यात्रांचे राजकारण 

प्रकाश पवार
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

राज-रंग
 

महाराष्ट्रात महाजनादेश, शिवस्वराज्य यात्रा, जन आशीर्वाद यात्रा अशा राजकीय यात्रा सुरू आहेत. भारतीय समाजजीवनात यात्रा ही संकल्पना लोकवादी स्वरूपाची आहे. यात्रा ही संकल्पना सामाजिक-धार्मिक, राजकीय असे विविध अर्थ व्यक्त करते. उदा. तीर्थयात्रा अशीही संकल्पना वापरली जाते. भारतीय समाजात चारीधाम यात्रा अशीही एक धारणा आहे. दोन-चार किंवा अनेक स्थळांना आणि समाजाला जोडण्याचे काम यात्रा करते. उदा. देहू-आंळदीपासून पंढरपूरपर्यंतच्या विविध स्थळांना पालखी जोडते. यामध्ये धार्मिक-सामाजिक सलोखा आणि समाजधारणा यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. राजकारणात लोकमत घडविण्यासाठी व लोकांचे संघटन करण्यासाठी ही संकल्पना वापरली जाते. राजकारणात यात्रा या संकल्पनेचा वापर राजकारण घडविण्यासाठी आणि राजकारणातून हद्दपार करण्यासाठी केला जातो. राजकारणातून हद्दपार करण्यासाठी दूरच्या यात्रेला पाठविण्याची जुनी परंपरा भारतात होती. तर लोकांशी यात्रांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. त्यामुळे यात्रांचे नियोजन करण्याची परंपरा भारतात आहे. उदा. अडवाणींनी भारतात रथयात्रा ही संकल्पना खूप कुशलपणे राबवली होती. मध्यप्रदेशात शिवराजसिंग चौहान यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली होती. समाज आणि राजकारण, मतदार आणि राजकीय पक्ष, मतदार आणि नेतृत्व यांना जोडणारा पूल म्हणून यात्रा काम करते. यात्रा ही संकल्पना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उपयोगात आणली आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यांमध्ये तीन पक्षांनी यात्रांचे नियोजन केले. परंतु महापुरामुळे यात्रा काही दिवस थांबविण्यात आल्या. परंतु त्यांची सुरुवात नव्याने होत आहे. भाजपने दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात महाजनादेश, शिवस्वराज्य यात्रा, जन आशीर्वाद यात्रा इत्यादींमधून कोणते राजकारण घडते आहे, या यात्रांमध्ये कोणते प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय स्पर्धेचा कोणता नवीन अर्थ पुढे येतो; या गोष्टींची चर्चा येथे केली आहे. 

