सांस्कृतिक सॉफ्ट पॉवर 

प्रकाश पवार
सोमवार, 1 जून 2020

राज-रंग
महाराष्ट्राच्या विकासात सांस्कृतिक विकासाला विशेष महत्त्व असून सॉफ्ट पॉवरमध्ये सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. नंतरच्या काळात मात्र सॉफ्ट पॉवरकडे दुर्लक्ष होऊन हार्ड पॉवरवर भर दिला गेला. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सांस्कृतिक घटकांमध्ये काही प्रमाणात अधोगती निर्माण झाली, ही अधोगती भरून काढण्यासाठी सांस्कृतिक घटकांचा विकास हाच महाराष्ट्राचा महत्त्वाचा विकास असल्याचे समजून घेऊन सांस्कृतिक विकासाची संकल्पना जाणून घेणे गरजेचे आहे...

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सरकारच्या पुढाकाराने संस्कृतीचा विकास करण्याची कल्पना जलद गतीने वाढली. संस्कृती ही एक मूल्यव्यवस्था आणि जीवनपद्धती आहे. सरकारने या क्षेत्राशी सर्जनशील आणि संवेदनशील संबंध ठेवला पाहिजे. अंतर्दृष्टी विकसित करून लोकांची मने संस्कृत केली पाहिजेत. नवीन व्यक्ती घडविली पाहिजे हा विचार म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विकासाची संकल्पना होय. जागतिक पातळीवरती जोसेफ नाय यांनी सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर अशा दोन संकल्पनांचा वापर केला आहे. सॉफ्ट पॉवरमध्ये सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा संस्कृती हा एक घटक महत्त्वाचा मानला होता. त्यांच्या विकासाच्या पाच आधार स्तंभांपैकी हा एक आधारस्तंभ होता. राज्यकर्त्या वर्गाला कोरोना संकटानंतर या सांस्कृतिक घटकाचे महत्त्व नव्याने समजू लागले आहे. यशवंतराव चव्हाण उत्तरकाळात केवळ हार्ड पॉवरवरती भर दिला गेला, असे खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते सॉफ्ट पॉवरकडे लक्ष दिले गेले नाही. यशवंतराव चव्हाण यांनी सांस्कृतिक घटकाचा विकास हाच महाराष्ट्राचा महत्त्वाचा विकास आहे, अशी भूमिका घेतली होती. म्हणून त्यांनी विश्वकोश, बालभारती, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ अशा प्रकारे संस्थांची उभारणी केली. या संस्थांनी महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचे संवर्धन केले. महाराष्ट्रात याआधी गंगा जमुना संस्कृतीप्रमाणे संस्कृतीची फार मोठी वाढ झालेली नव्हती. शिवाजी महाराजांच्या काळात राज्यव्यवहारकोश तयार केला होता. शहाजी महाराजांनी संस्कृतीकडे लक्ष दिले होते. सयाजीराव गायकवाड यांनीदेखील साहित्याने संस्कृतीची जोपासना केली. परंतु बिहार, सिंधप्रांत आणि पंजाब याप्रमाणे दैदीप्यमान सांस्कृतिक वारसा आपणाकडे नाही हे लक्षात घेऊन महाराष्ट्राने नव्याने सांस्कृतिक जडणघडणीचा पाया घातला. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राचा विकास मोजण्याचा सांस्कृतिक घटक हा एक पैलू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सांस्कृतिक घटकांमध्ये काही प्रमाणात अधोगती निर्माण झाली. विशेषत: सरकारला त्यांचे काही काम सोडून द्यावे लागले होते. सरकारला वेगवेगळ्या सांस्कृतिक पैलूंचा विसर पडला होता. विशेषतः अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना स्वतंत्र भाषा विभाग निर्माण करण्यात आला म्हणजेच जवळपास पुढे पन्नास वर्षे जावी लागली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी समिती स्थापन केली. समितीचा अहवाल अजूनही अमलात आलेला नाही. म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती सांस्कृतिक घटकाकडे दुर्लक्ष झालेले आहे. बदलत्या काळाप्रमाणे भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी ऑनलाइन विश्वकोशाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. परंतु, तोही प्रकल्प फार गतीने पुढे गेलेला नाही. 

