बहरलेले सांस्कृतिक पुणे 

अरुण नूलकर
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे विशेष
 

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख सर्वांनाच आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम पुण्यात जवळजवळ वर्षभर सुरू असतात. एकंदरीत चोखंदळ पुणेकर रसिकांची भूक भागविण्याचे काम हे अगदी सगळेच नाही, तरी बरेचसे कार्यक्रम नक्कीच करीत असतात; त्यातही सांगीतिक कार्यक्रमांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असतो आणि तीच बहुसंख्य रसिकांची आवड आणि मागणीसुद्धा असते. प्रस्तुत लेखात पुण्याच्या सांस्कृतिक विश्‍वातील सांगीतिक कार्यक्रमांचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. 

साधारण १९५३ पासून आजतागायत पुण्याचे भूषण मानला गेलेला संगीत महोत्सव म्हणजे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजेच रसिकांच्या बोली भाषेतला ‘सवाई’! आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या संगीतोत्सवाचे मुख्य आधारस्तंभ होते भारतरत्न पं. भीमसेन जोशी! त्यांच्याबरोबर (कै.) सवाई गंधर्वांचे जावई (कै.) डॉ. नानासाहेब देशपांडे, (कै.) दत्तोपंत देशपांडे, (कै.) दाजी करंदीकर, नंतरच्या काळात (कै.) डॉ. एस. व्ही. गोखले इत्यादी सुरुवातीची बरीच वर्षे माझे वडील (कै.) केशवराव नूलकर हेसुद्धा या मंडळींच्या बरोबरीने विश्‍वस्त होते. 

नंतरच्या काळात अर्थातच महोत्सवाचा वाढता विस्तार, लोकप्रियता लक्षात घेऊन जागा बदलत गेल्या. त्यात मोतीबाग, नूमवि प्रशाला, मुलींचे भावेस्कूल, रमणबाग प्रशाला आणि मागच्या वर्षी महाराष्ट्र मंडळाची मुकुंदनगर येथील प्रशाला असे ठळक बदल झाले.

वडिलांमुळे मी आणि माझे बंधूसुद्धा ‘सवाई’च्या आयोजनात होतो. प्रामुख्याने मंडपावरील तिकीट विक्रीचे काम आमच्याकडे असे. तीन दिवसांचे बैठकीचे सीझन तिकीट रु. ३/- इतके अल्प असल्याचे माझ्या आठवणीत आहे. गमतीने काही पुणेकर ‘म्हणजे एक गायक चवलीत पडतो!’ असेही म्हणायचे. पं. भीमसेनजींच्यामुळे अनेक मोठमोठे कलाकार पुणेकर रसिकांना ऐकायला मिळाले आणि आजही मिळताहेत. या दिग्गजांची नावे लिहायला जागा पुरणार नाही; इतक्‍या या सर्वांनी पुण्याच्या ‘सवाई’त आपली कलासेवा रुजू करून पुणेकरांची हवीहवीशी दाद मिळवली आहे. पं. रविशंकर, उ. बिस्मिल्ला खाँ, उ. विलायत खाँ, उ. बडे गुलाम अलीखाँसाहेब, पं. कुमार गंधर्व, उ. अल्लारखाँ, उ. अहमदजान तिरखवाँ, उ. झाकिर हुसेन, उ. अलीअकबर खाँ आणि असे एकाहून एक मान्यवर; तर या महोत्सवात प्रथमच शास्त्रीय नृत्य सादरीकरण सुरू झाल्यावर पं. बिरजू महाराज, पं. गोपीकृष्ण, वैजयंतीमाला, हेमा मालिनी, सितारादेवी यांचेही नृत्याविष्कार पाहायला मिळाले. काही संस्मरणीय मैफली म्हणजे ‘सवाई’तले पं. कुमार गंधर्वांचे गायन, त्यांच्या साथीला तबल्यावर वसंतराव देशपांडे; तर पेटीला पु. ल. देशपांडे आणि दरवर्षी त्या काळात तीन रात्री पूर्ण चालणाऱ्या महोत्सवाचा कळस म्हणजे रविवारच्या प्रातःकाळी होणारे पं. भीमसेनजींचे गायन; अनेक पुणेकरांनी हे गाणे सकाळी दूध आणायला जाता जाता (‘मोफत’ही) ऐकले आहे. 

