पक्ष, मतदारांना जोडणारे पूल

प्रकाश पवार
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

राज-रंग
 

नदी किंवा रस्त्यावर पूल असतात. तसेच पक्ष आणि मतदारांची सांधेजोड करणारे राजकीय पूल असतात. राजकीय पुलांची संकल्पना म्हणजे निवडणूक विषयक राजकारणाची दूरदृष्टी असे मानले जाते. पन्नासच्या दशकापासून राजकीय पूल ही संकल्पना पक्ष आणि मतदार यांना जोडण्यासाठी उपयोगात आणली गेली. राजकीय दळणवळणासाठी पक्षांकडून पुलांची बांधणी केली जाते. तसेच जुन्या पुलांची मोडतोड केली जाते. नव्या राजकीय पुलांचे बांधकाम आणि जुन्या राजकीय पुलांची मोडतोड ही महाराष्ट्रातील सध्याची सर्वांत मोठी घडामोड आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच राजकारणात आर्थिक व पक्षांतराच्या मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ही प्रक्रिया म्हणजे दोन्ही काँग्रेस आणि मतदार यांची दळणवळणाचे पूल जवळपास मोडण्याच्या घटना आहेत. काँग्रेस पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विघटन झाले. म्हणजे मतदार आणि पक्ष यांच्यातील दळणवळण कमी झाले. भाजप-शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस पक्षांखेरीजच्या पक्षामध्ये धरसोड दिसते. म्हणजे त्यांचे मतदार संवादाचे पूल मोडले गेले. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वासाठी नवीन राजकीय पुलांच्या संकल्पना मांडल्या गेल्या. त्यांची नवी संरचना उभी केली. त्या संरचनेला भाजपसाठी काम करण्याची कार्यपद्धती दिली गेली. नवीन राजकीय पुलांच्या संकल्पनांमुळे दोन्ही काँग्रेसकडील राजकीय अवकाश भाजपकडे सरकला. या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्रचना करणाऱ्या आहेत. भाजप आणि मतदार यांना जोडणाऱ्या विविध नवीन पुलांची बांधकामे केली गेली. भाजपेतर पक्ष आणि मतदार यांना जोडणारे जुने पूल कमकुवत झाले. काही पूल मोडले, तर काही जुने पूल कुजले. त्यामुळे भाजपेतर पक्ष आणि मतदार यांच्यातील दळणवळण कमी झाले. ही प्रक्रिया सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान अशा विविध राजकीय पुलांच्या मदतीने घडली आहे. भाजपने पक्ष आणि मतदारांच्या दरम्यान संवादाचे बांधलेले महत्त्वाचे पूल चित्तवेधक आहेत. त्यांची ही साकलिक कथा आहे.  

आर्थिक पुलांची डागडुजी
 आर्थिक क्षेत्राच्या मदतीने राजकीय पुलांच्या संकल्पना प्रत्यक्ष राजकारणात काम करतात. महाराष्ट्रातील सहकार हा राजकारणाचा एक बालेकिल्ला होता. सहकार हा दोन्ही काँग्रेस व मतदार यांच्यातील राजकीय दळणवळणाची रक्तवाहिनी होती. परंतु, सहकार या पुलावर अडथळे निर्माण झाले. यातून दोन्ही काँग्रेस आणि मतदार यांच्यातील संवादाची नाकेबंदी झाली. गेल्या पाच वर्षांत सहकार क्षेत्रातील नाकेबंदी वाढत गेली. त्यामुळे मतदार वर्ग दोन्ही काँग्रेसपासून दूर सरकला. दोन्ही काँग्रेस आणि मतदार यांच्यातील मध्यस्थ वर्ग म्हणजे सहकार क्षेत्रातील नेते आहेत. त्यांनी सहकाराचा पूल नव्याने सुरू करण्यासाठी खटपट सुरू केली. आर्थिक पुलाची डागडुजी करताना सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मतदार आणि भाजप यांच्या दरम्यान संवादांचे नवीन पूल बांधले. या नवीन पुलांच्या बांधकामामुळे दोन्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर घडून आले. भाजपनेदेखील पुढाकार घेऊन नेते आणि त्यांचे मतदार यांच्यातील नाकेबंदी उठविण्यासाठी आर्थिक मदत केली. भाजपने राष्ट्रीय सहकार विकास निगमाकडून चार सहकारी कारखान्यासाठी ३१० कोटी कर्ज मंजुरीला मान्यता दिली. धनंजय महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना आहे. त्यास ८५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. कल्याण काळे यांच्या साखर कारखान्याला ७५ कोटींचे कर्ज मंजूर केले. कोरेंच्या कारखान्याला १०० कोटींचे कर्ज मंजूर केले. वैद्यनाथ साखर कारखान्यालाही कर्ज मंजूर केले. या तपशिलाचा अर्थ म्हणजे मतदार आणि नेते यांच्यामधील राजकीय दळणवळण भाजपने पुन्हा सुरू केले. त्यामुळे मतदार आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांना एकमेकांशी भाजपने जोडले. त्यांना भाजपसाठी राजकीय कृती करण्यासाठी उद्युक्त केले. जुनी कृतीसज्जता दोन्ही काँग्रेस पक्षांनी घडवली होती. ती मात्र बंद पडली. यास मान्यता सहकार क्षेत्राशी संबंधीत नेते आणि सहकार क्षेत्राशी संबंधीत कामगार-शेतकरी वर्गांची मिळालेली दिसते. आर्थिक कोंडी ही राजकारणाला नवीन वळण देते. या सूत्रानुसार महाराष्ट्रात आर्थिक कोंडी झाली होती. ती कोंडी सहकार क्षेत्रातील नेत्यांनी पुढाकार घेऊन सोडवली. त्यामुळे भाजप आणि मतदार यांच्यातील महामार्ग खुला झाला. भाजपसाठी काम करण्यास सहकार क्षेत्र उद्युक्त झाले. म्हणून ही नवीन कृतीसज्जता आहे. 

