अतिराजकीयीकरणाचे युग

प्रकाश पवार
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

राज-रंग
 

नव्वदीच्या दशकानंतर अतिराजकीयीकरणास राजकारण म्हणून ओळखले जाऊ लागले. अतिराजकीयीकरण या प्रक्रियेने राजकारणाचा पोत बदलला. साधेपणा जाऊन राजकीय क्षेत्रात सत्तेची स्पर्धा ही चंगळवादी पद्धतीने घडू लागली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात केवळ खुली सत्तास्पर्धा राहिली नाही, तर त्या सत्तास्पर्धेचा संबंध उत्तरोत्तर सत्ता अधिकाधिक वाढत जाण्याशी येऊ लागला. नेतृत्व घडो अगर न घडो, लोकसेवा करता येवो अगर न येवो, बहुमत असो अगर नसो पण सत्तेवरती मात्र नियंत्रण असले पाहिजे. हे तत्त्व जवळपास जगभर स्वीकारले गेले. त्यामुळे राजकारणाचे क्षेत्र हे सार्वजनिकतेकडून व्यक्तिगत सत्तास्पर्धेकडे वळले. यातूनच आरंभी नेतृत्वाचे अतिराजकीयीकरण घडले. प्रश्‍नांचे अतिराजकीयीकरण झाले. तसेच विचारप्रणालीचेदेखील सपाटीकरण होऊन अतिराजकीयीकरण झाले (विचारप्रणालीचा अंत). म्हणजेच राजकारणातील अचूकता कमी कमी होत गेली. राजकारणातील साधेपणा कमीकमी होत गेला. राजकारण म्हणजेच प्रतिष्ठा, व्यक्तिगत हितसंबंध, उद्योगव्यवसाय, धर्मकारण, समाजकारण अशी एकांगी आणि एका बाजूची चर्चा सुरू झाली. या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समग्रता कमी झाली. 
राजकारण समग्र असावे असे न्या. रानडे, महात्मा गांधी यांना वाटत होते. त्यांचे राजकारण भावत नाही. हा मुद्दा एकूण जागतिक राजकारणाची शोककथा म्हणून पुढे आला आहे. 

अतिराजकीयीकरणाची प्रक्रिया  
अतिराजकीयीकरण ही प्रक्रिया जागतिक पातळीवर सध्या घडते. या प्रक्रियेचा प्रभाव भारतीय राजकारणावर पडला आहे. तसेच राज्य, जिल्हा, शहर व गाव अशा पातळ्यांवर अतिराजकीयीकरण ही प्रक्रिया दिसते. अतिराजकीयीकरण म्हणजे राजकारण घडविण्यासाठी केलेला एक प्रयत्न असतो. तसेच ही प्रक्रिया म्हणजे राजकारण असतेच असे नाही. कारण ही प्रक्रिया राजकारणाचे अंधूक व अस्पष्ट रूप असते. याची प्रचिती अनेक वेळा येते. काश्मीर प्रश्‍नावर भारत आणि जगभर चर्चा झाली. तसेच त्या विषयात अमेरिका, चीन, जर्मनी अशा अनेकांनी भाग घेतला. याचा अर्थ हा मुद्दा अतिराजकीयीकरण झालेला आहे. संबंध नसलेल्यांनीही त्याबद्दल मत व्यक्त केले. या पद्धतीनेच राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्येदेखील वेगवेगळे विषय घेऊन त्यांचे अतिराजकीयीकरण केले जाते. अतिराजकीयीकरण ही प्रक्रिया म्हणजे एकाच वेळी राजकारणाचे विविध अर्थ लावणे. ते अर्थ सुसंगत असतीलच असे नव्हे. ते अर्थ परस्पर विरोधी तसेच लोकशाही व राजकारण विरोधीदेखील असतात. यामुळे अतिराजकीयीकरण ही प्रक्रिया अलीकडे राजकारणावरती हल्ला करताना दिसते. 

