पाऊस माळावरचा

राजेंद्र अत्रे, उस्मानाबाद
सोमवार, 19 जुलै 2021


झडझिम्मड

पाऊस कोसळतो. दरवर्षी न चुकता येतो. कधी लवकर, कधी उशिरा. कधी ओढ धरतो. कधी नकोसा होतो. कधी रुसून जातो, पण येतो. तो येतो हे आपलं भाग्यच! पाऊस हेच पृथ्वीवरचं चिरंतन नि अंतिम सत्य. पाऊस हेच जीवन. त्याची रूपंही असंख्य. कधी धो-धो, धुवांधार - मुसळधार, कधी रिमझिम, कधी विरळ-तुरळक, कधी रिपरिप नि पिरपिर, कधी थेंब-थेंब - टिपटिप, कधी ढगफुटी, कधी झड, कधी लाजून धुक्यात झरणारा, कधी बुरंगट, कधी पेंडवलता, कधी घोंगडंफुट्या, तर कधी ह्या ... रट्टया! ज्या- त्या प्रादेशिकतेच्या वेगवेगळ्या शब्दात बांधलेला. तो कोसळतो सर्वत्र. नद्या समुद्रावर - लाटांशी खेळत, डोंगरदऱ्यात - झोके घेत- उड्या मारत, सपाट रानावर - भुईभळा भरत नि मातीशी एकरूप होत, तर माळरानावर नाचत - तडतडत. त्याची वागण्याची रीत ही अशी प्रत्येकाशी वेगवेगळी.

पावसाची रीत आणि वागणं प्रत्येकानं आपापल्या परीनं अनुभवलं असणार. म्हणून पाऊस प्रत्येकाच्या नजरेतून त्याला वेगळा दिसणारा. अनेकांच्या स्मरणात त्यांनी अनुभवलेले असे अनेक पावसाळे घर करून बसलेले असतील. तसे ते माझ्याही मनात आहेत. पण माळरानावर मी अनुभवलेला पाऊस मला प्रत्येक आठवणीत आनंद देत असतो.

एकदा बसनं औरंगाबादला निघालो होतो. सायंकाळी पाचला गाडी होती. दुपारपासूनच आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली होती. मधेच प्रखर ऊन पडायचं. वाऱ्याच्या झुळकी यायच्या आणि ढग पांगायचे. मृग निघून चार-पाच दिवस झाले होते‌. एक दोन बुरंगटंही झाली होती. मी बसस्थानकावर आलो तेव्हा आभाळ गच्च भरून आलं होतं. वारा थांबला होता आणि थेंब टिपकायला लागले होते. वातावरणात खूप उकाडा होता. अंगातून घाम निथळत होता. गाडी वेळेवर फलाटावर लागली. मी गाडीत बसलो. जागा खिडकीजवळच होती. गाडी सुरू झाली आणि पाऊस ही दाट झाला. जांभळ्या - काळ्या ढगांची आकाशात दाटी झाली होती आणि पाऊस जोर धरत होता. 

उस्मानाबादच्या बसस्थानकावरून पंधरा-वीस मिनिटात गाडी गडदेवदरीच्या माळावर आली तेव्हा पाऊस धुवांधार सुरू झाला. पावसासोबत वेगवान वाराही होता. त्याचा वेग एवढा होता, की त्या किंचितशा चढाच्या रस्त्यावर तो आमच्या गाडीला जरासुद्धा पुढे सरकू देत नव्हता. तो एकटाच नव्हता तर पावसाच्या चांगल्या रगदार सरींचीही त्याला सोबत होती. शेवटी नाईलाजानं ड्रायव्हरनं त्यांच्याशी झुंज देत नेटानं गाडी हळूहळू पुढे सरकवत रस्त्याच्या सपाट भागावर आणून थांबवली. तरी त्या वाऱ्याच्या वेगानं थांबलेल्या गाडीलाही हेलकावे बसत होते. पाऊस इतका होता की आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. सगळा भोवताल जांभळा -काळा झालेला. अंधारलेलं. दाही दिशा त्या एकाच रंगात हरवून गेलेल्या. फक्त ऐकू येत होता तो पावसाचा आवाज. धो - धो.

