सत्तास्थापनेतील उलथापालथ

प्रकाश पवार
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राज-रंग
 

महाराष्ट्राच्या राजकारणाची सत्तास्थापन व सत्तावाटप ही लक्षणे आहेत. खरे राजकारण तर वेगळेच आहे. त्या राजकारणाकडे या लक्षणाच्या आधारे जाता येते. ते राजकारण अर्थांतच दिल्ली विरोधी महाराष्ट्र असे प्रतीकात्मक आहे. परंतु, हितसंबंधाच्या संदर्भांत चव्हाण-पवार प्रारूप विरोधी फडणवीस प्रारूप असा खरा वादविषय आहे. तरीही सत्तावाटपाची प्रक्रिया साधीसुधी नसते. सत्तावाटप महायुद्धापेक्षा जास्त अवघड असते. या घडामोडीचा अनुभव महाराष्ट्रास नव्याने मिळाला. कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊन जवळपास एक महिना झाला. मात्र, सरकार स्थापन झाले नाही. सत्तास्थापनेचा गुंता कमी होण्याच्या ऐवजी वाढतोय, असे दोन प्रारूपांमधील हितसंबंधाच्या संघर्षामुळे दिसते. सरकार किंवा सत्तास्थापनेचा जनादेश जनतेने भाजप-शिवसेना महायुतीस दिला, ही वस्तुस्थिती काळ्या दगडावरील रेष होती. परंतु, जनादेश आणि सत्तावाटप या दोन गोष्टी वेगवेगळ्या भाजप-शिवसेना महायुतीने केल्या. पक्षांमधील सत्तावाटपाच्या भोवती एक महिनाभर महाराष्ट्राचे राजकारण घडले. सत्तावाटपाचे राजकारण नाट्यमय पद्धतीने वेगवेगळी वळणे घेऊ लागले. या सत्तावाटपाच्या नाट्यमय राजकारणाला इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अतिनाट्यमय स्वरूप दिले. एक तर सत्ता हा जनतेसाठी विरोधाचा विषय असतो. त्यामध्ये सत्तावाटपाच्या अतिनाट्यमय घडामोडीने जास्तीची भर घातली. नेते, पक्ष, सत्ता यांच्याबद्दल एकूण नकारात्मक राजकीय चर्चा गेला महिनाभर मध्यम वर्ग व नवमध्यम वर्ग करू लागला. म्हणजेच महायुतीस सुस्पष्ट जनादेश ते सत्ताकांक्षी पक्ष अशी दोन परस्पर विरोधी टोकांची राजकीय चर्चा झाली. सत्तास्थापनेस वेळ लागला. या पार्श्‍वभूमीवर जनादेशाचा नेमका अर्थ कोणता आहे, राजकीय पक्षांना सत्ताकांक्षेची इतकी अतिनाट्यमय संधी कशी मिळाली, या प्रक्रियेतून नवीन कोणते प्रारूप घडते आहे, यांचा वेध घेणे उचित ठरेल.

जनादेश
भाजप-शिवसेना महायुतीस सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला. ही वस्तुस्थिती शरद पवारांनी निवडणूक निकालाच्या दिवशी स्वीकारली. त्या दिवसापासून त्यांनी महाआघाडीला जनादेश विरोधी पक्षाची कामगिरी करणारा मिळाला आहे अशी भूमिका घेतली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ही वस्तुस्थिती अशी स्वीकारली नाही. त्यांनी सत्तास्थापना (महायुती) आणि विरोधी पक्ष (महाआघाडी) या जनादेशाचे विच्छेदन केले. यामुळे जनादेशाचे विविध अर्थ पुढे आले. भाजपच्या जागा कमी झाल्या. भाजपला सुस्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपने बहुमताचा दावा केला होता. तो दावा यशस्वी झाला नाही. यामुळे भाजप विरोधी जनादेश हा एक आवाज सुरू झाला. भाजपमध्ये दोन गट आहेत. देवेंद्र फडणवीस विरोधी गटाने भाजप विरोधी जनादेश अशी चर्चा सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये पेरली. माध्यमांमध्ये भाजप समर्थक व फडणवीस विरोधक असा नवीन वादविवाद सुरू झाला. या वादविवादाने भाजपमधील गटबाजी पुढे आणली. गटबाजीचा भाजपला सर्वांत मोठा फटका बसला. कारण गटबाजीने भाजप विरोधी जनादेश हे सूत्र विकसित केले. अमित शहांचा युतीस विरोध होता. तर फडणवीसांनी युती केली. असा नवीन वाद गटांनी उभा केला. तसेच निष्ठावंत फडणवीस (दिल्ली निष्ठा) व बिगर-निष्ठावंत अशी चर्चा सुरू झाली. बिगर-निष्ठावंताना खलनायक म्हणून प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे भाजपची जवळपास निम्मी ताकद फडणवीस विरोधी काम करू लागली. यामुळे भाजपच्या धारदार विरोधात नसलेला जनादेश भाजप विरोधी म्हणून लोकांमध्ये पोचला. हा तो जनादेशाच्या अर्थाचा अनर्थ ठरला. ही महत्त्वाची कामगिरी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची ठरली. भाजप आणि शिवसेना यांना संयुक्त जनादेश मिळालेला होता. परंतु, या जनादेशाचा संबंध या दोन्ही पक्षांनी सत्तावाटपाशी जोडला. सत्तेच्या केंद्रीकरणाचे प्रारूप भाजपमध्ये उदयास आले. त्यामुळे सत्ता दिल्लीमध्ये राहील, यास अग्रक्रम दिला गेला. सत्तेचे युतीमध्ये विकेंद्रीकरण करण्यास विरोध झाला. सत्ता भाजपच्या बाहेर व त्यातही भाजपतील निष्ठावंत गटाच्या बाहेर जाऊ नये अशी ताठर भूमिका घेतली गेली. त्यामुळे शिवसेनेची सत्ताकांक्षी अशी प्रतिमा उभी राहिली. परंतु, शिवसेना