पाऊस.. इथलाही आणि तिथलाही

उत्तम शं. सावंत, कऱ्हाड
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

काही भागात पाऊस कमी पडतो, तर काही भागात तो कोसळतोच नको म्हणावे इतका पडतो. पण पावसाचे हे आगमन एक आशा घेऊन होतं, नवचैतन्य घेऊन येतं. नवनिर्मितीचा संदेश घेऊन येतं. 

भर दुपारी नागझिरा जंगलात पाणवठ्याजवळ उभा होतो. ग्रीष्माच्या कडक उन्हानं अंगाची लाही लाही आणि मनाची तगमग झाली होती. नाल्यातील सुकत आलेल्या झऱ्यावर मधमाश्‍याची गर्दी होती. टकाचोर, कोतवाल, बुलबुल, नाचरे, खंड्या वगैरे पक्षी पाणवठ्यावर घुटमळत होते. कोणी मधमाश्‍यांचे घास घेत होतं, कोणी चोचभर पाण्याने आपली तहान भागवत होतं, तर कोणी पाणवठ्यावर उडता उडता डुबकी मारत होतं. उन्हाचा चटका जाणवत होता. बाजूलाच कुसुमांच्या सावलीत चितळाचा कळप रवंथ करीत बसला होता. 

नागझिरा हे विदर्भातील पानझडीच जंगल. कुसुम, जांभूळ, आंबा अशी झाडं सोडली तर सारं जंगल उघडं-बोडकं झालं होतं. ग्रीष्म ऋतू संक्रमणाच्या उंबरठ्यावर होता. वर्षाऋतूच्या स्वागतासाठी सर्व सृष्टी आसुसलेली होती. भोवतालचे वृक्ष, लतावेली पर्णहीन झाल्या होत्या, पण त्या फुफाट्यातही काही अंगभर फुले लेवून फुलल्या होत्या. चार-पाच महिन्यांपासून पानगळ झालेल्या वृक्षांच्या अंगाखांद्यावर कुठेकुठे आता हिरवी लव दिसू लागली होती. नवीन नाजूक पालवी बाहेर डोकावत होती. वर्षाऋतूचे स्वप्न पाहात सर्वजण ग्रीष्माचा ताप सहन करत उभे आहेत असं वाटत होतं.

मनात असे हे सर्व विचार सुरू असताना अचानक आकाशात काळे ढग जमू लागले. विजा कडाडू लागल्या, वारा सुटला. सारं जंगल त्या वाऱ्यानं मुळापासून हलवून सोडलं. अचानक वाऱ्याच्या झुळुकेसह मृद्‌गंध जाणवला. मन शहारून गेलं. कुठे तरी वर्षा ऋतू अवतरला आहे, अन् त्याची खबर ही वाऱ्याची झुळूक सर्वत्र मृद्‌गंधाच्या रूपाने पसरवत आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने पानझडी जंगलातील तो हिरवागार कुसुम अंगात आल्यासारखा हलत होता. त्याखाली बसलेली चितळं झटकन उभी झाली, इकडेतिकडे कावरीबावरी होऊन पाहात राहिली. हळूहळू जंगल गाजू लागलं. टपोऱ्या थेंबांचा पाऊस आमच्या दिशेने धावत येत होता. थेंबांचा पानावर आणि पाचोळ्यावर पडलेला आवाज हळूहळू मोठा होऊ लागला. जवळ येऊ लागला. विदर्भातली पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापाची उन्हे तीन-चार महिन्यांपासून सलग सहन केल्यानंतर पावसाच्या अशा अनाहूत आगमनाने अंग शहारून गेले. वारा कमी होऊन धपाधप पाऊस कोसळला. विजाही मनसोक्त कडाडल्या. ढगांनी आणलेलं सर्व पाणी काही क्षणात रीतं केलं. आता या अभ्यंगस्नानानंतर अवघी सृष्टीच हिरवा शालू नेसून वर्षा ऋतूच्या स्वागताला सजणार होती. इतके दिवस जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असणारे असंख्य जीव आणि तऱ्हेतऱ्हेची बीजं आता जागी होतील. अंथरुणातून एखाद्या लहान मुलानं डोकं बाहेर काढावं तसं जमिनीच्या वर येतील. अनेक जन्मसोहळे साजरे होतील. सृष्टीच्या नवनिर्मितीस सुरुवात होईल. तप्त उन्हाच्या तापाने रखरखलेली सृष्टी नवनिर्मितीचा  सोहळा साजरा करण्याच्या तयारीस लागेल. एखाद्या लग्नसोहळ्यात घरातील कर्ती स्त्री नटून-थटून, हिरवागार शालू नेसून लग्न सोहळ्याच्या तयारीत जशी मग्न होते अगदी तशीच या सृष्टीची नवनिर्मितीसाठी लगबग सुरू होईल. 

