विद्या बाळ यांचा समतेचा लढा

प्रकाश पवार
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

राज-रंग
 

स्त्रीवाद हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा प्रवाह आहे. या प्रवाहाची विचारसरणीही बहुआयामी आहे. कारण भारतात मार्क्सवादी, समाजवादी, बहुजनवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, लोहियावादी असे नानाविध प्रकारचे स्त्रीवाद उदयास आले. स्त्रीवादी तत्वचिंतनाने समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था समजून घेऊन तिला आकार दिला. समाजात स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचे प्रयोग घेतले गेले. या कामात विद्या बाळ यांचे आयुष्य गेले. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी भारतीय संदर्भांत समाजवादी चौकटीमध्ये स्त्रीवादाची मांडणी केली. त्यांनी विचारांची मांडणी आणि प्रत्यक्ष कार्य अशा दोन्ही पातळ्यांवर काम केले. जे विचार मांडतात त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना सामाजिक काम करताना विचार मांडण्यासाठी वेळ मिळत नाही. अशी वस्तुस्थिती असते. परंतु, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सातत्याने विद्या बाळ यांनी केल्या. हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा वारसा आहे. त्यांनी सतत चळवळ आणि संकल्पना यांचा मेळ घातला. थोडक्यात त्यांनी समाजवादी स्त्रीवाद या चौकटीची लोकशाही पद्धतीने क्रांतिकारी पुनर्मांडणी केली. यामुळे त्या स्त्री या वंचित वर्गाच्या एक भारतीय नेत्यादेखील होत्या. त्यांची दृष्टी लोकशाही समतावादासाठी महत्त्वाची आहे. 

