ट्रेंडी होम अप्लायन्सेस

ज्योती बागल
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

दसरा-दिवाळी म्हणजे मनसोक्त खरेदी! मग ती दागिन्यांची असो किंवा होम अप्लायन्सेसची. रोजच्या वापरासाठी आवश्यक अशा होम अप्लायन्सेसमध्ये फ्रिज, टीव्ही, एसी, कुलर, फॅन, वॉशिंग मशिन, मिक्सर, आटा चक्की, मायक्रोवेव्ह, टोस्टर, इंडक्शन कुकर आणि आणखी बऱ्याच वस्तूंचा समावेश होतो. या अप्लायन्सेसच्या लेटेस्ट ट्रेंडविषयी...

टीव्ही आणि होम थिएटर हे आता आपल्या घराच्या दिवाणखान्यातील अविभाज्य घटक झालेले आहेत. सध्या यामध्ये अनेक कंपन्यांचे साधे आणि स्मार्ट टीव्हीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. टीव्हीमध्ये सोनी, पॅनासॉनिक, वनप्लस, रेडमी, एलजी, सॅमसंग, फिलिप्स, हायसेन्स इत्यादी ब्रँड उपलब्ध आहेत. एलजीच्या ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्हीची किंमत १९ हजार आहे. सोनी ब्राविया अल्ट्रा एचडी फोर के एलईडी अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीची किंमत ६२ हजार रुपये. वनप्लसचा वाय सीरिजमधील फुल एचडी एलईडी स्मार्ट टीव्ही २९,५०० रुपयांना मिळतो; तर सॅमसंग सिरीज फाइव्ह फुल एचडी एलईडी स्मार्ट टीव्हीची किंमत ३९,५०० रुपये आहे. होम थिएटरमध्येदेखील याच कंपन्यांची मॉडेल्स उपलब्ध असली तरी सोनीच्या होम थिएटरला मात्र जास्त मागणी आहे. यांच्या साधारण किमती ३,५०० रुपयांपासून अगदी दोन-अडीच लाखांपर्यंत आहेत.  

रेफ्रिजरेटरमध्ये व्हर्लपूल, एलजी, हायर, सॅमसंग, बॉश, गोदरेज, सोनी, पॅनासॉनिक या कंपन्यांबरोबरच आणखी बऱ्याच कंपन्यांचे सिंगल आणि डबल डोअरचे फ्रिज उपलब्ध आहेत. व्हर्लपूलचा ‘आईसमॅजिक प्रो’ हा सिंगल डोअर फ्रिज २०० लिटरचा असून याची किंमत १७ ते २० हजारांच्या दरम्यान आहे, तर ३४० लिटरच्या इंटेलिफ्रेश या डबल डोअर फ्रिजची किंमत ३६ हजार आहे. सॅमसंगच्या ३२४ लिटरच्या डबल डोअर फ्रिजची किंमत ३० हजार रुपये आहे, तर ४१५ लिटरच्या फ्रिजची ४६ हजार आहे. सॅमसंग आणि व्हर्लपूलचे सिंगल डोअर फ्रिज ११ हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. एलजीचे रेफ्रिजरेटर २६० लिटर, ३०८ लिटर, ४२० लिटर आणि ५४७ लिटर या कपॅसिटीमध्ये उपलब्ध आहेत. यांच्या किमती अनुक्रमे २५ हजार, ३१ हजार, ४४ हजार, ७० हजार आहेत, तर सिंगल डोअरचे फ्रिज १५-१६ हजारांपासून उपलब्ध आहेत. रेफ्रिजरेटरची कपॅसिटी लिटरवरून ठरते, तर क्वालिटी ही त्या प्रॉडक्टला किती स्टार आहेत यावरून ठरते. त्यामुळे कधीही फ्रिज किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची क्वालिटी नक्कीच तपासून बघावी.    