‘सवाई’च्या आठवणी न संपणाऱ्या आहेत. एका वर्षी तर आयोजकांनी प्रेक्षकांवर गुलाबपाण्याचे नाजूक फवारेही उडवले होते. ते उडवण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठ स्वयंसेवकाला, ‘पाणीमहाराज’ असे प्रेमळ नावही पडले होते. 

‘सवाई’ने अनेक कानसेन नक्कीच तयार केले. ‘सवाई’ला हजेरी लावणे आणि तिथे गाण्याबरोबरच खाण्यावरही मनसोक्त प्रेम करणारे पुण्यातले, बाहेरचे, देशभरातले आणि परदेशातलेसुद्धा रसिक या सर्व परंपरा सांभाळून आहेत. 

‘सवाई’ला मिळणारी अमाप लोकप्रियता बघता त्याच्या तारखांकडे रसिक लक्ष ठेवून असतात. असे महोत्सव हवेहवेसे वाटत असतात. म्हणून कदाचित असेल, पण मागील काही वर्षांत ‘सवाई’व्यतिरिक्त असेच शास्त्रीय संगीताचे आणखी काही महोत्सव दरवर्षी पुण्यात आयोजित होत आहेत. यातला एक महत्त्वाचा म्हणजे गेल्या १०-१२ वर्षांपासून सुरू असलेला ‘वसंतोत्सव’! ख्यातनाम गायक (कै.) पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि सध्याचे लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी स्थापन केलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे हा ‘वसंतोत्सव’ अतिशय वैविध्यपूर्ण असा साजरा केला जातो. 

पुण्यातला संगीतोत्सवांचा सीझन साधारणपणे नोव्हेंबरपासून म्हणजेच दिवाळीनंतर सुरू होतो. त्यातही ‘सवाई’च्या तारखा डिसेंबरचा दुसरा आठवडा हे जवळपास निश्‍चित असल्याने त्यानंतर बाकीचे महोत्सव आयोजित केले जातात. २०१३ पासून, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर त्यांच्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आगळावेगळा असा ‘गानसरस्वती महोत्सव’ आयोजित करत आहेत. 

याशिवाय, गांधर्व महाविद्यालय, पुणे भारत गायन समाज, गानवर्धन, सुरेल सभा, मित्र फाउंडेशन या संस्थाही शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित करत असतात. यापैकी ‘गानवर्धन’ १९७८ मध्ये स्थापन झाली. गेली ४० वर्षे अव्याहतपणे गायन, वादन, नृत्य या शास्त्रीय संगीताच्या तिन्ही उपांगांचा रसिक जनांत योग्य प्रसार व्हावा, या ध्येयाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या या संस्थेने खूपच वैविध्य राखले आहे. संस्थेच्या पत्रकात म्हटल्याप्रमाणे कलासादरीकरणाबरोबरच संगीतसाधकांच्या वैचारिकतेत प्रगल्भता यावी या उद्देशाने संगीत शिबिरे, अखिल भारतीय स्तरावर गायन, वादन, नृत्यस्पर्धा, मान्यवर संगीत विचारवंतांची चर्चासत्रे, सुग्रास संगीतोत्सव, नामवंत गायकांची सप्रयोग व्याख्याने अशा अभिनव उपक्रमांचे आयोजन केले जाते. कलापरिपूर्णतेच्या सीमेवर असलेल्या उदयोन्मुख कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. संस्थापक-अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ १९८२ पासून दरवर्षी अव्याहतपणे सुरू आहे. शास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या सुमारे दोनशेहून अधिक दिग्गजांनी यात आपले विचार मांडले आहेत. ग्रंथ स्वरूपातही ते प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता हा ग्रंथ ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. दरवर्षी त्या वर्षात होणाऱ्या १५ कार्यक्रमांची एकत्रित आमंत्रणपत्रिका वर्षाच्या सुरुवातीलाच दिली जाते. अभिजात संगीताची आवड जोपासणाऱ्या संस्थांमध्ये गानवर्धन अग्रेसर आहे. 