खरंतर विदर्भात पावसाला सुरुवात जरा उशिराच होते. मे महिन्याच्या शेवटी केरळच्या किनाऱ्यावर मॉन्सून आल्याच्या बातमीने अंगावर शहारे येतात आणि तो महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पोहोचला की पाऊस आल्याची स्वप्ने पडू लागतात. विदर्भात जूनच्या मध्यावर कधीतरी पाऊस पोहोचतो. बऱ्याचदा तो आला की अचानक धो-धो कोसळतो. सर्वत्र पाणी पाणी करतो आणि अचानक आला तसा गायब होतो. इथे पावसाळ्यातील संततधार फार कमी जाणवते. कधी वर्षा ऋतूच्या सुरुवातीला धो-धो कोसळतो, तर कधी वर्षा ऋतूच्या शेवटी, पूर्व विदर्भात पहिल्या पावसाच्या आगमनाबरोबर कास्तकारांची लगबग सुरू होते. बांधबंदिस्ती करून भाताची खाचरं लागणीसाठी तयार केली जातात. गोंदिया भंडारा जणू विदर्भातील कोकणच. पावसाळ्यात सर्वत्र हिरवी तजेलदार भातखाचरं, चिखलणी करणाऱ्या बैलजोड्या, वाकून ओळीने रोपे लावणारी बायामाणसं असं चित्र सर्वत्र असतं. इथले गावोगावी असणारे माजी मालगुजार, ‘मामा’, तलाव सुरुवातीच्या पावसानं भरून जातात. वर्षा ऋतूच्या आगमनाने बदललेलं हे सृष्टीचे रूप आणि उन्हाळ्यात लाही लाही करणारं व या उन्हानं वाळून रखरखीत झालेली सृष्टी; दोन्ही ऋतूत निसर्गाचा किती हा विरोधाभास. विदर्भात हा विरोधाभास विशेष जाणवतो. पर्णहीन वृक्ष, विरळ झालेलं जंगल, जमिनीवर पडलेला पालापाचोळ्याचा थर, सुकलेले नाले-झरे, आकसलेले तलाव, तेज हरपलेले वन्यप्राणी हे सर्व चित्र वर्षाऋतूच्या आगमनाने धुऊन जाते. हिरव्यागार पानांनी गजबजलेले वृक्ष, हिरवे गर्द झालेलं जंगल, लुसलुशीत गवत आणि खळखळ वाहणारे नाले, तुडुंब भरलेले तलाव, सारं कसं बदलून जातं. पाऊस एखाद्या वर्षी शेतकऱ्यांना हवा तसा कोसळतो, परंतु बऱ्याचदा दुबार, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती फार काहीच लागणार नाही, अशी फसवणूक करून दडी मारतो. इथे पाऊस किती पडेल, कधी पडेल, कुठे पडेल याची नेहमीच अनिश्चितता. तो आपला बेभरवशाच्याच. नेहमीच चिंतेत ठेवणारा हा पश्चिम विदर्भातील पाऊस !

कोकणातलं पावसाचं आगमन मात्र वाजत गाजत असतं. समुद्र खवळलेला असतो. कोळ्यांच्या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकतात. वर्षभर हिरवे असणारे जंगल पहिल्या पावसानंतर आणखीनच गडद आणि घनदाट होते. घरांची अगोदरच डागडुजी होते. पहिल्या पावसानंतर उन्हाळ्यात उष्ण दमट वातावरणात सतत घामावणाऱ्या शरीरास पावसामुळे आलेल्या गारव्याने सुखद वाटू लागतं. हवेतील दमटपणा अचानक वाढतो. कपडे दोन-दोन दिवस सुकत नाहीत. त्यावर बुरशी चढू लागते. घराच्या बाहेर पडायचं तर हातात छत्री किंवा अंगावर कोट हवाच. अखंड पावसाळाभर घराच्या पन्हाळी सतत वाहत, ठिबकत राहतात. सतत कोसळणाऱ्या पावसाच्या धारा आणि त्यामध्ये चिंब भिजणारी हिरवीगार झाडी; खिडकीतून बाहेर डोकावलं तर असंच चित्र पावसाळाभर असतं. प्रत्येकाच्या दारातील काठोकाठ ओथंबलेल्या विहिरी, पायवाटा-रस्ते सोडले तर जिथे जागा मिळेल तिथे गवत, झाडे झुडपे उगवलेली. हिरवीगार झाडी, त्यातून वळवळत जाणारे लाल रस्ते. कोसळणाऱ्या पावसात हेच रस्ते नाले होऊन वाहू लागतात. पाऊस संपताच वाहणारं पाणी काही नाल्यात वाहून जातं, तर काही जमिनीत मुरून जातं. क्षणात सर्व पाणी गायब होतं. अगदी पाऊस पडला की नाही, असा प्रश्न पडावा. इथली लाल माती आणि सच्छिद्र जांभाखडक यांची ही किमया. इथला पाऊस इतक्या सतत कोसळतो की पूर्ण पावसाळ्यात छतावर, पानावर अंगणात पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे आवाज आणि बाजूने सतत नाल्यातून खळाळणाऱ्या पाण्याचा आवाज! हे आवाज सतत चार महिने कानात घुमत राहतात. रात्री पाऊस नसला अन वातावरण शांत असलं की खवळलेल्या समुद्राच्या आवाज, अगदी पाच -सात किलोमीटर अंतरावरही ऐकू येतो. तसाच झाडांच्या पानावर टपोऱ्या थेंबांनी आवाज करीत घुमत आलेला पाऊसही स्पष्ट ऐकू येतो. रात्री झोपताना छतावर सतत वाजणारा पाऊस, छतामध्ये झिरपून मधेच अंगावर पडणारा पावसाचा एखादा थेंब आणि पावसाच्या आवाजाला साथ देणारे पावसाळ्यापूर्वी जागा होणाऱ्या आणि रात्रभर चालू राहणाऱ्या, बेडकांच्या विविध आवाजातले कोरस.

