बदलता पाऊस

डॉ. रंजन केळकर
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

गेला रविवार. ११ जुलै २०२१. आषाढ महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे आषाढाचा पहिला दिवस, अर्थात कालिदास दिन. पण तो केवळ एका महाकवीचा स्मृतिदिन नाही. तो जणू मॉन्सूनच्या आगमनाचा उत्सव आहे. कालिदास-रचित मेघदूत या महाकाव्याची सुरुवात “आषाढस्य प्रथम दिवसे..” या तीन शब्दांनी झालेली आहे. शृंगार रसानं ओतप्रोत भरलेल्या मेघदूतात अचूक हवामानशास्त्रही सामावलेलं आहे. त्यात ढगांचं बाह्यरूप, त्यांची आतील रचना, पर्जन्याची प्रकिया, मॉन्सूनचा मार्ग, सर्व काही वर्णन केलेलं आहे. पण मेघदूतातून स्पष्ट होतं ते हे, की कालिदासाच्या काळी, नैऋत्य मॉन्सूनचं आगमन आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी होत असे. म्हणजेच आजपासून १,६०० वर्षांपूर्वीही मॉन्सून आतासारखाच होता.

‘मॉन्सून’चा खरा अर्थ वर्षात दोनदा दिशा बदलणारे वारे असा आहे. ही माहिती कवी कालिदासालाच नाही, तर त्याच्या आधीच्या काळातील व्यापाऱ्यांनाही होती. नैऋत्य मॉन्सूनचे वारे वाहू लागले, की भारताच्या पश्चिमेकडील देशांचे व्यापारी शिडांच्या जहाजांमधून केरळच्या किनारपट्टीवर येत असत. तिथं ते चार महिने मुक्काम करायचे, मसाले इत्यादी विकत घ्यायचे. मग मॉन्सूनचे वारे उलट दिशेनं वाहू लागले, की तो माल जहाजांत भरून ते घरी परतायचे. त्याकाळची परदेशी नाणी व काही वस्तू केरळमधील उत्खननात सापडल्या आहेत. त्या भारताच्या जुन्या व्यापारी संबंधांचा पुरावा सादर करण्याबरोबरच तेव्हाच्या मॉन्सूनच्या वाऱ्यांविषयीही साक्ष देतात. मॉन्सूनचे वारे प्राचीन काळीसुद्धा, आजच्यासारखेच वाहत होते.  

बदलतं जग आणि बदलता भारत  
ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. या ऐतिहासिक घटनेचा अमृतमहोत्सव आपण पुढील वर्षी साजरा करणार आहोत. या पाऊणशे वर्षांच्या कालखंडात एक बदल असा होत गेला ज्यानं संपूर्ण जगाला व्यापलं. तो म्हणजे हवामान बदल. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड नामक एक अत्यल्प पण महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही दशकांमध्ये जगभर झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळं कार्बन डायऑक्साईड वायूच्या प्रमाणात ३० टक्के वृद्धी झाली आणि परिणामी पृथ्वीचं सरासरी तापमान १ अंश सेल्सिअसनं वाढलं. यालाच वैश्विक तापमान वाढ हे नाव दिलं गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची लोकसंख्या ३० कोटी होती. २०११ च्या जनगणनेत ती १२० कोटी मोजली गेली. म्हणजे दरम्यानच्या कालावधीत आपली लोकसंख्या चौपट वाढली. पण याबरोबरच, भारताचं वार्षिक अन्नधान्य उत्पादन जे १९४७ मध्ये ५० मिलियन मेट्रिक टन होतं, ते आता ३०० मिलियन मेट्रिक टन इतकं म्हणजे सहापट वाढलं. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, वादळं, अशा अनेक प्रकारच्या प्रतिकूल हवामानावर मात करून आपल्या शेतकऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी, आणि राज्यकर्त्यांनी एकत्रितपणे घडवून आणलेला हा चमत्कार आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर भारतानं हवामान बदलावर मिळवलेला हा विजय आहे. आणि तरीही, दर वर्षी, मॉन्सूनच्या आगमनाची तारीख जवळ येऊ लागली की, तो एक चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनतो. भारताची सध्याची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी आहे. तिच्या वाढीचा दर लक्षात घेतला तर २०६० पर्यंत ती १६४ कोटीचा आकडा गाठू शकेल. त्यावेळी अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायला भारताला दर वर्षी ३५० मिलियन मेट्रिक टन उत्पादन करावं लागेल. हे लक्ष्य साध्य करणं अशक्यप्राय नाही. पण समस्या ही आहे की, शेतीसाठी लागणारी सुपीक जमीन आणि सिंचनाची उपलब्धता मर्यादित आहे. त्याशिवाय जर हवामान बदल होत राहिला, आणि मॉन्सूनवर त्याचा विपरीत परिणाम झाला, तर मग शेतीचं काय होईल, हा प्रश्न उद्‌भवतो. म्हणून चिंता फक्त हवामान बदलाची नाही, पण भविष्यातील भारताच्या अन्न सुरक्षेची आहे. 

