ऑनलाइन प्रॉपर्टी 

इरावती बारसोडे, ज्योती बागल
सोमवार, 25 मार्च 2019

प्रॉपर्टी विशेष
या इंटरनेटच्या युगात सर्वच गोष्टी ऑनलाइन मिळतात. त्याला प्रॉपर्टीचाही अपवाद नाही. तुमच्या आवडीचा फ्लॅट, बंगला, जमीन, ऑफिस एका जागी बसून शोधता येण्याचे ठिकाण म्हणजे प्रॉपर्टीच्या वेबसाइट्‌स. हव्या त्या शहरात, हव्या त्या भागात, हव्या त्या किमतीत, हव्या त्या प्रकारची प्रॉपर्टी शोधून देऊ शकणाऱ्या अनेक संकेतस्थळांच्या जाहिराती दिसतात. अशाच काही संकेतस्थळांविषयी...

९९एकर्स डॉट कॉम : या संकेतस्थळावर सर्व मेट्रोपॉलिटन शहरांसह काही निवडक शहरांमधील प्रॉपर्टी लिस्टिंग्ज आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांचा यामध्ये समावेश आहे. या संकेतस्थळावर घर खरेदी करणे, भाड्याने घेणे यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेतच. त्याशिवाय, रेडी पझेशन, बांधकाम सुरू असलेल्या आणि नवीन लाँच होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची माहितीही उपलब्ध आहे. निवासीमध्ये अपार्टमेंट, इंडिपेंडन्ट/बिल्डर फ्लोअर, व्हिला, स्टुडिओ अपार्टमेंट, फार्म हाउस, सर्व्हिस अपार्टमेंट इत्यादींची माहिती उपलब्ध आहे. तर, व्यावसायिकमध्ये दुकाने, शोरूम्स, ऑफिस स्पेस, जमीन, इंडस्ट्रिअल लॅंड, प्लॉट, ॲग्रिकल्चर लॅंड, हॉटेल/रिसॉर्ट, गेस्ट हाउस/बॅंक्वेट हॉल यांसाठीचे लिस्टिंग्ज दिलेले आहेत. याठिकाणी शहर, प्रोजेक्‍ट, सोसायटी, रेंट रेंज असे विविध फिल्टर्स लावून, तसेच नकाशाचा वापर करूनही प्रॉपर्टी शोधता येते. कर्जासाठी विविध बॅंकांच्या गृहकर्ज योजनांची माहितीही इथे दिलेली आहे. तसेच, ॲडव्हाईस या टॅबअंतर्गत विविध लेख, बातम्या, किमती आदींची माहिती आहे. या संकेतस्थळाचे ॲपही आहे.  

प्रॉपर्टी बझार डॉट कॉम : या संकेतस्थळावर निवासी अपार्टमेंट, स्वतंत्र बंगला/व्हिला, जमीन, मजला, फार्म हाउस, स्टुडिओ अपार्टमेंट, पेंटहाउस हे सर्व खरेदी करता येणार आहे आणि भाड्यानेसुद्धा घेता येणार आहे. व्यावसायिक जागांमध्ये स्वतंत्र शोरूम, जमीन, आयटी किंवा बिझनेस पार्कमधील ऑफिस, गोदाम, फॅक्‍टरी, शीतगृह, स्वतंत्र दुकाने, बिझनेस सेंटर, जमीन किंवा प्लॉट, ॲग्रिकल्चरल लॅंड, हॉटेल/मोटेल/रिसॉर्ट, स्वतंत्र ऑफिस, गेस्ट हाउस/हॉस्टेल, रेस्टॉरंट/बॅंक्वेट हॉल, मॉलमधील जागा हे पर्याय उपलब्ध आहेत. जागा शोधताना प्रकार, किंमत, जागा (एरिया), खोल्या अशा प्रकारचे फिल्टर्स लावून प्रॉपर्टी शोधता येते. एजंटच्या मदतीने प्रॉपर्टी शोधायची असेल, तर तो पर्यायही उपलब्ध आहे. येथे दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकता, चेन्नई, सुरत, इंदोर आणि जयपूर या शहरांमधील पर्याय अधिक आहेत. प्रॉपर्टी शोधताना काही अडचण आल्यास तुम्ही हेल्पलाईनद्वारे संपर्क साधू शकता. ॲपवरूनही प्रॉपर्टी शोधणे शक्‍य आहे.