पक्ष बाळबोध पक्ष नव्हता. शिवसेना पक्षाने त्यांची सत्ताकांक्षेची प्रतिमा पुढे येऊ दिली नाही. म्हणून बाळासाहेबांना दिलेले वचन, निवडणूकपूर्व वाटाघाटी यावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले. यास पाठिंबा फडणवीस विरोधी गटाचा मूक मिळाला. जागा वाटपाचे सूत्र व भाजप-शिवसेना युती अंतर्गत बंडखोरी-पाडापाडी यामुळे शिवसेनेच्या तुलनेत भाजप विरोधी चर्चा उभी राहिली. यांचा थेट फायदा शिवसेनेने उठवला. शिवसेनेच्या तुलनेत भाजप हा पक्ष सत्ताकांक्षी आणि सत्तेचे केंद्रीकरण करतो, अशी प्रतिमा गेल्या महिन्यात शिवसेनेने पुढे आणली. थोडक्यात सत्तास्थापनेचा जनादेश हा पक्षीय व गटांच्या पातळीवर विभागला गेला. त्यामुळे एकसंध अर्थ भाजप-शिवसेना महायुतीस ओळखता आला नाही. 

विरोधी पक्षाचा जनादेश
महाआघाडीस विरोधी पक्ष म्हणून जनतेने सहमती दिली. महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान तर स्वच्छपणे विरोधी पक्ष म्हणून उदयास आले. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागांमध्ये वाढ झाली. शरद पवारांच्या नेतृत्वाला दिव्यवलय प्राप्त झाले. यामुळे शरद पवारांची प्रतिमा राष्ट्रीय नेते याखेरीज महानेते अशी पुढे आली. शरद पवार महानायक म्हणून लोकांनी स्वीकारले. मराठी पत्रकारांनी त्यांची ही प्रतिमा विकसित केली. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यापुढे पेचप्रसंग उभा राहिला. शरद पवारांचे नेमके स्थान कोणते असावे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना नाखुशीने शरद पवारांची प्रतिमा महानायक म्हणून स्वीकारावी लागली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये धरसोड आणि परस्पर विरोधी भूमिका सतत दिसते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवारांचा महानायक व खलनायक असा दुतोंडी चेहरा पुढे आणला. त्यामुळे शरद पवार अशा कृत्रिम प्रतिमेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे त्यांची महानायक व खलनायक अशी कृत्रिम प्रतिमा रंगवत आहेत. शिवसेना पक्षाने भाजपशी व भाजपने शिवसेनेशी सत्तावाटपाच्या प्रश्‍नावर जुळवून घेण्यास नकार दिला. यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये अंतर पडले. यामुळे सत्तास्थापनेच्या नवीन प्रयोगाने तोंड वरती काढले. यामुळे शरद पवारांची नवीन भूमिका सत्तास्थापनेच्या संदर्भात पुढे आली. सत्तास्थापनेबरोबरच नवीन प्रश्‍न पुढे आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी पक्षाचा जनादेश आणि सत्तास्थापना अशी परस्पर विरोधी प्रतिमा विकास पावली. जनादेशाचा आदर करण्याची भूमिका शरद पवारांची सुरुवातीपासून राहिली. परंतु, तरीही त्यांना जनतेला सरकार देण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या पेचप्रसंगाचा लाभ शरद पवार विरोधकांनी उठविण्यास सुरुवात केली. कारण शरद पवार हेच महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र झाले. शरद पवारांच्या भोवती सत्तास्थापनेचे केंद्र फिरू लागले. म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवारांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि शरद पवार यांच्यामध्ये लव्ह-हेट असे संबंध पुन्हा दिसू लागले. शरद पवारांनी विरोधी पक्षाच्या जनादेशाचा पुन्हा पुन्हा दावा केला, तेव्हा तेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांना शरद पवार शिवसेनेला दगा देणार असे वाटू लागले. शरद पवारांनी विरोधी पक्षाचा जनादेश आणि महाशिवआघाडीची चर्चा अशी दुहेरी भूमिका का घेतली हा यक्षप्रश्‍न वाटतो. याची मुख्य कारणे तीन आहेत. एक, भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारलेले नाही. शिवाय भाजपला फडणवीसांनी नवीन आधार मिळवून दिले आहेत. दोन, शिवसेना पक्ष सत्तावाटपाची सौदेबाजी करतो की नवीन आघाडी करतो याबद्दल अस्पष्टता बरेच दिवस होती. तीन, शिवसेना पक्षाबरोबर समझोता ही नवीन घडामोड आहे. त्यामुळे अशा नवीन आघाडीबद्दल शरद पवार फार काळजीपूर्वक निर्णय घेत आहेत. नवीन आघाडी घडविण्यास त्यामुळे वेळ जात आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्याबद्दलचा तपशील जाहीर करण्यात जास्त रस आहे. यामुळे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात गंभीर बदल राजकीय पक्ष करत आहेत. त्यांची बातमी मात्र नकारात्मक स्वरूपात प्रसारित होते. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे हसू झाले. 