यात्रांचे अर्थ आणि सत्तास्पर्धा 
भाजपने महाजनादेश, शिवसेनेने जन आशीर्वाद, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा अशा संकल्पना वापरल्या आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्या संकल्पनांमध्ये ‘जन’ ही संकल्पना समान आहे. मात्र भाजपची संकल्पना ही शिवसेनेपेक्षा जास्त खोल आणि व्यापक आहे, असा भाजपचा दावा दिसतो. कारण त्यामध्ये महाजनादेश असा दावा केला आहे. तर शिवसेनेने केवळ जन ही संकल्पना वापरली आहे. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे भाजप जनादेश ही संकल्पना वापरते. तर शिवसेना जन आशीर्वाद ही संकल्पना भाजपपेक्षा वेगळ्या अर्थाने वापरते. जनादेश व जन आशीर्वाद या दोन्ही संकल्पनांमध्ये जन समान आहेत. आदेश व आशीर्वाद या दोन्ही धारणा परस्परविरोधी आहेत. परंतु, सरतेशेवटी महाजनादेश व जन आशीर्वाद मिळविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या दोन पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यात्रा वेगळी आहे. कारण त्यांनी शिवस्वराज्य असा संकल्प केला आहे. या यात्रेमध्ये ‘नवस्वराज्याचा नवा लढा’ अशी टॅगलाइन वापरली आहे. नवस्वराज्य आणायचे, अशी शपथ घेतली जाते. ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेची जाणीव करून देते. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना ही राष्ट्रीय होती. म्हणजेच स्वराज्य संकल्पना राष्ट्रवाचक होती. छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना शिवसेना व भाजपने याआधी वापरली होती. शिवसेना पक्षाच्या शिवसंकल्पनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आशय होता, असा शिवसेनेचा दावा आहे, तर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने अशी संकल्पना वापरली होती. भाजपने ‘फिर एकबार शिवशाही सरकार’ अशी घोषणा दिली. संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थ हिंदुत्व चौकटीत वेळोवेळी स्पष्ट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य ही संकल्पना वापरल्यामुळे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली. ‘शिव’ ही संकल्पना सर्वसमावेशक या अर्थाने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वापरत आहे. कारण दोन्ही पक्षांचा दावा अठरापगड जातींच्या एकोप्याचे राज्य असा आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन नेते अमोल कोल्हे हे आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्या जीवनकार्यावर दोन मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सामाजिक पाठिंब्यासाठी तीव्र संघर्ष दिसतो. शिवाय भाजपने उच्चभ्रू मराठा स्वतःकडे वळविला आहे. त्यांनादेखील अठरापगड जातींचा पाठिंबा मिळतो. या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस उतरलेली दिसते. शिवाजी महाराजांचे प्रतीक घेऊन मतदारांचे संघटन महाराष्ट्रातील प्रमुख तीन पक्ष करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगल कलश शिवनेरीवरून शिवराय जेथे जेथे गेले, तेथे तेथे घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. या तीन पक्षांची सत्तास्पर्धा एकमेकांशी आहे, असे वाटते. त्यामुळे हे तीन पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. यामुळे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी शिवप्रतीकाच्या भोवती अस्मितांचे राजकारण सुरू केले. या तीन पक्षांच्या तीन अस्मिता म्हणजे त्यांचा समर्थक वर्ग सुरक्षित ठेवण्याची ही रणनीती दिसते. 

महाभरती-नव राजकीय भरती 
महाभरती-नवीन भरती या संदर्भात पाच नवीन राजकीय विषय नव्याने राजकारणात आले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांनी महाभरती-नवीन भरती हा विचार यात्रांमध्ये मांडला आहे. 

१. भाजपने महाजनादेशासाठी महाभरतीची संकल्पना वापरली आहे. शिवाय दोन्ही काँग्रेसमधील चांगल्या नेतृत्वाला भाजपमध्ये संधी देण्याची संकल्पना वापरली आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये चांगले नेतृत्व होते. चांगले नेतृत्व आहे, असे जवळपास भाजपने मान्य केले. याशिवाय भाजपने दोन्ही काँग्रेसमधील नेतृत्वाच्या शुद्धीकरणाची चळवळ राबवलेली दिसते. त्यामुळे यात्रा ही नेतृत्वाच्या शुद्धीकरणाची चळवळ आहे. 

२. दोन्ही काँग्रेस पक्षातील पक्षांतरामुळे जुने नेतृत्व गेले. त्या जागी युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी यात्रा सुरू केली. म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्षांचीदेखील नवीन नेतृत्वाच्या भरतीची ही संकल्पना आहे. या यात्रांमधून नवीन नेतृत्वाचा शोध दोन्ही काँग्रेस घेत आहेत. परंतु, महाभरती व युवा नेतृत्वाचा पुनर्शोध या प्रक्रियांमध्ये सामाजिक संघर्ष राजकीय स्पर्धेमुळे उभा राहिला आहे. 