सामान्य मॉन्सून  
या पार्श्वभूमीवर, आगामी मॉन्सून सामान्य राहील असं पूर्वानुमान एकदा जाहीर झालं की, आपल्याला हायसं वाटतं. पण सामान्य मॉन्सून हा एक आदर्श मॉन्सून नसतो. खरं तर आदर्श मॉन्सूनविषयी प्रत्येकाच्या मनात एक निराळीच कल्पना असते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांचा आदर्श मॉन्सून म्हणजे ज्यात पेरणीच्या वेळी भरपूर पाऊस पडतो, नंतर अधूनमधून पाऊस आणि उघडीप असते, आणि कापणीच्या वेळी पाऊस नसतो. धरण प्रबंधकांना वाटतं की, धरणाचे दरवाजे उघडायला लागतील एवढा पाऊस पडू नये आणि मॉन्सूनच्या शेवटी धरणात वर्षभर पुरेल एवढा साठा राहावा. शहरी नागरिकाच्या आदर्श मॉन्सूनमध्ये अतिवृष्टी होत नाही आणि कामावर जातायेताना पाऊस पडत नाही. 

सामान्य मॉन्सूनची व्याख्या संपूर्ण देशावरच्या आणि पावसाळ्यातील चार महिन्यांच्या पावसाच्या सरासरीवर आधारलेली आहे. प्रत्यक्षात, सामान्य मॉन्सूनमध्ये देशात कुठं पाऊस पडतो तर कुठं पडत नाही. तो कधी पडतो तर कधी पडत नाही. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडू शकतो. या सर्वांची सरासरी १०० टक्के भरली तरी कोणाचंही १०० टक्के समाधान होत नाही.   

निसर्गाचा नियमितपणा 
निसर्ग त्याची कामं वेळच्या वेळी करत राहतो. असं कधी झालेलं नाही की, मॉन्सून आलाच नाही किंवा तो जूनऐवजी मार्चमध्ये आला. पण निसर्गाच्या नियमितपणात त्याला थोडं अनियमित राहण्याची मुभाही आहे. मे महिना संपावा आणि मॉन्सून दाराशी हजर व्हावा असं होत नाही. त्याचप्रमाणं, सप्टेंबर महिना जावा आणि मॉन्सूननं परतीचा मार्ग धरावा असंही होत नाही. जेव्हा मॉन्सून आपल्या अपेक्षेनुसार वागत नाही तेव्हा आपण म्हणतो की, पाऊस बदलला आहे. आपल्याला वाटू लागतं की, अलीकडील काही वर्षांत पावसाचं वेळापत्रक बदललंय. आता यापुढंही असंच होणार. पण मॉन्सून परत मूळपदावर आला की, पुन्हा आपला अपेक्षाभंग होतो.

मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागानं मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या सरासरी तारखांचं एक नवीन वेळापत्रक जाहीर केलं. अलीकडच्या काळातील हवामानाच्या नवीन नोंदी विचारात घेऊन आणि आधुनिक विश्लेषण पद्धतींचा अवलंब करून हे नवं वेळापत्रक तयार केलं गेलं होतं. या सुधारित वेळापत्रकानुसार नैऋत्य मॉन्सूनच्या महाराष्ट्रावरील विविध शहरांत आगमनाच्या सरासरी तारखा अशा आहेतः ८ जूनला कोल्हापूर, १० जूनला पुणे व बारामती, ११ मुंबई, १२ अहमदनगर, १३ औरंगाबाद व परभणी, १४ मालेगाव, १५ अकोला व अमरावती, १६ नागपूर, आणि १८ जूनला जळगाव. या नवीन सरासरी तारखा पूर्वीच्या तारखांपेक्षा थोड्या उशिराच्या आहेत. पण मागचा आणि यंदाचा मॉन्सून या तारखांना आलाच नाही. यावेळी तो केरळमध्ये ३ जूनला दाखल झाल्यावर काही दिवसांतच दक्षिण महाराष्ट्रात आला आणि १० तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्यानं व्यापून टाकलं. 

मॉन्सूनचं वेळापत्रक हवामानशास्त्रज्ञ आखू शकतात, पण मॉन्सूनवर ते लादू शकत नाहीत. मॉन्सूननं ते पाळलं नाही तर काही असामान्य घडलं आहे असं नाही. आपण ठरवून दिलेल्या चाकोरीत निसर्गानं फिरावं हा एक मानवी दुराग्रह म्हणावा लागेल. ऋतुचक्र बदललं आहे असा निष्कर्ष काढला जाणंही चुकीचं आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यामुळं दिवस आणि रात्र निर्माण होतात. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा एका वर्षात पूर्ण करते, पण तिचा हा अक्ष झुकलेला असल्यामुळं ऋतू निर्माण होतात. म्हणून हवामानाचा आणि ऋतूंच्या कालावधींचा संबंध जोडला जाऊ नये.  

सुकाळ, दुष्काळ आणि अवकाळ
मॉन्सूनच्या येण्याजाण्यात कालानुसार फेरबदल झाल्याचा ऐतिहासिक पुरावा नाही, आणि भविष्यात तो होण्याची फारशी संभावनाही नाही. मागील दीडशे वर्षांत मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यमानात चढउतार झालेला असला तरी त्यात सातत्यानं वाढ किंवा घट होत असल्याचा निश्चित संकेत दिसत नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याला आश्वस्त करणाऱ्या आहेत.

पण मॉन्सूनमधील पावसाच्या वितरणाविषयी असं ठामपणे सांगणं कठीण आहे. आपल्या देशातील आणि परदेशातील अनेक शास्त्रज्ञ हवामान बदलाचा सखोल अभ्यास करत आहेत आणि भारतीय मॉन्सूनवर त्याचा काय परिणाम होऊ शकेल याचा ते शोध घेत आहेत. मात्र त्यांच्या विविध निष्कर्षांत एकवाक्यता नाही. काही शास्त्रज्ञ म्हणतात की, हवामान बदलामुळं भारतावर भविष्यात वारंवार दुष्काळ पडतील. कोणी म्हणतात की, येणाऱ्या काळात मॉन्सून अधिक सक्रिय होईल. काहींचं म्हणणं आहे की, सरासरी पर्जन्यमान आहे तेवढंच राहील पण जोरदार सरी कोसळतील आणि त्यांमधील कालांतर वाढेल. 

अतिवृष्टी आणि दुष्काळ ही पर्जन्यमानाच्या विषमतेची दोन टोकं आहेत. यंदा मुंबईत मॉन्सून दाखल झाला त्या दिवशी, ९ जून २०२१ला, २४ तासांत २३ सें.मी. पाऊस नोंदला गेला. या आधी मुंबईत २६ जुलै २००५, रोजी ९४ सें.मी. पाऊस पडला होता, जो आजवरचा उच्चांक आहे. हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटना वाढत आहेत अशी एक विचारधारा आहे. पण मुंबईसाठी अतिवृष्टी काही नावीन्यपूर्ण घटना नाही. तिथं यापूर्वीही, ५ जुलै १९७४ ला ५८ सें.मी. आणि २१ सप्टेंबर १९४९ रोजी ७० सें.मी. पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. अतिवृष्टीच्या संदर्भात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा नद्यांना पूर येणं नैसर्गिक आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला किंवा बिहारमधील कोसी नदीला असे पूर नेहमीच येतात. पण शहरी पूर एक नवीन समस्या आहे जिच्यामागं अतिवृष्टी हे एकमेव कारण नाही. अवैध बांधकामं आणि पाण्याच्या निचऱ्याची अपुरी व्यवस्था ही कारणंसुद्धा आहेत. केवळ बदलत्या पावसाला दोषी न ठरवता यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. 

