वाडासंस्कृतीच्या पाऊलखुणा...

आशिष तागडे 
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे विशेष
वाडासंस्कृती हे पुण्याचे वैशिष्ट्य होते. पुण्याचा विस्तार होत गेला तसतसे वाड्यांचे अपार्टमेंटमध्ये रूपांतर झाले. मात्र, या वाडासंस्कृतीच्या काही पाऊलखुणा आजही अनेक पेठांतून पाहायला मिळतात. तीच आपुलकी आणि मायेचा ओलावा हे वाडे टिकवून आहेत. 

विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुणे विद्यापीठातील ‘आयुका’मध्ये आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अर्थातच त्यासाठी बच्चेकंपनीसह पन्नाशीत पोचलेले पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आकाश निरीक्षण करताना त्यांच्या सहज गप्पा कधी वाड्यांमध्ये पोचल्या हे अनेकांना समजलेही नाही. रात्री गच्चीत झोपताना ‘ही पाहा शुक्राची चांदणी.. सप्तर्षी.. तो चांदण्यांचा पुंजका आहे, त्याला अमुकतमुक नक्षत्र म्हणतात बरे का...’ असे आजी किंवा वाड्यातील कोणी बुर्जूग सांगत. त्यातून सहज अभ्यास होत होता. ‘आयुका’तील दुर्बिणीतून तोच तारकापुंज पाहताना त्याला वाड्यातील गच्चीची सर मात्र नव्हती... हे सांगायचे कारण म्हणजे पुण्यातील परंपरा जपलेली वाडासंस्कृती आता केवळ पाऊलखुणा जपून आहे. 

पुण्यात पेशवाईच्या काळात ठरवून काही पेठा विकसित करण्यात आल्या. यामध्ये त्या काळातील सरदारांबरोबर मातब्बर मंडळींचे मोठे वाडे बांधण्यात आले. पुण्याचे हे रूप अत्यंत लोभसवाणे आणि तितकेच आपुलकीचे होते. वाड्यात कोणाकडेही साधे कार्य असो, ते पूर्ण वाड्याचे होत असते. कोणाकडे काही वाईट घटना घडल्यास त्या दिवशी अख्खा वाडा त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत असे. एवढेच कशाला वाड्यातील कोणाही कुटुंबाकडे एखादा पाहुणा आल्यास तो पूर्ण वाड्याचा कधी व्हायचा हे पाहुण्यालाही समजत नसायचे. आजही पुण्यातील कसबा, सदाशिव, गुरुवार, शनिवार, सोमवार आदी पेठांतून वाड्यांची संस्कृती कायम आहे. जुने वाडे आपापली आत्मीयता जपून आहेत. अनेक वाड्यांची जागा फ्लॅट किंवा सोसायट्यांनी घेतली असली तरी त्यामध्येही तीच आपुलकी आजही जाणवत आहे. वाडे संपत चालले आहेत, पण वाडासंस्कृतीचा पूर्णतः लोप होत आहे, हे आजही पेठेतून राहणाऱ्यांना जाणवत नाही. आधुनिकता, विभक्त कुटुंब पद्धत, व्यक्तिस्वातंत्र्य, मुलांचे परदेशी वास्तव्य इत्यादी कारणांमुळे वाडे जाऊन तिथे अपार्टमेंट उभे राहिले. परंतु, त्यामध्येही मायेची सय कायम आहे. वाड्याशी जुळलेली नाळ कायम आहे. वाड्यात न राहताही वाड्यासारखी संस्कृती अजूनही आमच्या सोसायटीत जिवंत आहे, असे अनेक सोसायटींमधील सदस्य अभिमानाने सांगतात. वाड्यात आठवड्यात एकेदिवशी सर्व मुले एकत्र येऊन सहभोजन करणार, हा पायंडाच असायचा. कोणाच्या घरात काय शिजतेय हे केवळ वासावरून सर्व वाड्याला समजायचे. 

