सुंदरसे अलंकार  

ज्योती बागल 
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

सध्या सर्वप्रकारच्या दागिन्यांमध्ये टेंपल ज्वेलरीचा ट्रेंड असल्याचे दिसते. म्हणजेच टेंपल डिझाईनमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, झुमके, बांगड्या असे सर्वच दागिने उपलब्ध असल्याने या सर्वांचा मिळून मॅचिंग असा एक सेटच तयार करता येतो, त्यामुळे ब्रायडल सेटसाठी टेंपल ज्वेलरीला जास्त मागणी दिसते. तसेच यामध्ये फॅन्सी आणि मॅट फिनिशिंग असलेले दागिने येतात, जे हल्लीच्या तरुणींना जास्त आवडतात. अर्थात यात कलकत्ता, राजस्थानी, बंगाली अशी इतरही डिझाईन्स उपलब्ध आहेत. याबरोबरच हल्ली लाखी दागिन्यांनाही चांगली मागणी दिसते कारण या प्रकारात, कमी वजनात पण आकाराने मोठे दिसतील असे दागिने करता येतात. शिवाय त्यावर हॉलमार्क असल्यामुळे एक्स्चेंजला वेट टू वेट एक्स्चेंज मिळू शकतो. 

‘जुने ते सोने’ ही म्हण एकूण सर्वच गोष्टींना लागू होते. त्यामुळे जुन्याच फॅशनला एक नवीन रूप देऊन पुन्हा बाजारात आणले जाते आणि ग्राहक त्या नव्या रूपाला पसंती देतात. दागिन्यांच्या बाबतीत तर हे सर्रास पाहायला मिळते. ‘कोल्हापुरी साजा’ला सध्या पूर्वीपेक्षा जास्त पसंती मिळत असून इतर दागिन्यांच्या तुलनेत या दागिन्याची सर्वाधिक होत असल्याची माहिती सोने विक्रेत्यांकडून मिळते. कारण हल्ली पारंपरिक कोल्हापुरी साजाला थोडेसे मॉडिफाय करून टेंपल ज्वेलरीचा टच दिलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच तर कोल्हापुरी साज आणखी जास्त आकर्षक दिसू लागला आहे.    

कोल्हापुरी साजासह ट्रॅडिशनलमध्ये मोहनमाळ, चपला हार, बकुळ हार, ठुशी, वज्रटीक, चिंचपेटी, तन्मणी असे गळ्यातील दागिने नव्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. ठुशीमध्येही बऱ्याच व्हरायटी उपलब्ध असून लाखी मनी आणि पेंडंटमुळे त्या आणखी उठून दिसतात. ठुशी साधारण तीन-साडेतीन ग्रॅमपासून पुढे घेऊ तशा उपलब्ध आहेत. मोहनमाळ साधारण २०-२५ ग्रॅमपासून पुढे आहे. 

मंगळसूत्रामध्ये शॉर्ट-लाँग आणि हेवी व लाइटवेट असे प्रकार उपलब्ध आहेत. खास लग्न समारंभासाठी काळ्या मण्यांतील मोठे पेंडंट असलेल्या पारंपरिक आणि आणि रोजच्या वापराकरिता काळे मणी आणि छोट्याशा सोन्याच्या वाट्या किंवा सोन्याचे अथवा डायमंडचे अगदी नाजूक पेंडंट असलेल्या शॉर्ट मंगळसूत्रांना मागणी असल्याचे दिसते. ही शॉर्ट मंगळसूत्र साधारण पाच ग्रॅमपासून १५ ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहेत. लाँग मंगळसूत्र २५ ग्रॅमपासून अगदी ५० ग्रॅम, ७० ग्रॅम, ८० ग्रॅम यानुसार पुढे घेऊ तसे उपलब्ध आहेत. यामध्ये टेंपल डिझाईनला जास्त मागणी आहे. 

