कोविडोत्तर युगाची नांदी

प्रकाश पवार
सोमवार, 13 एप्रिल 2020

राज-रंग
 

'कोविड - १९' अथवा कोरोना ही एक जागतिक आपत्ती आहे. तशीच ही घटना समाजात दूरगामी परिणाम घडवून आणणारी आहे. ही एक समाजमनावर छाप उमटवणारी घटना आहे. कोविडपूर्व आणि कोविडोत्तर अशी काळाची विभागणी घडत आहे. नव्वदीच्या दशकापासून 'चंड भांडवलीव्यवस्था' रडतखडत काम करत होती. परंतु, कोरोनामुळे चंड भांडवलीव्यवस्था खूपच कृतिशील झाली. 'चंड' म्हणजे अमानवी तत्त्व होय. त्यामध्ये व्यक्ती साधन मानली जाते. हे गेल्या तीन महिन्यांपासून आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. विशेष समाजांची संरचना आणि मूल्यव्यवस्थेत बदल घडवून येत आहे. व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाज, व्यक्ती-विज्ञान आणि व्यक्ती-निसर्ग यांचे समंजस आणि सलोख्याचे संबंध अतिशय जलद गतीने वितळत गेले. त्यांना चंड भांडवलीव्यवस्थेने खड्यासारखे बाजूला सारले. कोरोनाने समाजाची घडी विस्कटून टाकली. कोरोना या वहानावर विज्ञान-तंत्रज्ञान स्वार झाले. मानवी चेहरा असलेले विज्ञान-तंत्रज्ञान हे चंड विज्ञान-तंत्रज्ञान अथवा अमानवी झाले. चंड ही संकल्पना नवीन नाही. 'चंडाशोक' ही एक लोककथा आहे. चंडाशोकाचा धर्माशोक असा सकारात्मक बदल घडवून आला होता. परंतु, कोरोनामुळे धर्मा नावाचे रूपांतर चंड मानवात झाले. कारण मानवतेपासून व्यक्ती दूर जाऊ लागली. तसेच समाजही चंड समाज झाला. हिंसा-अहिंसा, सत्य-असत्य, न्याय-अन्याय यांपैकी कोणताही तत्त्वाधिष्टित भेद आजचे विज्ञान आणि भांडवलशाही करत नाही. म्हणून ती चांडाळासारखी झाली आहे. तिची कार्यपद्धती चांडाळ चौकडीसारखी आहे. हा समाजशास्त्रीय फेरबदल सध्या घडला. यामुळे कोविडोत्तर जगाची संरचनात्मकव्यवस्था उभी राहात आहे. तिची नवीन मूल्यव्यवस्था घडत आहे. ही घटना आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. ही कथा समाजाच्या उदयोस्ताची आहे. जुन्याचा अंत आणि नव्याला सहमती दर्शवली जाते.