रेफ्रिजरेटरप्रमाणेच वॉशिंग मशिन ही रोजच्या वापरातील महत्त्वाची वस्तू आहे. वॉशिंग मशिनमध्ये फ्रंट लोडिंग व अप लोडिंग आणि फुल्ली ॲटोमॅटिक व सेमी ॲटोमॅटिक असे प्रकार असतात. वॉशिंग मशिनची कपॅसिटी किलोमध्ये दिलेली असते आणि त्यानुसारच त्यांच्या किमती ठरतात. यामध्ये एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हायर, गोदरेज, बॉश व आणखी बऱ्याच कंपन्यांची वॉशिंग मशिन उपलब्ध आहेत. व्हर्लपूलचे सात किलो कपॅसिटी असलेले फुल्ली ॲटोमॅटिक फ्रंट लोड मशिन ३१ हजारांमध्ये येते, तर साडेसहा किलो कपॅसिटीच्या फुल्ली ॲटोमॅटिक टॉप लोड मशिनची किंमत १६ हजार रुपये आहे. सॅमसंगचे फुल्ली ॲटोमॅटिक टॉप लोड आणि साडेसहा किलो कपॅसिटीचे मशिन १५ हजारांत येते. बॉशचे पाच स्टार असलेले इन्व्हर्टर फुल्ली ॲटोमॅटिक टॉप लोड मशिन २५ हजारांत मिळते. फ्रंट लोडिंगच्या वॉशिंग मशिनला जास्त मागणी असून एलजी, सॅमसंगची मशिन जास्त घेतली जातात.  

मिक्सर ग्राइंडर आणि फूड प्रोसेसरमध्ये उषा, फिलिप्स, बजाज, पिजन, केनस्टार, बटरफ्लाय, प्रेस्टिज, महाराजा, वंडरशेफ, प्रीती, सुजाता मल्टीमिक्स, कुकवेल, हॅवेल्स इत्यादी कंपन्यांचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. उषा फूड प्रोसेसरची किंमत ११,४९९ रुपये आहे. वंडरशेफचा न्यूट्री ब्लेंड कम्प्लिट किचन ग्राइंडर ३,५०० रुपयांना आहे. बजाजच्या मिक्सर ग्राइंडरची किंमत ५,५०० रुपये आहे. प्रेस्टिजचा फूड प्रोसेसर ८,५०० रुपये आहे. महाराजा व्हाईटलाईन स्मार्ट शेफ फूड प्रोसेसरची किंमत ४,९०० रुपये आहे. मिक्सर ग्राइंडरपेक्षा फूड प्रोसेसरची किंमत जास्त असते कारण त्यामध्ये प्रोसेसरमध्ये बाऊल, ज्यूसर, ब्लेंडर जार, ड्राय ग्राइंडिंग जार, चटणी जार, एग व्हिस्कर, आटा केनेडर, चॉपर ब्लेड, कटर इत्यादी भांडी येतात. मिक्सर ग्राइंडर आणि फूड प्रोसेसरवर साधारण एक ते दोन वर्षांची वॉरंटी मिळते.    

बजाज, एलजी, सॅमसंग, फिलिप्स, पिजन, पॅनासॉनिक, गोदरेज, केंट, उषा, हॅवेल्स, मॉर्फी रिचर्ड्स इत्यादी आणि काही लोकल ब्रॅंड्सचे मायक्रोव्हेव ओव्हन बाजारात उपलब्ध आहेत. मायक्रोव्हेवची कपॅसिटी लिटरमध्ये मोजतात. सॅमसंगच्या ३२ लिटरच्या मायक्रोवेव्हची किंमत आहे २३ हजार रुपये. एलजीच्या २८ लिटरच्या मायक्रोवेव्हची किंमत आहे १७ हजार, तर गोदरेजच्या १९ लिटरची किंमत आहे नऊ हजार रुपये. पॅनासॉनिकचा २७ लिटरचा मायक्रोव्हेव १३ हजारांपर्यंत मिळतो. बजाजचा २२ लिटरचा ओव्हन टोस्टर सात हजारांपर्यंत मिळतो. काही कंपन्यांनी टू इन वन म्हणजेच मायक्रोवेव्ह प्लस टोस्टर असे प्रॉडक्ट्स बाजारात आणले आहेत. सर्व कंपन्यांच्या मायक्रोवेव्हवर साधारण एक ते दोन वर्षांची वॉरंटी मिळते. 

इंडक्शनमध्ये फिलिप्स, प्रेस्टिज, उषा, बजाज, पिजन, हॅवेल्स इत्यादी ब्रँडचे इंडक्शन बाजारात उपलब्ध आहेत. प्रेस्टिज ॲटलास इंडक्शन कूकटॉपची किंमत १८०० रुपये आहे. उषा इंडक्शन कूकटॉप दीड हजारांपासून उपलब्ध आहेत. पिजन इंडक्शन १५००पासून उपलब्ध आहेत. बजाज आणि फिलिप्सचे इंडक्शन्स दोन हजारांपासून उपलब्ध आहेत. यांचे फीचर्स पाहिले तर त्यामध्ये टच बटन, टायमर, एलईडी डिस्प्ले, पॉवर सेव्हर टेक्नॉलॉजी, अँटी मॅग्नेटिक वॉल, इन्सेक्ट प्रूफ डिझाईन, एरोडायनॅमिक कुलिंग सिस्टीम, ड्युअल फिट सेन्सर, ॲटोमॅटिक शट ऑफ, ॲटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर असे बरेच फीचर उपलब्ध आहेत. सर्वच कंपन्यांच्या इंडक्शनवर एक वर्षाची वॉरंटी आहे. 