नेकलेसमध्ये टेंपल आणि कलकत्ती या दोन डिझाईनमध्ये शॉर्ट आणि लाँग नेकलेस उपलब्ध आहेत. तसेच कुंदन नेकलेस, ऑक्सिडाइज्ड नेकलेस असेही प्रकार उपलब्ध आहेत. टेंपलचे शॉर्ट नेकलेस साधारण ३० ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत, तर लाँग नेकलेस ४० ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत. बऱ्याचदा गोल्डन नेकलेसमध्ये जे रेड-ग्रीन असे खडे वापरले जातात, ते शक्यतो सेमी प्रेशियस असतात. त्यामुळे हे नेकलेस सर्वच प्रकारच्या ड्रेसवर किंवा साड्यांवर मॅच होऊन जातात. टेंपल ज्वेलरीमध्ये शक्यतो रेड आणि ग्रीनच खडे वापरले जातात.     

बांगड्यांमध्ये टेंपल वर्क, कलकत्ती वर्क, प्लेन बांगडी आणि पाटल्या यांसह आणखी बरेच प्रकार उपलब्ध आहेत; मात्र ट्रॅडिशनल पाटल्या-बांगड्यांना जास्त मागणी असून त्यामध्येदेखील टेंपल डिझाईनला जास्त मागणी आहे. शिवाय यलो कलकत्ती हा प्रकारही पाहायला मिळतो.     

कानातल्यांमध्ये झुमके, रिंगा, चांद बाली, छोटे-मोठे टॉप्स असे नेहमीचे प्रकार, पण नव्या डिझाईनमध्ये पाहायला मिळतात. एव्हरग्रीन समजल्या जाणाऱ्या झुमक्यांनाच जास्त मागणी दिसते. मोठे झुमके १५-२० ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे येतात. छोटे टॉप्स अगदी दोन-अडीच ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. झुमक्यांबरोबर बऱ्याचदा मॅचिंग कान चेन घेतले जातात. हे साधारण तीन-साडेतीन ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे मिळतात.  

अंगठ्यांमध्ये टेंपल वर्क, कलकत्ती वर्क, बंगाली वर्क आणि अमेरिकन डायमंड हे प्रकार उपलब्ध आहेत, मात्र हल्ली रोडियम पॉलिश किंवा थोडेसे कास्टिंगमध्ये रेट्स असतात. यामध्ये लेडीज अंगठ्यांची रेंज तीन-चार ग्रॅमपासून, तर जेंट्सची पाच ग्रॅमपासून पुढे आहे. याव्यतिरिक्त वेडिंग बँड रिंग, कपल बँड रिंग मिळतात. त्याचबरोबर नेकलेस सेटवर मॅचिंग अशा फॅन्सी अंगठ्याही मिळतात.  

 नथी साधारण दोन-तीन ग्रॅमपासून पुढे उपलब्ध असून पुढे घेऊ तशा आहेत. यामध्ये सोन्याची आणि मोत्यांची नथ हे दोन प्रकार जास्त चालतात. बऱ्याचदा टीव्हीवरील मालिकांमध्ये वेगवेगळ्या पात्रांनी घातलेल्या नथींप्रमाणे नथींना विशेष मागणी दिसते. याशिवाय चेनमध्ये महिलांसाठी अगदी नाजूक अशा चेन उपलब्ध आहेत, तर जेंट्ससाठी बॉक्स चेन, इंद्रजित चेन, रोप चेन, बोगॅम्बो चेन असे प्रकार पाहायला मिळतात. त्यांची साधारण रेंज पाहिली साधी चेन पाच ग्रॅमपासून मिळते तर मोठ्या चेन ५० ग्रॅम, १०० ग्रॅमपासून पुढे घेऊ तशा आहेत. बाजूबंद आणि वाकीमध्ये टेंपल आणि कलकत्ती हेच दोन प्रकार अधिक लोकप्रिय आहेत. टेंपलचा अँटिक बाजूबंद मिळतो तर वाकीमध्ये चटई वाकी पाहायला मिळते. हे साधारण २५ ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. हल्ली सोन्याचे पैंजणही लोक खरेदी करताना दिसतात. यामध्ये सिंपल पैंजण साधारण १५-२० ग्रॅमपासून उपलब्ध आहेत.               

(लेखात दिलेल्या किमतीत आणि वजनात बदल होऊ शकतो.)