हाउसिंग डॉट कॉम : टाऊनशिप, प्रोजेक्‍ट, अपार्टमेंट, प्लॉट, स्टुडिओ अपार्टमेंट, रिसेल फ्लॅट, डुप्लेक्‍स, पेंटहाऊस, रेडी टू मूव्ह इन फ्लॅट आणि प्रोजेक्‍ट, रेरा प्रोजेक्‍ट, ॲफोर्डेबल प्रोजेक्‍ट्‌स, लक्‍झरी फ्लॅट्‌स अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टी सर्च करता येतील. 
भारतातील सर्व मोठ्या शहरांमधील प्रॉपर्टी लिस्टिंग्ज इथे आढळतील. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर, अकोला, अमरावती, बारामती, चिपळूण, अलिबाग, रायगड, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, दौंड, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, लातूर, लोणावळा, महाबळेश्‍वर, नागपूर, नाशिक, सोलापूर या शहरांमधील प्रॉपर्टी या संकेतस्थळावर शोधता येणार आहेत. विविध शहरांमधील नवीन प्रोजेक्‍ट्‌स, प्राइस ट्रेंडची माहितीही येथे मिळणार आहे. याशिवाय इन हायलाईट, ट्रेंडिंग प्रोजेक्‍ट, फीचर्ड कलेक्‍शन, टॉप लोकॅलिटी, टॉप बिल्डर्स ही वेगळी फीचर्स संकेतस्थळावर पाहायला मिळतील. संकेतस्थळावर ‘द बाईंग गाइड’ देण्यात आलेले आहे. त्यामध्ये घर घेण्यापूर्वी माहीत असाव्यात अशा बाबींची माहिती दिलेली आहे. संकेतस्थळावरून हे गाइड डाऊनलोड करता येईल. याचेही ॲप उपलब्ध आहे.

कॉमनफ्लोअर डॉट कॉम : हे संकेतस्थळ सुरुवातीलाच तुम्हाला कोणत्या शहरातील प्रॉपर्टी हवी आहे, हे विचारते. उदा. तुम्ही नागपूर शहर एंटर केले, तर संकेतस्थळावर वरच्या बाजूला नागपूरमधील जागा दिसतील. त्यामध्ये विक्रीसाठी असलेले अपार्टमेंट, व्हिला, प्लॉट आणि भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या जागांचाही समावेश आहे. तसेच अपार्टमेंट ऑन रेंट हा पर्यायही आहे. त्याशिवाय सुरू असलेल्या, पूर्ण झालेल्या आणि नजीकच्या काळात सुरू होणाऱ्या प्रकल्पांची माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर गेल्या २४ तासांमधील प्रॉपर्टी लिस्टिंग्जची आकडेवारी दिलेली आहे. इस्टेट एजंट हवा असल्यास, त्याचीही यादी संकेतस्थळावर मिळू शकेल. संकेतस्थळावर नव्यानेच ॲड झालेल्या प्रॉपर्टी वेगळ्या देण्यात आल्या आहेत. ग्राहकांसाठी कॉमनफ्लोअर फोरम आणि कॉमनफ्लोअर ग्रुप अशा सुविधा उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरही गृहकर्जाची सेवा उपलब्ध आहे. या सर्व गोष्टी मोबाईलवरूनही बघता येणार आहेत, कारण याचेही अँड्रॉइड व ॲपलसाठी ॲप उपलब्ध आहे.

इंडिया प्रॉपर्टी डॉट कॉम : निवासी जागांमध्ये अपार्टमेंट, स्वतंत्र व्हिला, बिल्डर फ्लोअर, फार्म हाउस, रो हाउस, रिटायर्न्मेंट कम्युनिटी, स्टुडिओ अपार्टमेंट आणि व्यावसायिकमध्ये रिटेल शोरूम, शॉप, इमारत, ऑफिस कॉम्प्लेक्‍स, आयटी पार्क, वेअर हाउस इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, जमिनींमध्ये निवासी, व्यावसायिक, शेतजमीन आणि फार्म हाऊससाठी जमीन हे पर्याय आहेत. लोकॅलिटी, बिल्डर, प्रोजेक्‍ट, बजेट, खोल्या यांसारखे फिल्टर्स लावून प्रॉपर्टी शोधता येईल. प्रॉपर्टी शोधताना लाइव्ह सपोर्टचीही मदत घेता येऊ शकते. ठराविक भागातील किमतींचा अंदाज येण्यासाठी प्राइस ट्रेंड्‌समध्ये आलेखांच्या माध्यमातून संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे. एखादी प्रॉपर्टी आवडल्यास शॉर्टलिस्ट करता येते. गृहकर्जासाठी ऑनलाइनच अप्लाय करता येते. तुम्हीही संकेतस्थळावर प्रॉपर्टीची माहिती देऊ शकता. त्यासाठीची नियमावली संकेतस्थळावरच दिलेली आहे. या संकेतस्थळाचेही ॲप उपलब्ध आहे. 

मॅजिकब्रिक्‍स डॉट कॉम : मॅजिकब्रिक्‍स हेदेखील घर, जागा, फ्लॅट, ऑफिसेस खरेदी, विक्री आणि भाड्याने देणारे व्यावसायिक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गाझियाबाद, फरिदाबाद, हैदराबाद, मुंबई, पुणे, ठाणे अशा मुख्य शहरांत जागा, घर, फ्लॅट शोधायला मदत होऊ शकते. विशेष म्हणजे या संकेतस्थळावर तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भातील निर्णय घ्यायला मदत होईल असे काही टूल्सदेखील दिले आहेत. जसे की, घर विकत घ्यावे की भाड्याने, तुमची लोन एलिजिबिलिटी किती आहे, ईएमआय कॅलक्‍युलेशन्स, एक्‍स्पर्ट सर्व्हिस आणि टॉप एजेन्ट्‌स इत्यादी.

