कन्व्हर्टेबल लाइफस्टाइल

आशिष देशपांडे
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

कोरोनाच्या संकटामुळे माणसाला माणसाची खरी किंमत काही प्रमाणात कळली असे म्हणावेच लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येकालाच आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूचे महत्त्व या लॉकडाउनने शिकवले!

घरातच बंद होऊन राहायची वेळ आल्यानंतर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याच घरांत आपापली जागा शोधताना गोंधळले होते. त्यात वर्क फ्रॉम होम, शाळा, कॉलेज वगैरे न संपणारी यादी. पण काहीही असले तरी व्यक्तीगणिक गरजा बदललेल्या आहेत, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. नव्याने लक्षात आलेल्या या गरजांना साजेसे आपले घर आहे का? कोरोनानंतर आपल्या राहत्या घरात बदलेल्या गरजांनुरूप बदल प्रत्येकालाच आवश्यक वाटू लागले आहेत. आणि याची सुरुवात होते घराच्या उंबरठ्यापासून.

एन्ट्रन्स
प्रत्येक घरालाच जुन्या पद्धतीप्रमाणे एक व्हरांडा असण्याची गरज या पुढे नक्कीच जाणवेल. त्यामुळे सेल्फ सॅनिटायझेशनच्या सोयी लक्षात घेऊनच आता घराचा प्रवेश (एन्ट्रन्स) मांडावा लागेल. कुरिअरने आलेल्या व आपण बाहेरून आणलेल्या वस्तूंसाठी घराच्या बाहेर एक वेगळी जागा निश्चित करावी लागेल, त्याच बरोबर शू रॅकची रचना करताना प्रत्येक वस्तू सॅनिटाइझ करून ठेवण्यासाठी जागा ठेवावी लागेल. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मास्कसाठी जागा करणे गरजेचे आहे. नवीन वस्तूंसोबतच, जुन्या, वापरातल्या वस्तू ठेवण्यासदेखील जागा करावी. छत्र्या/ रेनकोट/ ओव्हरकोट/ टोप्या अशा अनेक वस्तू इथे ठेवता यातील.   

बैठकीची खोली
आजच्या गरजेनुसार बैठकीच्या खोलीत वावरणाऱ्या मंडळींना आपापसांत पुरेसे अंतर ठेवून वावरता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. बराच वेळ घरात जात असल्या कारणाने बैठकीची मांडणी सोईस्कर व सुटसुटीत अशीच हवी. बैठकीच्या खोलीचेच ऑफिसच्या जागेमध्ये रूपांतर होऊ शकेल अशी आसन व्यवस्था करणे गरजेचे ठरत आहे. या खोलीतील सोफे किंवा रिक्लाईनर्स यांचे कापड अत्यंत काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक वेळेस त्याची स्वच्छता करणे सोपे गेले पाहिजे. 

मास्टर बेडरूम 
कोरोनानंतरच्या काळात अंतर्गत सजावटकारांसमोर कमी जागेत उपलब्ध खोलीचा विचारपूर्वक बहुउद्देशीय वापर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. कुटुंबातील सदस्यांचा सारा वेळ घरातच जात असल्यामुळे  बेडरूमचा वापर हा फक्त झोपण्यासाठी राहिला नाही. त्याहीपेक्षा कन्व्हर्टिबल रूम या नवीन संकल्पनेतून नवी रचना निर्माण करावी लागेल. यात मेडिटेशन, व्यायाम, पूर्ण वेळ ऑफिस अशी संरचना करावी लागेल. त्याच बरोबर नव्या संरचनेत आरामदायक बेडची व्यवस्था, ड्रेसिंग युनिट असेही सर्व बदल करावे लागतील.

मुलांची खोली 
बाकी घरात जसे बदल झाले तसेच मुलांच्या खोलीत पण बरेच बदल झाले. ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे शाळा घरातच आली असल्याने जागेचा तुटवडा भासतो आहे. त्यात प्रत्येकास ‘प्रायव्हसी’ आवश्यक आहे. त्यामुळे फर्निचरची रचना त्या पद्धतीने करावी. या बरोबरच मुलांना घरातील बाकी  व्यक्तींनादेखील सामावून घ्यावे लागते किंवा ती खोली आयसोलेशन रूम म्हणून वापरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे त्या खोलीची रचना व इतर वस्तू मुव्हेबल असाव्यात .

स्वयंपाकघर 
स्वयंपाकघरातही बरेच बदल झालेले दिसून येतात. काम करणाऱ्या माणसांची जागा काही प्रमाणात यंत्रांनी घेतल्यामुळे स्टरलायझेशन होऊन वस्तू जागच्या जागी गेलेल्या दिसतात. पण किचनमधला वाढलेला वावर बघता त्या जागेला एनर्जेटिक ठेवणे महत्त्वाचे आहे. लॉकडाउनच्या भीतीने किराणा व धान्य साठवणूक करण्याला प्राधान्य दिले जात असल्याने स्टोअर रूमची/ स्पेसची गरज भासायला लागली. त्याच बरोबर भांडी स्वच्छ करण्यासाठी, झाडलोट करण्यासाठी नवीन आलेले रोबो, इतर यंत्रांसाठीही जागा निर्माण करणे आवश्यक झाले.