गांधर्व महाविद्यालय, पुणे भारत गायन समाज, गोपाल गायन समाज या शास्त्रीय संगीतातील बुजुर्गांनी स्थापन केलेल्या संस्था संगीत शिक्षणाचे अत्यंत मोलाचे कार्य अव्याहतपणे चालवत आहेत, त्यालाही रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 

मराठी सुगम संगीताच्या क्षेत्रात तर ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हणावे लागेल इतके उदंड कार्यक्रम सतत होत असतात. या क्षेत्रातली पुण्यातली आद्य संस्था म्हणजे १९७० पासून कार्यरत असलेली ‘स्वरानंद’ - आताचे ‘स्वरानंद प्रतिष्ठान’! सुसज्ज वाद्यवृंदासह मराठी गाणी सादर करणारी अशी ही पहिलीच संस्था म्हणून आद्य! त्याआधी गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर हे केवळ तबला-पेटीच्या साथीवर कार्यक्रम करत असत. वाटवे हे तर भावगीताचे जनक! प्रतिभावान कवींच्या रचनांना चाली लावून त्या ऐकण्याची आवड रसिकांच्या मनात निर्माण केली ती गजाननराव वाटवे यांनीच! स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या पुण्याच्या सांस्कृतिक विश्‍वात गजानन वाटवे हे नाव विलक्षण लोकप्रिय होते. गणेशोत्सवातले सर्व दिवस पुण्यात (आणि बाहेरगावीसुद्धा!) चौकाचौकांत त्यांचे कार्यक्रम ऐकायला अलोट गर्दी असे. थोड्या नंतरच्या काळात बी. सायन्ना आणि पार्टी, तसेच सरस्वती काळे ही नावेही लोकप्रिय झाली.

हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उषा मंगेशकर आणि पुण्याची गायिका उषा वर्तक अशा संचात ‘भावसरगम’ कार्यक्रम होत असे, पण संपूर्ण वाद्यवृंद त्यात नसे. म्हणून आमच्या ‘स्वरानंद’ने ७ नोव्हेंबर १९७० ला पुण्याच्या लक्ष्मी क्रीडा मंदिरात सादर केलेल्या ‘आपली आवड’ या कार्यक्रमाला पुणेकरांनी तुडुंब प्रतिसाद दिला. कारण त्याची वैशिष्ट्ये होती, सुरेल गायिका-गायक, सुसज्ज वाद्यवृंद आणि नेटके, शैलीदार निवेदन! रसिकांची आवड पूर्ण होत असल्याने हा कार्यक्रम खूप गाजला.
तरीही, ‘स्वरानंद’ला खरी ओळख मिळाली, ती १७ डिसेंबर १९७५ रोजी भरत नाट्य मंदिरात हाऊसफुल गर्दी झालेल्या, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या अपूर्व कार्यक्रमामुळे! 

‘स्वरानंद’चे तेव्हाचे निवेदक आणि नंतरच्या काळातले प्रतिभावान कवी सुधीर मोघे यांची ही संकल्पना! ‘ग. दि. माडगूळकरांच्या कार्यकर्तृत्वाला दिलेली ती मानवंदना’ असे मोघे म्हणायचे. या पहिल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे हे त्रिकूट म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे हे तीन शिल्पकार प्रत्यक्ष उपस्थित होते... आणि आपण घडविलेल्या त्या काळाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेत होते. कार्यक्रमानंतर रंगमंचावरच जमलेल्या अनौपचारिक मैफलीत बाबूजींनी त्यांच्या त्यानंतर येणाऱ्या चित्रपटातली काही गाणीही ऐकवली. 
पुढच्या काळात ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ दणाणून उठला आणि दिल्लीसुद्धा गाजवून आला. 

विविध निमित्ताने, समयोचित असे कार्यक्रम सादर करून ‘स्वरानंद’ने गेल्या ४८ वर्षांत आपला रसिकवृंद निर्माण केला आहे. भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे झाली, त्यानिमित्त सुधीर मोघे रचित ‘स्वतंत्र ते भगवती’ हा १८५७ ते १९४७ या काळातील प्रमुख घटना-व्यक्तींवरील गीतांचा कार्यक्रम केला; तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कवी जयंत भिडे रचित गीतांचा कार्यक्रम, ‘नमन मृत्युंजयवीरा’ हा तर थेट अंदमानला जाऊन केला. याशिवाय, सुगम संगीतक्षेत्रातील कवी, संगीतकार यांच्या षष्ठ्यब्दि, पंच्याहत्तरी, स्मृतिदिन असेही कार्यक्रम केले. पुलंच्या ६०, ७५ आणि ८० व्या वाढदिवशी ‘पुलकित गाणी’ हा कार्यक्रम त्यांच्याच उपस्थितीत करून त्यांची महत्त्वपूर्ण दाद मिळवली.

एकंदरीत विविध निमित्ताने रसिकांना त्यांची ‘मर्मबंधातली ठेव’ अशी ही मराठी गाणी सादर करून आनंद देण्याचे कार्य ‘स्वरानंद’ आजही करत आहे. 