मकान डॉट कॉम : या संकेतस्थळावर तुम्ही फ्रीमध्ये तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात करू शकता. या संकेतस्थळाची रिअल इस्टेट मार्केटिंग आणि ट्रांझॅक्शन सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी मदत होते. यावर प्रॉपर्टी विकणे, खरेदी करणे आणि भाड्याने देणे हे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी सर्च, शॉर्टलिस्ट, प्रॉपर्टी व्हिजिट, होम लोन्स, बुकिंग, मुव्हिंग, रजिस्ट्रेशन अशा सहजसोप्या पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर घर घेतानाचा गायडन्स, नेमके काय खरेदी करावे, घर घेताना महत्त्वाच्या स्टेप्स, घर घेताना कोणत्या साध्या चुका होऊ शकतात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला येथे फ्रीमध्ये मिळू शकते. बेंगळुरू, मुंबई, पुणे, नोईडा, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, लखनौ, जयपूर, विशाखापट्टणम, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या शहरांत घर किंवा जागा शोधायला या संकेतस्थळाची मदत घेता येईल.

क्विकर डॉट कॉम : या संकेतस्थळावर प्रॉपर्टी खरेदी आणि भाड्याने देणे असे दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. या संकेतस्थळाची तुम्हाला दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, कोची, जयपूर, नोईडा अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये जागा, घर, फ्लॅट, अपार्टमेंट, बंगला आणि पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी जागा शोधायला तसेच एखादा प्रोजेक्‍ट घायलाही मदत होऊ शकते.

प्रॉपटीगर डॉट कॉम : हे ऑनलाइन रिअल इस्टेट ॲडव्हायजरी पोर्टल आहे. नवीन घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात यासाठी या संकेतस्थळाची मदत होऊ शकते. त्याचबरोबर होम लोन्स आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, रेराविषयीची माहिती, प्रॉपर्टी बघायला जाताना आवश्‍यक गोष्टींची चेकलिस्ट इत्यादीसाठीदेखील या संकेतस्थळाची मदत होते. भारतातील १२ हून अधिक प्रमुख शहरांमध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही प्रॉपर्टी शोधू शकता.

प्रॉपर्टीवाला डॉट कॉम : हे संकेतस्थळ भारतातील रिअल इस्टेटमधील ग्राहक, विक्रेते, प्रमोटर्स, बिल्डर्स यांना रिअल इस्टेट क्षेत्रातील अद्ययावत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेले असून सर्वजण याचा मोफत लाभ घेऊ शकतात. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील प्रमुख शहरांमध्ये प्रॉपर्टी शोधायला आणि विकायला मदत होऊ शकते. याचबरोबर ऑनलाइन एजंट आणि ब्रोकर शोधण्याचेही पर्याय इथे उपलब्ध आहेत. तसेच, या संकेतस्थळावर ग्राहकांच्या सोयीसाठी रेसिडेंशिअल आणि कमर्शिअल सेल आणि रेंटचे प्राईजस ट्रेंड्‌स दिले आहेत. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना मदत होऊ शकेल असे काही लेखही या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जसे की, गुंतवणूक कशी करावी, गुंतवणूक करण्याची योग्यवेळ कोणती, रिसेल प्रॉपर्टी घ्यावी का? इत्यादी.

द बॅलन्स डॉट कॉम : हे संकेतस्थळ पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे. इथे पहिल्यांदाच घर घ्यायचा विचार करणाऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या थिम्स तर दिल्याच आहेत; शिवाय घर विकणाऱ्यांसाठीही टिप्स दिल्या आहेत. याचबरोबर घर विकताना ग्राहकाला ते कशाप्रकारे दाखवावे, घर विकण्याआधी घरातील कोणत्या गोष्टी दुरुस्त किंवा सुस्थितीत करून द्याव्यात, जेणेकरून ते चांगल्या किमतीला विकले जाईल, घर विक्रीची जाहिरात कशाप्रकारची असावी, मार्केटमधील इतर घरांशी कशा प्रकारे तुलना केल्याने घर विकण्यास किंवा घेण्यास कशी मदत होईल यासाठीच्या टिप्स दिल्या आहेत. याव्यतिरिक्त लोन प्रोग्रॅम्स, होम फायनान्स, हिअरिंग ॲन एजंट, मार्केट फॅक्‍ट्‌स ॲण्ड ट्रेंड्‌स याविषयीचीदेखील माहिती याठिकाणी मिळू शकते.

संबंधित बातम्या