राजकारण म्हणजे लोकांचे हितसंबंध, मतदारांचे हितसंबंध, दुर्लक्षित समूहांचे हितसंबंध, गरीब शेतकऱ्यांचे हितसंबंध, शेवटच्या माणसाचे हितसंबंध असा अर्थ घेतला जातो. परंतु, हे हितसंबंध सामूहिक हितसंबंध असतात. त्या हितसंबंधांना वगळून सत्ताधारी वर्गाचे हितसंबंध अशी अदलाबदली केली जाते. या अदलाबदलीमध्ये सत्ताधारी वर्ग आपल्या हितसंबंधांसाठी लोकांना, मतदारांना, दुर्लक्षित समूहांना, गरिबांना किंवा शेवटच्या व्यक्तीला आपल्या हितसंबंधांचे साधन करतो. म्हणजेच लोकांना त्यांचा सार्वजनिक विवेक तर्कसंगतपणे वापरण्यापासून दूर नेतो. लोक तर्कसंगतपणे कृती करत नाहीत तसेच निर्णय घेत नाहीत ही गोष्ट मानसशास्त्रज्ञ सिग्मुंड फ्राइड यांनी नोंदवून ठेवली आहे. ही लोकांची मानसिकता अतिराजकीयीकरण करण्यासाठी वापरली जाते. विशेष म्हणजे सिग्मुंड फ्राइडच्या भाच्याने या तर्कविसंगतीचा कौशल्याने उपयोग करून उत्पादनाची जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे जगभर चंगळवाद, उपभोक्तावाद उदयास आला. हेच तर्कशास्त्र राजकारणात वापरले जाते. या तर्कशास्त्रावर आधारित राजकारणाचे स्वरूप चंगळवादी, उपभोक्तावादी घडविले गेले. यामुळे राजकारणाचे अतिरंजित रूप पुढे आले. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते स्वतःची प्रतिमा, पक्षाची प्रतिमा, पक्षाचे सामाजिक आधार, सामाजिक-आर्थिक प्रश्‍न यांची मांडणी अतिनाट्यमय पद्धतीची करतात. त्यामुळे राजकारण हे लोकांचे, मतदारांचे, दुर्लक्षित समूहांचे, गरिबांचे किंवा शेवटच्या व्यक्तींचे राहत नाही. 

राजकारण हे चंगळवाद आणि उपभोक्तावाद अशा आशयाचे घडू लागते. यासाठी अतिविस्तृतपणे अतिराजकीयीकरण केले जाते. हा एकूण राजकारणातील मुख्य प्रवाह झालेला आहे. म्हणजेच राजकारणात साधी माणसे होती, त्यांची साधी राहणी होती, त्यांचे विचार चांगले होते. राजकारणातील साधी माणसे जास्त महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व देत होती. कमी महत्त्वाच्या गोष्टींना कमी महत्त्व देत होती. ही प्रक्रिया आज राजकारणातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे राजकारणात एक प्रकारचा सत्तेचा चंगळवाद आलेला आहे. म्हणूनच निवडणूक ही व्यवस्थापन झाली आहे. निवडणुकीला व्यवस्थापन समजून निवडणुकीचा एक व्यवसाय केला जातो. निवडणुकीचा प्रचार हा व्यवस्थापन पद्धतीने केला जातो. यामध्ये नेतृत्व किंवा पक्ष साधा राहत नाही, त्यांची विचारसरणी साधी नसते. या गोष्टी जागतिक पातळीवरती घडत आहेत. त्याचे प्रतिबिंब भारताच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहे. 