३. ओबीसी समूहातील नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष उभा राहिला आहे. कारण नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या जिल्हा परिषदांवरून वाद झाला. ओबीसींना २७ टक्के आरक्षण स्थानिक शासन संस्थांमध्ये मिळत होते. हा मुद्दा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये यामुळे राजकीय विषय झाला. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, असा न्यायालयाने आदेश दिला. त्याचीही चर्चा या यात्रामध्ये होते. त्यामुळे ३४ जिल्हा परिषदांमधील ९०-९५ जागा कमी होण्याच्या शक्यतांचा बोलबाला झाला. १४ जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त राखीव जागा ठेवलेल्या आहेत. हा वाद एकूण दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप असा सुरू झाला. यामुळे ओबीसी वर्गाचे खरे पाठीराखे कोण अशी चर्चा होते. ही चर्चा राजकीय आहे. तसेच ही चर्चा पक्षीय स्पर्धेच्या संदर्भातील आहे. यामुळे मतदार, नेते, पक्ष यांच्यातील संबंधांची पुनर्जुळणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींच्या जागा कमी होणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलन करण्याची भूमिका मांडली आहे. 

४. दोन्ही काँग्रेस पक्षांची युवकांची राजकीय भरतीची प्रक्रिया ग्रामीण भाग केंद्रित आहे. तर भाजपची महाभरतीची संकल्पना ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही भागात सुरू आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस व शिवसेना पक्षापेक्षा जास्त गती भाजपच्या महाभरती संकल्पनेची दिसते. 

५. दोन्ही काँग्रेस पक्षातील पक्षांतर करणारे चांगले नेतृत्व आहे, अशी भाजपची नवीन संकल्पना आहे. त्या संकल्पनेचा प्रचार भाजप करते. तर पक्षांतर करणारे म्हणजे भरडे पीठ होते, असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस करते. यामुळे पक्षांतर करणारे नेतृत्व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या बरोबरच महाराष्ट्रात महापूर आला. त्यामुळे नवीन भरतीची चर्चा कमी झाली. परंतु पक्षांतर करणाऱ्या नेतृत्वापुढे नवीन पेचप्रसंग उभे राहिले आहेत. ते नवीन पेचप्रसंग आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातील आहेत. आपत्ती व्यवस्थापनात सरकारवर विरोधी पक्ष, आपत्तीग्रस्त नागरिक टीका करत आहेत. यामुळे एकूण महाभरती व नवभरती या दोन्ही गोष्टी वादाच्या भोवऱ्यात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भरतीची संकल्पना राष्ट्रीय होती. त्यामुळे राष्ट्रीय मराठा अशी संकल्पना वापरली जात होती. राजारामशास्त्री भागवत, न्या. रानडे यांनी राष्ट्रीय मराठा संकल्पनेची चर्चा केली होती. लोकमान्य टिळकांनी ‘राष्ट्रीय मराठा’ अशी संकल्पना वापरली होती. पंडित नेहरूंनीदेखील ‘राष्ट्रीय मराठा’ अशी संकल्पना वापरली होती. त्या संकल्पनांशी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांनी जुळवून घेतले होते. या संकल्पना सर्वसमावेशक होत्या. यापेक्षा वेगळे अर्थ सध्याच्या यात्रांमध्ये दिसत आहेत. राष्ट्रीय मराठा ही संकल्पना अंधुक आणि अस्पष्ट दिसते. 

थोडक्यात, महाभरती आणि नवभरतीमध्ये राष्ट्रीय मराठा हा जातीखेरीजचा आशय लोप पावला आहे. त्यांचा पुनर्शोध घेतला जात नाही. त्यामुळे महाभरती आणि नवभरतीमध्ये सुसंगती दिसत नाही. महाभरती आणि नवभरतीच्या संकल्पना केवळ सत्तास्पर्धा केंद्रित आहेत. तशाच त्या लोकवादी आहेत. त्यांचा आशय राष्ट्रवाचक करण्याचे पक्षांपुढे मोठे आव्हान दिसते. सत्तास्पर्धा आणि लोकवाद यापेक्षा राष्ट्रीय ही संकल्पना वेगळी आहे. तो आशय यात्रांमध्ये पक्ष शोधत नाहीत. राष्ट्रवाद, समाज धारणा या अर्थाने यात्रांचा आशय कमकुवत दिसतो. परंतु, राजकीय पक्षांमधील स्पर्धा म्हणून हा आशय प्रभावी दिसतो.

संबंधित बातम्या