सुगम संगीताचे असे कार्यक्रम करणाऱ्या आणखी काही संस्था नंतरच्या काळात पुण्यात निर्माण झाल्या. त्यात ‘झलक पुणे,’ ‘स्वरालय,’ ‘स्वरश्री’ यांची नावे घेता येतील. ‘फर्माइशे’ ही संस्था मराठी-हिंदी असे दोन्ही कार्यक्रम करते. 

गेल्या काही वर्षांत पुण्याच्या सांस्कृतिक विश्‍वात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय ठरले आहे. ‘त्रिदल’ या डॉ. सतीश देसाईंच्या संस्थेने ही सुरुवात केली आणि आजही ते आपले वैशिष्ट्य राखून आहेत. तसेच ‘संवाद-पुणे’चे सुनील महाजनही दिवाळी पहाट कार्यक्रमात आघाडीवर असतात. नेहमीच्या नाट्यगृहांसह, मोठी सभागृहे, विविध लॉन्स, फार्म्स, हाउसिंग सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंच असे सर्वजण दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रसिकांच्या आवडत्या सेलिब्रिटी कलाकारांना मुद्दाम आणून कार्यक्रम करतात. रसिकांना आकर्षित करण्यासाठी मध्यंतरात फराळाची सोयसुद्धा करतात! (आता फक्त, ‘अभ्यंगस्नानाची सोय’ एवढेच बाकी आहे.) 
कधी कधी हवे असलेले कलाकार विशिष्ट दिवशी पहाटे नसतील तर तोच ‘पहाट’ कार्यक्रम संध्याकाळी - रात्री असासुद्धा करतात!

हल्ली, पूर्वीच्या मानाने गणेशोत्सवात मराठी गाण्यांचे कार्यक्रम कमी होतात. पण धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असते. उदा. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे पाडवा ते रामनवमी या काळातला संगीत महोत्सव, ‘पुणे नवरात्रौत्सव मंडळा’तर्फे नवरात्रीतला संगीत महोत्सव, कोथरूडच्या बेडेकर गणपती मंडळातर्फे पाडवा ते रामनवमी या काळातला संगीतोत्सव तसेच सातारा रोडवरील श्रीशंकर महाराज मठातील संगीतोत्सव, घसेटी पुलाजवळील श्री अक्कलकोट स्वामी मंदिरातील संगीतोत्सव. 

वर उल्लेख केलेल्या अनेक कार्यक्रमांव्यतिरिक्त तितकेच अनेक कार्यक्रम पुण्याच्या सांस्कृतिक विश्‍वात काही ना काही निमित्ताने होत असतात. कारण आजच्या काळाची ती गरज झाली आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, वाचक मंच, विविध क्‍लब्स, माजी विद्यार्थी संघ, नैमित्तिक सहली, संमेलने असे कितीतरी ग्रुप्स हल्ली निर्माण झाले आहेत. त्यांना घटकाभर करमणूक हवी असते, ती अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून मिळते. 

अर्थात सर्वच कार्यक्रमांना नेहमीच संपूर्णपणे प्रतिसाद मिळतो असे नाही. हल्ली विनामूल्य कार्यक्रमांना ओतप्रोत गर्दी असते आणि काही ठराविक कलाकारांच्या गाण्याला रसिक अगदी तिकीट काढूनही गर्दी करतात. त्यामुळे तशा नवोदित कलाकाराला गुणवत्ता असूनही कधी कधी रसिकांची पसंती मिळायला वेळ लागू शकतो. पण तरीसुद्धा एकदा पुण्यात मनपसंत दाद मिळाली, की मग तो कलाकार सर्वत्र दाद मिळवतो असा भल्याभल्यांचा अनुभव आहे. 

आजचे सांस्कृतिक पुणे तर फारच बहरले आहे. त्यामुळे कुणाही कलाकाराला पुण्याची दाद ही महत्त्वाची वाटते, मग ते ‘सवाई’तले गाणे असो, नाटकाचा प्रयोग असो किंवा सुगम संगीताचा कार्यक्रम असो! ‘पुण्याला स्वतःची संस्कृती आहे, परंपरा आहे, चांगले झालेच पाहिजे, चांगले केलेच पाहिजे यातून ही परंपरा येते,’ असे पुलंनी म्हटले आहे. 

सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या पुण्यात ही सांस्कृतिक परंपरा, तो दर्जा टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे, हे भान मात्र महत्त्वाचे.
 

संबंधित बातम्या