पश्‍चिम भारतातील भाजपव्यवस्था 

प्रकाश पवार
मंगळवार, 11 जून 2019

राज-रंग
 

काँग्रेस व्यवस्था ही एक वर्चस्वशाली पक्ष पद्धती पन्नास-सत्तरीच्या दशकांपर्यंत होती. त्यानंतर ऐंशीच्या दशकात काँग्रेस व्यवस्था दिसून आली. परंतु, नव्वदीच्या दशकानंतर काँग्रेस व्यवस्थेचा ऱ्हास झाला. समकालीन दशकामध्ये भाजप व्यवस्था ही दुसरी एक वर्चस्वशाली पक्ष पद्धती उदयास आली. म्हणजे भाजपने काँग्रेसचे स्थान स्वत:कडे खेचून आणले. समकालीन दशकाच्या आरंभी दुसऱ्या एक पक्ष पद्धतीचे उत्तर भारत आणि पश्‍चिम भारत असे दोन मुख्य आधार ठरले. या दोन विभागांतून दुसऱ्या एका पक्ष पद्धतीची सुरुवात झाली. अर्थातच या दोन विभागांपैकी उत्तर भारतातून एक पक्ष पद्धतीस सर्वांत जास्त पाठिंबा मिळाला. त्या खालोखाल पश्‍चिम भारतातून दुसरी एक पक्ष पद्धती पुढे आली. गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांतून भाजप व्यवस्था घडली. 

भाजपव्यवस्थेचे आधार 
 पश्‍चिम भारतामध्ये भाजप व्यवस्थेचे मुख्य चार आधार उदयास आले. एक, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी हा एक भाजप व्यवस्थेच्या मोजमापाचा निकष ठरतो. सतराव्या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम भारतातून भाजप व्यवस्थेला भक्कम आधार मिळाला (७६ पैकी ६८). सोळाव्या लोकसभा निवडणुकीत असाच भक्कम आधार मिळाला होता (७६ पैकी ६९). पश्‍चिम भारतातील जागा जिंकण्यामध्ये दोन्ही निवडणुकीत सातत्य दिसते. कारण भाजपने जवळपास ९० टक्के जागा एक हाती जिंकून घेतल्या (२०१४ - ९०.७८ टक्के व २०१९ - ८९.४७ टक्के). यामुळे पश्‍चिम भारत हा भाजप व्यवस्थेचा एक कणा आहे. दोन, भाजप व्यवस्थेला पश्‍चिम भारतातून नेतृत्व मिळाले. नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मनोहर पर्रीकर इत्यादी. यांचा जनमानसावर विलक्षण प्रभाव पडला. विविध गटांवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य या नेत्यांकडे दिसले. मनोहर पर्रीकरांच्या नंतर नितीन गडकरींनी गोव्यातील सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष कामगिरी केली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा होती (देवेंद्र फडणीस, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे). ही सत्ता स्पर्धा भाजपने नियंत्रणात ठेवली. गुजरातमध्ये पाटीदार आणि इतर यांच्यात नेतृत्वावरून अंतर पडले होते. ती स्पर्धादेखील काबूत ठेवली. नरेंद्र मोदी-नितीन गडकरी यांच्यातील वाद किंचित बाहेर आला. मात्र, पक्षाच्या पूर्ण नियंत्रणाखाली नेतृत्वामध्ये ऐक्‍य आणि एकोपा राहिला. तीन, मराठी-गुजराती हितसंबंध आणि अस्मितांमध्ये भाजपने समझोता घडवून आणला. आरंभी म्हणजे सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवाजी महाराजांची अस्मिता तडजोडीसाठी उपयोगात आणली (शिवाजी महाराजांच्या आर्शीवादाने, शिवाजी महाराज महागुरू). त्यामुळे शिवसेनेची शिवाजी अस्मिता आणि भाजपची शिवाजी अस्मिता यावरून पश्‍चिम भारतातील महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील संबंधांमध्ये किरकोळ संघर्ष झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप वेगवेगळी लढली. तेव्हा हा राजकीय संघर्ष चिघळला होता. स्थानिक शासन संस्थांच्या आणि लोकसभेच्या पोट-निवडणुकीत वाद वाढला होता. परंतु, भाजप-शिवसेना पक्षांनी हा संघर्ष कमी केला. लोकसभेसाठी भाजपने पुढाकार घेऊन समझोता केला. मनसेने नरेंद्र मोदी विरोध, अमित शहा विरोध आणि गुजरात विरोध वाढवला. परंतु, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मराठी-गुजराती या अस्मितांचा संघर्ष झाला नाही. उलट मराठी-गुजराती अशी राजकीय मैत्री झाली.