दुहेरी कामगिरी 
 विद्या बाळ यांनी विचारांची मांडणी केली. तसेच त्या विचारांवर आधारीत स्त्रीवादी चळवळ चालवली. त्यामुळे त्यांचे जीवन दुहेरी स्वरूपाचे होते. त्यांचा जन्म तिशीच्या दशकामध्ये झाला (१२ जानेवारी १९३७). भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अगदी शेवटच्या पर्वात त्यांची सुरुवातीची दहा वर्षांची वाढ झाली. स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. तो काळ त्यांनी अनुभवला होता. त्या दरम्यान हिंदू कोड बिलाची चर्चा ऐरणीवर आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरूंची स्त्रीच्या हक्काबद्दल निश्‍चित भूमिका होती. तेव्हाचा समाज स्त्री स्वातंत्र्य व समतेच्या विरोधी गेलेला होता. हा काळ त्यांच्या तरुणपणातील होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात नीटनेटकी झाली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्यांनी 'क्रिस्त्रीम' परिवारातील स्त्री मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणून वैचारिक काम सुरू केले (१९६४). तो काळ जागतिक पातळीवरती कल्याणकारी राज्यसंस्थेने माघार घेण्यास सुरुवात झालेला होता. त्याच वर्षी भारतात कल्याणकारी राज्यसंस्थेचे पुरस्कर्ते पंडित नेहरूंचे निधन झाले होते. थोडक्यात राज्यसंस्था समाजवादापासून बाजूला सरकत होती. हा राज्यसंस्थेचा अगदी सुरुवातीचा काळ होता. तेव्हा स्त्री प्रश्‍नावर निश्‍चित भूमिका विद्या बाळ यांनी घेतली. राज्यसंस्थेने पुढाकार घेऊन समाजव्यवस्थेत हस्तक्षेप करावा. राज्यसंस्थेने स्त्री-पुरुष समतेचा विचार गतिशील करावा, असा त्यांनी प्रयत्न केला. या बरोबर त्यांनी राज्यसंस्थेच्या खेरीज नागरी समाजात विविध संस्था आणि संघटनांना स्त्रीवादी विचार दिला. त्यांनी नागरी समाजात स्त्रीवाद पसरवला. यानंतर दहा वर्षांनी जागतिक पातळीवर स्त्री चळवळीची लाट आली. साठ-सत्तरीच्या दोन दशकांमध्ये आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस त्या स्त्री मासिकाच्या साहाय्यक संपादक होत्या. तो काळ धरसोडीचा होता. तसेच समाजवादाकडून, मध्यम मार्गी विचारांकडून पक्ष, संघटना, नेते, कार्यकर्ते हिंदुत्ववादाकडे वळण्यास सुरुवात झाली होती. एका अर्थाने वेगळ्या स्वरूपातील फॅसिझम वाढत होता. अशा फॅसिस्ट स्त्रीविषयक विचारांचा त्यांनी ठामपणे प्रतिवाद केला. बहुल समाजाऐवजी एकसंघ समाजाचा दावा पुढे आला होता. त्या काळात विद्या बाळ यांनी बहुल समाजाच्या संकल्पनेचे वैचारिक पातळीवर आणि कामातून समर्थन केले. मराठा महासंघ, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, हिंदू सेना अशा संघटनांनी महाराष्ट्रात नवहिंदुत्वाचा विचार स्वीकारला होता. यामुळे ऐंशीच्या दशकात स्त्री वर्गांत आक्रमकता आली होती. अशा संदर्भांत त्यांनी लोकशाही पद्धतीचा राजकीय प्रतिकारासाठी सनदशीर मार्ग स्वीकारला. हिंसक राजकीय मार्ग उदयास येत होते. संघटना त्या मार्गाचे समर्थन करत होत्या. तेव्हा त्यांनी ठाम-निश्‍चितपणे सनदशीर मार्गाचा पुरस्कार केला. नवहिंदुत्वामधून वाढणारा स्त्रीविरोधी विचार त्यांनी स्पष्टपणे नाकारला. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात खुली स्पर्धा सुरू झाली. तेव्हा त्यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये मिळून साऱ्याजणी हे मासिक सुरू केले. त्यांनी या मासिकाच्या संस्थापक संपादक म्हणून कार्य केले. आरंभीच्या वीस वर्षांतील लेखांचे 'स्त्रीमिती' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे (२०१२). त्यांनी आरंभीच्या दोन दशकांमध्ये स्त्रियांच्या न्यायासाठी आणि न्याय हक्कांसाठी विविध प्रयोग केले. त्यांचे प्रतिबिंब त्या पुस्तकांमध्ये उमटले आहे. ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी नारी समता मंच (१९८१) स्थापन केला. शहरी भागाबरोबर ग्रामीण महिलांमध्ये त्यांनी चळवळ सुरू केली. ग्रोइंग टुगेदर हा प्रकल्प त्यांनी राबविला. 'मी एक मंजुश्री' नावाचे प्रदर्शन त्यांनी गावोगावी जाऊन भरवले. महिला व्यक्त होत नव्हत्या. महिलांना व्यक्त होण्यासाठी त्यांनी 'बोलते व्हा' हे केंद्र सुरू केले. अशाच स्वरूपाचे व्यासपीठ त्यांनी पुरुषांसाठीही सुरू केले. त्यांनी 'पुरुष संवाद केंद्र' सुरू केले (२००८). थोडक्यात स्त्री-पुरुष हे स्त्री विषमतेबद्दल बोलत नव्हते. वर्चस्वाला मूक संमती होती. अशा काळामध्ये त्या मुक्या स्त्री-पुरुषांच्या मुकनायिका झाल्या. त्यांनी त्यांच्याकडून वर्चस्वाच्या व शोषणाच्या कथांबरोबर समतेच्या, सहिष्णुतेच्या, परस्पर सहकाऱ्यांच्या कथा पुढे आणल्या. त्या काळाला त्यांनी स्त्री-पुरुष समतेला नवीन दिशा दिली. जागतिकीकरणाच्या संदर्भांत स्त्रियांवर अन्याय वाढले होते. म्हणून त्यांनी काळोखात प्रकाशफेरी काढल्या. ही अंधार-प्रकाश आणि स्त्री हक्कांच्या जागृतीची संवेदनशील आणि सर्जनशील कथा महाराष्ट्राने अनुभवली आहे. त्यांनी संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांचा सुरेख मेळ घातला होता. उदा. नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद, अ‍ॅसिड हल्ल्यांविरोधात जागृतीसाठी दोस्ती जिंदाबाद, अक्षरस्पर्श ग्रंथालय, सखी साऱ्याजणी मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग ही त्यांची काही महत्त्वाची उदाहरणे आहेत. ग्रामीण भागात सखी साऱ्याजणीच्या शाखा आहेत. त्यांनी अशा सामाजिक कार्यक्रमातून एक संस्थात्मक जाळे विणले. त्यांनी स्त्री-पुरुष समतेचा विचार संस्थात्मक पातळीवर उभा केला. व्यक्तिगत स्वरूपाच्या कामापेक्षा त्यांनी संस्थात्मक काम उभे केले. तसेच त्यांनी या कामास सामूहिक स्वरूप दिले. त्यांनी सामूहिक टिम म्हणून सातत्याने दृष्टी विकसित केली. कार्यकर्त्यांमध्ये समाजवादी व स्त्री-पुरुष समतावादी जीवननिष्ठा विकसित केल्या. म्हणजेच त्यांनी तत्त्वचिंतन आणि प्रत्यक्ष सामाजिक बदल अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य केले. त्यांचे काम यामुळे जास्त गुंतागुंतीचे होते. तसेच पुरुषसत्ताक समाजाचा ऱ्हास घडवणारे होते. पुरुषसत्तेचे विविध कंगोरे त्यांनी समजून घेऊन त्यावर त्यांनी उपाय शोधले. 