कोकणातून सह्याद्रीचा कडा चढून वर आलं की पावसाळा हा एक सोहळाच असतो. पश्चिमेस सरळसोट सह्यकडा आणि पूर्वेस पसरलेल्या त्याच्या रांगांनी तयार झालेल्या दऱ्याखोऱ्या. या दऱ्याखोऱ्यांत घनदाट जंगल. उच्चभ्रू घराण्यातील स्त्रिया-पुरुष जसे नेहमीच चांगले कपडे, दागिने लेऊन वर्षभर त्यांची श्रीमंती, वेगळेपण दाखवतात, तसंच सह्याद्रीतील हे घनदाट सदाहरित जंगल सदैव पांघरलेला हिरवा शालू जंगलाची समृद्धी दर्शवतो. इथले झरे वर्षभर वाहत असतात. पण जूनच्या सुरुवातीस अरबी समुद्रावरून पावसाचे काळे मेघ येऊन सह्यकड्यावर धडकतात, पाऊस कोसळायला लागतो; इतका की उसंतच देत नाही. उन्हाळ्यात झुळूझुळू वाहणारे नाले, आता त्यांचे उग्ररूप दाखविण्यास सुरुवात करतात. सह्याद्रीच्या माथ्यावरून वेगात आणि उधळत येणारे जलप्रपातात कोणी चुकून सापडला तर जीवावरचंच संकट. सतत पाऊसधारा कोसळत असतील तर नाले आपोआपच फुगतात. सह्याद्री म्हणजे जैवविविधतेचा महासागर. या धो धो पावसात, गर्द झालेल्या झाडीत आणि सतत धुक्यानी व्यापलेल्या वातावरणात कित्येक आकाराचे, रंगाचे, ढंगाचे, स्वभावाचे जीव इथे जन्म घेतात, वाढतात, जन्म देतात आणि काही जण आपल्या अल्पायुष्याला विरामही देतात. सर्व वातावरण भारलेलं असतं. घनदाट जंगलांनी व्यापलेले हिरवेगार डोंगर, फेटा ल्यावा तसे डोंगरांच्या डोक्यांवर रेंगाळणारे मेघ आणि घनदाट वनराजीतून उंचावरून जागोजागी कोसळणारे शुभ्र धबधबे, अधून मधून येत जात राहणारं धुकं आणि त्या धुक्यामुळे नाहीसं होणारं आणि पुन्हा दिसत राहणारं आजूबाजूचं निसर्गचित्र, चोवीस तास ऐकू येणारं नाल्यांचं खळाळणारं संगीत. सह्याद्रीत पावसाळाभर असं भारलेले वातावरण असतं. सह्याद्रीतला पावसाळा हा खरं तर तिथल्या वैविध्यपूर्ण जीवांनाच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी वरदान ठरतो. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या सर्व नद्या वर्षभर वाहतात आणि त्यावरील धरणे ह्या सह्याद्रीतल्या पावसानेच तुडुंब भरतात. ती भरली तरच अवघ्या महाराष्ट्राची तहान, शेती आणि उद्योग यांची पाण्याची गरज भागवण्याची शाश्वती आणि तरच महाराष्ट्राचे अर्थचक्र गतीने फिरण्याची खात्री.

काही भागात पाऊस कमी पडतो, तर काही भागात तो कोसळतोच नको म्हणावे इतका पडतो. पण पावसाचे हे आगमन एक आशा घेऊन होतं, नवचैतन्य घेऊन येतं. नवनिर्मितीचा संदेश घेऊन येतं. 

(लेखक भारतीय वन सेवेचे अधिकारी असून, सध्या कराड (जि. सातारा) येथे उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून कार्यरत आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या आधी ते विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये कार्यरत होते.)

संबंधित बातम्या