परंपरेला आधुनिकतेचा साज...

महिमा ठोंबरे
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

प्रत्येक सणानुसार आणि त्याच्या औचित्यानुसार नटण्याची ओढ सर्वत्र दिसून येते. त्यामुळे साहजिकच सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी कपड्यांची दुकाने गजबजलेली दिसून येतात. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नाही.

गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा आणि दिवाळी म्हणजे महाराष्ट्राच्या आनंदाला येणारा बहर. शारदीय नवरात्रोत्सव, दसरा आणि मग दिवाळी अशी सणांची भरगच्च रेलचेल या काळात असते. त्यालाच जोडून मग लग्नसराईचे मुहूर्त सुरू होत असल्याने उत्सवप्रेमी नागरिकांसाठी हा सुगीचा काळ असतो. धार्मिक कार्यक्रमांसह खाद्यपदार्थांचा आस्वाद आप्तजनांसह घेण्याची ही संधी सहसा कुठलाच महाराष्ट्रीय माणूस चुकवत नाही, आणि या सगळ्या आनंदमयी क्षणांना साजरे करण्याची तयारी अर्थातच शॉपिंगपासून सुरू होते. 

खरेतर गेली दीड वर्षे कोरोनाचे सावट जगावर आहे. मागील वर्षी कठोर निर्बंधांमुळे आणि भीतीमुळे नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर पडणे, टाळले होते. मात्र यंदा ती भीती कमी झाल्याने आणि त्याला लसीकरणाची जोड मिळाल्याने दुकानांमधील वर्दळ आता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाने झालेले आर्थिक नुकसान भरून येण्याची चिन्हेही दिसू लागल्याने व्यावसायिकदेखील सुखावले आहेत.

‘जुनं ते सोनं’ असाच ट्रेंड यंदाच्या फॅशनमध्ये दिसून येतो आहे. पारंपरिक खणाला यंदा सर्वाधिक मागणी आहे. अगदी पुरुषांच्या जॅकेटपासून ते लहान मुलींच्या परकर पोलक्यापर्यंत खणाला पसंती दिली जात आहे. महिलेसाठी खणाची साडी, पुरुषासाठी त्याच खणाच्या कॉम्बिनेशनचे जॅकेट आणि लहान मुला-मुलींसाठी त्याच खणाचा शिवलेला ड्रेस, अशी फॅशन अनेक कुटुंबे आपलीशी करत आहेत.

प्लेन कुर्त्यांवरील खणांचे जॅकेट पुरुषांनाही कोणत्याही समारंभाला शोभेल असा लूक देत आहेत. 

साड्यांमध्ये पारंपरिक खण आणि आधुनिक खण अशा दोहोंची चलती आहे. तरुण मुलींसाठी खणांचे ड्रेस मटेरियलही उपलब्ध आहेत. लाल-काळा, लाल-हिरवा, पिवळा-निळा या रंगांच्या कॉम्बिनेशनला विशेष मागणी आहे. खणाच्या ओढण्यादेखील बाजारात आल्या आहेत. एकच ओढणी सगळ्या कुर्त्यांवर उठून दिसत असल्याने त्याचाही ट्रेंड आहे. इतकेच नाही तर लहान मुलींचे शिवलेले परकर पोलके आणि फ्रॉकदेखील खणाच्या कपड्यांमध्ये फॅशनला फॉलो करत आहेत. पर्सेस आणि मास्कदेखील खणाच्या डिझाईनने सजले आहेत.

