अंतरायाच्या पुनर्मांडणीचे राजकारण 

प्रकाश पवार
सोमवार, 1 जुलै 2019

राज-रंग
 

राजकारणात अंतराय घडवले जातात. अंतराय आर्थिक, सामाजिक, धार्मिक असे विविध प्रकारचे असतात. उदा. बहुजन-बहुजनेतर असा एक सामाजिक अंतराय राजकारणात होता. नव्वदीनंतर महाराष्ट्रात जुन्या बहुजन संकल्पनेपेक्षा वेगळी बहुजन संकल्पना भारिप-बहुजन महासंघाने मांडली होती. समकालीन दशकामध्ये वंचित बहुजन अशी पुनर्मांडणी बहुजन वंचित आघाडीने केली. त्यामुळे बहुजन-बहुजन वंचित असा नवीन अंतराय घडवला गेला. बहुजन आणि वंचित बहुजन यांचे राजकीय संबंध परस्परविरोधी हितसंबंधी म्हणून मांडले गेले. या दोन्ही बहुजन संकल्पनांच्या सत्ताकांक्षा आणि अर्थकांक्षा वेगवेगळ्या आहेत. त्या दोन्ही आकांक्षांच्या भोवती अंतरायाची संरचना उभी केली जाते. अशी अंतरायाची संरचना उत्तर भारतात नव्वदीच्या दशकात होती. तिचे स्वरूप हिंदुत्व-बहुजन असे होते. परंतु, समकालीन दशकामध्ये या जुन्या अंतरायाची पुनर्मांडणी केली गेली. भाजपने नव्वदीच्या दशकात उत्तर भारतात हिंदुत्व-जात हा अंतराय घडवला. हिंदुत्वाच्या राजकारणाचे नेते अडवानी, तर जातीच्या राजकारणाचे नेते मुलायमसिंह, कांशीराम, मायावती असा नेतृत्वाच्या पातळीवर एक सामाजिक अंतरायाचा पदर नव्वदीनंतर दिसतो. परंतु, समकालीन दशकामध्ये हिंदुत्व-जात या अंतरायाची पुनर्जुळणी सुरू झाली. समाजवादी पक्षाने काँग्रेसशी समझोता करून मुस्लिम-यादव यांची पुनर्जुळणी केली. तर सतराव्या लोकसभा निवडणुकीत ही जुळणी मुस्लिम, यादव, जाटव, जाट अशी बेरजेच्या पद्धतीची केली. भाजपने बेरजेपेक्षा सामाजिक रसायनाचे सूत्र विकसित केले.  भाजपने समकालीन दशकामध्ये हिंदुत्व-जात या अंतरायाची पुनर्मांडणी हिंदुत्व सांस्कृतिक राष्ट्रवाद-दहशतवाद अशा पद्धतीने केली. त्यामुळे एकूण उत्तर भारतातील अंतरायाचे जुने स्वरूप बदलले. त्या जागी नव्या युगाशी सुसंगत अशी अंतरायाची पुनर्मांडणी झाली. अर्थात या आघाडीवर नरेंद्र मोदी - अमित शहांनी मोठी कामगिरी केली. अंतरायाची पुनर्मांडणी का केली? अंतरायाच्या पुनर्रचनेचे आधार कोणते आहेत? उत्तर भारतात अंतरायाच्या पुनर्मांडणीचे राजकीय परिणाम कोणते दिसतात? हे महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित होतात. 

