पुण्याची शैक्षणिक संस्कृती 

योगेश बोराटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात सहायक प्राध्यापक
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे विशेष
विद्येचे माहेरघर... ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट... ते अगदी अलीकडच्याच काळातील विद्यापीठांचे शहर! पुणे शहराच्या वेगळेपणाची ओळख करून देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या बिरुदावली शहराचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व सातत्याने अधोरेखित करत आहेत. त्याचवेळी ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ म्हणूनही ओळखले जाणारे हे शहर आपली शैक्षणिक संस्कृतीही जगापुढे मांडत चालले आहे. या संस्कृतीचा टप्प्याटप्प्याने विस्तारही करत चालले आहे. राज्यात आणि देशभरात होणारा हा सांस्कृतिक विस्तार अनेकांना या संस्कृतीच्या केंद्रस्थानाकडे, अर्थात पुणे शहराकडे खेचत राहिला आहे. शहराच्या शैक्षणिक संस्कृतीशी निगडित अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा घेतलेला आढावा. 

पदवीप्रदान समारंभानंतर पदवी मिळविलेल्या नवपदवीधारकांचे माध्यमांमधून उमटलेले प्रातिनिधिक प्रतिबिंब आठवते का? तेच, ते पदवीप्रदान सोहळ्याचे काळे गाऊन्स घातलेले आणि त्याच काळ्या टोप्या आकाशात उडवत उड्या मारणारे ते नवपदवीधर. छायाचित्रांच्या पार्श्‍वभूमीवर असणारी गर्दी आणि विद्यापीठाची मुख्य इमारत. म्हटले तर हा सारा प्रकार तसा पाश्‍चिमात्यांचे अनुकरण म्हणावे असा. मात्र, आपल्याकडे त्यासाठी होत असलेला समारंभ हा शुद्ध मराठीमध्ये व्हावा, यासाठीची सूचना कोणी केली, या प्रश्‍नाचे उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या आणि सध्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १९८० च्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये मराठीमधील ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना विद्यापीठाने डी. लिट. देऊन गौरविले होते. या प्रसंगाच्या निमित्ताने पु. ल. देशपांडे यांनी हे समारंभ मराठीमधून व्हावेत, अशी सूचना केली होती. मराठी भाषेमधून पदवीप्रदान समारंभांचे कामकाज सुरू होण्यासाठी ही सूचना महत्त्वाची बाब ठरली. पुणे विद्यापीठ आणि केवळ पुण्यातीलच नव्हे, तर मराठी साहित्याच्या क्षेत्रातील एक ख्यातनाम साहित्यिक यांच्याशी संबंधित असलेली ही एक बाब राज्यात इतरत्र दुर्लक्षिली गेली असती तरच नवल! या सूचनेचा परिणाम असा, की १९८१ पासून विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाचे मराठीकरण झाले आणि विद्यापीठगीताचा त्यामध्ये समावेश होण्याचा शुभारंभही झाला. ही सूचना त्यानंतरच्या टप्प्यावर पुणे शहरातील शैक्षणिक चालीरितींमध्ये आणि त्यानंतरच्या काळात पर्यायाने राज्याच्या शैक्षणिक संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करणारी एक महत्त्वाची बाब ठरली. त्यामुळेच, राज्यातील विद्यापीठांनी आंग्लभाषेचे दडपण झुगारून मराठी भाषेमधून पदवीप्रदान सोहळ्याचे कामकाज चालविण्यासाठीची संस्कृती पुण्याने रुजविली, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. 