धो-धो पाऊस कसा असतो, तो प्रत्यक्ष त्यादिवशी ‘ऐकायला’ मिळाला. असा माळावरचा तुफानी पाऊस मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. माळावरच्या सर्वात उंच जागेवरून. खरं तर असा दुर्मीळ आनंदाचा क्षण योगायोगानंच लाभला होता, हे भाग्यच म्हणायला हरकत नाही. अशा पावसातही न भिजता बसमध्ये सुरक्षित होतो, म्हणून हा आनंदी क्षण अनुभवता येत होता. अन्यथा अशा माळावर, अशा तुफानी पावसात कोण कशाला जाणार आहे! भरारणाऱ्या वाऱ्यात मिसळणाऱ्या वेगवान सरीतून फवारणारे वसारे स्सुंईं... स्सुंईं ...  आवाज करत भोवती घोंगावत होते. जणू सरींचं आणि वाऱ्या‍चं तुंबळ युद्धच चाललं होतं. त्यात गोडवा तर अजिबातच नव्हता तर भीषणताच होती. कदाचित मनातल्या भीतीनंही तसं वाटत असावं, कारण पावसाचं रूपच तसं रौद्र होतं. तांडवनृत्य म्हणतात ते याहून वेगळं नसावं, असं वाटत होतं. विजांचा कडकडाट प्रचंड होता. त्या आवाजानं आभाळ तुटून खाली पडतंय की काय, असा भास होत होता. असंख्य जीव्हांनी विजा क्षितिजभर वळवळत होत्या. डोक्यावर वीज कडाडताच ती कोसळतेय की काय, असं वाटायचं‌. तिचा कानठाळ्या बसवणारा कडकडाट व्हायचा आणि तो संपताच मागे गडगडाट उरायचा. त्या गडगडाटानं संपूर्ण आकाश प्रतिध्वनीत व्हायचं, तोच पुन्हा कडकडाट व्हायचा. त्या उजेडानं काळजात धस्स व्हायचं. विजांचा कडकडाट म्हणजे काय? आणि गडगडाट म्हणजे काय? यातला फरक त्याचवेळी समजला. विजांच्या त्या उजेडात आठही दिशांच्या क्षितिजाचं विशालकाय वर्तुळ पाहताना पृथ्वीच्या वरच्या ध्रुवावर आपण मध्यभागी उभे आहोत असं वाटत होतं. कारण सगळ्या बाजूंचं ते क्षितिज दृष्टिक्षेपाच्या किंचित खाली होतं. तिथून आकाश खूप ठेंगणं वाटत होतं.

पाऊणएक तासानं पाऊस पूर्ण ओसरला. जसा तो वेगानं आला, तसा तो वेगानं ओसरलाही. सगळे प्रवासी क्षणभर गाडी बाहेर आले. वाऱ्यानं सगळे ढग हुसकावून लावले होते. तरी थेंब थेंब टपकत होते. सगळ्यांनी सुटकेचा स्वच्छ - मोकळा नि ओला दीर्घ श्वास घेतला. लगेच ऊन पडलं आणि दोन्ही टोकाची क्षितिजं व्यापणारं, स्वच्छ रंगाचं महाकाय इंद्रधनुष्य उमललं. जणू पावसानं जाताना धरणीला दिलेली सुंदर भेटच. वातावरण खूप आनंदी वाटत होतं. आश्लेषा नक्षत्राचा आविष्कार आम्हाला त्या माळावर ऐन मृगातच पहायला मिळाला होता. पण त्यात श्रावणाचं हळवेपण नव्हतं. सृष्टीचं ते ओलंचिंब रूप मनमोहक होतं. जागोजागी खड्ड्यांनी साचलेलं पाणी चमचमत होतं. माळावरचं सगळं रान मुरमाड असल्यानं तिथं पाणी मुरत नाही. त्यामुळं उताराच्या दिशेनं असंख्य ओहोळ खडकाशी खेळत - बागडत निघाले होते. माळावर मोठी झाडं नसतात. असलं तर क्वचित एखादं. खुरटी झुडपं अधिक‌. त्यामुळं क्षितिजापर्यंत बघताना नजरेच्या आड काहीच येत नाही. हा सुखद अनुभव अनुभवताना, पाऊस थांबला तरी गाडीत बसायला नको वाटत होतं. काही वेळापूर्वीचं पावसाचं धसमुसळेपण आणि नंतरचं अवनीचं स्नातचिंब नितळ रूप त्या माळामुळंच अनुभवायला मिळालं होतं.

