पुणे-‘रिअल’ हॉट डेस्टिनेशन

उमेश पवार
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

कव्हर स्टोरी

भारतातील सर्वाधिक वेगाने वाढ होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. पुण्याची वाढ गेल्या काही वर्षांत झालेली ही आश्चर्यचकित करणारी आहे. आर्थिक वाढीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने रिंग रोड विकसित करण्याचे ठरवलेले आहे. त्याचे बांधकाम पूर्ण होणे, हे पुण्यातील व्यावसायिक रिअल इस्टेट मार्केटसाठी एक वरदानच ठरणार आहे. 

सध्या बांधकाम सुरू असलेला पुणे मेट्रो प्रकल्प हा केवळ रिअल इस्टेटच्या वाढीसाठीचा एक मानांकच ठरणार नाही. मात्र शहराच्या राहणीमानाचा निर्देशांक आणि राहणीमानाची प्रत वाढवेल आणि त्याचसोबत शहरातील असंख्य लोकांसाठी तो एक किफायती आणि सोयीचा दळणवळणाचा मार्ग ठरेल. 

या सोबतच पुण्याच्या परिसरात भविष्यात तीन विमानतळ असणार आहेत. त्यातला एक आत्ताच अस्तित्वात आहे आणि उर्वरित दोन अनुक्रमे नवी मुंबई आणि पुरंदर परिसरात उभारले जाणार आहेत. यामुळेही पुण्यातील व्यापाराला अधिक चालना मिळेल व व्यवसाय वृद्धिंगत व्हायला मदत होणार आहे. त्याचसोबत चांदणी चौकातील मल्टी-फ्लायओव्हर आणि सहा पदरी हायवेचे बांधकाम पुण्यासाठी आणि पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत. पंधरा-वीस वर्षांपूर्वी कुठल्याही अभ्यास वा अंदाजाशिवाय केवळ गुंतवणूक म्हणून पुण्यात काही लोकांनी ज्या जागा घेतल्या, त्याची किंमत आता दुप्पट, तिप्पटच नव्हे तर काही ठिकाणी चौपटही झालेली आहे. मात्र रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शहराचा अभ्यास असणे अनिवार्य आहे.

चिनी तत्त्वज्ञान सांगते त्याप्रमाणे, जिथे शहर संपते तिथे गुंतवणूक करावी. त्याप्रमाणे गतीने विकसित होत असलेल्या पुण्यात स्वतःचे हक्काचे घर घेण्याचा विचार करीत असाल तर खालील उपनगरांचा प्राधान्याने विचार करायला काहीच हरकत नाही.

पूर्व पुणे : विमाननगर, न्यू कल्याणीनगर, मुंढवा, हडपसर 

पश्चिम पुणे : बावधन, भूगाव, बाणेर, बालेवाडी हिंजवडी, वाकड, रावेत, गहुंजे.

दक्षिण पुणे : एनआयबीएम रोड, उंड्री, गंगाधाम परिसर, कात्रज

उत्तर पुणे – चऱ्होली, आळंदी 

जे गृहखरेदीदार आरामदायी घराच्या शोधात आहेत, ज्यांना बजेटसाठीच्या मर्यादा नाहीत अशांसाठी पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये कोरेगाव पार्क, कोथरूड, प्रभात रोड, कर्वे नगर, एरंडवणे, सहकार नगर अशा विविध भागांमध्ये पुनर्विकास प्रकल्प मोठ्या संख्येने उभे राहत असून तिथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत. यातील काही उपनगरांमध्ये मेट्रोचे काम  सुरू असून तिथे एकूण चार एफएसआय मिळत असल्याने तिथेदेखील मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. तिथेदेखील गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध होते आहे.

लॉकडाउनच्या काळात निवासी क्षेत्रात मोठी मागणी आणि त्यानुरूप वाढ दिसून आली. कोरोना महासाथीसारख्या कठीण काळामध्ये घरातच थांबणे अपरिहार्य आहे, आणि घरातून चालणारे ऑफिस तसेच शाळेसाठी अधिक व्यवस्थित जागेची गरज भासणार आहे हे या काळात खूप लोकांच्या लक्षात आले.

