महाराष्ट्राच्या विकासाची इमारत 

प्रकाश पवार
सोमवार, 18 मे 2020

राज-रंग
महाराष्ट्र राज्यस्थापनेचे सध्या हीरक महोत्सवी  वर्ष सुरू आहे. या  साठ वर्षांच्या काळात महाराष्ट्राने अनेक विकास संकल्पना अनुभवल्या  आहेत.  या  हीरक महोत्सवी  वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या गेल्या सहा दशकांतील राजकारणाचा व समाजकारणाचा  घेतलेला चर्चात्मक  आढावा...

राजकारण आणि समाजकारणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा चिकित्सक आढावा घेण्याचा योग्य निकष कोणता हा प्रश्न उपस्थित होतो, याचे साधे उत्तर यशवंतराव चव्हाण प्रारूप हे आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण यांनी आणला, तेव्हा त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दलची एक निश्चित आणि स्पष्ट प्रतिमा तयार झाली होती. चव्हाण यांच्या विचारातील महाराष्ट्र कोणता होता आणि त्यांच्या विचारांनुसार साठ वर्षांत  महाराष्ट्राची वाटचाल झाली की  नाही?  हा एक चिकित्सक आढावा  महत्त्वाचा ठरतो.  

बहुपदरी विकास संकल्पना 
यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र संकल्पनेचे महत्त्वाचे पाच आधारस्तंभ होते. एक, राजकीय विकास.  दोन, सामाजिक विकास.  तीन, सांस्कृतिक विकास.  चार, आर्थिक विकास.  पाच, महाराष्ट्राचा विकास आणि स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा समन्वय, असे पाच आधारस्तंभ होते. चव्हाण यांनी या पाचही आधारस्तंभांची मांडणी जाणीवपूर्वक केली  होती. हे पाच आधारस्तंभ म्हणजे एक प्रकारची महाराष्ट्राची संरचनात्मक आणि मूल्यात्मक चौकट होती. या चौकटीमध्ये चव्हाण यांची विकासाची संकल्पना स्पष्टपणे दिसते. चव्हाण यांची विकासाची संकल्पना महत्त्वाची  का? याचे कारण या विकास संकल्पनेची पाळेमुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये खूप खोलवर गुंतलेली होती. चव्हाण यांनी या दोन्ही चळवळी आणि विकासाची कल्पना अत्यंत कल्पनेने  एकमेकांशी जोडली होती. त्यामुळे हा एक महत्त्वाचा पाचवा आधार चव्हाण यांच्या विकास संकल्पनेला आहे. पाचव्या आधाराविना विकास संकल्पना अपुरी ठरते. म्हणून संयुक्त महाराष्ट्र स्थापनेची इच्छाशक्ती आणि संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या एकूण विकासाची  रूपरेषा ही स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळींशी एक दिवसजीव झालेली यशवंतराव चव्हाणांनी घडवली. हा खरे तर  हीरक महोत्सवी महाराष्ट्राच्या उत्सवातील आणि मोजमापातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. चव्हाणांच्या विकास संकल्पनेतील पाच आधारस्तंभांपैकी राजकीय विकास हा आधारस्तंभ नेमका कोणता होता. याचे विवेचन येथे केले आहे. 