कोरोनानंतरच्या अनलॉकनंतर लाईटवेट ज्वेलरीचा जास्त ट्रेंड आलेला आहे. म्हणजे कमी वजनात नेकलेस, मंगळसूत्र, चेन, चोकर या दागिन्यांना मागणी जास्त आहे. सध्या सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे मागणीही चांगली आहे. शिवाय पुढे लग्नसराईचा सीझनमुळे सोने व चांदी दोन्हींना डिमांड चांगली आहे. अलीकडेच झालेल्या गणपती उत्सवात देवाचे दागिने आणि पूजेचे साहित्य यांना चांगली मागणी होती. नवीन ट्रेंडमध्ये दक्षिण भारतात तयार केली जाणारी अँटिक पॉलिश, गेरू पॉलिश ही लाईटवेट टेंपल ज्वेलरी उपलब्ध असून याला मागणीही चांगली आहे. ब्रायडल सेक्शनमध्ये अनकट डायमंड (म्हणजे लाखेशिवाय) आणि जडावू ज्वेलरी एकदम क्लासी असल्याने डिमांडमध्ये आहे. शिवाय कॉर्पोरेटमध्ये काम करणारे आणि ३०-३५ वयातील तरुण यांचीदेखील रोजच्या वापरासाठी १५-२० हजारांत असणाऱ्या डायमंड रिंग, डायमंडचे पेंडंट, डायमंड बाळी, कानातले टॉप्स, लाइटवेट चेन या दागिन्यांची मागणी वाढली आहे.          
- वास्तुपाल रांका, संचालक, रांका ज्वेलर्स  

कोरोनामुळे पुन्हा थोडी भीती होती की मागणी घटेल की काय, परंतु कोरोनानंतर दागिन्यांना चांगली मागणी वाढलेली आहे. सोन्याची किंमतही रिझनेबल आहे. सोन्याचा दर ५५ हजारांवरून ४७-४८ हजारांवर आला आहे. म्हणजे एका वर्षभरामध्ये ७-८ हजारांनी खाली आला आहे. त्यामुळे लोकांना सोने खरेदीसाठी ही एक संधीच आहे असे म्हणता येईल. सध्या लाईट वेट दागिन्यांचा ट्रेंड असला तरी हाय वेटच्या दागिन्यांनाही मागणी आहे. कारण लोकांचे समारंभांमध्ये जे पैसे वाचलेत ते दागिने खरेदी करण्यासाठी वापरले जात आहेत. दसऱ्याच्या दागिन्यांसाठी ग्राहकांच्या मागण्या घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी आम्ही ग्राहकांच्या मागणीवर भर दिला आहे, कारण तरुण पिढीच्या लोकांना ट्रेंडी आणि लाइटवेट दागिने जास्त आवडतात. त्यासाठी आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे आणि कमी किमतीचे डायमंडचे फिक्सरेट कलेक्शन आहे.
- अमित मोडक, संचालक-सीईओ, पीएनजी अँड सन्स लि.  

सध्या टेंपल ज्वेलरीची फॅशन आहे. बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये लाँग आणि उठावदार ज्वेलरी पाहायला मिळत असल्याने महिलांमध्येदेखील त्यांचीच क्रेझ आहे. नेकलेसमध्ये ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये टेंपल नेकलेस, कुंदन नेकलेस, ऑक्सिडाइज्ड नेकलेस मुलींना फार आवडतात. बऱ्याचदा बजेट कमी असेल तर लाखी दागिने खरेदी केले जातात, कारण कमी पैशांत पण सुंदर असा ब्रायडल सेट तयार होतो. शिवाय हल्ली नेहमीच्याच दागिन्यांमध्ये बऱ्याच डिझाईन्स आणि व्हरायटी उपलब्ध झाल्यामुळे नऊवारी साडी असेल तर टेंपल ज्वेलरी, लेहेंगा चोळीवर कुंदन ज्वेलरी अशी खरेदी केली जाते. दिवाळीनंतर असणाऱ्या लग्नांची खरेदी खरेतर दसऱ्यापासून सुरू होते. त्यामुळे नेकलेस, मंगळसूत्र हेच दागिने जास्त खरेदी केले जातात.’     
- सोनाली जगताप, सुपरवायझर, पीएनजी ज्वेलर्स प्रा. लि.
 

संबंधित बातम्या