मुंबईच्या वाटांवरचं पावसाचं संगीत

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

जुन्या खुणा विरत चाललेली मुंबई अशी कधी कधी अनोळखी वाटते. इथल्या दोनच गोष्टी बदललेल्या नाहीत. एक म्हणजे इथली गर्दी आणि दुसरी इथला पाऊस. कोरोनाच्या काळामुळं गर्दीवर काहीसा परिणाम झाला आहे, पण पावसाचं तसं नसतं. कोरोना असो की नसो, पाऊस तर येणारच. धबाधबा कोसळणारच पण अलीकडे पावसाचं वेळापत्रकाचं गणितही जरा बदललंय...

मुंबईतला पाऊस आता स्थिरावला आहे. मुंबई शहर म्हणजे गजबजतं वातावरण, चहलपहल आणि वाहती गर्दी. त्याचा चेहरा तसा बहुरंगी आहे. तोंडओळख करून घ्यायची म्हटली, तरी एकाच रंगाचा, एकाच ढंगाचा वावर इथं दिसणार नाही. मुंबईत चहूबाजूंनी येणारे आणि इथं स्थायिक होणारे लोक हे यामागचं कारण. इतक्या साऱ्यांना आपल्या पोटात सामावून घेणारी मुंबई आत-बाहेर ओलावा बाळगणारी आहे. अनेकांना मुंबई म्हटलं, की इथली सिमेंट काँक्रिटची जंगलं आठवतात. वेगानं बदलणारं आणि झपाट्यानं इमले उभं करणारं हे शहर. अलीकडच्या दिवसांत तर या शहराचं जुनं रूप पुसत पुसत चाललं आहे. गिरण्या तर केव्हाच हटल्या. त्याजागी गगनचुंबी रहिवासी इमारती आणि बाजारपेठा आणि कार्यालयांची स्थापना झाली. अजूनही होत आहे. मोनो, मेट्रो या आधुनिक साधनांनी मुंबईतला प्रवास सुखकर झाला. आजही नवीन मेट्रोची उभारणी सुरू आहे. त्यामुळे जागांचं रूपडं पालटू लागलंय. एखाद्या ठिकाणी बऱ्याच कालावधीनंतर गेलं, तर परिसर ओळखताही येत नाही... जुन्या खुणा विरत चाललेली मुंबई अशी कधी कधी अनोळखी वाटते. इथल्या दोनच गोष्टी बदललेल्या नाहीत. एक म्हणजे इथली गर्दी आणि दुसरी इथला पाऊस. कोरोनाच्या काळामुळं गर्दीवर काहीसा परिणाम झाला आहे, पण पावसाचं तसं नसतं. कोरोना असो की नसो, पाऊस तर येणारच. धबाधबा कोसळणारच. अलीकडे पावसाचं वेळापत्रकाचं गणितही जरा बदललंय...

उन्हाळ्यातील काहिलीला शांतवत येणारा पाऊस नक्कीच खूप सुखावणारा असतो. दमट हवामानामुळं मुंबईत अंगाला घामाच्या धारा लागतात. कधी एकदा पावसाचं आगमन होतंय, याकडे मुंबईकरांचे डोळे लागलेले असतात. जिवाच्या होणाऱ्या तगमगीवरचा उतारा होऊन आलेला पाऊस आनंदच देणारा. अर्थात हवेत गारवा येण्यासाठी मुंबईत एवढा तेवढा पाऊस पडून भागत नाही. भरपूर पाऊस झाला, की मगच हवा जराशी थंड होते. नाहीतर घामाच्या धारांपासून सुटका नसते. मुंबईत उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू असतात, असं काहीजण म्हणतात ते उगाच नाही. त्याशिवाय पावसामुळे मुंबईकरांपुढे वेगळे प्रश्न निर्माण होतात, हेही खरंच. मुंबईच्या दैनंदिन जीवनात अडथळे उभे करण्याचं काम हा पाऊस वारंवार करत असतो. मुंबईकरांचं घरातून बाहेर पडणं त्रासदायक होतं. त्यांना प्रवास करणं मुश्कील करून टाकतो हा पाऊस. तरीही पाऊस म्हटल्यावर मुंबईकर मनातून सुखावतोच. पावसाशी असलेलं मुंबईचं नातं एकदम खास आहे. इथला पाऊस असतोही खास. क्वचितच तो पिरपिरत पडतो. उलट कोसळण्यावरच त्याचा जास्त भर असतो. त्यात गेल्या वर्षापासून वादळं वारंवार आली. गतवर्षी आलेलं ‘निसर्ग’ आणि यंदाचं ‘तौते’ चक्रीवादळ, विशेषतः कोकण आणि मुंबईला, चांगलंच झोडपून गेलं. मुंबईचं जीवन विस्कळित करणारी ही वादळं हा निसर्गातील बदलाचाच एक अवतार आहे आणि त्याची वारंवारिता वाढत जाणार आहे, असं जाणकार सांगतात. जगभरातील निसर्गाचाच समतोल डगमगत असल्याचंच हे द्योतक आहे. २००५ सालचा २६ जुलै हा मुंबईकरांच्या जीवनातला कसोटी पाहणारा दिवस होता. त्या दिवशी झालेल्या ढगफुटीमुळं काही काळातच प्रचंड पाऊस कोसळला आणि मुंबईला मोठाच तडाखा देऊन गेला. काहींना आपले प्राणही यात गमवावे लागले, तर अनेकांच्या व्यवसायाचं नुकसान झालं. कैकजण आपापल्या कार्यालयांमध्ये अडकून पडले. त्यापैकी काहींना तर दोन दिवस तिथंच थांबावं लागलं होतं. कारण रेल्वे व रस्तेवाहतूक पूर्ण विस्कळित होती. तो अनुभव खरोखरच अंगावर आजही काटा आणतो. पण याच प्रसंगी मुंबईकरांच्या मदतशील स्वभावाचंही दर्शन घडलं. पावसामुळे अडकलेल्या अनोळखी लोकांना आपल्या घरी ठेवून घेणारे अनेक मुंबईकर होते. रस्त्यात अडकलेल्यांना खाणंपिणं पुरवणारे, त्यांना धोक्याच्या जागेतून बाहेर काढण्यासाठी लोक धावून आले. इतरही वेळी मुंबईत अनेकदा पावसामुळे पाणी साठतं. रस्ते बंद होतात. रेल्वे संथगती होते आणि बरेचदा तीही सेवा ठप्प होते. या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईकर वाट काढत असतो. 

