मध्यमवर्ग आणि घरखरेदी

नरेंद्र जोशी
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

आज मुख्यतः शहरी भागात ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या किमतीतील घरे हा खरेतर मध्यमवर्गीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहेत. यापूर्वी याच मध्यमवर्गीय गटातील घरखरेदीदाराची मर्यादा ६० ते ८० लाख रुपये होती. मात्र वन, टू बीएचकेसोबतच, थ्री बीएचके असा विस्तार अनुभवताना घरासाठी अधिक पैसे मोजण्याची तयारीही हा वर्ग आता दाखवू लागला आहे. सुलभ वित्त पुरवठा आणि गरजेच्या मानले जाणाऱ्या सुविधा यामुळे तो याकडे आकर्षित झाला आहे, हे विशेष! 

कोरोनाची आपत्ती आपणा सर्वांसाठी ऐतिहासिक व अनाकलनीय अशी आहे. मागील सुमारे दीड वर्षांपासून आपण सारेजण या संकटाचा सामना करतो आहोत, त्याच्याशी एकजुटीने लढा देतो आहोत. त्यातही देशात बहुसंख्येने असलेला मध्यमवर्ग, ज्या कुटुंबामध्ये चार ते सहा एवढी सदस्य संख्या आहे, अशा कुटुंबांनी मोठ्या आव्हानांचा सामना या काळात केला. दुसऱ्या लाटेनंतर नवे नियम व आव्हानांसह जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे हक्काच्या घराचे महत्त्व.  

कोरोनानंतर आता हाच मध्यमवर्ग मोठ्या घरासाठी प्राधान्याने विचार करताना दिसतो आहे. सर्वसाधारणपणे स्थावर मालमत्ता क्षेत्रात निवासी, वाणिज्यक, औद्योगिक व जमीन (रिकामी जागा) असे प्रकार पडतात. निवासी जागा गटात घर, बंगला, ड्युप्लेक्स, अपार्टमेंट इत्यादी प्रकार पाहायला मिळतात. यासोबत निवासाच्या उद्देशाने घरखरेदीदाराला दशकभरापासून निवासी व वाणिज्यक असे दोहोंचे मिश्रण असलेल्या टाऊनशिप किंवा स्मार्ट सिटी हे मध्यवर्गीय घरखरेदीदारांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे.

नियोजनबद्ध निवासी मालमत्ता हे त्याचे अधिक वैशिष्ट्य आहे. निमशहरी अगदी ग्रामीण भागातही युनिफाईड डीसीच्या रूलच्या नव्या धोरणांच्या माध्यमातून राज्य शासन अशा स्थावर मालमत्ता प्रकाराला प्रोत्साहन देते आहे. राहण्याच्या सुविधेबरोबरच रोजगाराची उपलब्धता या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न आहे. 

टाऊनशिप अथवा स्मार्ट सिटीमध्ये निवासाभोवती सेवा देणारे उद्योग, आस्थापना, साखळी दालने असतात. तर औद्योगिक स्थावर मालमत्ता गटात निर्मिती प्रकल्पाभोवती निवासी स्थावर मालमत्तेची रचना असते. मात्र निवासी क्षेत्राला फटका बसणार नाही असेच उद्योग या परिसरात विकसित केले जातात. महाराष्ट्रासारख्या राज्यात औद्योगिक वसाहतीत निवासी व्यवस्थेला नुकतीच काही अटी व शर्तींवर परवानगी मिळाली आहे.

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला सरकारकडून मागील काही वर्षांमध्ये अधिक प्रोत्साहन दिले गेले आहे. ४० लाख रुपयांच्या आतील या घरांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातूनही मागणी आहे. स्थानिक पातळीवरचे अनेक विकसक अशा प्रकारच्या घरांच्या निर्मितीला पीएमएवाय म्हणजे पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अनुदान म्हणून आणि मागणी वाढते म्हणूनही प्राधान्य देत आहेत. शहरी भागांसाठीची ही योजना थांबविण्यात आलेली असली तरी ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना अद्याप सुरू आहे. 

परवडणाऱ्या दरातील घरांसोबत मध्यमवर्गाकडून आरामदायी घरांचीही जोड दिली जात आहे. म्हणजे त्याच आकारात मात्र अधिक सुविधेसह अशा प्रकारच्या घरांची निर्मिती वाढत आहे.