हे झाले केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण! शहराचा शैक्षणिक इतिहास नजरेखालून घातला, तर अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करणे सहज शक्‍य आहे. केवळ उच्चशिक्षणाच्या बाबतीतच नव्हे, तर शालेय शिक्षणाच्या टप्प्यावरही पुणे शहराने अशा अनेक चालीरीती सुरू केल्या. त्या केवळ शहरातच नव्हे, तर राज्यातील आणि गरजेनुसार देशभरातील इतर ठिकाणीही रुजविल्या. नंतरच्या टप्प्यावर शहराच्या शैक्षणिक संस्कृतीच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याचा विचार होऊ लागला. येथे ‘संस्कृती’ या शब्दाचा संदर्भ हा एरवी केवळ नेहमीच्या भाषा - साहित्य - नृत्य - संगीत - नाट्यविषयक घडामोडींचा आढावा घेणारा शब्द म्हणून वापरलेला नाही. समाजाला विशिष्ट पद्धतीने एकत्र बांधून ठेवणारी एक बाब म्हणूनही संस्कृतीचा विचार केला जातो. त्यामध्ये काही विशिष्ट रूढी असतात, प्रघात असतात, काही विशिष्ट मूल्यांच्या भोवतीने हा समाज एकत्र गुंफला जातो. अशा सर्व मुद्द्यांच्या मदतीने संस्कृती ही अशा समाजासाठी जगण्याची समाजमान्य रीत म्हणूनही विचारात घेतली जाते. जगण्याच्या या रीतीमध्ये स्थळ, काळानुरूप नानाविध मुद्द्यांचा समावेश होत राहतो. एका विशिष्ट समाजाचा भाग म्हणून माणसाने स्वीकारलेल्या सवयी, धारणा, कला, नैतिकता, कायदे, परंपरा, ज्ञान इत्यादी मुद्द्यांवर आधारलेली एक किचकट बाब म्हणूनही संस्कृतीचा विचार केला जातो. महत्त्वाची बाब ही, की संस्कृती आणि शिक्षण हे एकमेकांपासून वेगळे ठेवता येत नाही. शिक्षणामधून संस्कृतीच्या प्रसारासाठीचे प्रयत्न होत राहतात. समाजाच्या सांस्कृतिक घटकांवर शैक्षणिक घटकही अवलंबून असतात. संस्कृतीचे जतन आणि संस्कृतीमध्ये बदल अशा दोन्ही भूमिका शिक्षणाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात. त्या आधारे शिक्षणाची संस्कृतीही पुढे जात राहते. या संस्कृतीशी संबंधित विविध व्यवहारांची निर्मिती, त्यांचा पाठपुरावा, त्यामधील बदल आणि सुधारणा आणि पुन्हा नवे व्यवहार अशा एका चक्राच्या माध्यमातून ही संस्कृती पुढे जात राहते. 

या व्यापक चौकटीमधून पुणे शहरामधील शैक्षणिक व्यवहारांचा विचार करता, हे व्यवहार केवळ परंपरा वा चालीरीतींपुरते मर्यादित राहिले नसून, ते एका व्यापक शैक्षणिक संस्कृतीत रूपांतरित झाल्याचे आपण सहजच जाणून घेऊ शकतो. पुण्यात अशी शैक्षणिक संस्कृती रुजविण्यासाठीचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले. ती तितक्‍याच जाणीवपूर्वक रुजविली गेली. या शैक्षणिक संस्कृतीशी निगडित असणाऱ्या प्रवाहांमध्ये सातत्य टिकून राहण्यासाठीच्या यंत्रणा शहर आणि परिसरामध्ये टप्प्याटप्प्याने उभ्या राहत गेल्या. त्या आधारे या संस्कृतीचे जतन होण्यासाठीचे प्रयत्न गांभीर्याने होत गेले. पर्यायाने आज अगदी विद्यापीठांचे शहर म्हणून ओळख निर्माण होण्यापर्यंतचा पुण्याचा इतिहास आपण अनुभवत आहोत. पुण्यात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेले शैक्षणिक प्रयोग हे समाजसुधारणा, देशभक्ती आणि राष्ट्रीय कार्य या भावनांनी प्रेरित होते. महात्मा फुले यांनी सुरू केलेली मुलींसाठीची पहिली शाळा हे 
स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात पहिले पाऊल मानले जाते. महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे दिलेली साक्ष ही शहरी भागातील उच्च शिक्षणावरील खर्चावर, प्राथमिक शिक्षणाच्या हेळसांडीवर, शिक्षण व प्रशासनातील उच्चवर्णीयांच्या मक्तेदारीवर टीका करणारी होती. ग्रामीण भागातील शिक्षणप्रसार, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, स्त्री-शिक्षण आदी मुद्द्यांची नेमकी गरज स्पष्ट करणारी भूमिका फुले यांनी त्यावेळी मांडली होती. देशात शिक्षणाच्या विस्ताराच्या टप्प्यावर फुले यांनी मांडलेल्या या भूमिकांचा सातत्याने पाठपुरावा होत राहिला आहे. त्या अर्थाने मुली आणि बहुजनांसाठीच्या शैक्षणिक संस्कृतीची सुरुवात करण्यासाठीचे व्यापक काम हे महात्मा फुले यांनी याच पुण्यातून केले. महात्मा फुले यांच्या या कार्याने केवळ शैक्षणिक संस्कृतीमध्येच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या समाज सुधारणांच्या संस्कृतीलाही एक वेगळी दिशा दिली आहे. 