पाणी साठणं हे मुंबईला तसं नवीन नाही. वर्षानुवर्षं हे होत आलं आहे. कारण मुंबई हे बेट आहे आणि भरतीच्या काळात जर मोठा पाऊस आला, तर पाणी साठतंच. पण पूर्वी मुंबई आजच्या तुलनेत स्वच्छ होती. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चालताना घाण वाटायची नाही, की भीतीही मनाला शिवायची नाही. आजचं तसं नाही. कारण मुंबईपुढचा आजचा मोठा प्रश्न आहे, विविध प्रकारच्या कचऱ्याचा. पावसाळ्यात हा कचरा मुंबईकरांच्या मार्गातला मोठाच अडथळा होतो. ठिकठिकाणी साचणारं पाणी आणि त्यामुळे होणारा गॅस्ट्रो, कावीळ, त्वचारोग, हिवताप, डेंग्यू अशा रोगांचा प्रसार हे पावसाळ्याच्या दिवसांतलं एक आव्हानच असतं. गेल्या काही वर्षांमध्ये लेप्टोस्पायरोसिस या जीवघेण्या आजाराचा प्रसार साचलेल्या दूषित पाण्यातून चालण्यामुळं होत आहे. आरोग्यव्यवस्थेवरचा ताणही या काळात वाढत असतो. या सगळ्या त्रासाला अर्थातच केवळ पावसाचं अस्मानी संकट नक्कीच कारणीभूत नाही. पण तो वेगळा विषय आहे. एकूणच मुंबईकरांचे हालही पावसाच्या अतिवृष्टीमुळं होत असतात. नाहीतर पावसाशी एरवी त्याची गट्टीच असते. साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढं जाण्यातही एक मौज असते. पूर्वी शाळा-कॉलेजच्या दिवसांत घरचे नको जाऊ म्हणत असतानाही, मुद्दाम पावसात बाहेर पडण्यात गंमत होती. पाण्यातून हळूहळू पुढं सरकत चालण्याचा आनंद निराळाच असतो. कॉलेज अशावेळी बंदच असे आणि मग मैत्रिणींनी मिळून जवळच्या थिएटरला जाऊन एखादा सिनेमा बघणं साधलं जाई. ऑफिसातले लोकही अशावेळी मुद्दाम बाहेर पडून काहीही करून ऑफिस गाठतात आणि पावसाने सर्व विस्कळित झाल्यामुळं घरी लवकर जायला मिळण्याचा आनंद घेण्याकडे त्यांचा कल असतो. अर्थातच हल्ली हा आनंद जरा कमी झाला आहे. कारण वाहतुकीचा खोळंबा होणं, साठलेल्या पाण्यात थबकलेल्या बस-रेल्वेगाडी किंवा टॅक्सीतून उतरायला भाग पडणं आणि सुखरूप घरी परतू शकतो की नाही या भीतीत वावरणं हा आता नेहमीचा भाग झाला आहे. म्हणूनच अलीकडे पाऊस धबाधबा कोसळत असेल, तर घराबाहेरच न पडण्याकडे लोकांचा कल असतो. पण असं वारंवार घडलं, तर किती दांड्या मारणार, हा प्रश्न आहेच...