नवीन समाजाची जुळणी
 पश्‍चिम भारतात नवीन समाजांच्या संकल्पना मांडल्या गेल्या. त्या त्या समाजविषयक संकल्पनांचे राजकारण केले गेले. हिंदी समाज, राष्ट्रीय मराठा समाज, आधुनिक समाज, हिंदुत्व समाज इत्यादी. न्या. रानडे यांनी हिंदी समाज अशी संकल्पना मांडली होती. भक्ती परंपरेचे संबंध त्यांनी हिंदी समाजाशी जोडले होते. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय मराठा अशी संकल्पना राजकारणात आणली (शिवजयंती). त्याबरोबर त्यांनी हिंदू संकल्पना अशीही धारणा राजकारणात मांडली (गणेशोत्सव). महात्मा गांधींनी हिंदू समाजाचे नवीन भारतीय रूप मांडले. त्यामध्ये हिंदूंच्या श्रद्धांबद्दल आदर होता. तसेच विविध धार्मिक मूल्यांना मान्यता दिली होती. शिवाय राजकारणाचे अध्यात्मिकरण केले होते. गांधीच्या समकालीन प्रवाहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाज व्यवस्थेची चिकित्सा केली. त्यांनी आधुनिक भारतीय समाजाची संकल्पना राजकारणात पुढे आणली (गौतम बुद्ध). तेव्हा वि. दा. सावरकरांनी व संघाने हिंदुत्वाची संकल्पना राजकारणात गतिशील केली. या सर्व संकल्पनांच्या वाद-विवादातून पश्‍चिम भारतात बहुजन समाज ही संकल्पना स्थिरस्थावर झाली. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण आणि गोव्यात दयानंद बांदोडकरांनी बहुजन राजकारण उभे केले. गांधींनंतर गुजरातमध्ये मात्र बहुजन समाजांचा प्रयोग अस्पष्ट होता. यामध्ये भाजपने फेरबदल केले. भाजपने नव्याने पुढाकार घेऊन पश्‍चिम भारतात हिंदुत्व समाजाची संकल्पना घडवली. नव्वदीच्या दशकापर्यंत बहुजन समाज ही एक संकल्पना होती. ती नव्वदीच्या दशकात जीर्ण झाली. त्या नंतर एक पोकळी तयार झाली होती. त्या पोकळीत हिंदुत्व समाज ही संकल्पना विणली गेली. हिंदुत्व समाजाची संरचना आणि मूल्य व्यवस्था घडवली गेली. हिंदुत्व समाज विविध धाग्यांनी विणला गेला. त्यामुळे हिंदुत्व समाज हा बहुपदरी आहे. एक, हिंदुत्व समाजाचा सावरकरनिष्ठ हिंदुत्व हा एक धागा आहे. भाजपने गुजरात, महाराष्ट्र, गोवा येथे सावरकरनिष्ठ समाजाशी जुळवून घेतले. दोन, संघनिष्ठ हा हिंदुत्व समाजाचा दुसरा एक महत्त्वाचा धागा आहे. त्यांनी संरचनात्मक कामावर भर दिला होता. या हिंदुत्वाशी भाजपचे सुरुवातीपासून मातृसंस्था म्हणून नाते होते. भाजपने सावरकरनिष्ठ व संघनिष्ठ हिंदुत्व समाजात बऱ्यापैकी राजकीय एकमत घडवून आणले. तीन, सावरकर आणि संघाच्या खेरीज मठ आणि मंदिरांशी संबंधित हिंदुत्व समाज आहे. हा हिंदुत्व समाज राजकीयदृष्ट्या लवचिक भूमिका घेत होता. परंतु, समकालीन दशकामध्ये मठ-मंदिरांशी संबंधित हिंदुत्व समाज भाजपशी जोडला गेला. विशेष भाजपने त्यांच्याशी जुळवून घेतले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रतीक स्वरूपात उमेदवार दिला आणि ते निवडून आले. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि वंचित बहुजन संकल्पना मांडणाऱ्या दोन्ही उमेदवारांचा त्यांनी पराभव केला. चार, पश्‍चिम भारतात क्षत्रिय हिंदुत्व समाज आहे. त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ चालवली होती व ब्राह्मणेतर समाज किंवा बहुजन समाजाची संकल्पना घडवली होती. परंतु, त्या संकल्पनेत सुप्त अवस्थेत हिंदुत्व समाजाचे गुणधर्म होते. नव्वदीच्या दशकाच्या आधी ते गुणधर्म स्वीकारण्यास भाजप धरसोड करत होती. त्यांनी काँग्रेस (सौम्य हिंदुत्व), शिवसेना (आक्रमक हिंदुत्व), सावरकरनिष्ठ हिंदुत्व स्वीकारले होते. परंतु, संघ-भाजपपासून दोन हात दूर क्षत्रिय हिंदुत्व समाज होता. हा हिंदुत्व समाजाचा एक महत्त्वाचा धागा म्हणून समकालीन दशकात उदयास आला. या गटांशी भाजपने जुळवून घेतले. पाटीदार (गुजरात) व मराठा (महाराष्ट्र) यांनी खुलेपणे क्षत्रिय हिंदुत्वाचा विचार पुढे आणला. त्यांनी बहुजन हा विचार सोडून दिला. यासाठी नव्वदीच्या दशकापासून भाजपने प्रयत्न केले होते.  गोपीनाथ मुंडे यांनी या आघाडीवर खूप काम केले होते. त्यामुळे शेतकरी संघटनेतील सदाभाऊ खोत, उल्हास पाटील भाजपकडे झुकले.      