भोवताली ज्ञान
व्यक्तीच्या आणि समाजाच्या अवतीभवती ज्ञान असते. हे ज्ञान लोकसाहित्यामध्ये व लोक दैवतांच्या कथांमध्ये आहे, अशी यशवंतराव चव्हाण यांची निश्चित भूमिका होती. त्यांनी लोककथांकडे पाहण्याचा ज्ञानात्मक दृष्टिकोन महाराष्ट्राला दिला. त्यांच्यावरती रामायणाचा प्रभाव होता. परंतु, त्यांनी रामायणाचा समाजवादी अर्थ लावला होता. रामायणाला सीतायण अशी कल्पना त्यांनी सुचित केली होती. विचारसरणी खूप व्यापक आहे. कारण सीता ही निवैर्याची व शांतीचे प्रतीक होती. तसेच सीता हे शेती संस्कृतीचे प्रतीक होती. सीता कष्टाच्या शेतीशी जोडलेले प्रतीक आहे. सीता हे त्यागाचे आणि आत्मबलाचे प्रतीक आहे. सीता जनक राजाच्या घरी आली व ही वरील तत्त्वेही आली. परंतु, सीता हरण केल्याने लंकेतील ज्ञान आणि भौतिक गोष्टींचा अंत झाला. यशवंतराव चव्हाणांनी या पद्धतीच्या ज्ञानाचे संकलन करण्याचा विचार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संकल्पनेमध्ये समाविष्ट केला. अशा संकल्पना त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेल्या होत्या. जात्यावरच्या गाण्यांमध्ये मोठे ज्ञान आहे याची जाणीव त्यांना झाली होती. 'नका बाळांनो डगमगू, चंद्र सूर्यावरील जाईल ढगू' ही जात्यावरील कविता मुख्यत्वेकरून कोणत्याही संकटाचा व्यक्ती सामना करू शकते, हे तत्त्वज्ञान विकसित करते. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याच्या संकलनासाठी संपूर्ण आयुष्य घालवले. त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य माला सुरू केली, तेव्हा सरकारने महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर होत्या. या सर्व साहित्य संकलनामधून असे दिसून आले, की ज्ञान हे आपल्या भोवताली आहे. ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवातून सहजासहजी बोलींमध्ये आणलेले होते. बोलीभाषेतील ज्ञान सरोजिनी बाबर यांनी ज्ञान व्यवहारांच्या संस्थेमध्ये आणले. मोहन डकरे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या दीक्षांत समारंभांमध्ये केलेल्या भाषणाचे संकलन केले आहे. त्या संकलनामध्ये त्यांनी भोवतालचे ज्ञान संकलित करण्याची संकल्पना मांडलेली आहे. 