महाशिवआघाडीचे वैचारिक आधार 
शिवसेना पक्षाने जवळपास भाजपपासून काडीमोड घेतली. यामुळे नवीन आघाडी ही महाशिवआघाडी अशी जन्मास येत आहे. ही प्रक्रिया सोपी आणि थेट कृतीची निश्‍चित नाही. कारण शिवसेना पक्षाची वैचारिक भूमिका हिंदुत्ववादी आहे. तर काँग्रेस पक्षाची वैचारिक भूमिका धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारी आहे. शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांना जोडणारा दुवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या तीन पक्षांमध्ये वैचारिक मतभिन्नता आहेत. तरीदेखील नवीन आघाडी कशी तयार होते. शिवाय ही आघाडी किती दिवस स्थिर सरकार देईल असे महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. नवीन आघाडी का आणि नवीन आघाडी स्थिर सरकार देईल का या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शोधत आहे. म्हणून नवीन आघाडीचे सरकार स्थापन करण्यास विलंब झाला. नवीन आघाडी का यांचे उत्तर भाजप विरोध हे एक आहे. भाजप हा शक्तिशाली पक्ष आहे. त्याचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर झाला आहे. हा पक्ष प्रादेशिक पक्षांचा व काँग्रेसचा अवकाश कमी करत चालला आहे. या कारणाने भाजप हा काँग्रेस व प्रादेशिक पक्षांचा समान शत्रू आहे. निवडणूकपूर्व काळात जरी शिवसेनेची भाजपबरोबर युती होती, तरी भाजपने विस्तारवादी धोरण राबविले होते. यामुळे शिवसेना भाजपचे नाते परस्परांशी प्रतिस्पर्धी म्हणून विकसित झाले, याचे आत्मभान शिवसेनेला आले आहे. म्हणून शिवसेना भाजप विरोधात गेली. सत्तावाटपापेक्षा पक्षाचे अस्तित्व हा शिवसेनेपुढील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. हाच मुद्दा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसतो. थोडक्यात भाजप विरोध आणि पक्षाचे अस्तित्व या मुद्यांवर आधारित सत्तास्थापनेची चर्चा सुरू झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वैचारिक मतभिन्नता गेल्या पाच वर्षांपासून कमी कमी होऊन त्यांचे प्रदेशवाद विरोधी भाजप या मुद्यांवर एकमत घडत आहे. तसेच ही निवडणूक काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवरून न लढविता मतदारसंघाच्या पातळीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य या मुद्यांवर लढविली. यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वैचारिक मतभिन्नता कमी झाली. परंतु, या सर्व फेरबदलांना समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या नियम आणि अटींची गरज आहे. म्हणून सरकार स्थापन करण्यापूर्वी समान कार्यक्रम या मुद्यावरती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भर देत आहे. पाच वर्ष स्थिर सरकार देण्यासाठी समान कार्यक्रम आधार ठरू शकतो याचे आत्मभान दोन्ही काँग्रेसला आहे, असे दोन्ही काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांमधून दिसते. नवीन सरकार तीन पक्षांचे स्थापन होणार असले, तरी त्या तीन पैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणूकपूर्व आघाडी केली होती. त्याच्या अंतर्गत समझोता घडण्यास शिवसेनेपेक्षा जास्त महत्त्व आहे. तसेच महाआघाडीमधील मित्र पक्ष हादेखील महत्त्वाचा मुद्दा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने आहे. कारण पुन्हा शिवसेना वेगळी झाली, तर ताकदवान भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला छोट्या छोट्या पक्षांची गरज महत्त्वाची वाटते. यामुळे ही सत्ता स्थापनेच्या आघाडीची ही प्रक्रिया वरवर दिरंगाईची वाटते, पण