मुख शुद्ध तुझं... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पोटपूजा
 

भरपेट आणि तृप्त जेवण केल्यानंतर तोंडात बडीशेप, सुपारी असं काही टाकल्याशिवाय या जेवणाची पूर्तता झाल्याचं समाधान लाभत नाही. असा एखादा मुखवासाचा किंवा मुखशुद्धीचा पदार्थ चावत-चघळत गप्पा मारणं, शतपावली करणं किंवा वाचत बसणं म्हणजे परमानंदच! शिवाय तोंडही यामुळं स्वच्छ होतं आणि पचनही चांगलं होतं. जेवणाचे इतके विविध पदार्थ आपण करतो, मग मुखवासात मागं कसे राहू? त्यातही प्रचंड वैविध्य असतंच. नावाप्रमाणंच मुखाला स्वच्छ-सुगंधी करणारे, जिभेची आणि एकूणच मुखाची अंतर्गत शुद्धी करणारे पदार्थ मुखवासात मोडतात. ते खाताना तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळं खाल्लेलं चांगलं पचतं, पोटात वायू धरत नाही वगैरे कारणांसाठी मुखवास खाल्ला जातो. तसंच यामुळं दातही स्वच्छ होतात. मनही प्रसन्न होतं. विशेषतः भारतात आणि पाकिस्तानात मुखवासाचे हे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. लवंग, वेलची, बडीशेप, सुपारी हे पदार्थ तसेच खाल्ले जातात, तर यांच्या मिश्रणातूनही वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. कधी पूड करून, तर कधी नुसतेच भाजून मुखवास तयार केला जातो. कधी त्यावर साखरेची आणि निरनिराळ्या रंगांची पुटंही चढवली जातात. इथल्या बऱ्याच हॉटेलांमधून जेवण वा खाणं झाल्यानंतर बशीत रंगीबेरंगी, शर्करावगुंठित बडीशेप किंवा बडीशेप आणि धनाडाळ व खडीसाखर असा मुखवास पेश केला जातो. जेवणाची थाळी देणारं हॉटेल असेल, तर काउंटरवर - वर खोबरं भुरभुरलेल्या विड्यांचा नजराणा तयारच असतो. हा विडा मात्र वेगळे पैसे मोजून घ्यावा लागतो. 

खाण्याची अशी समाधानपूर्ण परिसमाप्ती करणारा मुखवास ही खूप प्राचीन अशी भारतीय परंपरा आहे. यात अर्थातच नागवेलीचं म्हणजेच, विड्याचं पान हे मानाचं पान आहे. ‘पान’ इतकंच म्हटलं, तरी पुरतं. तो एक स्वतंत्र अध्यायच आहे खरं तर. पानाभोवतीच्या आख्यायिका, मिथकं आणि दंतकथाही अनेक. पार समुद्रमंथनापर्यंत पानाची ही कहाणी जाऊन पोचते. नागवेलीच्या पानांना संस्कृतात ताम्बूल, गुजरातीत नागुरवेल, तेलुगूत तमलपक्कू असे निरनिराळे शब्द आहेत. पानसंस्कृती वेदकाळापासून अस्तित्वात आहे. पानाला आणि सुपारीलाही हिंदू संस्कृतीत खास स्थान आहे. बारशापासून लग्नापर्यंत आणि वेगवेगळ्या पूजाविधींमध्येही विड्याचं पान आवश्यक असतं. सुपारीलाही कमी महत्त्व नाही. तीही सगळीकडं लागते. पतीपत्नींनी मिळून काही विधी करायचा झाला आणि पत्नी नसेल, तर तिच्याजागी सुपारी ठेवून विधी केले जातात. ‘पानसुपारी’ समारंभ या नावातच पान आणि सुपारीचं महत्त्व अधोरेखित होतं. पानाच्या जाती आणि आकारही खूप आहेत. किंचित तिखट, तुरट, कडवट आणि गोड अशा चवीचं हे पान औषधीही असतं. कोरड्या खोकल्यावर पान व ओवा खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. कफ, तोंडाची दुर्गंधी, अपचन कमी करण्यासाठी पान गुणकारी ठरतं. पान हे कृमिनाशकही असतं. बनारसमध्ये हिरवी पाने सफेदही केली जातात. त्याला पका पान म्हणतात. तर मगही (मगधी) पानही खूप प्रसिद्ध आहे. ते जास्त काळ टिकून राहतं. भारतात बऱ्याच ठिकाणी पानाची शेती होते. 