नव्या सामाजिक पुलांची संकल्पना
 बहुजन ही एक संकल्पना राजकारणात सामाजिक पूल म्हणून दोन्ही काँग्रेस आणि मतदार यांच्यात काम करत होती. परंतु, बहुजन संकल्पनेचा सेतू हळूहळू ढासळत गेला. त्यामुळे जाती सुट्यासुट्या झाल्या. जाती-जातींमध्ये संवाद राहिला नाही. जात संस्था ही बहुजन या पुलामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त जातींना जोडण्याचे काम करत होती. जातसंस्था बहुजन या पुलाच्या अभावामुळे निवडणूक क्षेत्रात पराभूत ठरू लागली. अशी सुटी-सुटी जात-व्यवस्था दोन्ही काँग्रेस पक्षांच्या विरोधात गेली. पक्ष आणि मतदार यांना जोडण्याचे आधुनिक राजकीय काम जात करत नव्हती. त्यामुळे बहुजन जातीमधील वादविवाद टोकदार झाले. भाजपने या पार्श्‍वभूमीवर जातीपेक्षा वेगळी आणि बहुजन संकल्पनेपेक्षा वेगळी संकल्पना विकसित केली. जातीच्या ऐवजी वर्णव्यवस्था आणि आधुनिक राजकारण यांची सांधेजोड भाजपने केली. तसेच बहुजन या संकल्पनेऐवजी समरसता या संकल्पनेचा पूल मतदार आणि राजकीय पक्ष यांच्या दरम्यान बांधला. जवळपास सर्व बहुजन समाजाला क्षत्रिय म्हणून मान्यता भाजपने दिली. त्यामुळे बहुजन हा पूल निकामी झाला. त्याऐवजी क्षत्रिय हा पूल राजकीय दळणवळणासाठी मोकळा केला गेला. यामुळे जाती-जातीमधील राजकारणाचे तणाव विरघळले. त्या जातिवादी राजकारणाची चौकट राजकारणातून हद्दपार झाली. त्या जागी वर्ण आणि समरसता या चौकटीमध्ये राजकारण घडवले गेले. यामुळे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजाची दोन्ही घराणी भाजपमध्ये गेली. मतदार आणि दोन्ही राजघराणी यांच्या दरम्यानचा नवीन पूल भाजपने बांधला. त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडील राजघराणी आणि मतदार यांच्यातील दळणवळणाची नाकेबंदी झाली. समरसता या संकल्पनेमुळे ओबीसी, दलित, आदिवासी नेते आणि मतदार यांच्यात नवीन राजकीय दळणवळणाची यंत्रणा उभी राहिली. थोडक्यात नवीन संकल्पनांचा उपयोग भाजपने केला. त्यामुळे जुनी जात संघटना लक्षी मतदार आणि नेते यांच्यातील यंत्रणा मोडली. त्या जागी नवीन यंत्रणा उभी राहिली. यामुळे एकूण पक्षांतर करण्याचे प्रमाण वाढले असे दिसते. 
 सरंजामशाही पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात कोंडी केली आहे. काँग्रेस परिवारातील पक्ष हे सरंजामशाहीचे बालेकिल्ले झाले होते. सरंजामशाही यंत्रणा ही मतदार आणि दोन्ही काँग्रेस यांच्यातील संवादाची नाकेबंदी करत होती. रिअल इस्टेट, नोकरी, सहकार, शिक्षण, राजकारण, धर्मकारण, अशा नानाविध क्षेत्रात सरंजामी मूल्यव्यवस्था काम करते. यामुळे सरंजामशाही मूल्य व्यवस्थेला नवीन मध्यमवर्गाचा विरोध झाला. शहरी आणि निमशहरी भागातील मासेस आणि अभिजन यांच्यामध्ये सरंजामशाहीने नाकेबंदी केली. या क्षेत्रातील नगरसेवक, राजकीय अभिजन आणि मतदार यांचे नातेसंबंध शत्रुभावी झाले होते. हा क्षेत्रातील जुनी यंत्रणा भाजपने मोडली. त्या जागी भाजपने नवीन यंत्रणा उभी केली. यामुळे सरंजामशाही पुढील समस्या भाजपने सोडवली. संरजामदार भाजपचे समर्थक झाले. तसेच संरजमादारांना भाजपने वाकवले. याबद्दल मतदारांमध्ये समाधान दिसू लागले आहे.             