वर्णद्वेषी भेदभाव
वर्णद्वेषीकरण ही एक भेदभावाची प्रक्रिया आहे. भेदभाव हे धोरण असते. या तत्त्वाचा पुरस्कार कोरोनाच्या काळात वाढला आहे. कोविड - १९ या विषाणूचा प्रसार वाढला, तसा तसा वर्णद्वेषी प्रचार सुरू झाला. विसाव्या शतकातील पन्नाशीनंतर वर्णद्वेषावर संस्था आणि राज्यघटनांनी नियंत्रण ठेवले होते. परंतु, जग पुन्हा जवळजवळ ऐंशी वर्षे मागे गेले. ऐंशी वर्षांच्या कालावधीत मानवी मनाची प्रगती हळूहळू झाली होती. परंतु, हा उलट प्रवास केवळ दोन-चार महिन्यांत पूर्ण झाला. ही अधोगती आहे. चीन विरोधात शिवीगाळ, अपमान, द्वेष या पद्धतीने व गतीने सुरू आहे. मिचमिच्या डोळ्यांच्या तिरस्करणीय व्यक्ती अशी सरळसोट भूमिका घेतली गेली. भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथे नागरिक डिजिटल पद्धतीने अशा तिरस्करणीय गोष्टी करत आहेत. नागरिकांवर संस्थांचे नियंत्रण राहिलेले नाही. संस्थांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी वर्णद्वेषाचे मुख्य प्रचारक झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी 'चायनीज व्हायरस' असे ट्विट केले होते. या शब्दांमध्ये अमर्याद आपपरभाव दिसतो. व्हाइट हाऊसच्या जबाबदार अधिकाऱ्याने कुंग फ्लू ही संकल्पना तुच्छतेने वापरली. यानंतर 'चॉप फ्लूई' व 'राईस बेबीज' हे शब्द अवमान करण्यासाठी सर्रासपणे वापरले गेले. यामध्ये शुद्धाशुद्धता हा विचार पुढे आला. दगाबाजी चार आरोप लावला गेला. चायनीज दांभिक आणि ढोंगी आहेत. यामुळे जन्मखूण, शारीरिक चिन्हे, कृतिखूण, भाषाखूण, बोलखूण या सर्व गोष्टींचा पुनर्वापर झाला. उदा. चायनीज व्हायरस, कुंग फ्लू, चॉप फ्लूई व राईस बेबीज इत्यादी. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श आणि साधन स्पर्श या सर्व गोष्टींचा आधार पाश्चिमात्य देशांनी आणि आशिया खंडातील देशांनी घेतला. या सर्व स्पर्शांना वर्णभेदभावाच्या एका साच्यात बसवले गेले. विषाणूंचा संसर्ग चीनच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी लॅबमधून झाला, की जनावरांच्या बाजारातून झाला? याचा शोध घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली आहे, असे खुद्द बोरिस जॉन्सनने म्हटले आहे. हे वृत्त 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या घडामोडी संस्था आणि सामान्य लोक अशा दोन्ही पातळ्यांवर घडत आहेत. अशा घटनांना संस्था ताकद पुरवत आहेत. समाजाची मानसिकता यामुळे बदलली जाते. हे रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची संस्था काम करत नाही. मानवी जातीचे हे वर्णद्वेषीकरण सुरू झाले आहे. हा आधुनिक जगाचा उलटा प्रवास दिसतो. चीनमध्ये विषाणूंचा जन्म झाला. परंतु, त्यांना वर्ण व्यवस्थेने जन्मास घातले नाही. त्यांचा जन्म चंड भांडवलशाहीमुळे झाला आहे. अतिशय नफ्याची अभिलाषा आणि राजकीय वर्चस्व प्रस्थापित कराण्याचा विचार या माध्यमातून चीनमध्ये या विषाणूंचा जन्म झाला. हे विवेचन वेगळे आणि वर्णद्वेषीकरण हा विचार वेगळा आहे. या गोष्टीचे आत्मभान जगाला राहिले नाही. समाजात वर्णद्वेषीकरण प्रक्रिया रोखणे खूप कठीण काम आहे. ती पुन्हा मानवी मनात खोलवर गेली, तर त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. त्यामुळे वेळीच या घडामोडी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

