माझ्या मनातला पाऊस

(संकलन ः आशिष तागडे, ज्योती बागल)
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

पावसाचा आनंद कसा लुटावा याची प्रत्येकाची कल्पना वेगळी असते. कोणाला लाँग बाइक राईडला जायला आवडतं, कोणाला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी भटकायला आवडतं; एखाद्या शाळेतल्या मुलाला डबक्यात उड्या मारायला आवडतं, तर कोणाला गॅलरीत भजी-चहाचा आस्वाद घेत पाऊस बघायला आवडतं. एखाद्याला चक्क पांघरूण ओढून ताणून द्यायला आवडतं... थोडक्यात काय प्रत्येकाची पाऊस ‘एन्जॉय’ करण्याची पद्धत वेगळी. अशाच काही जणांच्या ‘मनातला हा पाऊस’...

पाऊस म्हणजे आनंदी आनंद!
आजही पाऊस पडायला लागला की 'ये रे ये रे पावसा, तुला देते पैसा' हे गाणं मोठ्याने म्हणत नसले तरी नकळत गुणगुणलं जातंच. लहानपणी करायचो तसं भर पावसात उड्या न मारता मस्त दोन्ही हात पसरून पावसाला कवेत घेऊन भिजायला मला प्रचंड आवडतं आणि पावसाच्या सरीत ओलंचिंब होऊन पाण्यात कागदाची होडी करून सोडायची मज्जा आजही कमी झालेली नाहीये. अगदीच जोराचा पाऊस पडत असेल तर रस्त्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात छपाक छपाक करत दूरपर्यंत चालत जाणं म्हणजे भारी! मला लोणावळा खंडाळ्याच्या घाटात बाईकवरून प्रवास करत तिथला पाऊस एन्जॉय करायलाही खूप खूप आवडतं! अर्थात हे थोडं रिस्की आहे पण त्यात मजाही तेवढीच येते... आणि पावसात भिजल्यावर मला गरमागरम भुट्टा खाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. तर असा पावसाळ्यात एकूणच आनंदी आनंद असतो!
- मनस्वी झोंबाडे, व्यवस्थापक, रायझिंग स्टार प्री स्कूल

 

हरवलेला पाऊस!
मला पाऊस आवडतो आणि पावसात भिजायला पण आवडते. पाऊस आल्यावर मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो. सगळीकडे थंडगार फ्रेश हवा असते. पाऊस म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सगळीकडे हिरवळ, डोंगर-दऱ्या, पाण्याने वाहणारे धबधबे. पावसाळ्यातला निसर्ग मनाला प्रसन्न करतो.

विजांचा कडकडाट होतो, तेव्हा ढगात आजी दळण दळत असते, असं लहानपणी ऐकायचो तेव्हा मला प्रश्न पडायचा की आजीबाईचं ते जातं किती मोठ्ठं असेल ना? पाऊस आल्यावर छत्री घेऊन मित्रांसोबत फिरायला जाणं म्हणजे भारी गंमत असते. आमच्या शाळेचं पटांगण खूप मोठं आहे. पावसाळ्यात तिथं खूप पाणी साचतं, तेव्हा आम्हा मुलांना एकच काम असतं, ते म्हणजे पाण्यात होड्यांची शर्यत लावणे. कोणाची होडी लांब जाते? आणि कोण नवनवीन प्रकारच्या होड्या करून आणतात? आता शाळा बंद असताना मला त्या पटांगणाची, होड्यांची आणि मित्रांचीही खूप आठवण येते. या कोरोनामुळे तर आई पावसातही भिजू देत नाही. असा हा माझा हरवलेला पाऊस मला पुन्हा हवाय!
- कार्तिक किरण खराडे, विद्यार्थी (इयत्ता ८ वी)

मातीचा दरवळ आणि मनसोक्त भिजणे
तीन वेगवेगळ्या शहरातील पाऊस अनुभवला. शालेय शिक्षण अहमदाबाद महाविद्यालयीन शिक्षण पुणे आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईचा पाऊस अनुभवला. अहमदाबादचा पाऊस भीतीदायक, पुण्यातील पाऊस शांत, तर मुंबईच्या पावसाचा स्वभाव वेगळाच आहे. मातीचा सुगंध यायला लागल्यावर मनात खूप चैतन्याच्या भावना निर्माण होतात. काळे ढग म्हणजे लेदरचे जाकीट घालून घोड्यावर दौडत येणारे स्वार वाटतात. पावसात मनसोक्त भिजण्याची मजा काही औरच असते. 
पुण्यात असताना पाऊस सुरूझाल्यावर फिरण्याचा मोह आवरत नाही.