सहिष्णू स्त्रीवाद
 विद्या बाळ यांनी स्त्रीवाद या विचारांमध्ये स्वातंत्र्य आधारीत समतेची भर घातली. त्यांनी स्वातंत्र्य विचाराला समतेचा भक्कम आधार मिळवून दिला. स्त्रीवादाच्या विविध प्रकारांशी संवादी राहून त्यांनी भारताच्या स्थानिक गरजांच्या संदर्भांत मांडणी केली. त्यांनी स्त्रियांचे स्थानिक प्रश्‍न आणि वैश्‍विक विचार यांचा विचारपूर्वक मेळ घातला. त्यामुळे विद्या बाळ यांचा स्त्रीवाद हा भारतातील नवीन स्त्रीवादाचा कोभ व धुमारा ठरला. त्यांच्या स्त्रीवादाची वेगळी पाच वैशिष्ट्ये आहेत. एक, वंचितकेंद्रितता हे यांच्या स्त्रीवादी विचारांचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी हद्दपार स्त्री वर्गांच्या समावेशनासाठी स्त्रीवादाचा दावा केला. त्यामुळे त्यांचा स्त्रीवाद वगळणे, हद्दपारी, दुय्यम दर्जा अशा गोष्टींचा प्रतिवाद करतो. सत्ता, अधिकार, संपत्ती, प्रतिष्ठा, मानवता अशा गोष्टीपासून स्त्री वर्ग वंचित आहे. ही जाणीव त्यांच्या कृती कार्यक्रम आणि विचारातून विकास पावली. अशा वंचित स्त्री वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संस्थात्मक व वैचारिक प्रयत्न केले. दोन, या बरोबरच त्यांच्या स्त्रीवादाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सहिष्णू स्त्रीवाद विकसित केला. स्त्रीवाद म्हणजे पुरुषसत्तेचा अनुनय नव्हे. स्त्रीवाद म्हणजे पुरुष आणि स्त्री यांची स्पर्धा नव्हे. पुरुष-स्त्रियांनी परस्परांचा परद्वेष करणे म्हणजे स्त्रीवाद नव्हे. असा त्यांनी आक्रमक व असहिष्णू स्त्रीवादाचा प्रतिवाद केला. आरंभी स्त्रीवाद म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन असे झाले होते. स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्री-पुरुष वाद, संघर्ष, झगडा नव्हे हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सकारात्मक पद्धतीने सहिष्णू स्त्रीवादाचा अवकाश वाढवला. त्यांनी स्त्री-पुरुष यांच्यामधील संवाद, स्त्री-पुरुष समता, स्त्री-पुरुष सलोखा, परस्परांच्या हक्कांचा आत्मसन्मान अशी सहिष्णू स्त्रीवादाची व्याप्ती वाढवली. त्यांनी स्त्री-पुरुष या दोघांच्याही समान विकासाचा सातत्याने दावा केला. दोघांच्या सर्वांगीण उन्नतीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या या विचारांना प्रतिसाद मिळत गेला. याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी नकारात्मक इश्यूंची चर्चा केली नाही. त्यांनी दडपणूक, हिंसा, अन्याय अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा केली. अशा नकारात्मक इश्यूंपासून सुरुवात करून त्यांनी सकारात्मक स्त्रीवादाकडे सतत वाटचाल केली. तीन, भारतातील स्त्री वर्ग धार्मिक आहे. धार्मिकतेमधून विविध अंधश्रद्धा, रूढी-परंपरा उदयास आल्या. अशा अन्याय परंपरांची विद्या बाळ यांनी चिकित्सा केली. त्याविरोधी जनजागृती केली. विशेष म्हणजे त्यांनी विज्ञानाचा दृष्टिकोन समाजाला दिला. त्यांनी शासन व्यवहार धर्मनिरपेक्ष घडावा. विवेकशील व बुद्धिप्रामाण्यवादी निर्णय प्रक्रिया असावी अशी जीवनपद्धती विकसित केली. सद्‌सद्‌विवेकबुद्धी हा त्यांच्या लोकव्यवहारांचा मध्यवर्ती भाग होता. चार, त्यांचा विवेकवादावर प्रचंड विश्‍वास होता. परंतु त्यांचा विवेकवाद हा विचार सदसदविवेकबुद्धी या पद्धतीचा होता. त्यांचा विवेकवाद कोरडा आणि मानवविरोधी, पुरुषविरोधी कधीही झाला नाही. नव्वदीनंतरच्या काळात उपयुक्ततावादी चौकटीत विवेकवादाची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी कोरडा व केवळ सुखवादी विवेकवाद नाकारला. त्यांनी सद्‌सद्‌विवेकबुद्धीला अग्रक्रम देणारा विवेकवाद स्वीकारला. त्यांनी हा विचार स्त्री-पुरुष यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा भाग म्हणून मांडला. पाच, स्त्रीवादाची चर्चा त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय भागीदारी, मानसिक, सांस्कृतिक, वैद्यकशास्त्र अशी बहुअंगी केली. ही मांडणी त्यांनी सोपी उदाहरणे देऊन केली. त्यामुळे स्त्रीवाद हा विचार पुरुषविरोधी नव्हे, पुरुषसत्ताविरोधी आहे हा मुद्दा तळागाळात पोचला. त्यांनी वेळप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पुरुष विचारवंतांची मांडणी पुरुषसत्तेचे समर्थन करते, यांची उदाहरणे दिली. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पुरुषसत्ताक सत्तासंरचना व समाजसंरचनेच्या ऱ्हासाचा आशय स्वीकारला. असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. यामुळे कृतिशील समतावादाची, सहिष्णू समाजवादी स्त्रीवादाची मोठी हानी झाली आहे. 

संबंधित बातम्या