संयुक्त महाराष्ट्राची साठ वर्षे!

प्रकाश पवार
सोमवार, 11 मे 2020

राज-रंग
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना  एक मे  १९६० रोजी झाली. या स्थापनेला साठ  वर्षे पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची जडणघडण आणि आजची अवस्था अशा तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्राची वाटचाल झालेली आहे. या तीन अवस्था चित्तवेधक आहेत. त्यांचा सविस्तर घेतलेला आढावा...

संयुक्त महाराष्ट्र चळवळ
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हिंदी राष्ट्र अशी संकल्पना धूसर  होती. तसेच महाराष्ट्र ही संकल्पना देखील  नुकतीच  उदयाला येऊ लागली होती. राष्ट्रीयत्व आणि महाराष्ट्री यत्व असा एक संकल्पनात्मक वैचारिक मुद्दा उपस्थित झाला होता. राष्ट्रीय एकीकरण  आणि प्रादेशिक वेगळेपण असा आरंभी तणाव संपूर्ण भारतात होता. यास महाराष्ट्र अपवाद नव्हता. भाषिकांनी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा मांडला. भाषा या घटकाच्या आधारे राज्यांची पुनर्रचना करण्याचा विचार विसाव्या शतकाच्या पहिल्याच दशकांमध्ये सुरू  झाला होता. हा विचार भारतीयांनी प्रथम मांडला. ही एक वस्तुस्थिती आहे. परंतु, हे पूर्ण सत्य नाही. कारण भाषावार प्रांतरचनेची ही  प्रक्रिया ब्रिटिशांनी प्रथम सुरू केली असे  मत  खुद्द नेहरूंनी नोंदविले आहे. भारतातील पहिला भाषावार प्रांत ओरिसा हा  १९३६ मध्ये ब्रिटिशांनी निर्माण केला. हा तपशील नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांच्या रोज निशीमध्ये आला आहे. मराठी भाषेच्या एकीकरणाच्या  आधी कर्नाटक आणि आंध्रमध्ये भाषिक एकीकरणाच्या  चळवळी सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्रात मराठी भाषेच्या आधारे एकीकरण  चळवळ सुरू झाली नव्हती. तीस-पस्तीस वर्षे  असंघटितपणे मराठी भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न मांडला जात होता. याचे दुःख पटवर्धन यांना वाटत होते. परंतु,  या दरम्यान लोकमान्य टिळक, न.  चि.  केळकर अशा राजकीय नेतृत्वाचा भाषावार प्रांतरचनेला पाठिंबा होता. या पार्श्वभूमीवर १९४६ मध्ये ते बेळगाव येथे तिसावे मराठी साहित्य संमेलन भरले. त्या संमेलनांमध्ये वऱ्हाड मराठवाडा आणि गोमंतक हे तीन भाग एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करावा असा विचार मांडला. यामध्ये माडखोलकर आणि आचार्य अत्रे यांनी पुढाकार घेतला. या कार्यासाठी संघटित प्रयत्न करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात यावी असा ठराव मांडला गेला. याच वेळी अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न हा सर्व मराठी भाषिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे अशी संवेदनशील व जिव्हाळ्याची भूमिका मांडली. त्यानंतर मडगाव येथे गोमंतक  मराठी भाषिक म्हणून संयुक्त महाराष्ट्रात सामील करावे अशी भूमिका घेतली गेली. मराठी भाषिक प्रदेश एकसंघ नव्हता. मराठी भाषिक प्रदेशाचे एकीकरण करणे हे फार मोठे आव्हान होते. या प्रक्रियेमधून महत्त्वाचे चार तात्विक प्रश्न उपस्थित झाले. एक, राष्ट्रीयत्व  आणि महाराष्ट्रीयत्व  यांचा समन्वय घालण्याचा तात्विक प्रश्न होता. या तात्विक प्रश्नामुळे भारतीय राष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्या संबंधांची सलोख्याची आणि वादविवादाची चर्चा झाली. दोन, संयुक्त महाराष्ट्र ही संकल्पना नव्याने निर्माण करावयाची होती. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा, महाराष्ट्र-गुजरात, महाराष्ट्र-मध्यप्रदेश, महाराष्ट्र-आंध्रप्रदेश यांच्यामधील बहुभाषिक सीमारेषा यांच्याबद्दल तात्विक चर्चा सुरू झाली. येथील बहुभाषिक लोकांचे मनोमिलन कोणत्या प्रांतात करावे हाच एक कळीचा प्रश्न उपस्थित झाला. तीन, माडखोलकर यांनी हिंदुस्थान हा बहुराष्ट्रीय देश आहे अशी कल्पना स्वीकारली होती. या चौकटीत यांनी मराठी भाषिकांच्या एकसंघ राष्ट्राच्या निर्मितीचा विचार मांडला.  