महाविद्यालयात असताना माझ्याकडे यामाहा कंपनीची दुचाकी होती. पाऊस सुरू झाल्यावर दुचाकीला किक मारून मनसोक्त भटकंती करायचो. आजही पाऊस सुरू झाल्यावर पूर्वीप्रमाणेच भिजण्याचा मोह आवरता येत नाही, आणि मी आवरत नाही..मनसोक्त भिजतोच.
- प्रसन्न केतकर, अभिनेता

 

कोकणातला पाऊस अनुभवायचा आहे!
पावसाळा हा ऋतू तर मला सगळ्यात जास्त आवडतोच, पण मला एकदा कोकणातला पाऊसपण अनुभवायचा आहे. तिथल्या हिरव्यागार झाडांनी भरलेला निसर्ग, ढगाळ वातावरण, मातीचा येणारा सुगंध, धो धो पडणारा पाऊस आणि चोहीकडे पसरलेली धुक्याची चादर आणि गार गार हवा असा पावसातील निसर्ग मला अनुभवायचा आहे.
डोंगराळ भागातील निसर्ग पावसाळ्यात फार खुलून दिसतो. अशा ठिकाणी संध्याकाळच्या वेळी मस्त कडक कडक चहा पिता-पिता खिडकीत बसून पावसाचा आनंद घ्यायलाही मला फार आवडेल. तसेच पावसाळ्यात अशा भागातून प्रवास करणे म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, आणि झालेही तसेच. अलीकडेच काही दिवसांपूर्वी मला कल्याणहून अहमदनगरला प्रवास करता आला. पाऊस सुरू होता आणि दुपारी चारच्या सुमारास आम्ही माळशेज घाटात होतो, त्यावेळी मी जो निसर्ग अनुभवला त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. असा हा पाऊस प्रत्येकवेळी नवनवीन, आनंदी आठवणी देऊन जातो.
- गायत्री विजय मनेक, विद्यार्थिनी, पालघर.

 

निसर्गाचे बहुरंगी लँडस्केप...
पावसाळ्यात निसर्गाच्या विविध रंगछटा अनुभवायला मिळतात. काळ्या पहाडांवरून शुभ्र जलधारा कोसळतात. मग नद्यांमधून वाहताना त्यांना मातीचा मातकट रंग येतो. हिरवेगार नदी किनारे आणि त्यातून वाहणारा हा मातकट प्रवाह, आकाशाची निळाई अशी विविधरंगी छटा निसर्गात उमटते. धुलीकण विरहित वातावरणामुळे नजरेला ही निसर्गाची रंगसंगती अधिक स्पष्टपणे जाणवते. भवताली भासणारी प्रसन्नता मनावरचे मळभही दूर करते. नवनिर्मितीची भावना दाटून येते. पण पावसाळ्यात कुंचला घ्यावासा वाटत नाही. त्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे बाष्प. या काळाच हवेत बाष्प असतं. त्यामुळे जलरंगातील चित्र वाढायला वेळ लागतो. ताईला रंगातील चित्रांना बुरशीचा धोका संभवतो. अनेकवेळा हे रंग एरवी सारखे परिमाणकारक वाटत नाहीत. म्हणून मग चित्र काढणं नको वाटतं. पण हा पावसाळा डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न नक्की करतो. त्यासाठी मग काही मित्रांबरोबर कोल्हापूर जवळच्या डोंगरांवर जाणं. दरी खोऱ्यातून भटकणं. गप्पांचे फड रंगवणं हे सगळं पावसाळ्यात चालतं. नेहमी पाण्यात असणारी ठिकाणं पावसाळ्यात अत्यंत वेगळी भासतात. कोल्हापुरातला पंचगंगा नदी घाट शेकडो वेळा रेखाटला आहे. पण दर पावसाळा घाटाची नवी छटा दाखवून जातो. कधी कधी एखादी दुपार अशी असते की या सगळ्याचा कंटाळा येतो. बाहेर पाऊस मी मी म्हणत कोसळत असतो. धुक्याची दुलईच पसरलेली असते. अशावेळी खिडकीतून त्याचं कोसळणं पाहत बसावसं वाटतं. जोडीला वाफाळलेला चहा आणि एखादं पुस्तक असतं. पुस्तकातील शब्द आणि पावसाचा घननाद कधी एक होतो तेच कळत नाही. मात्र अशी दुपार कायमची स्मरणात राहते. पावसाळा रेखाटण्यापेक्षा निसर्गाचं हे बहुरंगी लॅंडस्केप मनात साठवून ठेवावंस वाटतं.  
- संजय शेलार, चित्रकार, कोल्हापूर 

मोहवून टाकतो....
पाऊस ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. पाऊस हा जीवनासाठी अत्यंत आवश्यकच आहे. संगीत आणि पावसाचे अनोखे ऋणानुबंध आहे. त्यामुळे पाऊस कसाही असला तरी तो मला मोहवून टाकतो. कधी रिमझिम पडणारा कधी कोसळणारा तर कधी संथ लयीत टपटप पडणारा... पावसाच्या संबंधित रागही आहेत. गुरुजन पावसाचा राग गातात त्यावेळी तशी वातावरण निर्मिती होते. कारण गुरुजनांकडे ती सिद्धी प्राप्त झालेली असते. सर्वसामान्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करणे ही संगीताची शक्ती आहे. ते संगीत आनंद निर्माण करते. पावसाळा मला कायम हवाहवासा वाटतो. त्यावरील आधारित राग गावेसे वाटतात. ते गात असताना वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. स्वतःच्या आनंदाची ती भावना असते. ती फक्त पावसातच निर्माण होऊ शकते.
- मंजूषा पाटील, गायिका

संबंधित बातम्या