वर्षाऋतूतला सह्याद्री

ओंकार ओक
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

सह्याद्री आणि तिथल्या डोंगरवाटा भटक्यांना नेहमीच खुणावतात; वर्षाऋतूत जरा जास्तच! कारण, सह्याद्रीतल्या पावसाची मजा काही वेगळीच. याही पावसाळ्यात आता पावलं गडकोटांकडे वळतीलच. पण यंदाची दुर्गभ्रमंती आणखी जपून, गर्दी न करता आणि मुख्य म्हणजे नियम पाळूनच करायची आहे; तरच त्या भ्रमंतीचा निर्भेळ आनंद लुटता येईल. 

पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरची एक अजस्त्र डोंगररांग! इथल्या कड्यांची रौद्रता आणि तिथून खाली दिसणाऱ्या दरीच्या खोलीचा नुसता अंदाज जरी घेतला तरी बघणाऱ्याचे डोळेच फिरावेत. ह्या बेलाग कडेकपाऱ्यांना कोंदण लाभलंय ते गहिऱ्या निसर्गाचं आणि रानवेड्या पाऊलवाटांचं! आहुपे... हे त्या आगळ्यावेगळ्या दुनियेचं नाव! खाली पाहिल्यावर कोकणातलं लोभसवाणं खोपिवली गाव आणि त्याच्या शेजारी एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे भासणारे गोरख - मच्छिंद्रचे बुलंद सुळके. सोबतीला असतो घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज... त्याच्या तालावर डोलणारा हिरवाकंच आसमंत... उंच कड्यावरून स्वतःला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे.... नशीबवान असाल तर समोर अलगद उमटणारं इंद्रधनुष्य आणि हे दृश्य वेडावून पाहणारे आपण...सह्याद्रीमित्र!! 

जून उजाडला की बेभानपणे कोसळणाऱ्या पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बसलेले निसर्गप्रेमी वळतात ते वर्षाऋतूत चिंब भिजून निघालेल्या घाटांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणांकडे! पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारे अनेक घाट आहेत, पण पर्यटकांचा अत्यंत लाडका घाट म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्याहून पौड - मुळशीमार्गे ताम्हिणीच्या रस्त्याला लागलं की सुरू होतं चारही बाजू व्यापून टाकलेल्या हिरव्याकंच निसर्गाचं साम्राज्य! मुळशी धरणाचा अथांग फुगवटा, त्याच्या मागं पसरलेली कैलासगड किल्ल्याच्या परिसरातली डोंगररांग, डावीकडे निसर्गाच्या कुशीत वसलेलं चिंब ताम्हिणी गाव आणि पर्यटकांबरोबरच साहसप्रेमींना खुणावणारी प्लस व्हॅली. एखाद्या स्वप्नात दिसावं असं हे दृश्य! ताम्हिणी घाटातले धबधबे हे तर पर्यटकांचं हक्काचं ठिकाण असल्यानं पावसाळ्यात इथं निसर्गप्रेमी आणि उत्साही मंडळींची भाऊगर्दी होते. ताम्हिणीतून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर लागणारं नितांतसुंदर पिंपरी गाव आणि तिथं असणारा कुंडलिका दरीचा नजरा अत्यंत देखणा असून जवळच घनगड व तैलबैला हे गिरिदुर्ग आहेत. पण पुरेशा अनुभव व मार्गदर्शनाशिवाय पावसाळ्यात हे किल्ले थोडे अनगड असल्यानं यांचा मोह टाळावा. ताम्हिणीच्या रस्त्यावर सध्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं हा प्रवास आपापल्या जबाबदारीवरच करणं इष्ट आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारं एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे वरंध घाट. पुण्याहून भोर – निगुडघर – हिर्डोशीमार्गे वरंध घाटाचा होणारा प्रवास हा वेड लावणारा! पुण्याहून भोरला जाताना वाटेत दिसणारं नीरा नदीच्या नेकलेस पॉइंट हे दृश्यपण अतिशय सुंदर असून जवळच भाटघरचं सुप्रसिद्ध धरणही पाहायला मिळतं. पुढे नीरा देवघर धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेनं जाणारा ‘ड्राईव्ह’ कमालीचा देखणा. साधारणपणे हिर्डोशी गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेनं अनेक धबधबे सुरू होतात. वरंध घाटाचं सुरेख दृश्य बघायला मिळतं ते धारमंडप गावापासून. कोकणात खोल गेलेले सह्याद्रीचे कडे, त्यांचा ढगांशी चालणारा लपंडाव, इतिहासप्रसिद्ध कावळ्या किल्ला व त्याच्या न्हावीण सुळक्याचं दिसणारं हिरवंगार दृश्य, सर्पाकृती सळसळत गेलेला वरंध घाटाचा रस्ता आणि जिथं आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो तो सुप्रसिद्ध ‘भजी पॉइंट’... हे दृश्य कॅमेऱ्यात टिपताना भान हरपतं! भजी पॉइंटवरून समोरच्या दरीत दिसणारे दोन मोठ्ठे धबधबे हा तर या सगळ्यावर निसर्गानं चढवलेला कळसच! हातातल्या आल्याच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेताना आणि कोसळणाऱ्या पावसात गरमागरम कांदाभजी शब्दशः ‘हादडताना’ हे दृश्य डोळ्यासमोर असणं ह्यासारखं सुख नाही! वरंध घाटातून कोकणात उतरल्यावर पुढे समर्थ रामदास स्वामींनी जिथं दासबोध लिहिला ती अतिशय सुप्रसिद्ध ‘शिवथरघळ’ आहे. वरंध घाट उतरून गेल्यावर पुढे बारसगाव फाटा आहे. तिथून शिवथरघळीकडे जाणारा रस्ता असून शिवथरघळीचा धबधबाही अतिशय प्रसिद्ध आहे. ‘गिरीचे मस्तकी गंगा तेथून चालली बळे, धबाबा लोटती धारा..धबाबा तोय आदळे’ हे समर्थांचे शब्द सार्थ ठरवणारी ही जागा! शिवथरघळ हे अत्यंत पवित्र ठिकाण मानलं जातं, त्यामुळे इथं वावरताना प्रत्येकानं त्या जागेचं पावित्र्य कायम राहील ह्याची खबरदारी घेणं अतिशय आवश्यक आहे. 

