बिहारियत संमतीचे राजकारण

प्रकाश पवार
सोमवार, 27 मे 2019

राज-रंग
 

बिहारचे राजकारण संघर्षांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, नव्याने संमतीचे राजकारण घडू लागले. बिहारियत ही संकल्पना संमतीच्या राजकारणाचे नवीन उदाहरण आहे. तेथे शंभर वर्षांचा बिहार आणि नवजात बिहारियत अशी नवीन धारणा उदयास आली. या संकल्पनेला विविध कंगोरे आहेत. कारण समकालीन दशकात बिहारियत ही संकल्पना राजकारण, अर्थकारण, अस्मिता, जागतिकीकरण अशा संदर्भात वापरली जाते. बिहारियत म्हणजे काय? बिहारियतचा उदय कसा झाला? बिहारियतचे राजकारण कोणते आहे? बिहारच्या राजकारणाला बिहारियत कोणती नवीन मर्मदृष्टी देते. हे साधेसुधे, परंतु महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित होतात. या चौकटीमध्ये निवडणुकीय राजकारणाच्या कशा उलाढाली होतात. यांची ही एक रोचक कथा आहे. तिचा येथे वेध घेतला आहे.  

आरंभीची बिहारियत
बिहारियत म्हणजे विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील समूहाची ओळख होय. त्यामध्ये मानवधर्म व नीती या गोष्टींचा समावेश होतो. तसेच भौतिक साधनांच्या न्याय वाटपाचा दावा बिहारियत करते. या संकल्पनेत अर्थार्जन व अर्थोत्पादन असेही अर्थ आहेत. या अर्थाला अहिंसेचे तत्त्व परस्परांशी जोडते. ही संकल्पना अनोखी व मुक्तीदाई (मोक्ष) आहे. ही संकल्पना खलनायकाच्या ऱ्हासाचा प्रयत्न करते. थोडक्‍यात या संकल्पनेला विविध अर्थछटा आहेत. आरंभी बिहार ही संकल्पना वापरली गेली (१९१२). बिहारची उत्पत्ती विहार पासून झाली. विहार ही संकल्पना गौतम बुद्धांशी संबंधित आहे. विहार म्हणजे बौद्ध भिक्षूंची राहण्याची जागा होय. या संकल्पनेचा संबंध आनंदाने आणि मजेने फिरणे असाही घेतला जातो. राज्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्‍यक अशा नैतिक चौकटी, तसेच वैयक्तिक आणि सामूहिक कर्तव्यांचे पालन असा धम्म संकल्पनेचा अर्थ होता. तो बिहारियतशी सुसंगत दिसतो. परंतु, विसाव्या शतकाच्या आरंभी विहार ओळख जवळपास पुसली गेली. डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांनी स्वतःची ओळख बिहार निवासी अशी सांगितली, तेव्हा त्यांना बिहार कोठे आहे? असा प्रतिप्रश्‍न वक्रोक्तीसारखा विचाराला गेला. या प्रश्‍नाने त्यांना व्याकूळ केले. तो प्रश्‍न त्यांच्या आठवणीत राहिला. सिन्हांनी बिहारच्या अस्तित्वासाठी काम सुरू केले. त्यांचे काम गरीब लोकांसाठी होते. तसेच त्यांनी शिक्षणावर भर दिला. या कामात लोकशाही, सामाजिक सलोखा आणि मानवतावाद हा विचार होता. विशेष म्हणजे बिहारची ओळख चर्चा, अहिंसा अशी होती. त्यांनी शिक्षणातून माणूस घडविण्याचा प्रयत्न केला. सिन्हांनी बिहारला स्वतःची ओळख मिळवून दिली. ती ओळख माणुसकीची होती. त्यामुळे माणुसकी हे बिहारियतचे एक खास वैशिष्ट्य आहे (बस कि दुश्‍वार है, हर काम का आसा होना, आदमी को भी मयस्वार नहीं इन्सां होना, बिहारी मयस्सर नहीं इन्सां). थोडक्‍यात बिहारियत नवीन असली, तरी तिची मुळे बिहारच्या धारणेमध्ये गुंतलेली आहेत. बिहारची धारणा संसदीय लोकशाहीला पूरक आहे. तसेच ती धारणा अहिंसक स्वरूपाची आहे. परंतु, सत्तरीनंतर दोन दशकांमध्ये बिहारची चर्चा हिंसा म्हणून जास्त झाली. बिहारची पुन्हा उपेक्षा झाली (एक बिहारी सौ बीमारी). राजकारणात तर जंगलराज अशा बिहारविरोधी संकल्पनांचा वापर झाला. जगंलराज ही संकल्पना लोकशाही, मानवतावाद, सामाजिक सलोखा, विवेकशील विरोधी अर्थाने वापरली गेली. त्यामुळे बिहारी व्यक्ती, समाज, अर्थकारण, राजकारण, भावुक झाले. बिहारमधील नवीन नेतृत्वाने बिहारियतचा पुनर्शोध घेतला. बिहारमध्ये गरिबीचे प्रमाण जास्त आहे. गरिबीचा संबंध आजारपणाशी जोडला गेला (बिमारू राज्य). त्यामुळे व्यक्ती व समाजाची ओळख आजारी अशी झाली. यातून ‘एक बिहारी, सौ बिमारी’ असा कलंक बिहारला चिकटला. या कलंकित ओळखीला बिहारने तीव्र विरोध केला. यातूनच ‘एक बिहारी, सौ पर भारी’ अशी नवीन धारणा पुढे आली. अर्थातच ही नवीन धारणा सकृतदर्शनी आक्रमक दिसते. परंतु, ही धारणा हळूहळू शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणावादी म्हणून पुढे आली. अंगमेहनतीबरोबर ज्ञानाच्या क्षेत्रातील कामे ही संकल्पनेत अभिप्रेत आहेत. गेल्या दोन दशकांत बिहारी समाजाने शिक्षण व शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले. यातून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या शिक्षण विषयक विचारांचे पुनरुज्जीवन केले गेले. बिहारचा विकास आणि ज्ञान यांचा संबंध जोडला गेला. ज्ञानी व्यक्तींनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण करावे अशी धारणा पुढे आली. यामुळे समाजकारणातील व राजकारणातील नेतृत्वामध्ये बदल होऊ लागला. राजकारणातील संभाषिते बदलली. बिहारचे राजकारण हिंसेच्या एकसाचेबद्धतेतून बाहेर पडले.   