ऑर्कुट संस्कृती 
एकोणीशे ऐंशीनंतर ऑर्कुट संस्कृती हळूहळू वाढू लागली. यामुळे भोवतालच्या ज्ञान संकलनाचा उद्देश मागे पडला. सांस्कृतिक वारसा विसरला गेला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासात जी वाढ साठ-सत्तरच्या दशकात झाली ती वाढ पुढे होऊ शकली नाही. १९९० नंतर महाराष्ट्रात आयआयटीचे क्षेत्र विकसित झाले. नव्वदीच्या नंतरचा महाराष्ट्रीय समाज हळूहळू ऑर्कुटवर आला. ऑर्कुटवर मराठी भाषिक लोक आल्यानंतर त्यांना सांस्कृतिक आकार दिला गेला नाही. या क्षेत्रातील सरकारची अधिकृत यंत्रणा उभी केली गेली नाही. केवळ सायबर क्राईम या स्वरूपातच त्याच्याकडे पाहिले गेले. सांस्कृतिक विकास संकल्पनेनुसार ऑर्कुटवरती येणाऱ्या मराठी भाषिकांना केवळ खासगी क्षेत्रावरती सोपविण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी सांस्कृतिक महाराष्ट्राचा विकास या संकल्पनेनुसार ऑर्कुटने जोडलेल्या लोकांशी सरकारने संस्थात्मक व्यवहार करणे गरजेचे होते. यामुळे २०१० नंतर ऑर्कुटवरील मराठी भाषिक लोक १९६० पासून विकसित होत गेलेल्या सांस्कृतिक घटकांपासून वेगळे झाले. ऑर्कुटवरील लोक संस्कृतीने वेगळे होऊ लागले. त्यामुळे त्यांची सामाजिक मनस्थिती वेगळी झाली. त्यांच्या राजकीय पक्षांबद्दलच्या निष्ठा बदलल्या. कारण नव्या संस्कृतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला प्रवेश करता आला नाही. नव्या क्षेत्रात प्रवेश केलेल्या मराठी भाषिकांना नवी दिशा देण्याची सांस्कृतिक गरज आहे. कारण आता केवळ ऑर्कुटवरती येणे याला महत्त्व राहिले नाही. यापलीकडे जाऊन जसे युरोपियन तंत्रज्ञानाला चिनी तंत्रज्ञानाने पर्याय दिले, तसे पर्याय सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राने उपलब्ध करून दिले पाहिजेत. हे काम केवळ खासगी क्षेत्रावरती न सोपवता त्याचा विचार सार्वजनिक क्षेत्रात करण्याची गरज आहे. ही यशवंतराव चव्हाणांची दृष्टी डिजिटल सार्वजनिक  काळात आजही कामास येऊ शकते. डिजिटल परंतु सरकारने स्थापन केलेल्या संस्था आणि त्यावर सरकारचे नियंत्रण असेल, तरच सांस्कृतिक विकास ही संकल्पना यशवंतराव चव्हाण यांच्या चौकटीत विकसित होऊ शकते. अन्यथा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात एक मोठी पोकळी या नवीन युगात उभे राहू शकते. थोडक्यात यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेली सांस्कृतिक विकासाची संकल्पना समजून घेऊन महाराष्ट्राचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. 

सामाजिक विकास 
यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक विकासाची संकल्पना महाराष्ट्राच्या विकास संकल्पनेत समाविष्ट केली होती. चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण यांचे मानसिक मनोमिलन व्हावे अशी कल्पना मांडलेली होती. ही संकल्पना सामाजिक एकोप्याची व सलोख्याची आहे. तसेच चव्हाण यांनी वेगवेगळ्या समूहांमध्ये एकोपा घडावा अशी भूमिका घेतली होती. कारण महाराष्ट्र स्थापन झाला, तेव्हा महाराष्ट्र तिभंगलेला होता. चव्हाण यांनी तिभंगलेला महाराष्ट्र एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच सामाजिक एकोपा ही विकासाची पूर्वअट चव्हाण यांनी मांडली होती. सामाजिक विकासाचा संबंध चव्हाण यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी जोडला होता. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारातील शेती, महिला आणि शिक्षण हे तीन मुद्दे महाराष्ट्राच्या विकास संकल्पनेशी जोडून घेतले. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारातील शेतीचे औद्योगिकीकरण आणि महाराष्ट्राचे औद्योगिकीकरण हे दोन मुद्दे संयुक्त महाराष्ट्र संकल्पनेशी जोडून घेतले. शाहू महाराजांच्या विचारातील कृषी-औद्योगिक समाजाची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष विकास संकल्पनेमध्ये उतरवली. सयाजीराव गायकवाड यांच्या विचारातील सांस्कृतिक विकासाचे विविध पैलू त्यांनी महाराष्ट्राच्या विकास संकल्पनेमध्ये सामील केले. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील तळागाळातील व्यक्तींचे हितसंबंध आणि त्यासाठीच्या आत्मबळाची संकल्पना त्यांनी विकास संकल्पनेशी जोडली. लोकमान्य टिळकांच्या विचारातील लोकशाही विचार आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा जाहीरनामा हा त्यांनी विकास संकल्पनेमध्ये सार रूपाने आणला. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील समूहाला त्यांनी राजकीय आणि नोकरीतील भागीदारीची संधी दिली. अशा विविध गोष्टी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या विकास संकल्पनेमध्ये समाविष्ट केलेल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कृषी-औद्योगिक समाजाची कल्पनादेखील महत्त्वाची होती. थोडक्यात चव्हाण यांनी खूप विचार करून विकासाचे प्रारूप विकसित केले होते. या सांस्कृतिक विकास संकल्पनेच्या चौकटीत महाराष्ट्राचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे.

संबंधित बातम्या