साड्यांमध्ये नेहमीप्रमाणे पेस्टल शेड्स आणि ब्राईट रंगांना मागणी आहे. नवनवीन प्रकार बाजारात आले असले तरीदेखील पारंपरिक पैठणी, गढवाल, कांजीवरम यांचे आकर्षण महिलावर्गात कायम आहे. पैठणीत विविध प्रकारचे काठ, विविध प्रकारचे पदर उपलब्ध असून बुट्ट्यांसह हटके डिझाईन असलेल्या पैठणी यावेळी ट्रेंडमध्ये आहेत. तसेच सिल्कच्या साड्यांमध्ये मल्टिकलर साड्यांचा एक नवीन ट्रेंड दिसून येतो आहे. जाड बॉर्डरच्या म्हणजे जवळपास सव्वा ते दीड फूट बॉर्डर असलेल्या साड्याही मोठ्या प्रमाणावर विक्रीला आहेत. तर पारंपरिक लूक आणण्यासाठी शिवलेल्या नऊवारी खरेदी करण्यासदेखील काहींनी प्राधान्य दिले आहे. 

कुर्ती आणि घागऱ्यांमध्ये यंदा मल फॅब्रिकची फॅशन आली आहे. घागऱ्यांमध्ये जॉर्जेट, कटवर्क आणि सिल्क बेस घागरे तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. हटके फॅशनच्या शोधात असलेल्यांसाठी कुर्त्यांमध्ये ३६० अंशाचा घेर असलेल्या कुर्ती उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मिक्स फॉईल प्रिंटच्या कुर्ती, मल्टी कलर प्रिंट कुर्ती, चंदेरी डिझाईनच्या कुर्ती यांच्याकडेही कल आहे. प्रिंटेड लाँग ड्रेस आणि मिडी, स्कर्टचेही पर्याय बाजारात आहेत. लेगिंग्जमध्ये लायक्राच्या सुपर सॉफ्ट लेगिंग्जना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर कॉटन पँट, प्लाझो आणि हेरमसारखे प्रकारही लक्ष वेधून घेत आहेत.

कुर्तींना मॅचिंग अशा नानाविध प्रकारच्या ओढण्या बाजारात उपलब्ध आहेत. खणाच्या ओढण्यांसह सोनेरी प्रिंट असलेल्या मल्टिकलर ओढण्यांची यंदा क्रेझ आहे. याशिवाय बंजारा ओढणी, गोटापट्टी, ज्यूट, कॉटन सिल्क, नेट, बांधणी असे असंख्य प्रकारही विक्रीला आहेत. तसेच फॅशनबाबत विशेष जागरूक असलेल्या तरुणींना कुर्तीला अनुकूल अशा कस्टमाईज्ड डिझायनर ओढण्यादेखील तयार करून मिळत आहेत. पुरुष सहसा फॅशनबाबत उदासीन असतात, असा आपल्याकडील सर्वसाधारण समज आहे. मात्र हा समज खोडून काढत गेल्या काही वर्षांत पुरुषही फॅशनचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. परिणामी पुरुषांच्या पेहरावातील अनेक पर्याय आता बाजारात उपलब्ध झाले आहेत.

पुरुषांच्या कुर्त्यात लखनवी, कटवर्क कुर्त्यांना मागणी आहे. शेरवानीमध्ये इंडो-वेस्टर्न प्रकाराला सर्वाधिक मागणी आहे. यातील बंद गळा व बाजूबंद पद्धतीने शिवलेल्या शेरवानी ट्रेंडमध्ये आहेत. सलवार-कुर्ता, जॅकेट-कुर्ता हे प्रकार समारंभासाठी घेतले जात आहेत. यात मल फॅब्रिक, मिक्स कॉटन, सिल्कच्या कपड्यांना प्राधान्य दिले जात आहे. तर रंगांमध्ये लाईट पेस्टल कलर्सना पसंती मिळते आहे.