बिहारियत केंद्री राजकीय चर्चाविश्‍व
 समकालीन दशकात बिहारच्या राजकारणात बिहारियत या विचारांवर आधारित नव्याने चर्चा सुरू झाली. नीतिशकुमारांनी त्यांची तुलना चंद्रगुप्त, सम्राट अशोक व बुद्ध यांच्याशी केली होती (२०१५). अशी तुलना म्हणजे बिहारियतचा अपमान आहे, अशी भूमिका रविशंकर प्रसादांनी मांडली होती (मुंगेर). पटणा येथे संघर्ष, मानवतावाद आणि बिहारियत यांचा मेळ घातला गेला (नाम है लडाकू, इंसानियत का दुसरा नाम बिहारियत है) अशी भूमिका शत्रुघ्न सिन्हांनी मांडली. बिहारी लोक चांगले, प्रेमळ, भावुक आहेत. ते इतिहासाला देव मानतात. खरेतर त्यांनी इतिहास म्हणजे सामूहिक स्मृती असा अर्थ लावला. अशी चर्चा पटणामध्ये झाली होती (२०१६). यास त्यांनी बिहारीपण म्हणून ओळख दिली. तेजस्वी यादव यांनी कुमार हे बिहारियत विरोधी आहेत, असा प्रचार केला. नीतिशकुमारांनी महाआघाडी मोडली. त्यांनी भाजपबरोबर आघाडी केली. त्यास बिहारियत विरोधी म्हणून ओळखले गेले. तेजस्वी यादवांनी या घडामोडीचे वर्णन सत्ताकांक्षी म्हणून केले (कुर्सी कुमार). सतराव्या लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यादव, राहुल गांधी, शत्रुघ्न सिन्हांनी प्रचारांचे सूत्र जवळपास बिहारियत भोवती फिरते ठेवले होते. बिहारी-बाहरी हा अंतराय बिहारियत वाचक मांडला गेला. विधानसभा निवडणुकीत हा अंतराय मध्यवर्ती होता. सतराव्या लोकसभा निवडणुकीत पटना साहेब लोकसभा मतदारसंघात अमित शहांनी रॅली काढली. तेव्हा शत्रुघ्न सिन्हांनी बिहारियतच्या पद्धतीने मत मांडले. त्यांचा आशय त्यांनी बिहारमध्ये बिहारियत आणि हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानियत असा लावला. त्यांनी दिल्ली विरोध हा मुद्दा वगळला होता (इतरेजन विरोध). म्हणजेच त्यांनी दिल्लीच्या सत्तेला हिंसक विरोध करण्यास नकार दिला. शत्रुघ्न सिन्हांनी त्या ऐवजी राजकीय स्पर्धा खुली ठेवण्यास सहमती दिली. त्यास त्यांनी बिहारचे चैतन्य संबोधले. या घोषणांच्या स्वरूपात विचार म्हणजे जय बिहार, भारत माता की जय असा व्यवहारात मांडला जातो. बिहार दिनाच्यावेळी बिहारियतचा उल्लेख भाषणांमध्ये केला जातो. जवळपास सर्वत्र बिहारियत ही आमची ओळख आहे. तिचा आम्हाला अभिमान आहे. ही भूमिका मांडली जाते. थोडक्‍यात बिहारियत ही संकल्पना समकालीन राजकारणातील एक चर्चाविश्‍व म्हणून पुढे आली आहे. राजकारणात बिहारियत या संकल्पनेची सूत्रे पुढील आहेत. एक, बिहारी राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांच्यातील खुली सत्तास्पर्धा ही संकल्पना स्वीकारते. दोन, बाहरी बंदीची संकल्पना बिहारी पक्षांनी नाकारली. तीन, खुल्ली सत्तास्पर्धा ही लोकशाही, मानवतावाद आणि सामाजिक सलोखावाचक असावी, असा त्यांचा दावा आहे. चार, बिहारच्या राजकारणात नवीन नेतृत्वाने यावे. बिहारमधील जातीवादास विरोध करावा, अशी तीव्र धारणा बिहारियतची आहे. पाच, बिहारियत ही संकल्पना लोकशाही पद्धतीने परिवर्तन वाचक म्हणून त्यांनी स्वीकारली आहे. त्यास त्यांनी राजकीय क्षेत्रात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. सहा, राजकीयदृष्ट्या संघटित होण्यास मागासवाद ही सुरुवात आहे. परंतु, त्यांचा अंतिम उद्देश विकास हा आहे. यामुळे बिहारियत ही संकल्पना मागासवाद ते विकास या दोन घटकांमधील राजकीय प्रक्रियेतील एक विचारप्रणाली म्हणून त्यांनी स्वीकारली असे दिसते. जात आणि धर्म या दोन्ही गोष्टींच्या आधारे संघटन करण्यास ही संकल्पना विरोध करते. बिहारियत ही एक सामूहिक धारणा आहे, असा ही संकल्पना दावा करते. यामुळे ही संकल्पना हिंसा विरोधी, बिगर लोकशाही प्रक्रिया विरोधी जाते. या मुद्यांवर नीतिशकुमार आणि भाजप यांच्यामध्ये मतभिन्नता आहेत. उदा. निवडणूक प्रचारात नीतिशकुमारांनी काही मुद्यांवर भाजपपासून वेगळेपण दाखवले होते (वंदे मातरम).  