समाजसुधारणांची पाठराखण करणाऱ्या शैक्षणिक प्रयोगांची पुण्यात जोपासना होत असतानाच्या काळामध्येच पुण्यात स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्थाही आता शहराच्या शैक्षणिक वैभवाचे एक प्रतीक मानल्या जातात. सध्या राज्यात खासगी विद्यापीठांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग आला आहे. त्यासाठी अर्थातच खासगी शिक्षणसंस्थांची निर्मिती ही एक महत्त्वाची बाब मानली जाते. राज्यात अशा खासगी शिक्षण संस्थांच्या निर्मिती प्रक्रियेची मुहूर्तमेढ पुण्यामध्येच रोवली गेली आणि तीही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये! भारतीयांनी स्वतःच्या बळावर शाळा चालवाव्यात, या मूळ विचारामधून पुण्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरही या प्रयोगामध्ये सहभागी झाले. पुढे याच प्रयोगातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची आणि फर्ग्युसन कॉलेजचीही स्थापना झाली. आज फर्ग्युसन कॉलेज हे स्वतंत्र खासगी विद्यापीठ झाले आहे. एका शाळेपासून सुरुवात होत, एका खासगी विद्यापीठापर्यंतचा टप्पा गाठणाऱ्या फर्ग्युसनचा इतिहास पुणे शहरातील आणि राज्यातील खासगी संस्थांच्या शैक्षणिक संस्कृतीसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. अशीच पार्श्‍वभूमी असणाऱ्या आणि या पुढील काळात स्वतंत्र विद्यापीठ होण्याची क्षमता असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी अशा संस्थांची वाटचाल हाही पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सुरू झालेली ‘सिम्बायोसिस’ ही संस्था तर पुण्याची शैक्षणिक संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यात महत्त्वाचा वाटा उचलते आहे. पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे एक महत्त्वाचे आधारकेंद्र म्हणून या संस्थेची सुरुवातीच्या काळातील एक ओळख होती. ही ओळख जपतानाच आता ही संस्था पारंपरिक शिक्षण, व्यवसाय आणि कौशल्य शिक्षण, व्यवस्थापन शिक्षण, भाषा शिक्षण अशा नानाविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठीचे एक महत्त्वाचे केंद्र झाली आहे. पुण्यात सुरू झालेल्या भारती विद्यापीठासारख्या संस्थेने तर केवळ पुण्यातच नाही, तर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या बरोबरीनेच दिल्लीसारख्या ठिकाणीही आपल्या शाखांचा विस्तार केला आहे. 

सरकारी संस्थांच्या बाबतीत तर पुण्यात एकाहून एक अशा शिक्षणसंस्था आपण बघू शकतो. तत्कालीन पुणे विद्यापीठ आणि सध्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही अशा संस्थांच्या सुरुवातीच्या बाबतीत एक महत्त्वाचा सांस्कृतिक टप्पा ठरतो. मराठी भाषेच्या प्रसारासाठी म्हणून १० फेब्रुवारी १९४९ रोजी हे विद्यापीठ स्थापन झाले. त्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून झालेला सातत्यपूर्ण पाठपुरावा हा राज्याचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे राज्यातील बारा जिल्ह्यांपर्यंत व्यापलेले होते. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, मराठी भाषा यांच्या अभ्यासाची जबाबदारी विद्यापीठाकडे सोपविण्यात आली होती. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. जयकर यांनी एका विद्यार्थ्याकडून विद्यापीठाचे बोधचिन्ह तयार करून घेतले होते. विद्यापीठ आणि  विद्यार्थ्यांच्या तत्कालीन नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारे हे उदाहरण ठरते. विद्यापीठामध्ये राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रे भरविण्याची परंपरा ही सुरुवातीपासूनच जोपासली गेली. विद्यापीठ स्थापनेच्या पहिल्याच वर्षी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे एक अधिवेशन पुण्यात झाले होते. विद्यापीठाचे प्रतिनिधी बाहेरच्या परिषदांसाठी जाण्याची सुरुवातही त्याच काळात झाली. 