तयार केलेल्या पानाला ‘विडा’ असा शब्द आहे. तर पानाचे तुकडे आणि बडीशेप, लवंग, सुपारी, गुलकंद, वेलची, काथ, चुना इत्यादी घालून तयार केलेल्या मुखवासाला तांबूल म्हणतात. तांबूल घरच्या घरीही करता येतो आणि तसाच तो बाहेर तयारही मिळतो. विड्याची संस्कृती जशी उपकारक तशीच ती अतिरेक झाला, तर घातकही ठरू शकते. त्यात तंबाखूची जोड त्याला असेल, तर विशेषच वाईट. रोजच्या जेवणानंतरही विड्याचं पान खाणारे असतात. विशेष प्रसंगी किंवा सणावारी तर विड्याचं पान खाल्ल्याशिवाय भोजनाचं सार्थक होत नाही. बंगालमध्ये पान खाण्याचं प्रमाण खूप आहे. तिथल्या महिलावर्गाला तर रोज पान खाल्ल्यावाचून चैनच पड  नाही. महाराष्ट्रातही पान खाण्याचा रिवाज आहे.  पानसंस्कृतीमुळं पानासाठीचे चांदी-पितळ्याचे नक्षीदार डबे, सुपारी तोडण्यासाठी अडकित्ते असा सरंजामही रुजला. पानामध्ये सुपारी, बडीशेप, गुलकंद, गुंजांची पानं, चुना, काथ, खोबरं केशर, वेलची असे कैक पदार्थ घातले जातात. त्रयोदशगुणी विडा, गोविंदविडा असे विड्याचे प्रकार प्रसिद्धच आहेत. ‘विडा रंगणं’ हा प्रेमाचा संकेतही मानला जातो. परस्परांवर प्रेम असेल, तर विडा रंगतो म्हणे; तर आव्हान स्वीकारण्याला ‘विडा उचलणं’ असा वाक्प्रचार मराठीत आणि हिंदीतही रूढ आहे. पूर्वी राजामहाराजांकडून तांबूल किंवा विडा मिळणं हा मोठाच सन्मान मानला जाई. लोकगीतांपासून विविध कथांपर्यंत पान आणि सुपारीचे अनेक संदर्भ संस्कृत (वात्सायनाचं कामसूत्र, रघुवंश इत्यादी) आणि मराठी वाङ्‍मयात सापडतात. इतरही भारतीय भाषांमध्येही ते असतीलच. 

मुखशुद्धीसाठी बडीशेप, लवंगीसारख्या पदार्थांबरोबरच इतरही अनेक तोंडाची रुची वाढवणारे आणि पचनाला उपकारक ठरणारे घटक यात वापरले जातात. तसंच वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून मुखवास केला जातो. ‘सुपारी नसलेली’ सुपारीची पावडर केली जाते. यात मग तीळ, जवस, शोपा, जायफळ, जेष्ठमध, वेलची, केशर, धनाडाळ असे बरेच पदार्थ घातले जातात. यांची भाजून पूड करतातच किंवा मग खमंग भाजून एकत्र करून हे मिश्रण खाल्लं जातं. मुखवासात खरबूज, लाल भोपळ्याच्या वाळवून सोललेल्या बियाही वापरतात. तोंडाला चव आणणाऱ्या गोष्टींमध्ये मग जिरागोळी, हिंगोळी अशांचाही समावेश करायलाच हवा. आमसूल वा चिंचेची गोळीही छान लागते. साखर, जिरं वगैरे वापरून या गोळ्या केल्या जातात. त्याशिवाय आवळ्याची सुपारी हा एक लोकप्रिय आणि पाचक प्रकार आहे. आवळ्याचा कीस वा फोडी आलं, काळं मीठ वगैरे घालून वाळवून, ही सुपारी केली जाते. आवळ्याची गोड कँडीही मुखशुद्धी म्हणून खाल्ली जाते. मुखवास किंवा मुखशुद्धी खाणं ही एक सवय आहे. तसंच जेवणानंतर काय, पण अनेकांना काहीही खाल्लं, किंवा अगदी कपभर चहा चरी प्यायला, की थोडीशी बडीशोप तरी तोंडात टाकल्यावाचून चैन पडत नाही. काहींना जेवणानंतर काहीतरी गोड लागतं. मग तो गुळाचा खडा का असेना. तर जेवणानंतर पेढे वगैरे मिठाईही खाणारे असतात. रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मकथेत, न्यायमूर्ती रानडे यांना जेवणानंतर ‘मुखशुद्धी’ म्हणून चक्क बेसनाचे लाडू किंवा मिठाई खायला आवडत असल्याचा उल्लेख आहे, त्याचं इथं ओघानं स्मरण झालं. 