अंतरायाची पुनर्मांडणी 
अंतरायाचे राजकारण हा विषय असा आहे, की त्या विषयात प्रत्येकजण तज्ज्ञ असतो. पण अंतरायाचे राजकारण इतके साधेसुधे नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात. हिंदुत्व-जात अंतराय म्हणजे हिंदुत्व व जात असे सामाजिक ध्रुवीकरण झालेले एकपदरी राजकारण समजले जाते. परंतु, त्यांच्या अंतर्गत अनेक पापुद्रे असतात. एकाच वेळी विविध समान व विरोधी घडामोडी घडतात. या घडामोडींमधील गॉसिप, गूढगर्भांतील कथांपेक्षा अंतरायाचे राजकारण वेगळे असते. त्यांचा पट घडवलेला दिसतो. नव्वदीच्या दशकापासून उत्तर भारतात भाजपव्यवस्था उदयास येत होती. परंतु, समकालीन दशकामध्ये भाजपव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट दिसू लागले. भाजपने हिंदुत्व आणि जात या जुन्या अंतरायाची पुनर्रचना केली. या परंपरागत अंतरायाची पुनर्मांडणी करण्यामध्ये नरेंद्र मोदी व अमित शहांनी पुढाकार घेतला. समकालीन दशकातील हिंदुत्वाने जवळपास जातवादी राजकारणाच्या घटकाचे विसर्जन केले. जातीचे राजकारण हे बेरीज आहे. भाजपने जातीच्या बेरजांचे राजकारण देश हितविरोधी असल्याचे चित्र उभे केले व जातींच्या बेरजेऐवजी जातींमधील घराणेशाहीविरोधी रसायन पुढे आणले. जातीजातींची समीकरणे ही एक महामिलावट आहे, अशी भूमिका घेतली. जातसंस्थेचे आत्मविसर्जन भाजपने केले नाही, तर जातवादी राजकारणाचे विसर्जन केले. त्यामुळे भाजपने जातवाद, ओबीसीवाद, अतिमागासवाद, बहुजनवाद अशा विचारसरणीची विरोधी भूमिका घेतली. या शिवाय जातीशी संबंधित जमीनमालकी आणि मध्यम शेतकरी जातींचे शेतीशी संबंधित हितसंबंधांना एकसंघपणाचे स्वरूप घेणार नाही, याची काळजी घेतली. तरीही उत्तर प्रदेशात मोठे दोन प्रयोग झाले. आरंभीचा प्रयोग हा काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या आघाडीचा होता. परंतु, तो प्रयोग हिंदुत्व राष्ट्रवादामुळे झाकला गेला. म्हणजेच हिंदुत्वविरोधी मध्यममार्गी-समाजवादी हा अंतराय उभा राहिला नाही. त्यानंतर दुसरा प्रयोग समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीचा झाला. या प्रयोगामध्ये हिंदुत्व-बहुजनवाद-समाजवाद अशी अंतरायाची परस्परविरोधाची अटकळ होती. या आघाडीमध्ये जाटांचा समावेश केला होता. त्यामुळे हा ‘याजाजा’ (यादव, जाट, जाटव) असा प्रयोग झाला. शिवाय त्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश होता. परंतु, भाजपच्या हिंदुत्व राष्ट्रवादामुळे हा प्रयोग झाकला गेला. भाजपने निव्वळ हिंदुत्व-जात असा अंतराय उभा केला नाही; तर राष्ट्रवादी-बिगर राष्ट्रवादी (देशहितविरोध) असा अंतरायदेखील उभा केला. यामुळे जातींचे हितसंबंध संकुचित ठरवता आले. जातींचे हितसंबंध देशहितविरोधी म्हणून त्यांची बोळवण केली गेली. त्यामध्ये पुन्हा जातीशी समझोता अल्पसंख्यांकांचा होता. यामुळे हिंदुत्वाच्या पुढे धर्मनिरपेक्षता हा मुद्दा मूळ धरू शकला नाही. उलट मुलायमसिंगांची प्रतिमा ‘मुल्ला मुलायम’ अशी केली गेली. त्यामुळे हिंदुत्व-जात अंतराय हा भाजपने देशभक्तीच्या आधारे झाकला. हिंदुत्वाला राष्ट्रवादाची जोड दिली गेली. त्यामुळे परंपरागत हिंदुत्वावरील भर कमी केला होता. लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा राष्ट्रवादाने झाकला. त्यामुळे रामकेंद्रित हिंदुत्व हा विचार दुय्यम स्थानावर गेला होता. म्हणजेच जसा जात मुद्दा दुय्यम स्थानावर गेला. तसाच हिंदुत्व मुद्दा दुय्यम स्थानावर गेला. त्यामुळे थेट हिंदुत्व-जात हा अंतराय राजकीयदृष्ट्या अंधुक होता. या ऐवजी राष्ट्रवाद-दहशतवाद असा अंतराय घडवला. दशहतवादविरोधी राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रीय राजकारण अशी नवीन राजकारणाची जडणघडण झाली. भाजपने या दशकाच्या सुरुवातीस राममंदिराऐवजी ‘गंगा’ हे हिंदुत्वाचे प्रतीक निवडणुकीशी जोडून घेतले. त्यामुळे राममंदिरावरील लक्ष कमी झाले. त्यानंतर थेट शिवाचे प्रतीक जोरकसपणे पुढे आणले. गेल्या पाच वर्षांत शिवाची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे हिंदुत्वाचे प्रतीक शिव हे राजकारणात जोडले गेले. या फेरबदलामुळे रामकेंद्रित हिंदुत्व दुय्यम स्थानावर आणि शिवकेंद्रित हिंदुत्व शिखरस्थानी अशी अदलाबदली केली गेली. या अदलाबदलीमुळे परंपरागत हिंदुत्वदेखील झाकले गेले. मोदीप्रणीत हिंदुत्व पुढे आले. मोदींच्या हिंदुत्वाला राष्ट्रवाद आणि शिव असे दोन कंगोरे होते. त्यामुळे एकूण उत्तर भारतातील हिंदुत्व-जात हा अंतराय अप्रस्तुत ठरला. ही भाजपची नवीन व्यवस्था समकालीन दशकात आकाराला आली. मोदींनी हिंदुत्वाची संरचना स्वीकारली. परंतु संरचनेचे नूतनीकरण केले. त्यामध्ये रामाच्या जागी राष्ट्रवाद आणि शिवाच्या संरचनांचा समावेश केला. अशा फेरबदलामुळे फरक काय झाला असा प्रश्‍न उपस्थित केला जाईल. याची तीन कारणे आहेत. एक, या फेरबदलामुळे शिवाची प्रतिमा ही उच्चजातीतर अशी आहे. शिवाय शिवाची प्रतिमा बहुसंख्य लोकांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे लोकांशी जोडून घेण्यास मदत झाली. दोन, अडवानी युगातील हिंदुत्वाचे प्रतीक रद्द ठरवता आले. अडवानी युगदेखील झाकले गेले. अडवानी गटाचे त्यामुळे विसर्जन झाले. तीन, मोदींनी राष्ट्रवादाचा अर्थ दहशतवादविरोध असा लावला. त्यामुळे एकूण राजकारणाच्या आखणीचा आखाडा बदलला. थोडक्‍यात हिंदुत्व-जात हा परंपरागत अंतराय दुय्यम झाला. त्या जागी राष्ट्रवाद-दहशतवाद हा अंतराय उत्तर भारतात सर्व दूर पसरला गेला. 

