सजावट स्वयंपाकघराची

मेधा देशपांडे
सोमवार, 25 मार्च 2019

प्रॉपर्टी विशेष
 

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक गृहिणीसाठी स्वयंपाक घर मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे सगळीकडे इलेक्‍ट्रॉनिकचा वाढता वापर बघता, या वस्तूंना दिवसेंदिवस बाजारात अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. इलेक्‍ट्रॉनिकवर माणूस अवलंबून राहिल्याने लाइट गेले, की सगळ्यांची चावी गूल होते. कारण, कितीतरी व्यवहार थांबतात. अशा इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंनी आपल्याला किती वेड लावले आहे, हे मात्र ती वस्तू नसल्यावरच कळते. अशा या वस्तू सर्वच क्षेत्रात उपलब्ध आहेत. कारण घरामध्ये प्रत्येक गृहिणी ही मल्टीटास्किंग जॉब करत असते. त्यामुळेच एक स्त्री कोणतेही मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने करू शकते, असे म्हटले जाते. तर स्त्रीच्या मनावर राज्य करणारे हे सध्याचे गुरू, दैनंदिन जीवनात कोणते बदल घडवून आणतात व या गुरूंचा मंत्र, घर इंटिरियर करताना नेमका कोणता असतो ते पाहूया...

 घर घेतले, की इंटिरियरचे बजेट एका बाजूला व होम अप्लायन्सेस, तंत्र व बजेट एका बाजूला. ज्याला इंटिरियरच्या भाषेत ‘व्हाइट गुड्‌स’ म्हणता येईल. सध्या होम अप्लायन्सेसची बाजारात उपलब्ध असलेली प्रॉडक्‍ट्‌स रेंज बघता प्रत्येक गृहिणीला वाटते, की ती आपल्या घरात असावी. अशी ही रेंज घर सजवताना नेमकी कशी वापरावी. कारण आहे त्या जागेत सगळे काही बसवून..आणि त्यात माणसे पण राहणार म्हणजे त्या डिझाइनरसाठी परीक्षेचा पेपर सोडवल्यासारखेच असते. या अप्लायन्सेसमध्ये सर्वांत जास्त पगडा असतो, तो म्हणजे किचनमध्ये उपलब्ध असलेले सगळे प्रॉडक्‍ट्‌स घेण्यापेक्षा जे खरंच आपल्याला उपयोगात येतात व आहे त्या जागेत बसतील असेच प्रॉडक्‍ट्‌स घ्यावेत. किचनमध्ये प्रत्येकालाच ओवन, मायक्रोवेव, ग्रीलर व कुकिंग सहित सर्व मशिन लागतात. त्याशिवाय गृहिणीचा हात कसा बरे चालणार? पण या सर्व मशिन वेगळ्या घेण्यापेक्षा सध्याच्या किचनला उपयुक्त अशी कुकिंगरेंज जरूर घ्यावी. रोज बेकिंग, कुकिंग, ग्रिलिंगचा अनुभव घेत अन्नदाता सुखीभव म्हणावे. या बरोबरच सोडामेकर, ज्यूसमेकर, कॉफीमेकर, टी-मेकर या सगळ्याच वस्तू गृहिणीला मदत करणाऱ्या असतात; पण ज्या कधीतरी लागणार आहेत, त्या वस्तूंसाठी किचनचे इंटिरियर खराब न करता लागेल तेव्हाच या वस्तू प्लगइन करून वापरलेल्या परवडतात. जसे, मॉडर्न किचन हे मॉड्युलर किचन म्हणून ओळखले जाते. तसेच इलेक्‍ट्रॉनिक किचन ही नवीन संज्ञा ऐकायला मिळेल. या व्यतिरिक्त इतर रूम्समध्येदेखील अप्लायन्सेसचा उपयोग वाढलेला दिसतो. जसे, की मूड लायटिंग किंवा रिमोट लायटिंग अँड रिमोट वरचे पडदे बसल्या ठिकाणी वापरायला आवडतात. हॉलमध्ये तर बसल्या ठिकाणी सोफ्याची रिक्‍लीनर खुर्ची तयार होते. थोडक्‍यात काय, तर बसल्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे हवी तशी वागलेली आवडते. यालाच कम्फर्ट म्हणू शकतो.

 किचनमधील इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू सोडून बाकी इतर बऱ्याच वस्तू योग्य जागी ठेवण्यासाठी मोठी कसरत असते. म्हणजे घरातील सगळ्यात किचकट भाग इंटिरियर करताना हाच असतो असे म्हटले तरी हरकत नाही. कदाचित जेव्हा आपण मॉड्युलर किचन किचन स्पेशलिस्टला देतो, तेव्हा इतक्‍या बारकाईने काम करता येत नाही व मिळणारी जागा अपुरी वाटते. कारण कित्येक वस्तूंसाठी जागा देताना अगदी धान्यापासून ते घरातील मोठी भांडी, परातीपर्यंत सगळ्यांसाठीच जागा करावी लागते. या वस्तूंची डिझायनर म्हणून आम्हाला इतकी ओळख होते, की लांबी, रुंदी, उंची सगळे तोंडपाठ. तेव्हा गृहिणीचा अभ्यास पण जोरदारच करावा लागतो, तिच्या उजव्या-डाव्या हाताच्या सवयीपासून ते तिची उंची, तिची मानसिकता या सगळ्यांचाच.  

 तसेच होम इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेत्रांनी ग्राहकांची मानसिकता व त्यांना लागणारी उपकरणाची मदत यावर बरेच संशोधन करून बाजारात इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे बरेच नवीन प्रॉडक्‍ट्‌स उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त अडचण एकच असते, इंटिरियरमध्ये त्याला योग्य जागा मिळण्याची. या संशोधनात पुढे जाऊन क्‍लिनिंग करणारा रोबोदेखील बाजारात उपलब्ध आहे व लवकरच तो घराघरांत दिसू शकेल. असेही इलेक्‍ट्रॉनिकचे मंत्रतंत्र आपल्यावर दिवसेंदिवस हावी होऊन गृहिणीची जागा एक रोबो लवकरच घेऊ शकेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या