व्यवस्थापकीय धारणा
समकालीन दशकामध्ये बिहारियत संकल्पनेचे सीमापार हे वैशिष्ट्ये घडत आहे. थोडक्‍यात ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत आहे. परदेशात बिहारियत म्हणून संघटन केले जाते. युरोपमध्ये संमेलने झाली. जर्मनीत संमेलन झाले, तेव्हा बिहारी हा जागतिक ब्रॅण्ड तयार करण्याचे काम सुरू झाले. प्रोजेक्‍ट ज्योती हा प्रकल्प सुरू झाला आहे. बिहार फर्टेनिटी व फ्रेंडनिटी अशा आशयाच्या धारणा घडत आहेत. या धारणा भारताच्या बाहेर विकास पावत आहेत. ही संकल्पना उद्यमशीलतेवर लक्ष केंद्रित करते. त्यांचा संबंध बिहार आणि भारताशी आहे. त्यामुळे ही संकल्पना सीमापार उत्क्रांत होते, असे दिसते. या संकल्पनेची तीन सूत्रे दिसतात. एक, बिहारियत ओळख घेऊन जागतिक पातळीवर संघटन केले जाते. अर्थातच ते बिहारी लोकांचे संघटन आहे. परंतु, बिहारच्या बाहेर घडते. दोन, बिहारियतचा संबंध उद्योग-व्यवसायांशी जोडला जात आहे. त्यामुळे ही संकल्पना आर्थिक उलाढालीसाठी उपयुक्त म्हणून विकसित केली जाते. तीन, व्यवस्थापन हा नवीन कंगोरा बिहारियतला आला आहे. या तीन सूत्रांमुळे ही संकल्पना बिहार आणि युरोप देश यांच्यातील संवादाची नवीन खिडकी ठरणार आहे. तसेच भारत आणि युरोप यांच्यातील देवाणघेवाणीची नवीन परंपरा सुरू करते. या अर्थाने बिहारियत ही संकल्पना नवीन राजकारणाची दिशा सूचित करते. भारतात घडलेली बिहारीयत लोकशाही, मानवता व सामाजिक सलोखा या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. तर सीमापार गेलेली बिहारियत जागतिकीकरण, विश्‍वबंधुत्व, व्यवस्थापन या तीन गोष्टींना महत्त्व देते. त्यामुळे बिहारचे राजकारण हे हिंसेकडून संवादाकडे वळू लागले आहे.     