सरतेशेवटी पाटील-खोतांनी हिंदुत्व समाजाशी जुळवून घेतले. सतराव्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी पक्षांचा पराभव केला. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात समाजवादी विचारांचा वारसा असलेल्या मंडलिकांनी हिंदुत्व समाजाशी जुळवून घेतले. विविध डाव्या गटांनी मंडलिकांना मते दिली. ते सरतेशेवटी हिंदुत्व समाजाशी रडतखडत जोडले गेले. पाच, ओबीसी समाजामध्ये हिंदुत्वाचे गुणधर्म सतत सुप्त अवस्थेत होते. त्या गुणधर्मांना भाजप-शिवसेनेने कृतिशील केले. भाजपने सुरुवातीस माधव (माळी, धनगर, वंजारी) अशी व्यूहनीती वापरली. त्यांची ही रणनीती महाराष्ट्रात स्वीकारली गेली. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ येथे या प्रयोगाला प्रतिसाद मिळाला. सहा, बहुसंख्य आणि अल्पसंख्याक यांच्यातील संबंधांमध्ये हिंदुत्व होते. अल्पसंख्याकांबद्दल इतरेजन अशी धारणा होती. याचा अर्थ बहुसंख्याक हिंदू आहेत. त्यांच्या ऐक्‍याचा आणि एकोप्याचा प्रयत्न झाला. समकालीन दशकामध्ये या प्रयोगाला स्वीकारले गेले. अल्पसंख्यांकांमधील दलितांशी नव्याने जुळवाजुळवी झाली. अर्थातच याची सुरुवात शिवसेनेने केली होती (शिवशक्ती-भीमशक्ती). भाजपने रामदास आठवलेंशी जुळवून घेतले. त्यांना दोन्ही वेळा राज्यमंत्री केले गेले (सामाजिक न्याय). विशेष म्हणजे माणगाव येथे छत्रपती शाहूंनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र दलित नेतृत्वाचा प्रयोग केला होता. त्यांचे समकालीन दशकांमध्ये शताब्दी वर्ष आहे (२०१९). या समकालीन दशकामध्ये माण ज्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघात आहे, तेथे दलितांनी शिवशक्ती-भीमशक्ती हा प्रयोग यशस्वी केला. वनवासी कल्याण आश्रम या संस्थेने आदिवासींना हिंदुत्व समाजात स्थान दिले. यामुळे हिंदुत्व समाज ही संकल्पना जवळपास तळागाळापर्यंत स्वीकारली गेली. सात, शहरी-अर्धशहरी भागात हिंदुत्व अस्मिता वाढत गेली. त्यासाठी विभुतीपूजा हा घटक महत्त्वाचा ठरला (बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदी). शहरी राजकारण म्हणजे काय याचे आत्मभान काँग्रेस