परवडणारी घरखरेदी करण्यापूर्वी...

नरेंद्र जोशी
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

चांगल्या लोकेशनला खरेदी करणे तसे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गोष्ट आहे. अशा परिस्थितीत आवाक्यातील घरखरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी पाहणे गरजेचे आहे, त्याचा हा आढावा...

परवडणारी घरे किंवा छोटी, कमी किमतीची घरे म्हणजे, जी समाजाच्या अल्प उत्पन्न असलेल्या घटकांतील लोकांनाही परवडणारी घरे. परवडणाऱ्या घरांसंबंधाने विविध देशांमध्ये वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेल्या आहेत. मात्र त्याचा मूळतः उद्देश असा आहे, की अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या समूहातील लोकांच्या गरजांना पूरक अशा घरांची उभारणी. परवडणाऱ्या घरांची गरज नेहमीच होती. ही छोटी घरे थोडक्यात ३० ते ४० चौरस मी. क्षेत्रफळाच्या आत असतात.

वाढत्या शहरीकरणाची कारणमीमांसा केली तर वाढती लोकसंख्या हेदेखील एक कारण सांगता येईल. पर्यायाने रोजगाराच्या शोधात महानगरात आलेल्या नागरिकांची निवासासाठी घरांची मोठी मागणी आहे. अशा स्थितीत शासन स्तरावरून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून महानगरातील मोठ्या लोकसंख्येला हव्या असणाऱ्या घरांची मागणी पूर्ण होईलच, याची हमी देता येईलच असे नाही. अशा वेळी खासगी विकसक घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरताना दिसतात, आणि याच वाढत्या मागणीचा विचार करून अनेक खासगी विकसक परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प सादर करताना दिसत आहेत.

परवडणाऱ्या घरांच्या योजना सर्वसाधारणपणे उपनगर आणि महानगराच्या बाहेर उभ्या राहताना दिसतात. शहरातील जमिनीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने तेथे घर घेणे सोपे राहिलेले नाही. त्यापेक्षा शहरालगत जमिनीवर गृहप्रकल्प उभारून तो ग्राहकांना उपलब्ध करून देणे फायद्याचे ठरते. या ठिकाणी जमिनीच्या किंमती तुलनेने कमीच असतात. अर्थात चांगल्या लोकेशनला खरेदी करणे तसे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गोष्ट आहे. अशा परिस्थितीत आवाक्यातील घरखरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी पाहणे गरजेचे आहे, त्याचा हा आढावा...

सार्वजनिक वाहतुकीची साधने

घरखरेदी करताना त्याचे लोकेशन, ठिकाण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सार्वजनिक वाहतुकीची सुविधा असणे महत्त्वाचे आहे. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी आपल्या घरापासून सुविधा असेल तर साहजिकच त्या भागाचे महत्त्व वाढते. याशिवाय ऑफिस, शाळा, कॉलेज, दवाखाना, बाजारपेठ अशा ठिकाणी जाण्यासाठी खात्रीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यास दैनंदिन कामात अडथळे येत नाहीत. मेट्रो, रेल्वे, बस इत्यादींची उपलब्धता ही दररोजच्या प्रवासासाठी गरजेची आहे. घराचे ठिकाण खूपच दूर किंवा मुख्य रस्त्यांपासून दूर असेल तर तेथून कोणत्याही ठिकाणी जाणे सोयीचे ठरत नाही. त्याचबरोबर खर्चातही वाढ होते. तेव्हा त्यातल्या त्यात आपल्याला कामाच्या ठिकाणापासून, मुलांना शाळेच्या ठिकाणापासून व बाजारपेठ व इतर किमान सुविधा उपलब्ध होतील अशा ठिकाणाचा विचार करावा.

सुरक्षित ठिकाण

परवडणाऱ्या घरांच्या योजना या उपनगरातील अंतर्गत भागात किंवा त्यालगतच्या भागात राबविल्या जातात. या भागात परिसरात स्थानिकांचा प्रभाव असतो आणि तेथील विकास असंतुलित असतो. परवडणाऱ्या घरांच्या अनेक योजना अनियंत्रित वस्ती असणाऱ्या भागांत, कारखाने तसेच काही योजना दुसऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेलगत उभारल्या जातात. अशा ठिकाणी सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घर खरेदी करताना त्या भागातील वातावरणाचा संपूर्णपणे अभ्यास करायला हवा. कुटुंबासाठी संपूर्ण सुरक्षित वातावरण लाभणाऱ्‍या ठिकाणीच घर खरेदीचा विचार करावा. गृहप्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे की नाही, याची चौकशी करावी. शक्यतो तुरळक वस्ती असलेल्या ठिकाणी घर घेणे टाळावे. 