चंड विज्ञान-तंत्रज्ञान
विज्ञान-तंत्रज्ञानांचे शाप आणि वरदान असे दुहेरी वर्णन शाळकरीपद्धतीने केले जाते. हा मुद्दा शाळकरी असला, तरी विज्ञान-तंत्रज्ञानाला स्वतःच काम करता येत नाही. त्यास माणूस आदेश देतो. हे सूत्र लक्षात घेतले, तर विज्ञान-तंत्रज्ञानाचा वरदान म्हणून वापर करावा, की चंड अथवा शाप म्हणून वापर करावा हे व्यक्तीच्या हाती आहे. आरंभी विज्ञान-तंत्रज्ञानाचा अभ्यास करून मनुष्याच्या दुःखांचा परिहार केला गेला. रसायनशास्त्रज्ञ पाश्वर यांच्या शोधामुळे नवीन युगाला सुरुवात झाली. हे चांगल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे, तर चीनमधील विज्ञान-तंत्रज्ञानाने या विषाणूंची निर्मिती करणे हा विषय चंडशोकाच्या लोककथेसारखा आहे. म्हणजे अमानवी तत्त्व आहे. या चंड भूमिकेत जवळजवळ सर्वच देश गेले आहेत. तसेच सर्वच समाज गेले आहेत. यांची काही उदाहरणे लक्षवेधक आहेत. १) विज्ञान-तंत्रज्ञानाचा चंड पद्धतीने वापर केला गेला. विदेशातून भारतात येताना पॅरासिटेमॉलचा उपयोग प्रवाशांनी सरकारला फसविण्यासाठी केला. त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानांच्या मदतीने इतरांच्या जीवनाला धोका निर्माण केला. २) आरंभी भारतात युजीसीने कार्यक्रम रद्द केले. त्यांना बुध्दिजीवी लोकांनी विरोध केला. विज्ञान-तंत्रज्ञान समजणारे लोक त्यांचा गैरवापर करत होते. ३) महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने बंदीचा निर्णय घेतला. तरीही आयआयटी क्षेत्राने बंदीचे नियम धाब्यावर बसवले. विज्ञान-तंत्रज्ञानवादी समूहाने चुकीचे वर्तन केले. ४) विद्यापीठांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला धाब्यावर बसवले. यामुळे भारतीय समाज विज्ञान-तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करण्याबरोबरच तो चंड अथवा वाईट वापर करतो, असे स्पष्टपणे दिसले. यानंतरची घडामोड थेट अंधश्रद्धा म्हणून घडली. 'यथा प्रजा तथा राजा' हे सूत्र लक्षात आले. या गोष्टीला केवळ राज्यकर्ता वर्ग नव्हे, तर विज्ञान-तंत्रज्ञानाला चंड स्वरूप देणारी सर्व प्रजा जबाबदार आहे. हे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाचे एक रूप आहे. हे विज्ञानाचे चंड रूप कोरोनामुळे जास्त उफाळून वरती आले. हा प्रश्न कसा हाताळावा यांचे आत्मभान आले नाही. टाळी, थाळी आणि दिवे लावण्यास विरोध झाला. तो विरोध मोदीविरोध म्हणून जास्त झाला. ही घटना विज्ञान-तंत्रज्ञान विरोधात गेली. हा मुद्दा नितीन राऊत यांनी वेगळ्या पद्धतीने हाताळला. त्यास काही लोकांनी प्रतिसाद दिला. मात्र, अशा पद्धतीने प्रश्न हाताळणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. थोडक्यात टोकाचे विज्ञान-तंत्रज्ञान विरोधक आणि समर्थक दोन्ही विज्ञान-तंत्रज्ञान व समाजाच्या विरोधात होते. देशकाळ, परिस्थिती पाहून साथ आणि प्रतिसाद दिला जातो. हे आत्मभान विरोधक आणि समर्थक यांच्याबरोबर राज्यकर्त्यांना नव्हते. ही एक भारतीय समाजाची सामाजिक अवस्था झाली आहे. ही अवस्था कोरोनामुळे जास्त गतीने पुढे आली.