राजकीय विकास एक आधारस्तंभ 
राजकीय विकास म्हणजे काय? हा प्रश्न जवळपास सर्वांच्या पुढे आज उभा राहतो. असाच प्रश्न यशवंतराव चव्हाण यांच्या पुढेही होता. कारण भारतीय समाजाचे त्यांचे  आकलन मिश्र स्वरूपाचे होते. भारतीय समाज ग्रामीण आणि शहरी अशा दोन भिन्न घटकांचा आहे. यातूनच परंपरा आणि आधुनिकीभवन अशा दोन प्रक्रिया ही घडत होत्या. आधुनिकभवन ही विकासाशी संबंधित प्रक्रिया होती. ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा विकास झाला पाहिजे अशी निश्चित कल्पना चव्हाणांनी आखली होती. त्यांच्या विकास संकल्पनेमध्ये राष्ट्रबांधणी, राज्य बांधणे, राजकीय सहभाग, साधनसंपत्तीचे योग्य वितरण अशा चार गोष्टींचा समावेश होता. चव्हाण यांच्या या संकल्पनेवर एका अर्थाने अमेरिकन राजकीय विकास या संकल्पनेचा प्रभाव होता. कारण चव्हाण यांनी लोकशाही संस्था उभ्या करणे आणि लोकशाही संस्थांमार्फत लोकांचे प्रश्न सोडवणे यास अग्रक्रम दिला होता. हा मुद्दा एन. डी. पाटील व भा. ल. भोळे यांनी अधोरेखित केलेला आहे. चव्हाण यांची विकास संकल्पना संस्थीभवनावर भर देते. तसेच त्यांची विकासाची संकल्पना व्यवस्थात्मक चौकटीमध्ये मूल्यात्मक विचार स्वीकारते. ही विकासाची दोन्ही वैशिष्ट्ये एका अर्थाने वस्तुस्थिती वाचक आहेत. परंतु, याशिवाय यशवंतराव चव्हाण यांनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, एम एन रॉय यांचा मानवतावादी विचार यामध्ये एक समाजवादी विचार होता. त्या समाजवादी विचारांमधूनदेखील चव्हाण यांनी सामान्य व्यक्तीच्या विकासाची बांधिलकी स्वीकारलेली होती. त्यामुळे त्यांच्या विकास संकल्पनेमध्ये संस्थात्मक चौकटीच्या बरोबर एक मानवी चेहरा होता. हेच चव्हाणांच्या विकास संकल्पनेचे वेगळेपण आहे. चव्हाण यांना आरंभी स्वातंत्र्य चळवळदेखील सामान्यांची वाटत नव्हती. परंतु, महात्मा गांधीजींची भाषा त्यांना सामान्य व्यक्तीच्या आत्मबळाची वाटली. सामान्य व्यक्ती राज्य सत्तेला विरोध करू शकते. हा आत्मविश्वास गांधी यांनी दिला, अशी चव्हाणांची धारणा आहे. हेच तत्त्व  चव्हाण यांनी विकास प्रारूपामध्ये समाविष्ट केले. सामान्य व्यक्ती सनदशीर मार्गाने सत्तेला विरोध करू शकते आणि सामान्य व्यक्तीचा विकास करू शकते असा त्यांचा युक्तिवाद यामुळे विकसित झाला. सामान्य व्यक्तीने राजकारणापासून दूर जाऊ नये. असामान्य व्यक्तीने राजकारणापासून अलिप्त राहू नये. सामान्य व्यक्तीने राजकारणात कृतिशील भाग घ्यावा. यातूनच व्यक्तीची स्वायत्तता, व्यक्तीचा विकास आणि व्यक्तीच्या आत्मबळाचा विकास होईल अशी धारणा चव्हाणांची झाली होती. त्यामुळे चव्हाण यांनी वर्चस्वशाली संबंधांच्या राजकारणापेक्षा सामान्य व्यक्तीच्या हितसंबंधांच्या गोष्टींना राजकारणाचा मध्यवर्ती विषय केले. चव्हाणांच्या विकास प्रारूपाचे सकलजनांचे राजकारण हे एक  तत्त्व म्हणून विकास पावले. यामुळे चव्हाण राजकारणाकडे तुच्छतेने पाहत नाहीत, उलट त्यांनी राजकारणाकडे सामान्य व्यक्तीचे अस्तित्व आणि सामान्य व्यक्तीच्या आत्मबळाचे तत्व म्हणूनच पाहिले होते. 