सहकाराचा आदर्श 
वाडासंस्कृती ही खऱ्या अर्थाने ‘सहकारा’चा आदर्शच मानावी लागेल. आपल्याकडील एखादी जिन्नस संपल्यावर सहजच शेजारच्या काकू किंवा मावशींकडे जाऊन आणणे हा शिरस्ताच होता. एवढेच कशाला, अगदी साखर, लिंबू इथपासून ते पाहुणे जास्त आल्यास उशा, पांघरुणांपर्यंत एकमेकांकडून हक्काने वस्तू मागितल्या जायच्या. वाड्यातील मुलांना ‘खेळायला जा’ असे मोठ्यांना सांगावे लागत नव्हते. सारे जण एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहात. सायंकाळी एकत्र रामरक्षा, भीमरूपी म्हणणे हे ओघानेच आले. गमतीचा भाग म्हणजे टीव्ही आल्यावर तर फार गंमत असायची. वाड्यात एखाद्याकडेच दूरचित्रवाणी संच असायचा. टीव्ही पाहणे म्हणजे मोठा सोहळाच असायचा. आपल्या घरचाच टीव्ही असल्यासारखे आम्ही हक्काने त्यांच्याकडे जायचो. टीव्ही बघायला येऊ का? हे विचारण्याची पद्धतच नव्हती. कारण, परके असे कधी वाटतच नव्हते. क्रिकेटची मॅच असेल तर त्या दिवशीचा माहोल तर विचारायलाच नको. परंतु त्याचेही एक अप्रूप होते. एकमेकांची सुख-दुःखे समजून घेऊन त्यावर तोडगा काढला जात होता. एकमेकांना भरभक्कम मानसिक आधार दिला जात होता. 

काळानुरूप बदल 
पुण्यातून वाडासंस्कृती गेली आणि फ्लॅटसंस्कृती आली. काळानुरूप प्रत्येक बाबतीत फरक हा पडणारच. वाडासंस्कृतीतील माणुसकी आणि जिव्हाळा आजही जपला जाऊ शकतो. वाडासंस्कृतीत कोणीही, केव्हाही एकमेकांकडे जाणार, दार सताड उघडेच. गणेशोत्सवाप्रमाणे चैत्री हळदी-कुंकू, संक्रांतीचे हळदी-कुंकू, वटपौर्णिमेची पूजा वगैरे उपक्रमही एकत्रितपणे राबविले जात होते. आजही ते करणे शक्‍य आहे. केवळ त्यासाठी मानसिकता पाहिजे. पूर्वीचे वाडे म्हणजे केवळ दगड-विटांच्या, मातीच्या भिंती नव्हत्या. त्यामध्ये दगडांप्रमाणे कणखरपणा, तर मातीचा ओलावा नांदत होता. ती संस्कृती जपण्याची आवश्‍यकता आहे. केवळ संस्कृतीच्या गप्पा मारून चालणार नाही, तर त्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. 

आधुनिक वाडे 
पुण्यात आजही अनेक वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत. त्यामधील कुटुंबे मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या वाड्यांनी आपली संस्कृती जपली असून विविध उपक्रम उत्साहात साजरे केले जातात. तर दुसरीकडे पुण्याच्या आसपास खास ‘वाडा संस्कृती’ सांगण्यासाठी आधुनिक वाडे उभे राहात आहेत. त्याचे पुणेकरांना प्रचंड अप्रूप वाटत आहे. पुणेकरांच्या मनात आजही वाड्याबद्दल आपुलकीचा एक कप्पा कायम आहे. वाड्याचा विषय निघताच तितक्‍याच आपुलकीने आणि तन्मयतेने ते यावर भरभरून बोलतात. ‘आमचा वाडा... पेठेची शान होता’ असे अभिमानाने सांगतात. वाडा गेला तरी त्याच्या आठवणी मात्र कायम आहेत.     
 

संबंधित बातम्या