चंगळवादी सत्तास्पर्धा 
 मोठ्या पक्षांनी चंगळवाद स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यामधून त्या पक्षांचे आणि मतदारांचे दुराव्याचे संबंध निर्माण झाले. याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस हा पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये पक्षांतर सध्या घडत आहे. या पक्षांतराविषयी महादेव जानकर यांनी भाजपचा काँग्रेस पक्ष होईल असा तर्क मांडला आहे. या तर्कानुसार भाजप या पक्षाचा ताबा चंगळवादी अभिजन घेतील असा अर्थ लावता येतो. या अर्थानुसार राजकारण ही एक चंगळ आहे, अशी धारणा दोन्ही काँग्रेसमधील अभिजनांची होती. त्यांची सत्तेची धारणा गाव ताब्यात पाहिजे, तालुका ताब्यात पाहिजे. सहकारी संस्थेवर नियंत्रण असावे. विधानसभेवर निवडून जावे. जसे विकेन्ड घर असावे, तसे दुसऱ्या जिल्ह्यात विधानसभेचा मतदार संघ आपल्या नियंत्रणाखाली असावा, दुसऱ्या जिल्ह्यात कारखाना असावा, राज्याबाहेर उद्योगस्नेही संबंध असावा, परदेशात गुंतवणूक करावी, अशा राजकीय सत्तेच्या चंगळवादी संकल्पना उदयाला आल्या आहेत. यामुळे लोकशाहीमधील निवडणुकांचा अर्थ संकुचित झाला आहे. निवडणूक म्हणजे सत्तेपर्यंत जाण्याची शिडी आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणजे सत्तेवर आरूढ होण्याचा मार्ग आहे. या प्रक्रियेत सतत अधिकाधिक सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. स्थानिक सत्ता, राज्यातील सत्ता, केंद्रातील सत्ता या गोष्टी मिळविणे म्हणजेच राजकारण अशी धारणा घडलेली आहे. यामुळे सत्ता ही विकेंद्रीकरणासाठी आहे. सत्ता ही शेवटच्या माणसासाठी आहे. सत्ता ही सेवेसाठी आहे. या संकल्पना राजकारणातून हद्दपार झालेल्या आहेत. महात्मा गांधी यांनी लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. परंतु, त्यांनी लोकशाहीमधील अतिराजकीयीकरण वगळलेले होते. 

महात्मा गांधींनी पाश्‍चिमात्य लोकशाही म्हणजे सत्तेची स्पर्धा अशी व्याख्या केली होती. गांधींनी ही सत्तेची स्पर्धात्मक संकल्पना वगळून कमीतकमी सत्ता आणि जास्तीत जास्त लोकसेवा अशी कल्पना मांडली होती. गांधींच्या मते, लोकशाहीत दुर्बलांनाही जास्तीतजास्त संधी असली पाहिजे. गांधींनी यासाठी लोक ही संकल्पना स्वतःच्या हितसंबंधांचे ज्ञान असणे या अर्थाने वापरली होती. तसेच लोकांनी स्वतःच्या हितसंबंधांसाठी लढले पाहिजे. असेही तत्त्व मांडले होते. गांधींनी स्वतःच्या हितसंबंधांचे ज्ञान असणारे लोक हे लोकप्रतिनिधी असतील आणि तेच राष्ट्रीय जीवन नियंत्रित करतील. ही सत्तेची संकल्पना आजच्या निवडणुकीय लोकशाहीतून बाजूला गेली आहे. सत्तेचा वाटा सर्वांना मिळत नाही. तोवर लोकशाही अशक्य गोष्ट आहे, अशी गांधीजींची धारणा होती. ही राजकारणाची संकल्पना म्हणजे पाश्‍चिमात्य लोकशाहीला पर्याय देण्याचा विचार होता. पाश्‍चिमात्य लोकशाहीच्या मूल्यमापनाच्या आधारे गांधींनी पर्यायी लोकशाहीची संकल्पना विकसित केली होती. परंतु, पर्यायी आणि शाश्‍वत विकासापेक्षा निवडून येणे जास्त महत्त्वाचे मानण्याची प्रथा गांधी उत्तर काळात निर्माण झाली. ही प्रथा म्हणजेच हळूहळू राजकीय चंगळवादाचा उदय व विकास होय. 