सर्व्हेलियन्सची हुकुमशाही
कोरोनामुळे सर्व्हेलियन्सच्या सर्व यंत्रणा अतिकृतिशील झाल्या आहेत. मानवी जीवनात पाळत ठेवण्याचे तंत्र स्वीकारले गेले. परंतु, कोरोनामुळे खासगी जीवनात पाळत तत्त्व आले. राज्यसंस्था, पोलीस, पोलीस पाटील यांचे नियंत्रण वाढले. यांचे कारण स्वयंसेवी जीवन परावलंबी झाले. लोक आत्मबळाचा सकारात्मक दृष्टिकोन व परिणाम विसरले. कोरोनाच्या निमित्ताने सत्यता व अधिकारांचे विकेंद्रीकरण झाले. प्रशासकीय सत्तेबरोबर लष्करी कारवाईची भाषा शैली वापरली गेली. लोकांना सत्तेचा वापर आपल्या जीवनात होत आहे, हे दररोजचे वाटू लागले. त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणून ते स्वीकारले. सीसीटीव्ही कॅमेरे यापुढे सर्व्हेलियन्सचे काम या काळात सरकले. डिजिटल कॅमेरा, मोबाईल यांनी तर मानवी जीवनाचे सूत्रसंचालन सुरू केले होते. पण या बंदमध्ये या माध्यमातून सरकार लोकांचे व्यवस्थापन करते. ही घटना कोरोना विरोधातील लढा म्हणून योग्य आहे. परंतु, लोकांनी स्वयंशिस्त पाळली नाही, म्हणून सरकारने ही संधी घेतली. या गोष्टीची लोकांनाही सवय लागली. म्हणून ही घटना समाजाची एक नवीन गरज म्हणून चंड भांडवलशाहीने ओळखली. तिचा प्रसार व प्रचार केला. सामाजिक संस्था, राजकीय संस्था आणि शैक्षणिक संस्था डिजिटल संदर्भात गेली दहा-वीस वर्षे निर्णय घेत नव्हते. परंतु, कोरोनामुळे थेट एका दिवसात निर्णय घेण्यात आले. पाच टक्के नोकरदारांच्या मदतीने कार्यालयात कामकाज सुरू आहे. नोकरदारांचे आरोग्य जादा कामामुळे चांगले राहणार नाही. उलट पाच टक्के नोकरदारांचे हे अमानवी शोषण आहे. परंतु, कोरोनामुळे त्यांना सवय झाली. हेच उदाहरण पुढे आदर्श म्हणून प्रसारमाध्यमे मांडणार आहेत. या गोष्टींचे समर्थन जनतादेखील करणार आहे. आपल्याकडे एक लोकयुक्ती आहे, 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो.' या काळ सोकावण्याच्या कल्पनेला कोरोनाच्या काळात नवीन पंख फुटले आहेत. छोटे-मोठे भांडवलदार यांना हे काळ सोकावण्याचे तत्त्व समाजात रूढ करायचे होते. त्यास पोषक वातावरण कोरोनाने निर्माण केले. तात्पुरते पर्याय कायमस्वरूपी तोडगा म्हणून ओळखले जातील. 