पक्षाला राहिले नाही. त्यामुळे शहरी भागात राजकीय पोकळी होती. त्या पोकळीत भाजपची वाढ झाली. पश्‍चिम भारतात शहरी राजकारण ५० टक्केपेक्षा जास्त घडते. शहरी राजकारणाची छाप ग्रामीण राजकारणावर आहे. त्यामुळे सरतेशेवटी शहरातून हिंदुत्व समाजाची धारणा ग्रामीण भागात गेली. थोडक्‍यात, सावरकरनिष्ठ, संघनिष्ठ, धार्मिक श्रद्धानिष्ठ, क्षत्रियनिष्ठ, ओबीसीनिष्ठ, बहुसंख्याकवादी अशा विविध संरचनांनी हिंदुत्व समाजाचे सामाजिक अभियांत्रिकीकरण केले (इंजिनिअरिंग). या संरचनांची कार्यपद्धती ही राष्ट्रवादाचा आशय मांडणारी होती. राष्ट्रवाद म्हणजे रसायन आहे, अशी नरेंद्र मोदींची संकल्पना आहे. राष्ट्रवादाचे रसायन पश्‍चिम भारतात भाजप व्यवस्था स्थिर करण्यास उपयुक्त ठरले. हिंदुत्व समाज या संकल्पनेला वळसा घालून पुढे जाणारी बहुजन किंवा हिंदू ही संकल्पना निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी ठरली नाही. परंतु, तरीही पश्‍चिम भारतात बहुजन किंवा हिंदू संकल्पना ही हिंदुत्व समाजाच्या राजकारणाविरोधी उद्रेक करते, असे दिसते. कारण गोव्यामध्ये हिंदुत्वेतर समाजामध्ये धरसोड दिसते. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही शक्ती शिल्लक आहे.  
 
रायगड, शिरूर, सातारा आणि बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिसते. या तपशिलाचा अर्थ म्हणजे भाजप एक पक्ष वर्चस्व पद्धतीचा हिंदुत्व समाज हा पाया आहे. हा पाया गुजरातमध्ये भक्कम आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात समकालीन दशकामध्ये विरोधही होतो असे दिसते. तर गोव्यात हिंदुत्व समाजाचा पाया महाराष्ट्राइतका भक्कम नाही. म्हणजेच महाराष्ट्र आणि गोवा येथे भाजपच्या एक पक्ष पद्धतीचे आधार विस्तारण्यास भाजपला संधी आहे. भाजपच्या विस्तारामुळे हिंदुत्व समाज आणि वंचित बहुजन समाज अशी एक राजकीय चढाओढ होऊ शकते. तसेच दुसरी चढाओढ हिंदुत्व समाज आणि मराठा-ओबीसी केंद्रित बहुजनवादामध्ये होईल; शिवाय तिसरी संघर्षाची शक्‍यता हिंदुत्व समाज विरोधी शिवसेना अशीही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  

संबंधित बातम्या