याशिवाय पारंपरिक पेशवाई पेहरावाला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे. विविध प्रकारच्या फॅशनचे कपडे खरेदी केले तरीदेखील लग्नसोहळ्यातील विधींसाठी मात्र धोतर, कुर्ता आणि उपरणे हा पेहरावच परिधान केला जातो आहे. यात शिवलेल्या सोवळ्यांना अधिक मागणी आहे. सिल्कचे आणि कॉटन सिल्कचे सोवळे यात उपलब्ध आहेत. या पेहरावाला अजून पारंपरिक साज चढवण्यासाठी काहींनी पगडीचीदेखील जोड दिली आहे. लहान मुलींच्या कपड्यांमध्येदेखील हाच ट्रेंड असल्याचे दिसून येत आहे. खणासह साडीच्या कापडाचे परकर पोलके आणि फ्रॉक यात उपलब्ध आहेत. मुलांसाठी नेहमीप्रमाणे शिवलेले सूट आणि सलवार-कुर्ते उपलब्ध आहेत. यात विशेषतः आई-बाबांच्या कपड्यांना मॅचिंग कपडे घेण्याकडे कल दिसून येतो आहे.

ॲक्सेसरीजमध्येही यंदा जुन्याच फॅशन नवीन टचसह ट्रेंडमध्ये आल्या आहेत. यात पर्सेसमध्ये खणासह बारीक डिझायनर वर्क असलेल्या पर्सेस ट्रेंडमध्ये आहेत. वेलबुट्टी आणि नक्षीकाम केलेल्या पर्सेसही उपलब्ध आहेत. तर कॉन्ट्रास्ट फॅशनसाठी वेस्टर्न पर्सेसनाही काही प्रमाणात पसंती मिळते आहे. फुटवेअरमध्ये हिल्सची फॅशन ओसरताना दिसते आहे. तर मोजड्या आणि जुती यांना पारंपरिक लूकमुळे पसंती मिळते आहे. पुरुषांमध्येही वेस्टर्न शूजसह मोजड्या आणि कोल्हापुरी चपलेला मागणी आहे.          

थोडक्यात, यंदाची फॅशन पारंपरिक कपड्यांना आधुनिकतेचा साज चढवत ‘जुनं ते सोनं’ या उक्तीचा प्रत्यय देणारी आहे. कुठलीच फॅशन नवीन नसते. पूर्वीच्याच फॅशनचा तो केवळ नवीन आविष्कार असतो, असा फॅशन विश्वातील एक मतप्रवाह आहे. यातील मतमतांतरे बाजूला ठेवली तरीदेखील मागच्या पिढीची फॅशन कधी ना कधीतरी आजमावून पाहण्याचा मोह कोणालाच आवरत नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे याच धर्तीवर यंदाच्या सण-उत्सवात आणि लग्नसोहळ्यांत ‘जुनं ते सोनं’ फॅशनमुळे ‘व्हिंटेज मूड’ पसरणार, यात शंका नाही. 

अनेक महिन्यांच्या निर्बंधांनंतर आता बाजारपेठा पूर्ण क्षमतेने उघडल्या आहेत. दसरा-दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई असा सण-उत्सवाचा मोठा काळ समोर आहे. खूप काळ घरात बसून कंटाळल्याने नागरिकही उत्साहाने खरेदी करतील, अशी आशा आहे. व्यावसायिकदेखील सकारात्मक आहेत. मात्र या काळात ग्राहक आणि विक्रेत्यांनीही मास्क, सॅनिटायझर अशी सगळी खबरदारी घेऊन तिसऱ्‍या लाटेची संभाव्य शक्यता दूर ठेवायला हवी.
- अमोल येमूल, 
संचालक, पेशवाई क्रिएशन्स

सर्वसामान्यांमध्ये असणारी कोरोनाची भीती आता बरीचशी ओसरली आहे. अनेकांचे लसीकरणदेखील पूर्ण झाले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कमी होत असल्याने त्यासाठीही खरेदीची निकड आहे. आर्थिक गाडी रूळावर येत असल्याने नागरिक खरेदीसाठी खर्च करण्याचीही तयारी दाखवत आहेत. या सगळ्या कारणांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत दीडपट ते दुप्पट वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाचा दिवाळी-दसरा व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरेल, अशी आशा आहे. 
- कौशिक मराठे, संचालक, लिननकिंग

संबंधित बातम्या