कोरोना आपत्तीनंतर शहरी भागातील निवासी मालमत्तांच्या भाड्याचे दर पुन्हा एकदा नॉर्मलला येऊ लागले आहेत. याचा अर्थ यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पुण्यात सध्या ‘होम ॲफोर्डेबिलीटी रेट’ उत्तम असल्याने आत्ताचा काळ पुण्यात नवीन प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी उत्तम असेल. नवीन प्रोजेक्ट लाँचेस सध्या निवडक संख्येने असले तरी विकसक घरांची विक्री व ग्राहकांसाठी वेगळ्या गुणवत्तापूर्ण सुविधांवर अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.   

निवासी क्षेत्रातील वाढती हालचाल व ग्राहकांच्या प्रतिसादाला अनेक घटक कारणीभूत आहेत. अनलॉक केल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली. बाजारात हालचाल सुरू करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरला. त्याशिवाय रेसिडेन्शिअल प्रॉपर्टीची मागणी वाढण्यामागे वर्क फ्रॉम होम हे दुसरे महत्त्वाचे कारण ठरले. 

रेसिडेन्शिअल मार्केटने २०२० नंतर वेगाने धाव घेतल्याचे दिसून येते. तारणासाठीचे कमीत कमी रेट, मुद्रांक शुल्कातील कपात आणि विकसकांकडून मिळणाऱ्या विविध सवलती व पर्याय ही त्यामागील मुख्य कारणे सांगता येतील.     

आपण आत्ता राहतो त्यापेक्षा मोठ्या घरात राहायला जायला हवे, असे वाटणाऱ्यांची संख्या कोरोनाकाळात व त्यानंतर वाढती राहिली आहे. त्यामुळे ही मंडळी, तसेच सध्या भाड्याच्या घरात राहणारे अनेकजण आता संभाव्य गृहघरखरेदीदार बनले आहेत.

मोठी अपार्टमेंट, व्हिला, बंगले, ओपन प्लॉट्स, लक्झरी फ्लॅट यांना सध्या मोठी मागणी आहे. स्थलांतरित नागरिकांची मोठी संख्या, मूलभूत सोयीसुविधा आणि त्यात अजून पडणारी विकासकामांची भर असे चित्र असणाऱ्या पुणे, अहमदाबाद, बंगळूर, हैदराबाद यांसारख्या शहरांत ही मागणी भविष्यातही कायम राहील. 

पुण्याची सध्याची लोकसंख्या सुमारे ६५ लाख असून ती २०३० पर्यंत एक कोटी एवढी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. उत्तम पर कॅपिटा डिस्पोझेबल इन्कम आणि पुण्यातील किंवा पुण्यात वास्तव्य करू पाहणाऱ्या तरुण लोकसंख्येची उत्तम वस्तूंवर खर्च करण्याची ताकद जास्त असल्याने येत्या काही वर्षात पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट भरभराटीला येणार आहे.   

‘पुणे रेसिडेन्शिअल रियालिटी रिपोर्ट’नुसार शहरात घर खरेदी करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. ‘आरामदायी घरांची बाजारपेठ’ डळमळीत झालेली आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते अजिबातच खरे नाही. गुंतवणूक म्हणून विचार करत असाल, तर कमर्शिअल प्रॉपर्टी हा उत्तम पर्याय आहेच. तसेच निवासी मालमत्तांमधील गुंतवणुकीचा परतावा व व्हॅल्यू अॅप्रिसिएशनदेखील येत्या काही वर्षांत १२ ते १४ टक्के एवढा वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांच्या मते प्लॉट्सना कायमच मागणी असते. कोरोनाने ती अधिकच पुढे नेली. कोरोना काळात ‘प्लॉटेड डेव्हलमेंट’ हा रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसाठी आणि त्याच सोबत घर विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. यामागे काही ठरावीक कारणे आहेत, जसे की, जमीन ही एक चांगला परतावा देणारी मालमत्तेच्या गटात मोडते. त्याचसोबत, येत्या काळात जिथे भविष्यात अधिक मोकळी जागा उपलब्ध असणारे गृहप्रकल्प व दाटीवाटीत नसणारे म्हणजे अधिकाधिक जागेत कमी घरांची रचना असलेले प्रकल्पांची मागणी असेल असे दिसून येत आहे. 

येत्या काही काळात रेसिडेन्शियल रिअल इस्टेट मधील गुंतवणूक हा चांगला परतावा, फायदा करून देणारे क्षेत्र ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. 

(लेखक रिअल इस्टेट क्षेत्रातील अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

संबंधित बातम्या