हवामान बदलामुळं दुष्काळी परिस्थिती वारंवार उद्‌भवेल अशीही भीती व्यक्त केली जात असल्याच्या संदर्भात हे लक्षात घेतलं पाहिजे की, पूर्वी १९७२, १९८७, २००२ साली देशभरात मोठे दुष्काळ पडलेले आहेत. सामान्य मॉन्सूनमध्येही देशातील काही भागात अधून मधून दुष्काळ पडत असतो. महाराष्ट्रापुरतं पाहिलं तर दुष्काळामागचं प्रमुख कारण त्याची भौगोलिक परिस्थिती आहे. कोकणात भरपूर पाऊस पडतो. तिथं दुष्काळ पडत नाही. पण नैऋत्य मॉन्सूनचे वारे सह्याद्री पर्वत पार करतात तेव्हा त्यांची शक्ती कमी होते. त्यामुळं मध्य महाराष्ट्रात बेताचा पाऊस पडतो. विदर्भात पुन्हा चांगला पाऊस पडतो कारण बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडून येणारे वारे बाष्प आणि ढग घेऊन येतात. मराठवाडा ही मधलीची कहाणी आहे. बंगालच्या उपसागरावरील वारे तेथे पोहचत नाहीत आणि अरबी समुद्रावरचे वारे तिथं येईपर्यंत मंदावलेले असतात. अशी ही भौगोलिक परिस्थिती आपण बदलू शकत नाही. ती फक्त समजून घेऊन आपण उपाय शोधू शकतो. वार्षिक पर्जन्यमानाचा ८०-८५ टक्के पाऊस मॉन्सूनच्या चार महिन्यात पडतो. बाकीचा १५-२० टक्के इतर महिन्यात पडतो. त्याला आश्चर्यकारक घटना समजून अवकाळी संकट म्हणणं चुकीचं आहे. कारण तो अपेक्षित असतो आणि त्याचं पूर्वानुमानही दिलं जातं.  

भविष्याला सामोरं जाताना
हवामान बदलाचा परिणाम भारतीय मॉन्सूनवर नेमका काय होईल याविषयी सध्या जरी शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता नसली तरी त्याचा सर्वाधिक प्रभाव शेतीवर पडेल हे निश्चित. पारंपरिक शेती आणि पिकं हवामानाशी सुसंगत आहेत. खरीप हंगामात मॉन्सूनच्या पावसावर शेती केली जाते आणि रबी हंगामात जमिनीत मुरलेल्या पाण्यावर जाडीभरडी पिकं काढली जातात. पण आता प्रगतिशील शेतकरी नवनवीन पिकं आणि शेतीच्या पद्धती उपयोगात आणत आहेत. असं करताना हवामानाच्या परिवर्तनशीलतेची माहिती करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतं हवामान कोणत्या पिकासाठी विपरीत ठरू शकेल हे आधीच विचारात घेणं गरजेचं आहे. नाहीतर, यशाऐवजी अपयश पदरी पडू शकेल. शेतकरी असोत किंवा अन्य कोणीही, हवामान मुळातच किती चंचल आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पावसातील बरेच बदल तात्पुरते असतात आणि परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होते. म्हणून प्रत्येक अनपेक्षित घटना हवामान बदलाची पूर्वसूचना समजून घाबरून जायचं कारण नाही. पावसाचे कायमस्वरूपी बदल शोधून काढणं आणि त्यांच्याशी जुळतं घेऊन प्रगतिपथावर राहणं यात सुज्ञान आहे. वराहमिहिरानं बृहत्संहितेत लिहिलं आहे, “आदित्यात् जायते वृष्टिः”. जोवर सूर्य असेल तोवर पृथ्वीवर पाऊस असेल.   
(लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक असून हवामानशास्त्र या विषयावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये विपुल लेखन केले आहे.)

संबंधित बातम्या