विद्यापीठाने बहिःशाल शिक्षण मंडळाचा प्रयोग राबविला. विद्यापीठीय शिक्षणाला थेट समाजाशी जोडणारा हा प्रयोग नंतर सर्वत्र प्रसारित झाला. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद १९६० मध्ये पुणे विद्यापीठात आले होते. देशाच्या राष्ट्रपतींनी विद्यापीठाला दिलेली ही पहिली अधिकृत भेट ठरली. विद्यापीठाने १९८३ मध्ये दूरशिक्षण अभ्यासक्रमांना सुरुवात केली. राज्यामध्ये त्यानंतरच्या काळात सुरू झालेल्या मुक्त विद्यापीठाच्या प्रयोगाची ही पायाभरणी ठरली. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्राध्यापकांना वेळोवेळी प्रशिक्षण मिळावे, म्हणून विद्यापीठाने १९८५ पासून ॲकॅडमिक स्टाफ कॉलेज सुरू केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने हा प्रयोग देशभरात राबविला. चांगले शिक्षक हेरणे व ते आपल्या संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही विद्यापीठामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. पुण्यात नंतरच्या काळात स्थापन झालेल्या अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यापीठाची ही परंपरा कायम ठेवल्याचे, वेळप्रसंगी पुणे विद्यापीठातील तज्ज्ञ आपल्याकडे रुजू करून घेतल्याचेही पुण्याच्या या शैक्षणिक संस्कृतीने अनुभवले आहे. याच पुणे विद्यापीठाने राज्यातील अनेक विद्यापीठांना कुलगुरूपदाचे उमेदवार दिले. विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या सर्वोच्च पातळीवरील संस्थांसाठीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, समित्यांचे प्रमुख व प्रशासकही दिले. या विद्यापीठातील अनुभव गाठीशी असलेल्या अनेकांना राष्ट्रीय पातळीवरील धोरणे ठरविणाऱ्या विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. पुण्यातील कामाच्या अनुभवाच्याच जोडीने त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि व्यापक नियोजनाच्या बळावर अशी संधी मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रीय उपक्रमांना गती आणि व्यापकता मिळवून दिली. या माध्यमातून एका अर्थाने पुण्यातील शैक्षणिक संस्कृतीचे अंश देशभरात पोचत गेले. 

राज्याच्या शालेय शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या सर्व शैक्षणिक व प्रशासकीय संस्था या पुण्यातच आहेत. पुण्यातील शिक्षणतज्ज्ञांचा या संस्थांमधील वावर हा त्यांचे या क्षेत्रातील निर्विवाद प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठरतो. शालेय अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असणारे अभ्यासक्रम संशोधनाचे उपक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मितीचे उपक्रमही पुण्यातूनच चालतात. शिक्षणाच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा मानला गेलेला कोठारी समितीचा अहवाल आणि या समितीसाठी सदस्य सचिव म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. जे. पी. नाईक यांचे कार्य हे शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक मानले जाते. डॉ. नाईक यांच्या प्रेरणेतून पुण्यात सुरू झालेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’सारख्या संस्थाही पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीच्या वाटचालीसाठी आता मोलाची भूमिका बजावत आहेत. या संस्कृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा पालक आणि विद्यार्थी वर्ग कायमच पुण्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी आग्रही राहिल्याचे या शहराचा शैक्षणिक इतिहासच सांगतो. चांगल्या शिक्षणासाठी सरकारी शाळांमधील सुविधा आणि शिष्यवृत्त्यांवर पाणी सोडणारे पालक खासगी शिक्षण संस्थांच्या सुरुवातीपासूनच पुण्यात अनुभवायला मिळाले. 