हा विचार कम्युनिस्ट विचारसरणीशी  मिळता-जुळता  होता. यामुळे महाराष्ट्रीयत्व  आणि आणि भारतीयत्व यामध्ये कम्युनिस्टांना मतभेद दिसत नव्हते. चार, २६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटना अमलात आली. त्यानंतर प्रांतांच्या जागी राज्य अशी संकल्पना वापरली गेली. यामुळे एक भाषा, एक राज्य आणि मराठी भाषेचे महाराष्ट्र राज्य अशी तात्विक भूमिका घेतली गेली. या चारही भूमिकांबद्दल संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये तात्विक चर्चा झाली. मुंबई कोणाची हा एक वादग्रस्त प्रश्न उपस्थित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई महाराष्ट्राची आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. गुजराती नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता. गोव्यामध्ये गोवा मुक्ती आंदोलन सुरू झाले होते. महाराष्ट्रातील समाजवादी नेतृत्वाने त्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यांनी गोमंतक हा मराठी भाषिक आहे अशी भूमिका घेतली होती. कर्नाटक राज्याची स्थापना झाली, मात्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाले नाही. विशाल द्वैभाषिक मुंबई राज्य निर्माण केले गेले.  या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभे राहिले. द्वैभाषिक मुंबई राज्य यामुळे मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्राला जोडला गेला, ही एक  प्रक्रिया  घडली. विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निवडणुकांमध्ये मराठी प्रदेशात काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेस पक्षाचा विजय गुजराती प्रदेशांमध्ये झाला. यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला. राष्ट्रीय नेतृत्वाने डावपेच म्हणून यशवंतराव चव्हाण यांना द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री केले. यामुळे यशवंतराव चव्हाणविरोधी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असा आखाडा मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात उभा राहिला. यशवंतराव चव्हाण यांनी पंडित  नेहरूंच्या राष्ट्रीयत्व या संकल्पनेशी मिळती-जुळती  भूमिका घेतली. ही भूमिका संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आणि काँग्रेस पक्षातील चव्हाणविरोधी गटाला मान्य नव्हती. यामुळे काँग्रेस पक्षातदेखील उभी फूट पडली. मराठी भाषिक प्रदेशात दोन वेगवेगळ्या भूमिका दिसू लागल्या. पन्नाशीच्या दशकाच्या उत्तरार्धात विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याचा कारभार चालवणे अवघड चालले होते. त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना संयुक्त महाराष्ट्र स्थापन करणे कसे योग्य आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली. चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आणले, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मराठी भाषिक प्रदेशातील जनमताचा अंदाज घेतला. चव्हाण यांनी पंडित नेहरूंचे मतपरिवर्तन केले. विशेषतः प्रतापगडावरील भाषणामध्ये पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची  प्रतिमा राष्ट्रीय नेता (heroism) अशी नव्याने मांडली. हा पंडित नेहरूंच्या भूमिकेत झालेला अमुलाग्र बदल होता. हा बदल महाराष्ट्राबद्दलच्या तात्विक चिंतनाचा देखील होता. कारण भारताच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नेता अशी ओळख दिली होती. त्यामुळे 'आयडिया ऑफ इंडिया' आणि 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'  या दोन संकल्पनांमधील  तात्विक अंतर्विरोध लोप पावला होता. तत्त्व म्हणून 'आयडिया ऑफ इंडिया'च्या  विरोधात 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'  ही संकल्पना जात नाही. उलट 'आयडी ऑफ इंडिया'  या संकल्पनेचा 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'  हा एक भक्कम आधारस्तंभ आहे, अशी वैचारिक भूमिका पुढे आली. त्या भूमिकेमुळे महाराष्ट्र हा प्रदेश संघराज्याचा एक राज्य म्हणून भाग असेल यावर शिक्कामोर्तब चव्हाण आणि पंडित नेहरू यांनी केले. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी वैचारिक  क्रांतिकारी घटना होती. अर्थातच याचे श्रेय संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरू या तिघांनाही जाते. या अर्थाने ही वैचारिक घडामोड सामूहिक होती. यानंतर कार्यपद्धतीच्या संदर्भातील वाटाघाटी दिल्लीत झाल्या. वाटाघाटींनंतर  संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला अशी प्रतिमा तयार झाली.