५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या किमतीतील घरे हा खरेतर मध्यमवर्गीयांचा जिव्हाळ्याचा विषय होताना दिसतो आहे. त्यांची यापूर्वीची या गटातील मर्यादा ६० ते ८० लाख रुपये घरांपर्यंतचीच होती. मात्र वन, टूबीएचकेसोबतच थ्री बीएचके असा विस्तार अनुभवताना घरासाठी अधिक पैसे मोजण्याची तयारीही हा वर्ग आता दाखवू लागला आहे. सुलभ वित्त पुरवठा आणि गरजेच्या मानले जाणाऱ्या सुविधा यामुळे तो याकडे आकर्षित झाला आहे. 

या प्रकाराच्या घरांच्या किमती दर वर्षी लक्षणीय टक्क्यांनी वाढताना दिसतात. ७०० ते १,२०० चौरस फूट क्षेत्रफळातील घरे यामध्ये अगदी सहज बसतात. याशिवाय यापेक्षा अधिकच्या आकाराची घरेदेखील उपलब्ध असून मध्यमवर्ग अपग्रेडेशनासाठी तशा मोठ्या रकमांच्या घरांचा विचार करताना दिसतो.

अशा घरांमध्ये विकसक मोठ्या घरांचा अनुभव देणारी रचना आणि सुविधादेखील देताना दिसत आहेत. शिवाय सण-समारंभाच्या निमित्ताने कर सवलत, तयार फर्निचर इत्यादी आकर्षक योजनादेखील आहेतच.

एक कोटी रुपयांवरील किमतीची घरे आरामदायी घरे म्हणून मानली जातात. मागील काही वर्षांमध्ये उच्चच नव्हे तर मध्यमवर्गीयही या किमतीतील घरांकडे आकर्षित झाले आहे. पुण्यात प्रभात रस्ता, मॉडेल कॉलनी, कोथरूड, सहकार नगर इत्यादी लोकप्रिय भागांमध्ये तर बाणेर, बालेवाडी, हिंजवडी या विकसित व नामांकित उपनगरांमध्येदेखील या किमतीच्या घरांकडे यापूर्वी वळणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांमध्ये आता मध्यमवर्गीयही दिसू लागले आहेत. 

या घरांमधील गुंतवणुकीलादेखील चांगला परतावा मिळत असल्याचे दिसते आहे. अशा गटातील गृहनिर्मितीत मोजके विकसकच उतरत असत. मात्र त्यांनीही आता परवडणाऱ्या तसेच मध्यम गटातील घरांची मागणी पाहता त्या क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आरामदायी घरनिर्मितीतील त्यांची ओळख कायम राहावी म्हणून वेगळ्या गटातील घर उभारणी करताना नवी उपकंपनी तसेच नव्या ब्रँडची जोड दिली जात आहे. सध्या बँकांचे कर्ज व्याजदर साधारणतः अगदी खालच्या पातळीवर म्हणजे साडेसहा-सात टक्क्यांवर आहेत, आणि तशीही कर्जमागणी कमी असल्याने प्रसंगी अधिक रकमेच्या घरांना खरेदीदार पसंती देतो. कोरोनामुळे निर्माण झालेले अस्थिर वातावरण कमी होत असून मागील दोन महिन्यांपासून घरखरेदीदार पुन्हा एकदा घरखरेदीसाठी सरसावला असल्याचे अभ्यास व सर्वेक्षण आकडेवारीवरून दिसून येते. 

मध्यमवर्गीयांच्या घर खरेदीदारांच्या वाढत्या क्रयशक्तीमुळे एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्राला पुन्हा उभारी मिळते आहे. नोटाबंदी, जीएसटी, रेरा, कोरोना इत्यादी अडथळ्यांतून निस्तेज झालेले रिअल इस्टेटचे क्षेत्र मध्यमवर्गीयांच्या प्रतिसादाने गतीने सावरण्याचा व पुन्हा एकदा उत्तम अशी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असलेला दिसतो आहे. परवडणारी घरे व मध्यमवर्गीय ग्राहकांची बदललेली मानसिकता क्षेत्राच्या या रिअल इस्टेट क्षेत्राच्या सक्रियतेचा मोठा आधार आहे.

संबंधित बातम्या