नव्वदीच्या दशकानंतर राजकीय चंगळवाद खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. यातूनच राजकीय पक्ष, राजकीय नेते, राजकीय संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, सामाजिक प्रश्‍न, आर्थिक प्रश्‍न इत्यादींचे अतिराजकीयीकरण घडून आले. अतिराजकीयीकरणामुळे संघटना, नेतृत्व, विचार आणि प्रश्‍न यांचे संबंध शाश्‍वत विकास आणि पर्यायी विकास यापासून वेगळे होत गेले. त्यामुळेच शाश्‍वत विकास आणि पर्यायी विकास या संकल्पनांच्या संदर्भात राजकारण म्हणजे राजकारणच नव्हे अशी भूमिका वेळोवेळी राजकीय पक्षांनी घेतली. तसेच राजकीय पक्षांनी त्यांचा विचार आणि त्यांनी उठवलेले प्रश्‍न हे अतिभावनिक स्वरूपाचे मांडले. यातूनच राजकारण आणि प्रश्‍न यांची ताटातूट झाली. राजकीय नेतृत्व हे राजकीय न राहता ते अतिराजकीयीकरण करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले. अशा नेतृत्वाने अतिराजकीयीकरण करण्यासाठी डावपेच म्हणजे राजकारण, अशी राजकारणाची व्याख्या केली. यामुळे अतिरंजित दावे करण्याची प्रथा ही महाराष्ट्रात उदयास आली. यातूनच अतिआत्मविश्‍वासदेखील व्यक्त होऊ लागला. तसेच अतिनाट्यमय घडामोडी घडू लागल्या. अशा काही निवडक घडामोडी राजकारण म्हणजे अतिराजकीयीकरण होय, असे सुचीत करतात. एक, महाभरती ही संकल्पना अतिराजकीयीकरणवाचक आहे. या संकल्पनेमधून पक्षांतर करणारे लोक हे सत्तेच्या चंगळवादाचे पुरस्कर्ते दिसतात. पक्षांतराची प्रेरणा देणारे घटकदेखील राजकीय चंगळवादाची जाण असणारे दिसतात. पक्षांतर करणारे नेते केवळ सत्ताकांक्षी आहेत असे नव्हे, तर पक्षांतर करणारे नेते हे सत्तेच्या संदर्भात चंगळवादी आहेत. त्यांना सत्ता चंगळ म्हणून अपेक्षित आहे. म्हणजेच सत्ता ही सेवा म्हणून अपेक्षित नाही. दोन, अतिनाट्यमय दावा करणारे पक्षदेखील अतिराजकीयीकरण घडविणारेच आहेत. महादेव जानकरांचा ‘रासप’ हा पक्ष आहे. त्यांनी भाजपकडे विधानसभेच्या ५७ जागांची मागणी केली आहे. तसेच त्यांनी त्यासाठी पुरावा म्हणून जिल्हा परिषदेचे ९८ सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपनगराध्यक्ष आणि २ आमदार ही पक्षाची ताकद आहे, अशी भूमिका मांडली आहे. तीन, बहुजन वंचित आघाडीने काँग्रेसला आम्ही ४४ विधानसभेच्या जागा सोडतो, अशी सुरुवातीला भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला विधानसभेच्या १४४ जागा सोडतो अशी भूमिका मांडली. या गोष्टीमध्ये काँग्रेस पक्षाचे राजकीय सत्तेच्या चंगळवादाचे धोरण काँग्रेसवरतीच कसे उलटले हे दिसते. चार, महादेव जानकरांनी भाजपची काँग्रेस होईल, अशी भूमिका मांडली. तो आशय जर आपण चंगळवादाच्या पद्धतीने तपासला, तर भाजप हा पक्षदेखील सत्तेच्या चंगळवादाचे तत्त्वज्ञान व्यवहारात स्वीकारतो असे दिसते. यामुळे एकूण ही प्रक्रिया छोट्या आणि मोठ्या पक्षांमध्ये घडते असे दिसते. थोडक्यात, अतिराजकीयीकरण म्हणजे राजकारण नव्हे. ही प्रक्रिया राजकारण घडविण्याचे एक साधन आहे. ही प्रक्रिया मूल्यात्मक राजकारणाला विरोध करते. मूल्यात्मक राजकारण लोकशाही चौकटीतून हद्दपार करते असे दिसते.

संबंधित बातम्या