या सर्वांव्यतिरिक्त वास्तूत इतरही अनेक बदल आवश्यक ठरत आहेत. घरातील वीज रचना हा एक मोठा टास्क आहे. सगळ्यांनाच नवीन पॉइंट्स करून घ्यावे लागले. सेन्सर लाईटचा वापर वाढला. त्याच बरोबर नव्याने आलेल्या गॅजेट्ससाठी सोय करावी लागली. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा इलेक्ट्रॉनिक्सचा वाढता वापर पाहता त्या साधनांमुळे निर्माण होणाऱ्या गरजाही पूर्ण करणे आवश्यकच आहे. घरातील प्लम्बिंगमध्ये बदल करण्याचीही गरज भासू लागली आहे, जेणेकरून नळांना फार वेळा हात न लावता हात धुता येणे शक्य होईल. त्यासाठी सेन्सर टॅप्स वापरात आणावेत किंवा राउंड टॅप न वापरता इतर उपलब्ध टॅप पाहावेत. जुन्या काळी दाराबाहेरच पाय धुऊन घरात यायची पद्धत होती, आज पाण्याच्या त्या बादलीची जागा सॅनिटायझर पॅडनी घेतली आहे!

घरातील प्रत्येक व्यक्ती घरूनच काम करत असल्याकारणाने प्रत्येकाला प्रायव्हसी हवी आहे. व्हर्चुअल ऑफिसेस, शाळा व इतर गोष्टींमुळे रूम साउंडप्रूफ असणे आवश्यक वाटत आहे. प्रत्येकाला गॅजेट्स वापरता येतील अशी जागा देणेही आज गरजेचे झाले आहे. कोरोनामुळे लहान मुले व वयस्कर व्यक्तींच्या विहारावर नियंत्रणे आली. ती बंधने लक्षात घेऊन नवीन रचना करणे गरजेचे भासू लागले आहे. घराबाहेर न पडू शकणाऱ्या सदस्यांसाठी घरातील बाल्कनी गार्डनचा फील देईल अशा पद्धतीने सजवावी. त्यामुळे घरातदेखील त्यांचा वेळ चांगला जाईल. अनेकजण बाल्कनीत चार दोन कुंड्या ठेवून बाल्कनी सुशोभित करतात, पण तेवढ्याने ते गार्डन वाटणार नाही. त्यामुळे आभासी जागा निर्माण करणे गरजेचे आहे. 

चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक सिनेमाप्रेमी लोक सध्या घरातच मोठे प्रोजेक्टर बसवून घेतात. ओटीटीवरील चित्रपट, वेबसीरीज मोठ्या पडद्यावर पाहिल्यासारखा फील मिळण्याला त्यांचे प्राधान्य असते. ज्यांच्या घरात एखादी जास्तीची खोली मिळत असेल त्यांनी खरंच या व्हर्चुअल गोष्टींचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही. कन्व्हर्टिबल फर्निचरचा वापर केल्यास प्ले रूम, म्युझिक  रूम, योग रूम असा कितीतरी पद्धतींनी या एक्स्ट्रॉ रूमचा वापर होऊ शकतो .
या सगळ्यासोबतच नव्याने भेडसावणाऱ्या वैद्यकीय अडचणींच्या दृष्टीनेही इंटेरियरमध्ये काही बदल करावेत. उदाहरणार्थ व्हेंटिलेटेड रूम्स, डोळ्यांना शांतता देणाऱ्या ग्रीनरीचा जास्तीत जास्त वापर. नैसर्गिक प्रकाश घरात यावा यासाठी काही भिंतींची रचना आणि जागा बदलावी लागली तरी चालेल कारण घरातून बाहेर न पडू शकणाऱ्या व्यक्तींना पुरेसे ऊन मिळणे हीदेखील खरंच गरज बनली आहे. 

कोरोनानंतर घरात, घराच्या सजावटीत होणारे बदल कदाचित अनेकांच्या कल्पनांच्या पलीकडचे असतील. पण माणसाच्या जगण्याच्या गरजा छोट्या जरी असल्या तरी आहे त्या जागेत नाती आणि माणसं सांभाळत आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ते बदल कमी जास्त प्रमाणात जो तो आपापल्या सोयीने नक्कीच करून घेत आहे. या जगावेगळ्या परिस्थितीत घरात राहणं अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी घरांच्या रचनांमधले हे बदल कदाचित आपली गरजही बनलेले असतील.
 

(लेखक इंटिरिअर डिझाईनर आहेत.)

संबंधित बातम्या