आजची अवस्था
संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मराठी भाषिकांचे तिभंगलेपण कमी करण्याचा विचार होता. यशवंतराव चव्हाण यांनी हा विचार जपला. परंतु, महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या तीन गटांत विभागलेला, आता तो  चार गटांत  विभागला गेला आहे. हे त्याचे वैचारिक आणि सामाजिक दुभंगलेपण आहे. या संदर्भातील चर्चा ना. ग. गोरे, श. दा. जावडेकर अशा अनेकांनी केली  आहे. यावर स्वतंत्रपणे चर्चा मौज यांनी केली होती. त्याबद्दलचे महाराष्ट्र महोदय हे पुस्तक वि. पु. भागवत यांनी संपादित  केलेले आहे. हे दुभंगलेपण गेल्या साठ वर्षांत कमी झाले नाही. महाराष्ट्र कर्नाटक हा सीमाप्रश्न गुजरात-महाराष्ट्र हा सीमाप्रश्न अजून वादाचा विषय म्हणून शिल्लक आहे. गोमंतक प्रदेशाचे महाराष्ट्रात विलीनीकरण  करता आलेले नाही. गोव्यात सार्वमत घेतले गेले, तेव्हा राष्ट्रीय नेतृत्वाने बांदोडकर यांना नाथ पै यांना विश्वासात घेतले. परंतु, पूर्णपणे तटस्थपणा राष्ट्रीय नेतृत्वाने दाखवला नाही. अशी खुलेपणाने चर्चा मोहन धारिया यांनी केलेली आहे. यामुळे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने उपस्थित केलेले काही प्रश्न मार्गी लागले. परंतु, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काही प्रश्न बाजूला गेले असे त्याचे स्वरूप दिसते. तरी ही  यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना वस्तुस्थितीत उतरविण्यासाठी अनमोल कष्ट घेतले. महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या वृत्तपत्रांनीदेखील या प्रश्नांची चर्चा आजतागायत  चिकित्सकपणे  सुरू ठेवली आहे. यावरून संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला साठ वर्षे  पूर्ण होत आहेत, याचे वेगळे महत्त्व आहे असे दिसते.

महाराष्ट्राची जडणघडण
 संयुक्त महाराष्ट्राची जडणघडण दिल्ली येथील वाटाघाटींमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या चळवळीत झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्र कोणाचा? असा तात्विक प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला यशवंतराव चव्हाण यांनी तात्विक उत्तर दिले होते. महाराष्ट्र हा बहुजनांचा असेल. संयुक्त महाराष्ट्र एका जातीचा व एका धर्माचा नसेल. तसेच तो बहुभाषिक हितसंबंध जपेल. संयुक्त महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या हितसंबंधांबरोबर व्यापारी, उद्योगपती आणि मध्यमवर्गाचे  हितसंबंध जपेल. अशी व्यापक भूमिका यशवंतराव चव्हाण यांनी मांडली. ही चव्हाण यांची भूमिका सकलजनवादी स्वरूपाची होती. यशवंतराव चव्हाण बहुजन या संकल्पनेबद्दल बोलत असले, तरी त्यांनी बहुजन संकल्पनेच्या बहुसंख्यांकवाद या मर्यादेवर मात केली होती. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र हा सकलजनांचा आणि अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधांचा देखील असेल अशी भूमिका घेतली होती. ही संयुक्त महाराष्ट्राची लोकशाही विषयक संकल्पना होती. ही संकल्पना अतिशय खोल व सैद्धांतिकदृष्ट्या प्रगल्भ होती. यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीने वेगळी भूमिका घेतली नाही. महाराष्ट्र चळवळीतील अनेक मुद्दे यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेस पक्षामध्ये  आत्मसात केले. यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काँग्रेस पक्षाला असणारा विरोध हळूहळू मावळत गेला. चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राची जडणघडण मुख्यतः चार तत्त्वांच्या  आधारे केली. एक, सर्व प्रदेशांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ (सत्ता वाटप) सर्व प्रदेशांना सहभागी करून घेणारे केले होते. समावेशन हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून उदयाला आलेले एक महत्त्वाचे तत्व होते. दोन, आर्थिक असमतोल दूर करण्यासाठी कार्यक्रमांची आखणी हे संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीचे दुसरे तत्त्व होते. १९६४ मध्ये सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली. तीन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून सांस्कृतिक विकासाचा मुद्दा पुढे आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण संस्था, बालभारती विश्वकोश अशा विविध बाजूंनी  ज्ञानाचे संकलन आणि ज्ञानाचा विस्तार करण्याची भूमिका घेतली गेली. लोकसाहित्यामध्ये आजूबाजूचे  ज्ञान आहे ही भूमिका संयुक्त महाराष्ट्रातून पुढे आली होती, तिची  जोपासना केली गेली. चार, विशेषतः  वैज्ञानिक दृष्टिकोन  आणि उपयोजित विज्ञान या क्षेत्रात महाराष्ट्राची जडणघडण करण्याचा विचार आरंभीच मांडला गेला. 
 

संबंधित बातम्या