खासगी क्‍लासची एक समांतर व्यवस्था पुण्याच्या शैक्षणिक इतिहासाचा एक भाग बनत गेली, ते सुरुवातीच्या काळापासूनच. खासगी क्‍लासमधून कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षांसाठीची पूर्वतयारी करून घेण्याचा फटका अगदी फर्ग्युसनसारख्या संस्थेलाही बसल्याचा इतिहास याच पुण्यात अनुभवायला मिळतो. क्‍लासेसच्या जाळ्यांचे सध्याचे वर्तमान म्हणजे ती समांतर व्यवस्था आता या शैक्षणिक संस्कृतीचाच भाग बनल्याचा भक्कम पुरावा देत आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा-कॉलेजांमधून आयोजित होणारे विविध विद्यार्थ्योपयोगी उपक्रम, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे हेही या पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीचे वैशिष्ट्य बनल्याचे अगदी अलीकडच्याच काळामध्ये अनुभवायला मिळत आहे. 

पुण्यातील प्रसारमाध्यमांची व्यवस्था तर अगदी सुरुवातीपासून या शैक्षणिक संस्कृतीच्या प्रसार-प्रचारामध्ये मोलाची भूमिका बजावत राहिली आहे. पत्रकारितेशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्था पुण्यात बहरल्या. अनेकदा शिक्षणविषयक धोरणांचा पत्रकारितेच्या माध्यमातून पाठपुरावा होत राहिला. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये झालेल्या विस्तारानंतरच्या पुण्यातील शैक्षणिक संस्कृतीचे प्रतिबिंब केवळ पुण्यापुरते मर्यादित न राहता ते राज्यभरात, अगदी घराघरामध्ये पोचत राहिले. शिक्षणाच्या क्षेत्रातील चांगल्या प्रयोगांना उचलून धरणे आणि चुकीच्या प्रयोगांना हाणून पाडणे, ही भूमिका या माध्यमांनी वेळोवेळी वठवली आहे. पर्यायाने प्रसारमाध्यमांमधून ही शैक्षणिक संस्कृती अधिकच बहरत गेली. असे असले, तरी राष्ट्रनिर्माणाचे कार्य डोळ्यासमोर ठेवत सुरू झालेल्या पुण्यातील शैक्षणिक क्षेत्राची वाटचाल अलीकडच्याच काळात सर्व्हिस इंडस्ट्रीकडे झाल्याचा अनुभवही याच शैक्षणिक संस्कृतीने तुम्हा-आम्हाला दिला आहे. ब्रिटिशांचे सांस्कृतिक प्रभुत्व मोडून काढत देशी शिक्षणाला बळकटी देण्याचे काम प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीमध्ये नंतरच्या काळात मात्र व्यावसायिकतेचे वारे वाहू लागले. केवळ पुणेरी अभिजनवाद प्रसारित करणारी शिक्षणव्यवस्था राज्यावर लादल्याची टीकाही पुढे येत गेली. खरे तर एका विशिष्ट संस्कृतीला दूर सारण्यासाठी दुसऱ्या एका विशिष्ट संस्कृतीचा तितक्‍याच ताकदीने आणि सातत्यपूर्ण पद्धतीने पाठपुरावा होत जाणे, ही तशी एक सामाजिक गरजच असते. असे असल्याने पुण्यातून निर्माण झालेल्या शैक्षणिक संस्कृतीला पर्याय ठरेल, अशी दुसरी तितकीच व्यापक आणि बलवान शैक्षणिक संस्कृती पुढे येणे ही एक सामाजिक गरजच म्हणायला हवी. मात्र, अद्यापही अशी सामाजिक गरज तितक्‍या व्यापकतेने विचारात घेतली जात नाही, हे पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीचे एक यशच म्हणायला हवे.    
 

संबंधित बातम्या