पुण्याहून कल्याण-मुरबाड इथं उतरणारा माळशेज घाट तसा सगळ्यांच्या परिचयाचा, पण सातवाहनकालीन नाणेघाटाला मात्र आत्ता कुठं थोडी प्रसिद्धी मिळू लागली आहे. नगर-कल्याण या व्यापारी मार्गाला जोडणारा हा अतिशय पुरातन घाटमार्ग! नाणेघाटाच्या गुहा व तेथील सातवाहनकालीन ब्राह्मी भाषेतील शिलालेख इतिहास अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. जवळच्या जीवधन किल्ल्यावर ट्रेकर्सची रीघ लागलेली असते. नाणेघाटातला नानाचा अंगठा हा आभाळात घुसलेला सुळका म्हणजे अंगावर येणारा हलका पाऊस झेलण्याचं उत्कृष्ट ठिकाण! पुण्याहून नाशिक हायवेनं जाताना लागणाऱ्या नारायणगावपासून जुन्नरला गेलं की तिथून आपटाळेमार्गे नाणेघाट सुमारे ४० किमीवर आहे. जुन्नर येथील अतिशय पवित्र असणारं शिवजन्मस्थळ अर्थात किल्ले शिवनेरी हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानाचं पान! जुन्नरपासून नाणेघाटात जाणारा रस्ताही असाच हिरवाईनं नटलेला. आपटाळे गावानंतर उजवीकडे दिसणारा चावंड किल्ला व त्याच्या जवळच असणारं कुकडेश्वराचं पुरातन देवस्थान हेही प्रेक्षणीय आहे. नाणेघाटाच्या शेजारी असणारे अंजनावळे गावचे वऱ्हाड सुळके हे प्रस्तरारोहकांसाठी एक अनोखं आव्हान समजलं जातं. नाणेघाटात माळशेज घाटाच्या शेवटाशी असलेल्या वैशाखरे गावातून येण्यासाठी पायी मार्ग आहे. इथून आल्यास नाणेघाटाची पुरातन वाट अनुभवता येते. नाणेघाटाच्या तोंडाशी पूर्वी दळणवळणासाठी जो कर घेतला जात असे तो साठवण्यासाठी उपयोग केला जाणारा पुरातन दगडी रांजण आहे. इतिहासाची ही सुवर्णपानं नक्कीच अनुभवण्यासारखी आहेत. नाणेघाटातील जीवधन किल्ला मात्र अनुभवी ट्रेकर्ससाठीच आहे. नवख्या पर्यटकांनी याची कास पावसाळ्यात न धरलेलीच बरी. नाणेघाटात सध्या रिसोर्ट झालं आहे, तिथं जेवण व राहण्याची सोय होऊ शकते. 