अंतरायाच्या पुनर्रचनेचा आधार 
हिंदुत्व-जात अंतरायाची पुनर्रचना यशस्वी का झाली, याची कारणे उत्तर भारताच्या भूगोलाशी जोडली गेली आहेत. ती कारणे चार आहेत. एक, उत्तर भारतातील राज्याची ओळख देवभूमी आहे. पर्वतीय प्रदेशाची ओळख उच्चजातीतर देवभूमी म्हणून जास्त आहे. शिवभूमी अशी त्या भूगोलाची ओळख आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अंतरायाची पुनर्रचना शिवकेंद्रित करता आली. दोन, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड अशा भागात बौद्ध लोक व संस्था आहेत. त्यांचा विलक्षण प्रभाव आहे. त्यांना नरेंद्र मोदींनी भाजपशी जोडून घेतले. तीन, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड या भागात सैनिक आणि माजी सैनिकांची लोकसंख्या मोठी आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित संस्था आहेत. या गोष्टीशी भाजपने जुळवून घेतले. उदा. शिमला लोकसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेसच्या माजी सैनिकाच्या विरोधात माजी सैनिक उमेदवार दिला होता. चार, पंजाब, जम्मू-काश्‍मीर येथे पंजाबियत-काश्‍मिरियत अशा संकल्पना एका बाजूला होत्या. परंतु त्यापेक्षा भिन्न भूमिका राष्ट्रवादाने घेतली. यामुळे राष्ट्रवादाचा भक्कम आधार मिळाला. यामुळे एकूण राष्ट्रवाद-दहशतवाद हा अंतराय प्रभावी ठरला. हिंदुत्व-पंजाबियत-काश्‍मिरियत हा अंतराय झाकला गेला. अर्थातच हिंदुत्व-जात या अंतरायाची पुनर्रचना घडून आली. हिंदुत्व-जात या परंपरागत अंतरायाचे तर्कशास्त्र अप्रस्तुत ठरले. त्या जागी नवीन अंतरायाचे रसायन घडवले गेले. 