पायाभूत सुविधा

साधारणपणे निवासी योजना या शहराच्या मध्यवर्ती भागापासून आणि अन्य प्रमुख विकसित भागापासून दूर असतात. अशावेळी घर खरेदी करताना शाळा, कॉलेज, रुग्णालय, बाजारपेठ इत्यादी ठिकाणे कितपत जवळ आहेत याचा अभ्यास करावा. घराच्या परिसरात कोण-कोणत्या पायाभूत सुविधा आहेत हेदेखील तपासून घ्यावे. दरम्यान कोरोनाच्या आपदेनंतरदेखील आपण निवडत असलेल्या जागेपासून सर्व अत्यावश्यक सुविधा, विशेषतः आरोग्य सुविधांची उपलब्धता आहे का, हेदेखील तपासून पाहावे. 

पायाभूत विकास कागदोपत्री नको

अनेकदा उपनगर आणि शहरालगतच्या पायाभूत विकासासाठी अनेक घोषणा केल्या जातात. मात्र या प्रस्तावित योजनांवरचे काम खूपच संथगतीने होते. नवीन भागातील विकासकामे कालांतरानेही सुरूच राहतील याची हमी देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांनी प्रस्तावित पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विकासकामांचे आश्वासन विश्वासार्ह वाटले तरच खरेदीचा विचार करावा. तसेच उपनगरांमध्ये कोणकोणती विकासकामे ही शासनाच्या विचाराधीन आहेत, त्याचा आढावादेखील घेतला तर घरात केलेली गुंतवणूक फलदायी ठरू शकते.

विकसकाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा 

विकसकाच्या योजनांवर, आकर्षक ऑफरवर हुरळून न जाता विकसकाच्या कामाचा दर्जा, पत याचेही आकलन असणे आवश्यक आहे. विकसकाने यापूर्वी केलेल्या योजनांचीदेखील पाहणी करून त्यांच्या कामाची पडताळणी करायला हवी. त्याच्या कामाबाबत एखाद्या ग्राहकाने तक्रार तर केली नाही ना, याची माहिती मिळावी. यासाठी विकसकाचे ट्रॅक रेकार्ड तपासून पाहणे गरेजेचे आहे.

त्यातही अधिकची माहिती मिळविण्यासाठी रेराच्या संकतेस्थळांचा वापर केल्यास त्यावरही विकसक, त्यांची आर्थिक कामगिरी, त्यांनी पूर्ण केलेले प्रकल्प, तेथील बांधकामाचा दर्जा इत्यादी विविध गोष्टींबद्दल एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच प्रकल्प सुरू असलेल्या भागात परिचितांकडेदेखील याबाबत चौकशी करता येऊ शकते. माहिती मिळविता येऊ शकते.

मासिक खर्चाचे आकलन करा

नवीन घर घेतल्यानंतर जी सोसायटी तयार होईल, तिथे आपल्याला द्यावा लागणारा देखभाल शुल्क, वीज बिल इत्यादी विविध मासिक खर्च लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे. घर खरेदीची किंमत आणि नंतरचा खर्च याचे आकलन करूनच घर खरेदीबाबत निर्णय घ्यायला हवा. अन्यथा घराचे खर्च वाढू लागल्यास दैनंदिन गरजा भागवताना अडचणी येऊ शकतात. 

सुरक्षित मार्ग 

प्रधानमंत्री आवास योजना आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) या कायद्याची अंमलबजावणी या दोन गोष्टींमुळे रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक परतावा देणारे आहे. विकसक आणि ग्राहकांमधील व्यवहारामध्ये आलेली पारदर्शकता हा मुद्दादेखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे.

गृहकर्ज परतफेडीवरील आयकर सवलत

नागरिकांना घरखरेदी करण्यास प्रोत्साहन देण्याबाबत केंद्र व राज्य शासनाची सकारात्मक भूमिका दिसते. म्हणूनच गृहकर्जावर आयकरातील कलम ८०सी, सेक्शन २४/सेक्शन ८० ईई या अंतर्गत सवलती देण्यात येतात. आपण गृहकर्ज घेऊन घरखरेदी करतो, तेव्हा करकपातीचे अनेक लाभ आपल्याला विनासायास मिळतात व त्यातून आपल्यावरील कराचा बोजा काही अंशी कमी होतो. त्यासंबंधातदेखील तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच घरखरेदी केल्यास भविष्यात त्याचा काही अंशी का होईना फायदा मिळवता येऊ शकतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय 

अनेक मंडळी अशा छोट्या घरांच्या खरेदीचा विचार गुंतवणूक म्हणून करतात. घर घेताना भाड्याच्या स्वरूपात मासिक नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी रिअल इस्टेट ही दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानली जाते. घरभाड्यातून मिळालेली रक्कम ही बँकेतील ठेवींवरील व्याजाच्या उत्पन्नाएवढीच निश्चित स्वरूपाची मानली जाऊ शकते. बड्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये रिअल इस्टेटचे प्रमाण त्यामुळेच मोठे असते. रिअल इस्टेट ही एक मूर्त स्वरूपाची मालमत्ता आहे. म्हणूनच या मालमत्तेची मालकी हा गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा विषय ठरतो.

 

 

संबंधित बातम्या