शब्द जन्मला. पण आजच्या या फराळाशी फलाहाराचा संबंध नाही. दिवाळीचा फराळ हा फलाहाराप्रमाणं हलका, साधा नसतोच. पण शब्द आणि त्याचा अर्थ कशी वळणं घेत राहील याचा भरवसा नसतो. उपासाच्या पदार्थांनाही फराळ म्हटलं जातं. पण तो फराळ वेगळा. तो कितीही केला, तरी त्याला ‘जेवण’ अजिबात म्हणायचं नसतं. एखादा पदार्थ आवडीनं व मन लावून कुणी खात असेल, तर लगेच त्याला, ‘फराळ चाललाय वाटतं?’ असं म्हटलं जातं. आवडलेलं चट्टामट्टा करणं, या अर्थानंही ‘फराळ’ हा शब्द वापरतात. हा शब्द लहानपणापासून असा ओळखीचा आणि जिभेवर बसलेला. पहिलीच्या पुस्तकातली एक कविता इथं आठवली. ‘ही पहा खार’ असं म्हणून खारीची चपळाई त्यात वर्णन केली होती. त्यात तिला उद्देशून म्हटलं होतं, ‘शेंगांचा फराळ आवडतो, नाही का?’ ‘फराळ’ शब्दाचा हाही अर्थ तेव्हा त्यातून उमगला होता. ‘फराळा’तला हा खारीचा वाटा मोठा गमतीशीर आहे.  

मुगाचं गोड सुंदल 
साहित्य : दोन वाट्या हिरवे मूग, २ वाट्या बारीक केलेला गूळ, १ वाटी नारळाचा चव, पाणी, थोडं तूप, चिमूटभर मीठ, वेलचीपूड, २ चमचे तूप. 
कृती : मूग पाच तास तरी भिजवावेत. मोड आलेले घेतले तरी चालेल. भिजवलेले मूग बुडतील इतकं पाणी घालून ते कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. शिजल्यावर त्यातलं पाणी गाळून घ्यावं. ते आमटीला वगैरे वापरता येईल. एका कढईत गूळ घ्यावा आणि तो भिजेल अशा बेतानं त्यात पाणी घालावं. गॅस पेटवून गूळ विरघळू द्यावा. नंतर वाटलं तर हे पाणी गाळून घ्यावं किंवा तसंच वापरावं. विरघळलेल्या गुळात चिमूटभर मीठ घालावं. नंतर भिजवलेले मूग घालावेत आणि नीट हलवून एकत्र करावेत. गुळात मूग मिसळून पाच मिनिटं तरी शिजू द्यावेत. मग नारळाचा चव त्यात मिसळावा व चांगलं हलवून घ्यावं. थोडं शिजू द्यावं. त्यात वेलचीची पूडही घालावी. वरून तूप घालून हलवून घ्यावं. एकजीव झालं, की चविष्ट सुंदल तयार. बशीत घेऊन, वरून तूप घालून खायला आणखीच मजा येते... 
पर्यायी सूचना : यात काजूचे तुकडे, बदामाचे काप किंचित तुपात परतून वा तळून घालता येईल. आवडत असेल, तर जायफळही घालता येईल. गोड सुंदल सर्वसाधारणपणे मुगाचंच करतात किंवा सालीच्या मूगडाळीचं. पण हरभरे व मूग यांचंही एकत्र करून करता येतं. ‘सुंदल’ ही एक तऱ्हेची गोड उसळ किंवा पुरणच आहे. कर्नाटकात चणाडाळीचं ‘हयग्रीव’ करतात, तेही बरंचसं याच तऱ्हेचं असतं. नवरात्रीत तिखट सुंदल करण्याची परंपरा आंध्र, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडूत आहे. कधी गोड सुंदलही केलं जातं. रोज वेगवेगळ्या कडधान्यांचं सुंदल करतात. ही एकप्रकारची उसळच होय. मिश्र उसळही केली जाते. मात्र सुंदल रसदार न करता जरा कोरडंच करतात.

संबंधित बातम्या