अंतरायाच्या पुनर्जुळणीचा परिणाम 
अंतरायाच्या पुनर्जुळणीमुळे महत्त्वाचे पाच परिणाम घडून आले. एक, समकालीन दशकामध्ये भाजप हा उत्तर भारतातील सर्वांत मोठा पक्ष आहे. हे भाजपचे सर्वसामान्य लक्षण आहे. याखेरीज उत्तर भारतात या पक्षाचे स्थान प्रभावशाली पक्ष या स्वरूपाचे आहे. हे समकालीन दशकातील भाजपचे वस्तुनिष्ठ वर्णन आहे. यांची निवडणुकीय स्वरूपाची दोन कारणे दिसतात. एक, या विभागात पक्षाला ७५ टक्के जागा मिळाल्या आहेत (९४ जागा). गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत केवळ सहा जागा कमी झाल्या. तेव्हा पक्षाला ७९.३६ टक्के जागा मिळाल्या होत्या. केवळ उत्तर प्रदेशात भाजपच्या नऊ जागा कमी झाल्या. म्हणजेच निवडणूक राजकारणात जागा जिंकण्याची क्षमता या आधारावर भाजप हा निश्‍चितच प्रभुत्व असलेला पक्ष ठरतो. दोन, मतांची टक्केवारी चांगली मिळवणे हा एक महत्त्वाचा निकष भाजपने जवळपास प्राप्त केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात भाजपला साठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळाली. उत्तर प्रदेश व हरयानात पन्नास टक्के मते मिळाली. या विभागातील जम्मू-काश्‍मीरमध्येदेखील ३९ टक्के मते मिळाली. परंतु पंजाबमध्ये केवळ ९.६३ टक्के मते मिळाली. त्यामुळे पंजाबचा अपवाद वगळता उत्तर भारतात जागा आणि मते या दोन्ही निकषावर भाजपचे वर्चस्व दिसते. हा महत्त्वाचा परिणाम भाजपच्या संदर्भात अंतरायाच्या पुनर्मांडणीचा झाला. दोन, दुसरा परिणाम म्हणजे काँग्रेस पक्षाने हिंदू अस्मिता स्वीकारली होती. राहुल गांधींनी शिवभक्त अशी प्रतिमा उभी केली होती. काँग्रेस हिंदू-हिंदुत्व असा अंतराय घडवत होती. काँग्रेस पक्षाचा हा अंतराय भाजपच्या सांस्कृतिक हिंदुत्व राष्ट्रवादामुळे झाकला गेला. किंबहुना सांस्कृतिक हिंदुत्व राष्ट्रवाद-हिंदू राष्ट्रवाद हा अंतराय उभा राहिला नाही. हा काँग्रेसच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. तीन, जातवादी, मंडलवादी, बहुजनवादी, न्यायकांक्षी संसदीय राजकारणाचा अस्त झाला. तरीही उत्तर प्रदेशात बसपला दहा लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत. परंतु, भाजपने सोळाव्या-सतराव्या लोकसभा निवडणुकीत बहुजनवादाचा पराभव केला. अतिमागासवाद हा समूह भाजपशी जुळवून घेतो. त्यामुळे काँग्रेसचा अतिमागासवाद यशस्वी झाला नाही. या अर्थाने भाजपने अंतरायाची पुनर्मांडणी केलेली यशस्वी झाली.    

संबंधित बातम्या