पाश्चात्त्य देशांतून आलेला च्युइंग गम हाही एकप्रकारे मुखशुद्धीचाच प्रकार. च्युइंग गमलाही मोठा इतिहास आहे. एक तऱ्हेचा डिंक, साखर, वगैरेंच्या मिश्रणातून तो जन्माला आला. त्याला वेगवेगळ्या फ्लेवर्सचा व रंगांचा साज चढवला गेला. च्युइंग गमचं पहिलं पेटंट 1869 मध्ये दाखल झालं; तर पहिला सुगंधित च्युइंग गम 1860 मध्ये बनला, अशा नोंदी आहेत. च्युइंग गमची बाजारपेठ आज किती मोठी आहे, हे काही वेगळं सांगायला नको. मुलांना प्रिय असणारा बबल गम यातूनच जन्माला आला. च्युइंग गममुळं तात्पुरता उत्साह वाढतो, असं दिसून आलं आहे.. तर साखरविरहित च्युइंग गममुळं दातांचं आरोग्य सुधारतं असा दावा केला जातो. तो सारखा चघळत  

राहिल्यानं तोंड स्वच्छ होतं आणि तोंडाला व्यायाम मिळतो, असं सांगणाऱ्या जाहिरातीही येत असत. मुलांपासून मोठ्यांपर्यंत च्युइंग गम खाण्याचं वेड दिसतं आणि जाहिरातींमुळं ते वाढीस लागतं. जगात आणि भारतात च्युइंग गमचे शेकडो ब्रँड्स लोकप्रिय आहेत, ते उगाच नाही. 

एकूणच, मुखवास हा केवळ तोंडाला चाळा नाही. तो तोंडाची शुद्धी करणाराही आहे. उत्तम भोजनानंतरची मुखशुद्धी ही एक चांगलीच सवय म्हणायला हवी. 


सुपारीविरहित सुपारी
साहित्य :  पाव किलो बडीशेप, 100 ग्रॅम ओवा, शोपा, जेष्ठमध, धनाडाळ प्रत्येकी, 25 विड्याची पानं, एक जुडी तुळस, पाच-सहा लवंगा, बोटभर दालचिनीचा तुकडा, आठ-दहा वेलची, चवीनुसार साखर, थोडं मीठ. 
कृती :  पानं आणि तुळस वगळता बाकी जिन्नस कोरडेच बाजून घ्यावेत. तुळशीची पानं वेगळी करावीत आणि विड्याच्या पानांबरोबर स्वच्छ धुऊन व पुसून कापडावर पसरून ठेवावीत. जरा वेळानं पानांचे तुकडे करून ते इतर सामानात मिसळावेत आणि मिक्सरवर बारीक करावेत. ही सुपारी पाचक आणि चवदारही असते. 
पर्यायी सूचना : यातलं प्रमाण जास्त वा कमी करू शकता. तिखट कमी हवं, तर ओवा कमी घालू शकता. साखर वगळली तरी चालेल. मीठ सैंधव वापरलं तर उत्तमच.


तांबूल 
साहित्य :  विड्याची पानं, काथ, थोडा चुना, कातरलेली सुपारी, चिकणी सुपारी, लवंग, जेष्ठमध, खोबऱ्याचा कीस, वेलची, गुलकंद (प्रमाण आवडीनुसार), पानं अर्थातच जास्त. 
कृती :  विड्याची पानं धुऊन त्यांचे देठ काढावेत व पुसून कोरडे करून या पानांचे तुकडे करून घ्यावेत. पानांचे तुकडे आणि गुलकंद वगळता वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावं. त्यात गुलकंद नीट मिसळावा आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून हलके फिरवावं. तांबूल काचेच्या बरणीत भरून ठेवावा. 
पर्यायी सूचना :  तांबूल करताना त्यात याशिवाय थोडी बडीशोप, तीळ, ओवा, आसमानतारा, धनाडाळ, चेरी, हेही घालू शकता.


ओल्या तूरदाण्यांची कचोरी 
साहित्य : दोन वाट्या तुरीचे दाणे, तीळ, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, लिंबूरस, साखर, मैदा किंवा बारीक रवा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. 
कृती :  तुरीचे दाणे मिक्सरमधून काढून घ्यावेत. मिरचीही वाटून घ्यावी. कढईत जरा तेल घालून तीळ, मोहरी, हिंग, हळद घालून वाटलेले तुरीचे दाणे त्यात घालावेत. एक वाफ आणावी. मग मीठ, खोबरं, कोथिंबीर, लिंबूरस व किंचित साखर घालून परतावं व पुन्हा एक वाफ आणावी. मैदा किंवा रवा घट्ट भिजवून घ्यावा. पुरी लाटून त्यात केलेलं सारण भरावं व वळून त्याची गोल कचोरी करावी. कचोऱ्या करून ठेवाव्यात आणि मग तेलात खमंग तळाव्यात. 
पर्यायी सूचना :  तुरीच्या शेंगांप्रमाणं कोवळे वाटाणे वापरूनही कचोरी चांगली होते. या सारणात गाजरही किसून घालता येईल. तसंच कोवळ्या हरभऱ्यांचाही वापर करता येईल.

संबंधित बातम्या