पावसात न्हाऊन निघणारी मुंबई दिसते मात्र सुंदर! जोरदार सरी येऊन गेल्या, की रस्ते एकदम स्वच्छ होतात. पूर्वी मुंबईतले रस्ते म्हणे धुतले जायचे. आता फक्त पावसातच ते धुतले जातात. इथल्या छोट्यामोठ्या टेकाडांवर हिरवळ पसरते. मैदानंही हिरव्या कुरणांप्रमाणे दिसतात. मुंबईकरांना चालण्याची सवय असते आणि आवडही. पावसाळ्यातला चालण्याचा आनंद आणखीच वेगळा. हलका पाऊस असला, तर छानच. अगदी खवळलेल्या समुद्राचं रौद्र रूप न्याहाळत भटकण्याचीही अलग खुमारी असते. पण जरा जपूनच हे सुख लुटावं लागतं. कारण समुद्राच्या लाटांचा जोर आणि उंची यापुढं माणसाचा टिकाव लागणं कठीणच. पण सावधगिरी बाळगून समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यातली मजा नक्कीच अनुभवता येते. वरळी सीफेस, गिरगाव आणि जुहू चौपाटी इथं पावसाळ्यात लोक जमतात. शिवाय नरिमन पॉइंट, माहीम कॉजवे, कार्टर रोड, ब्रीच कँडी, टीआयएफआरचा परिसर अन् तिथल्या भाभा ऑडिटोरियमजवळचा समुद्र... तिकडे मालवणी, गोराई बीच, मार्वेचा किनारा अशी बरीच समुद्रसान्निध्याची ठिकाणं पावसाळ्यात भटकण्यासाठी खुणावत असतात. समुद्र हे मुंबईचं वैभव आहे. पण समुद्रकिनारे मात्र पूर्वीसारखे स्वच्छ राहिलेले नाहीत, हे खेदानं म्हणावं लागतं...

पाऊस म्हणजे हिरवा रंग, ताजी हवा आणि ऊर्जा देणारा आसमंत. मुंबईला काँक्रिटचं जंगल म्हटलं, तरी इथली हिरवाई काही कमी नाही. हे काही रूक्ष आणि भकास शहर नाही. पावलोपावली तुम्हाला इथं वृक्षवेली आढळतात. पावसात न्हालेली ही झाडं अन् वेली एक छानशी चकाकी आणि तकाकी लेऊन असतात. इथं दुर्मीळ वृक्षही खूप आहेत. त्यावर पक्षी सुखानं राहतात. कोकिलकूजन आणि पोपटांचा मधुर रव नेहमीच कानी पडत असतो. पावसात खुललेली मुंबई बघताना विलक्षण असा आनंद मिळतो. अस्सल मुंबईकरांना मुंबईतल्या निवांत आणि सुंदर वाटा कायम खुणावत असतात. उन्हाळ्यातला बहाव्याचा बहर अंगावर बाळगणारे रस्ते या शहरात बऱ्याच ठिकाणी आहेत. माटुंग्याजवळचा फाइव्ह गार्डन परिसरातला एडनवाला रोड त्यातलाच एक. पावसाळ्याच्या दिवसांतही पिवळ्या फुलांचा सडा त्यावर पडलेला असतो. हलक्या पावसानंतरच्या ओलाव्यात या रस्त्यावरून फिरताना खूप छान वाटतं. ग्रँटरोडच्या मणिभवन परिसरातल्या एका गल्लीला तर ‘लॅबर्नम स्ट्रीट’ असंच नाव आहे. तिथली बहाव्याची झाडंही अप्रतिम आहेत....

मुंबईकरांना पाऊस झेलत फिरायला फार आवडतं. पावसाळ्यात मलबार हिलवरून दिसणारं समुद्राचं रूप, गेटवे ऑफ इंडियाला दिसणारे समुद्राचे विभ्रम... अशी अनेक ठिकाणं आहेत. पावसावर प्रेम करणारे अनेक मुंबईकर, पावसाचं घाटातलं रूप अनुभवायला डोंगरदऱ्यांमधून फिरायला जातात. खंडाळा, लोणावळा, माथेरान ही त्यांची पाऊस अंगावर घेत फिरण्याची खास आवडती ठिकाणं आहेत. पावसाशी मुंबईकरांचा सूर जुळलेला आहे. अगदी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’... पावसाचं संगीत मनात साठवत तो नेहमीच त्याची वाट पाहत असतो...

संबंधित बातम्या