नक्षत्रागणिक पाऊस आपला अवतार बदलतो. त्याचे हे सगळे अवतार मी या माळावर अनुभवले आहेत. कामानिमित्त ह्या प्रदीर्घ लांबीच्या माळावरून नेहमीच प्रवास करावा लागायचा, तेव्हा पाऊस हमखास कुठेतरी गाठायचाच. साधारणतः मृग नक्षत्रापासून ते पुष्य नक्षत्रापर्यंत पावसाला जोर असतो. पण क्रमाक्रमानं तो कमी होत गेलेला असतो‌. हिरवळ उमललेली असते. त्याची शीतलता नजरेत भरली जाते, त्यामुळे कदाचित जोरदार पाऊसही सुसह्य होतो. आश्लेषा नक्षत्राचा पाऊस माळावर पाहणं म्हणजे स्वर्गसुखच. नजर जाईल तिथपर्यंत हिरवळच हिरवळ. त्या हिरवळीच्या नयनरम्य सुखद, शीतल नि मखमली विविध हरितछटा मनाला आनंद देतात. शांत करतात आणि धीरही देतात. असं वाटतं की माळानं आपले विस्तीर्ण पंख पसरलेले आहेत. जागोजागच्या खड्ड्यातल्या,  पाण्यात पडलेल्या बाजूच्या हिरव्या हिरवळीच्या आणि निळ्या आभाळाच्या मिश्र प्रतिबिंबानं त्याला आलेला पाचूचा रंग म्हणजे त्या पिसाऱ्यावर खडे बसवले आहेत. वाहणाऱ्या छोट्या छोट्या ओहोळांच्या त्याच रंगाच्या रेषा त्या पिसाऱ्याला गतिमान करीत आहेत. माळाच्या पंखावर बसून आपण स्वर्गात चाललो आहोत, असाच भास ते दृश्य बघून होतो. त्या हिरवळीवर दूर-दूरपर्यंत लपाछपीचा खेळ खेळत पळणाऱ्या ढगांच्या सावल्या चित्त वेधून घेतात. हिरवळीवर पसरलेलं कोवळं हळदुलं ऊन आणि त्यात मिसळलेला हिरवळीतून परावर्तित झालेला हिरवा रंग म्हणजे हिरवं सुगंधी चांदणंच! सृष्टीचा हा माळावरचा रत्नजडित ऐश्वर्यसंपन्न गाभारा आणि श्रावण-श्रीमंती पाहून असं वाटतं, की आपण कुबेराच्या अंगणात खेळत आहोत. अशा वातावरणात येणाऱ्या श्रावणसरी म्हणजे जणू तंबोऱ्याच्या ताराच!  पृथ्वीचा खालचा गोल आणि ढगांचे वरचे गोल यांना जोडणाऱ्या. त्या तारांना जेव्हा कोवळ्या किरणांची मृदू बोटं छेडतात, तेव्हा सप्तसुरांचा राग सप्तरंगी इंद्रधनुष्य होऊन जातो. निसर्गातली ही दिव्य मैफल पहायची नि ऐकायची असेल तर त्यासाठी माळावरच्या एकांतात जाऊन पावसात भिजायलाच हवं. तरच ही अनुभूती लाभेल. हे ज्यानं अनुभवलं, त्याचं जन्माला येणं सार्थ झालं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

आश्लेषानंतर मघा ते हस्त नक्षत्रापर्यंत पावसाला पुन्हा जोर येतो. श्रावणातला त्याचा खेळकरपणा संपून तो गंभीर होतो. त्यात रगदारपणा नी दमदारपणा असतो‌. पण मृगासारखा उथळपणा नसतो. हा पाऊस धो धो बरसतो. त्यात विजा क्वचितच चमकतात. त्यामुळं तो भीतीदायक वाटत नाही. हिरवळीत दाटलेलं गर्द हिरवेपण आणि दाट पावसाचे गर्द जांभळेपण जेव्हा एकमेकात विरून जातं, तेव्हा तो घन:श्याम होतो. मोरपिसाच्या कुटीत बसून आपण राधा कृष्णाची भेट पाहतो आहोत असं वाटतं. शामरंगात एकरूप होऊन जातो.. कृतार्थतेची जाणीव मनाला धन्य करते.

आपलं घर असावं तर इथं माळावरच! ही भावना दृढ होते. म्हणजे माळावरचं पावसाचं मनमोहक विभ्रम नित्य अनुभवण्याची संधी मिळेल. जगणं धन्य होईल. त्याच्या आठवणीत जगण्यापेक्षा त्याच्या सोबतच जगण्याचा आनंद घेता येईल.

(लेखक कवी, गीतकार,  चित्रकार व छायाचित्रकार आहेत.)

संबंधित बातम्या