सत्तेचे विकेंद्रीकरण 
चव्हाण यांच्या राजकीय विकास संकल्पनेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा एक महत्त्वाचा भाग होता. चव्हाण यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे स्थूलमानाने चार वेगवेगळे स्तर स्पष्ट केले होते. चव्हाण यांनी स्थानिक पातळीवरती सत्ता द्यावी, अशी भूमिका घेतली. एक, स्थानिक पातळीवर सत्ता आणि अधिकाराचे वाटप करून जनतेच्या प्रतिनिधीचा विकास करण्याची त्यांची कल्पना होती. म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था या नेतृत्व घडवणाऱ्या पाठशाळा आहेत अशी ठाम भूमिका घेतली. ही भूमिका वैचारिक आणि प्रतिक्रियात्मक स्वरूपाची होती. दोन, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळावे अशीही त्यांची भूमिका होती. विभागीय पातळीवर तीदेखील सत्तेचे समतोल आणि न्याय वाटप करावे अशी त्यांची प्रबळ धारणा होती. या धारणेमध्ये विभागनिहाय सत्ता वाटप म्हणजेच सत्ता विकेंद्रीकरणाचे सूत्र अंतर्निहित असल्याचे दिसते. तीन, चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण ग्रामीण आणि शहरी अशा दोन संदर्भात करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला.  या दोनपैकी कोणत्याही एका भागाचे निर्णायक वर्चस्व निर्माण होऊ नये अशी काळजी घेतली. यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन संदर्भात सत्ता वाटपाचा विचार विकास म्हणून केला पाहिजे असा त्यांचा विचार होता. चार, चव्हाण यांनी जिल्हा हादेखील सत्ता वाटपाचे एक  महत्त्वाचे एकक मानले होते. जिल्ह्याला सत्ता विभागून द्यावी अशी त्यांची कल्पना होती. जिल्हाध्यक्ष यांचे स्थान त्यांनी जवळपास कॅबिनेट मंत्र्याच्या पद्धतीचे विकसित केले होते. याचा अर्थ असा होतो,  की  सत्तेचे विकेंद्रीकरण राज्य, जिल्हा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा संरचनात्मक पातळीवरती करावे अशी त्यांची राजकीय विकासाची कल्पना होती. या संस्थांनी व संस्थांमधील सत्तेने सर्वसामान्य व्यक्तींसाठी कार्य करावे अशी त्यांची भूमिका होती. महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाचा चिकित्सक आढावा घेण्यासाठी हे चव्हाण यांचे राजकीय विकासाचे तत्त्व कळीचे ठरते. या राजकीय विकास तत्त्वाच्या  चौकटीमध्ये एकूण गेल्या साठ वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा आढावा घेतला पाहिजे. हा संबंध लक्षात घेतला तर असे दिसून येते,  की चव्हाणांची राजकीय विकासाची संकल्पना आज  उपयुक्त आहे. ही संकल्पना महाराष्ट्राचा योग्य आणि  रास्त आढावा घेऊ शकते.

लोकशाही संकल्पना 
चव्हाण यांनी लोकशाहीची संकल्पना आणि आत्मबळाची संकल्पना यांची सांधेजोड विकास संकल्पनेत केली होती. व्यक्तीच्या, समाजाच्या, प्रदेशाच्या आणि राष्ट्राच्या प्रत्येक समस्येचे निरसन लोकशाही पद्धतीने करता येते. यावर त्यांचा विश्वास होता. हे तत्त्व म्हणजेच आत्मबळाचे तत्त्व आहे. आत्मबळ संस्थांमध्ये व समाजामध्ये आले पाहिजे असा युक्तिवाद चव्हाणांचा होता. आत्मबल म्हणजे हिंसेचा अंत होय. राजकारणातून हिंसा वगळल्यानंतरच सामान्य व्यक्तीला राजकारणात भाग घेता येतो. सामान्य व्यक्तीसाठी राजकारण हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. थोडक्यात चव्हाणांनी त्यांच्या राजकीय विकास या संकल्पनेत लोकशाही  संस्थांना महत्त्व दिले ही एक बाजू आहे. परंतु, त्या संस्थांमध्ये आत्मबळाचा  मूल्यात्मक विचार समाविष्ट केला. हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. आत्मबळ ही संकल्पना युद्ध संस्था, हिंसा आणि क्षत्रियत्व या संस्थेतील हिंसेचा अंत करते. राजकारणाने आत्मबळाचे स्वरूप धारण करावे असे चव्हाणांचे राजकीय विकास संकल्पनेबद्दल मत होते. राजकारण हे क्षेत्र गुंडपुंडाचे होऊ नये असाच त्यांचा मुख्य विचार होता. राजकारणाची भाषादेखील सुसंस्कृत असावी असे त्यांचे मत होते. राजकारणामध्ये हिंसक भाषा होती. चव्हाण यांनी राजकारणाची भाषा अहिंसक व संवादी केली. त्यामुळे त्यांच्या राजकीय विकास या प्रारूपामध्ये भाषाशैली या गोष्टीला अत्यंत महत्त्व होते. अहिंसक भाषाशैली म्हणजे चर्चेची व संवादाची भाषाशैली होय. म्हणून चव्हाण यांच्या राजकीय विकास प्रारूपामध्ये लोकशाही पद्धतीची भाषा ही एक  महत्त्वाची विकासाची अवस्था आहे. अहिंसक भाषा आणि राजकारण यांचे स्त्री वर्गासंदर्भात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकीय क्षेत्रांमध्ये स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा जपणारी भाषा त्यांनी मुख्य मानली होती.  
 

संबंधित बातम्या