चंड राज्यसंस्था
राज्यसंस्थेच्या जन्माची कथा जीविताचे संरक्षण, स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संपत्तीचे संरक्षण अशी सरळसोट, पण तिहेरी स्वरूपाची होती. ही कथा म्हणजे चांगल्या राज्यसंस्थेची कथा होती. राज्यसंस्थेच्या या तीनही कार्यक्षेत्रांच्या पुढे कोविड - १९ ने प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. चंड राज्यसंस्थेने व मानवाने राज्यसंस्थेच्या सत्तेचा 'हार्ड पॉवर' आणि 'सॉफ्ट पॉवर' असा नवीन विकास केला.  कोविड - १९ ही सत्ता सॉफ्ट पॉवर म्हणून चीनने विकसित केली. साॅफ्ट पॉवर ही विज्ञान, संस्कृती आणि धर्म यांनी घडविलेली वर्चस्वासाठीची संकल्पना आहे. या संकल्पनेची पाळेमुळे जागतिकीकरणानंतरच्या परिस्थितीत खोलवर गुंतलेली आहेत. तेव्हापासून राज्यसंस्थेची कल्याणकारी ताकद कमी होत गेली. त्या जागी चंड अथवा वाईट राज्यसंस्था जन्मास आली. यामुळे अमेरिकेला कोविडच्या निर्मूलनापेक्षा 'वर्क कल्चर' जास्त महत्त्वाचे वाटते. वर्क कल्चर आणि जीविताचे संरक्षण यांपैकी वर्क कल्चरला प्रथम क्रमांक आणि जीविताला दुय्यम स्थान अमेरिकन राज्यसंस्थेने दिले. चीनमध्ये विषाणूचा जन्म झाल्यानंतर साॅफ्ट पॉवर आणि जीवित यांपैकी साॅफ्ट पॉवरला प्रथम क्रमांक आणि जीविताला दुय्यम स्थान दिले गेले. भारतात राजकीय पक्ष इव्हेंट मॅनेजमेंट करत आहेत. परंतु, कोरोनाच्या विरोधातील लढण्यासाठी साधने पुरवली जात नाहीत. राज्यसंस्थेने स्वातंत्र्याची हमी दिली होती. परंतु, कोरोनामुळे सर्व्हेलियन्सच्या यंत्रणांनी हुकूमशाही पद्धती सुरू केली. संपत्तीबद्दल राज्यसंस्था काळजी घेते. परंतु, कोणाच्या संपत्तीबद्दल राज्यसंस्था काळजी घेते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोरगरीब जनता रस्त्यावर आली. त्यांचा रोजगार गेला. या उलट राज्यसंस्था भांडवली संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. थोडक्यात राज्यसंस्थेने तिचे अभिवचन पाळणे सोडून दिले आहे. राज्यसंस्था आधी दिखावा करत होती. कोरोनामुळे तिने दिखाऊ धोरण सोडून दिले आहे. हे तत्त्व समकालीन समाजालाही अपेक्षित होते. त्यामुळे कोरोनाच्या मदतीने चंड भांडवलीव्यवस्था काम करते असे स्पष्टपणे दिसते. ही घटना लोक नाईलाजाने स्वीकारत आहेत. परंतु, कोरोनाच्या निमित्ताने हिंसा-अहिंसा, सत्य-असत्य, न्याय-अन्याय यांपैकी कोणताही तत्त्वाधिष्टित भेद केला जात नाही.  

भारतात आत्मबळ अशी एक संकल्पना राज्यसंस्थेच्या संदर्भात आहे. आत्मबळ म्हणजे राजकीय हिंसेचा विलय घडवणे. हिंसा आणि युद्ध संस्था मानवी जीवनातून हद्दपार करणे होय. हा प्रयत्न महात्मा गांधी यांनी केला होता. या प्रयत्नांची तीन वैशिष्ट्ये आहेत. १) लोकसंग्रह करणे २) आत्मबळ वाढवणे आणि ३) विद्याबळ वाढवणे. या तीन वैशिष्ट्यांमुळे हिंसा कमी कमी होत गेली. परंतु, कोरोनाच्या निमित्ताने या तीनही वैशिष्ट्यांच्या विरोधातील राजकारण घडत आहे. चंड भांडवलशाही राज्यसंस्थेला बळाचा वापर करण्यास भाग पाडते. कोविड - १९ ही एक जैविक युद्ध संस्था आहे. तिला चीनने डावपेचांचा भाग म्हणून नव्याने जन्माला घातले. यामुळे ही घटना भारतीय आत्मबळ संकल्पनेच्या विरोधातील राजकारण घडविते. आत्मबळाची संकल्पना राज्यसंस्थेची ताकद कमी करते. परंतु, कोरोनाच्या निमित्ताने राज्यसंस्थेची हिंसात्मक ताकद वाढते. राज्यसंस्था ताकदवान होते. भारतात क्षात्रधर्म शास्त्र सहमतीने हिंसा करत होता. आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेत क्षत्रियांच्या हिंसेचा त्याग केला गेला. त्या जागी लोकसंग्रह, विद्याबळ आणि आत्मबळाची संकल्पना रूढ झाली होती. मात्र,  कोविड - १९ ने भारतीय राजकारणातील ही आत्मबळाची संकल्पना जवळजवळ सर्वच क्षेत्रांतून हद्दपार केली. म्हणून ही घटना मुळात नव्या युगाची नांदी आहे.

संबंधित बातम्या