थोडक्यात संरजामदार आणि मतदार या दोन्ही यंत्रणांच्या संदर्भांत भाजपने नवीन पूल बांधले. शहरी-निमशहरी भागात सरंजामदार रिअल इस्टेटचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्यात शत्रुभावी संबंध निर्माण झाले होते. या संबंधांची पुनर्रचना भाजपने केली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन संकल्पना आल्या होत्या. परंतु, शैक्षणिक संस्था त्या संकल्पना स्वीकारत नव्हत्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील युवा मतदार दोन्ही काँग्रेसशी संवादी राहिला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर मराठी शाळा बंद पडत होत्या. सामाजिक शास्त्रे, अभियांत्रिकी, शिक्षण शास्त्र, डी.एड, बी.एड्‌. अशा क्षेत्रात कोंडी झाली होती. या पाश्‍वभूमीवर नवीन पर्याय शोधले गेले नाहीत. पण किरकोळ डागडुजी मात्र केली गेली. महाराष्ट्र बोर्डाखेरीज नवीन बोर्डाची स्थापना केली. जुन्या विश्‍वकोशाचे डिजिटल विश्‍वकोशात रूपांतर केले गेले. त्यामुळे डिजिटल समाज आणि भाजप यांना जोडणारा नवीन पूल तयार झाला. या नवीन पुलामुळे डिजिटल समाज, बुद्धिजीवी वर्ग, सोशल मीडिया हे घटक भाजपशी संवाद करू लागले. भाजपने आजच्या काळातील समाजाची संकल्पना समजून घेतली. भाजपेतर पक्ष मात्र समाज समजून घेण्यात मागे राहिले. त्यामुळे नवीन समाजातील मतदार हा भाजपेतर पक्षावर केवळ नाराज नव्हता, तर तो भाजपेतर पक्षांशी संवादाची खिडकीही खुली करत नव्हता. यामुळे डिजिटल समाजाला भाजपेतर पक्षांमध्ये त्यांचे हितसंबंध दिसत नव्हते. यामुळे सोशल मीडियावर अतिशय कृतिशील असलेले गट व व्यक्ती भाजप समर्थक झाल्या. यामुळे एकूण नवीन डिजिटल समाजव्यवस्था आणि जुनी सरंजामी नेते यांच्यामध्ये अंतर पडत गेले. जुन्या सरंजामी नेतृत्वाला त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी डिजिटल समाजाशी जुळवून घ्यावे लागले. परंतु, सरंजामी समाजाला डिजिटल समाजाने थेट भाजपशी जोडले. त्यामुळे डिजिटल समाजातील कृतिशील गटांच्या सल्लामसलतीखाली सरंजामदार राजकारण करू लागले.            

राजकारणातील सरंजामदारांची स्वायतत्ता संपुष्टात आली. यामुळे एकूण बहुजन समाजाची नवीन घडी सामाजिक समरसता समाज अशी घातली गेली. जुन्या धाटणीचा बहुजन समाज हा राजकीय क्षेत्रात कुचकामी ठरला. या फेरबदलामुळे महाराष्ट्रात भाजपेतर पक्षांमध्ये सैरभरता आली. भाजप मात्र निश्‍चित आणि ठाम निर्णय घेऊ लागला. म्हणजेच काँग्रेस पक्षाची साठीच्या दशकाची जागा भाजपने मिळवली. त्यांची मुळे नवीन समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात.    

संबंधित बातम्या