अंतर्गतपणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील हा एक मैलाचा दगड आहे. कारण काँग्रेस विरोधात सर्व अशी राजकीय प्रक्रिया घडत होती. त्याजागी भाजप विरोधात इतर सर्व अशी घडू लागली आहे. या कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अँटी काँग्रेसवादाच्या जागी अँटी भाजपवाद अशी विचारसरणी व डावपेच महत्त्वाचे ठरत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये प्रादेशिक समतोल आहे. कारण दोन्ही काँग्रेस पक्षांचे सामाजिक आधार ग्रामीण मतदारसंघ आहेत. तर शिवसेना पक्षाचे आधार शहरी-निमशहरी मतदारसंघ आहेत. शिवसेनेचे राजकीय अर्थकारण शहरी व सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. तर दोन्ही काँग्रेसचे राजकीय अर्थकारण ग्रामीण व कृषी-औद्योगिक या स्वरूपाचे आहे. यामुळे हितसंबंधाच्या संदर्भांत महाशिवआघाडीत मोठे पेचप्रसंग नाहीत. उलट या सर्वच क्षेत्रात भाजप व इतर पक्ष अशी हितसंबंधाची आणि सामाजिक आधारांची स्पर्धा आहे. ही गोष्ट आकलन म्हणून चित्तवेधक आहे. परंतु, प्रत्यक्षात ही प्रक्रिया घडवणे खुपच अवघड काम आहे. यामुळे दिल्लीतील काँग्रेस पक्ष अतिमंद गतीने पुढे सरकत आहे. त्यांच्याशी जुळवून घेऊन शरद पवार सत्तास्थापनेचा प्रयत्न करत आहेत. ही सर्व प्रक्रिया अतिमंद तर राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी अतिउतावळी दिसते. याबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी नायक व खलनायक असे अर्थ लावले आहेत. मध्यम वर्ग व नवमध्यम वर्ग यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे अर्थ योग्य वाटत आहेत. परंतु, एकूण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा फेरबदल आहे, याचे आत्मभान राहिलेले नाही. मात्र, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील संरचनात्मक आणि मूल्यात्मक पुनर्जुळणी सुरू आहे. दिल्ली विरोध हा विचार भाजप विरोध म्हणून कृतिशील झाला आहे. या चौकटीत महाराष्ट्राचे भविष्यातील राजकारण घडविण्याचा हा दूरगामी प्रयत्न शरद पवार, सोनिया गांधी यांचा दिसतो. हा प्रयत्न तात्पुरती घडामोड ठरू नये, असे त्यांचे प्रयत्न आहेत. कारण फडणवीस प्रारूप राज्यात प्रभावी ठरले आहे. फडणवीस प्रारूपाचा विचार, रणनीती, डावपेच यशवंतराव चव्हाण प्रारूपाच्या बरोबर उलटे आहेत. शरद पवारांना या गोष्टीचे पुरेपूर आकलन आहे. चव्हाण प्रारूप आणि फडणवीस प्रारूप यांच्यातील हा संघर्ष सुरू आहे. फडणवीस प्रारूपाला नवमहाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे त्यांना तडजोड नको आहे. तर शरद पवारांना राज्याचे राजकारण जिल्ह्याच्या हितसंबंधाच्या चौकटीत घडवायचे आहे. म्हणून सत्तास्थापना हा दुय्यम प्रश्‍न आहे. खरा प्रश्‍न राजकारण कोणत्या चौकटीत घडावे हा आहे. म्हणून शरद पवार भाजपला आणि मोदी-शहा-फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देत आहेत. ही राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रासाठी नवीन आहे. कारण शरद पवार आणि मोदी-शहा-फडणवीस यांची राजकारणाची पद्धती अजूनही बुद्धिजीवी वर्गाने समजून घेतलेली नाही. केवळ पवार समर्थक किंवा भाजप समर्थक अशी वरवरची चर्चा केली जाते. त्यामुळे सध्याचे राजकारण नाट्यमय, अतिनाट्यमय, सत्ताकांक्षी वाटते. या भावुक परिस्थितीच्याबाहेर जाऊन महाराष्ट्राचे राजकारण निवडणुकीनंतर समजून घेतले गेले नाही. परंतु, या दोन्ही चौकटीच्या संदर्भांत राजकारणाचा अर्थ लावला तर ही वरवरची सत्तावाटपाची लाट नाही, तर आतून मोठी उलथापालथ घडते. तिचे वरवरचे सत्तावाटप हे लक्षण आहे. 

संबंधित बातम्या