लोणावळ्याजवळची सुप्रसिद्ध सहारा सिटी सर्वांनाच परिचित आहे, पण तिच्याच डोईवर असणारा कोरीगड किंवा कोराईगड हा किल्ला मात्र खूप कमी पर्यटकांना ठाऊक असेल. कोरबारस ह्या नावाने प्रसिद्ध असणारा हा इतिहासकालीन मुलूख. लोणावळ्यातून भुशी डॅम-घुसळखांबमार्गे पायथ्याचं पेठ शहापूर हे गाव गाठलं की धुक्यातून हळूच डोकावणारा कोरीगड किल्ल्याचा कडा नजरेत पडतो. कोरीगड किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. ट्रेकिंगचा थोडाफार अनुभव असल्यास हा किल्ला सहज चढता येऊ शकतो. वाटेवर लागणारं गणपतीचं मंदिर, पाण्याचं मोठं गुहाटाकं आणि सर्वात शेवटी लागणारा गडाचा सुस्थितीतील दरवाजा हे नक्की बघण्यासारखं आहे. कोरीगडाला विस्तीर्ण पठार लाभलं आहे. त्याच्या कोवळ्या हिरव्या गालिच्यावरून पायपीट करण्याची गंमत अतिशय सुंदर आहे. कोरीगडावर पाण्याची मोठी तळी आहेत. गडावर गडदेवता कोराईदेवीचं मंदिर, शिवमंदिर, बांधकामाचे अवशेष, तोफा, एकसलग असणारी भक्कम तटबंदी, आंबवणे गावाकडून येणारा दरवाजा हे सर्व अवशेष नक्की बघण्यासारखे आहेत. कोरीगड किल्ल्यावरून वातावरण स्वच्छ असल्यास दिसणारा लोणावळ्याचा परिसर, रायगड जिल्ह्याचा सुरेख नजारा, पायथ्याशी वसलेली सहारा सिटी व ढगांशी लपंडाव खेळणारा हिरवागार आसमंत हे तर नक्की अनुभवण्यासारखं. इथं वावरताना एक काळजी मात्र प्रत्येकानं नक्की घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे आपल्या अस्मितेची मंदिरं असून त्यांचं पावित्र्य राखणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. जिथं छत्रपती शिवरायांच पाऊलस्पर्श झाला आहे त्या स्थळांवर जाऊन मद्यपान करणं, ब्ल्यूटूथ स्पीकरवर गाणी लावणं, मोठमोठ्यानं ओरडणं, सिगारेट ओढणं किंवा हुल्लडबाजी करणं हे प्रकार चुकूनही करू नयेत. ‘पिकनिक’ किंवा ‘मौजमजा’ करण्याची इतर अनेक ठिकाणं आपल्या आजूबाजूला आहेत, तिथं पर्यटक मजा करण्यासाठीच जात असतात. परिस्थितीचं, इतिहासाचं व स्वतःचं भान राखूनच महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जावं. 

पावसाळ्यामध्ये भटकंती करणं हा एक स्वर्गीय आनंद आहे. पण त्याच्यासोबत येते ती एक अतूट जबाबदारी. महाराष्ट्र शासनानं व स्थानिक ग्रामस्थांनी या सगळ्या गडकिल्ल्यांवर व पर्यटन स्थळांवर वाढलेल्या अमर्याद गर्दीमुळं व तेथील पर्यटकांनी केलेल्या दूषित वातावरणामुळे अनेक चाप बसवायला सुरुवात केली आहे. हुल्लडबाजी अथवा कोणतेही गैरप्रकार केल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकण्याशिवाय गत्यंतर नाही, याचं भान कटाक्षानं बाळगणं गरजेचं आहे. तसंच अनुभव नसताना तळ्यात पोहायला उतरणं, खोल दरीत उतरण्याचा प्रयत्न करणं किंवा कड्याच्या टोकाशी जाऊन सेल्फी काढणं या प्रकारांमुळे अनेक पर्यटकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे आपण फिरायला जाताना एक सामाजिक शिस्त न बाळगल्यास कायमचा लक्षात राहील असा एखादा अघटित प्रसंग घडू शकतो. वर्षाऋतू हा नितांत सुंदर व सुरक्षितरीत्या आनंद घेण्याचा ऋतू आहे. त्याचं भान राखूनच व निसर्गाचा आदर मनात बाळगूनच ही ठिकाणं जवळ करावीत. मग बघा... निसर्ग त्याची गहिरी रूपं तुम्हाला कशी उलगडून दाखवतो ते!

संबंधित बातम्या