बिहारमधील बुद्धाची अहिंसा या सर्व गोष्टींना जोडणारे रसायन ठरते. या अर्थाने बिहारियत ही संकल्पना म्हणजे बिहारच्या राजकारणाची नवीन पुनर्जुळणी करणारी म्हणून पुढे येते. नीतिशकुमार, प्रशांत किशोर यांनीदेखील बिहारियत या संकल्पनेच्या आधारे बिहारची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो. प्रशांत किशोर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून कामास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. सरतेशेवटी ते बिहारच्या राजकारणात उतरले आहेत. त्यांना बिहारची ओळख नव्याने घडवायची आहे. या राजकीय घडामोडींचा अर्थ म्हणजे बिहारने स्वत:हाची तुच्छ लेखणारी ओळख फेकून दिली. त्या जागी बिहारियत हे जीवनमूल्य म्हणून स्वीकारले गेले. यासाठी बिहारमध्ये तरुण वर्गांची जमवाजमव सुरू आहे. बिहारियत ही संकल्पना घरभेदीला विरोध करते. बिहारी पक्षांच्या ऐक्‍याचा विचार मांडते. राजकारणात ही संकल्पना गुणग्राहकता स्वीकारते.   

बिहारच्या गदारोळात ही गोष्ट सहजासहजी लक्षात येत नाही. परंतु, या चौकटीमध्ये राजकारण घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे बिहारचे नवीन राजकारण ठरते.     

संबंधित बातम्या