कविता
झडझिम्मड
पावसाळी दुपार....
काठोकाठ भरलेलं आभाळ
उतावळ्या डोळ्यानी पीत बसावं
अशी एखादी दुपार...
कुलुपबंद काळजाची
एखाद हळवी खिडकी शोधुन
आत शिरकाव करते
अन आतल्या वळवाला निमित्त मिळतं...
उगीचच रिकाम्या बोटात
कुणाची तरी बोटं
गुंतल्याचा आभास होतो..
मोगऱ्याचा गंध बैचेन करतो
सोनचाफ्याची चाहुल थबकते,
वाफाळलेल्या काफीचा दरवळ
नाकाच्या शेंड्याशी रेंगाळतो,
एकाच छत्रीखाली भिजल्यागत
अचानक डावा खांदाही शहारतो..
समुद्रावरचा उनाड वारा हजारदा
कानाशी भणाणून जातो
उधाणलेल्या आठवणींनी पुन्हा एकदा
मनाचा कोपरान कोपरा दणाणून जातो..
बेभानलेलं भुतकाळाचं वादळ
मग थोपता थोपत नाही
खरंच... हल्ली पुर्वी इतकी मला
पावसाळी दुपार झेपत नाही
- गुरु ठाकूर
-------------------------------------------------------------------------------
पावसाने रोज यावे....
पावसाने आज यावे!
पावसाने रोज यावे!
दिवस रात्रींनी तयाला
अंथरावे..पांघरावे!!
पावसाचे गद्य सुंदर!
पावसाचे पद्य सुंदर!
सुंदराच्या सोहळ्यातिल
पृथ्वीचे हे आद्य सुंदर!!
हा कधि नयनात यावा...
हा कधि हृदयी धरावा...
आत दडल्या आठवांवर
संथ संततसा झरावा!!
पावसाने ताव व्हावे...
पावसाने दौत व्हावे...
पावसाची भरुन शाई
पावसावर लिहीत जावे!! ...
- संदीप खरे
---------------------
दरबार
पावसाचा रंगला दरबार होता
आसवांनी छेडला मल्हार होता
मारव्याने जान होती ओतलेली
आर्ततेने गाठला गंधार होता
कैकदा सौदामिनी आली कडाडत
दाद आल्याचाच आविष्कार होता
भैरवी सरताच सरले श्वास माझे
त्याच टाळ्या तोच सोपस्कार होता
संपली मैफल तरी ना संपलो मी
माझिया राखेतही झंकार होता
काय चुकलं, किती चुकलं
कोण भिजलं कोण सुकलं
पुलाखालचं पाणीदेखील
वाहून वाहून वाहून थकलं
पाणीच काय...
पूलसुद्धा वाहून गेला आहे...
एक पाऊस
माझ्याकडे राहून गेला आहे
छत्री विसरणाऱ्याला
आठवण तरी करून देता येते
पाऊसच
विसरणाऱ्याशी
काय
बोलायचं!
- वैभव जोशी