मिलसेंट, बजाज, हायस्टर डोमेस्टिक, मिल्टन इत्यादी कंपन्यांच्या आटा चक्की बाजारात उपलब्ध आहेत. मिलसेंट आटा चक्की प्रीमियम गोल्ड व्हॅक्यूम क्लीनची किंमत १९ हजार रुपये आहे, तर मिलसेंट व्हिस्पर फ्लोअर मिलची किंमत १८ हजार रुपये आहे. मिल्टन फॉर्च्युन फुल्ली ॲटोमॅटिक डोमेस्टिक फ्लोअर मिलची किंमत १७ हजार रुपये आहे. प्रेस्टिज ग्रेन ग्राइंडरची किंमत सात हजार रुपये आहे. मॉर्फी घरेलू आटा चक्कीची किंमत १८,५०० रुपये आहे. नटराज फुल्ली ऍटोमॅटिक डोमेस्टिक फ्लोअर मिलची किंमत १७ हजार रुपये आहे.    

सिलिंग फॅनमध्ये हॅवेल्स स्टेल्थ एअर सिलिंग फॅन, ओरियंट इलेक्ट्रिक, केनस्टार एरिया प्लस, उषा ब्लूम डॅफोडिल गूडबाय डस्ट सिलिंग फॅन, क्रोमटन ऑरा, पॅनासॉनिकचा अँकर, बजाज क्रेस्ट निओ असे आणखी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती दोन हजारपासून १० हजारच्या दरम्यान आहेत. टेबल फॅनमध्ये बजाज अल्टिमा, उषा मिस्ट एअर, उषा मॅक्स एअर स्वीप, क्रोमटन हाय फ्लो, टर्बो फॅन, हॅवेल्स कूल टेबल फॅन, ओरियंट इलेक्ट्रिक असे पर्याय उपलब्ध आहेत. या टेबल फॅनच्या साधारण किमती बाराशे ते दीड हजारपासून पुढे आहेत.    

कुलरमध्ये सिम्फनी सिस्ट डेझर्ट एअर कुलर, बजाज प्लॅटिनी पर्सनल एअर कुलर, वोल्टास डेझर्ट एअर कुलर, ब्लू स्टार डेझर्ट एअर कुलर, बजाज ग्लेशिअर एअर कुलर, बजाज रूम एअर कुलर, हॅवेल्स फ्रेडो आय पोर्टेबल एअर कुलर, उषा डेझर्ट एअर कुलर इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती पाच हजारपासून पुढे आहेत. कुलरची कपॅसिटीदेखील लिटरमध्ये असते आणि त्यानुसार किमती ठरतात.   

एसीमध्ये एलजी, व्हर्लपूल, गोदरेज, ब्लु स्टार, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, सॅमसंग, हायर इत्यादी ब्रँडचे एसी बाजारात उपलब्ध आहेत. एसीची कपॅसिटी टनात मोजतात. सॅमसंगचा एक टन आणि चार स्टार असलेल्या इन्व्हर्टर एसीची किंमत ३१ हजार आहे. एलजीचा १.५ टन ड्युअल इन्व्हर्टर तीन स्टार एसीची किंमत आहे २९ हजार रुपये. वोल्टास १.५ टन ॲडजस्टेबल इन्व्हर्टर पाच स्टार एसीची किंमत आहे ४० हजार रुपये. पॅनासॉनिकचा दोन टन पाच स्टार वाय फाय इन्व्हर्टर स्प्लिट एसीची किंमत आहे ५४ हजार रुपये. हायरचा टर्बो कूल एक टन तीन स्टार स्प्लिट एसीची किंमत आहे २६ हजार रुपये. वरील सर्व होम अप्लायन्सेसवर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्टोअर्समध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सही असतात. तर मग तुम्ही कोणती वस्तू घेण्याचा विचार करताय!    

(लेखात दिलेल्या वस्तूंच्या आकारात आणि किमतीत बदल होऊ शकतो.)

संबंधित बातम्या