समरसता हिंदुत्व ग्रँड सिद्धांत

प्रकाश पवार
बुधवार, 24 जून 2020

समरसता हिंदुत्व ही चौकट सध्याच्या राजकारणात अतिशय कृतिशील आहे. मात्र, या समरसता हिंदुत्व प्रारूपाशी छोट्या-छोट्या संकल्पना कशा जोडल्या गेल्या आणि त्यातून समरसता हिंदुत्व हा ग्रँड सिद्धांत कसा झाला, याचे सविस्तर विश्लेषण... 

कोरोना काळात राजकारण करू नये असा एक सूर आहे. परंतु, वस्तुस्थितीत सर्वच पक्ष राजकारण करत आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांची राजकारण करण्याबद्दल कृतिशीलता दिसून आली. ते विरोधी पक्ष नेते आहेत, तसेच त्यांच्या पाठीशी १०० पेक्षा जास्त आमदारांचे बळ आहे. ही एक गोष्ट राजकारण गतिशील करण्याची आहे. परंतु, यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे समरसता हिंदुत्व ही चौकट राजकारणात खूप कृतिशील आहे. या समरसता हिंदुत्वाचे संबंध बहुजन हिंदुत्व आणि बहुजनवाद यांच्याशी कोणत्या स्वरूपाचे आहेत हे समजून घेतले पाहिजे, तरच हे राजकारण समजू शकते...  

युतीपासून समरसतेचा आरंभ 
 ऐंशीच्या दशकापासून भाजपने ब्राह्मणेतर जातींचे संघटन करण्यासाठी समरसता हिंदुत्व या संकल्पनेचा उपयोग केला. महाराष्ट्राच्या संदर्भात हे सकलजनवाद विरोधातील प्रतिक्रांती होती. बहुजन जातींना सत्तेतील भागीदारी, जातीच्याऐवजी सामूहिक ओळख (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बहुजन, इतर मागास) यांच्याही विरोधातील हे बंड होते. महाराष्ट्राच्या संदर्भात व्यापक अर्थाने राष्ट्रीय मराठा या संकल्पनेच्या विरोधातील बंड होते. कारण राष्ट्रीय मराठा ही संकल्पना सर्वसमावेशक आणि व्यापक होती. ही संकल्पना शिवाजी महाराजांपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत अनेकांनी कष्टपूर्वक रचलेली संकल्पना होती. या संकल्पनेत लोकशाहीकडे वाटचाल करण्याची प्रेरणाशक्ती आणि उद्दिष्ट यांचा शोध घेतला गेला होता. हा मुद्दा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांच्या विचारांमध्ये मध्यवर्ती होता. तोच मुद्दा पुढे यशवंतराव चव्हाण आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस पक्षामध्ये राबवला. म्हणून व्यापक अर्थाने समरसता हिंदुत्व ही संकल्पना सकलजनवाद व बहुजनवादांच्या विरोधातील प्रतिक्रांती म्हणून पुढे आली. समरसता राजकारणासाठी पुढील वैशिष्ट्ये नव्याने घडवली. १) समरसता हिंदुत्वाचे राजकारण अस्पृश्यतेला विरोध (प्रथेला विरोध), परंतु जातिव्यवस्थेला विरोध करत नाही. २) ही संकल्पना जातीयवादाला विरोध करते, परंतु जातिव्यवस्थेला विरोध करत नाही. ३) ही संकल्पना जातीच्या विभाजनाला विरोध करते, परंतु जातीच्या एकत्रीकरणाचे (एकसंघीकरण) तत्त्व स्वीकारते. ४) समरसता हिंदुत्व राष्ट्रीय मराठा (Maratha state) या संकल्पनेऐवजी मराठा कनफेडरसी (Maratha confederacy) ही संकल्पना स्वीकारते. या वाटचालीत सुरुवातीला जनसंघाने जनता पक्षाबरोबर आघाडी केले. त्यानंतर त्यांनी माधव हे प्रारूप स्वीकारले. या दोन्ही उदाहरणांमध्ये समरसता हिंदुत्व चौकटीतील उच्च जातीचे राजकारण दिसते. 

समरसता हिंदुत्वाचे महत्त्वाचे टप्पे आहेत 
     नवहिंदुत्ववादी संघटनांची स्थापना करण्यात आली. या संघटनांचा पाया ब्राह्मणेतर जातींमध्ये वाढला होता. वनवासी कल्याण आश्रम, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त परिषद अशा संघटनांची स्थापना करून महाराष्ट्रात उच्च जातींच्या बाहेर पक्षाला सामाजिक आधार मिळवून देण्यात आले.

     शिवसेना पक्षाबरोबर युती करून शिवसेनेचा बहुजन हिंदुत्व हा सामाजिक पाया म्हणजेच ब्राह्मणेतर जातींमधील सामाजिक पाया भाजपशी जोडून घेतला गेला. ब्राह्मणेतर जातींमध्ये समरसता हिंदुत्वाचे अस्तित्वभान निर्माण केले. थोडक्यात हा टप्पा नवहिंदुत्व अस्तित्वभान ते समरसता हिंदुत्व अस्तित्वभान असा प्रवासाचा होता. या प्रवासामध्ये इतर मागास जाती काँग्रेसच्या बहुजनवादाकडून, शिवसेनेच्या बहुजन हिंदुत्वाकडे वळल्या, त्यानंतर बहुजन हिंदुत्वाकडून समरसता हिंदुत्वाकडे वळवल्या गेल्या. हा बदल जातींच्या संदर्भात समरसता हिंदुत्वाने घडवून आणला.  

     जनता पक्षाबरोबर युती आणि नंतर माधव या प्रारूपाचा वापर केला (माळी, धनगर व वंजारी). याचे प्रतीक म्हणून फरांदे, डांगे, मुंडे यांना ओळखले जात होते. यामध्ये पुढे वतनदार मराठा आणि नवबौद्धोत्तर दलित यांचाही समावेश करण्यात आला. वतनदार, सरदार, देशमुख, राजेराजवाडे या स्वरूपातील मराठा जात ही हिंदुत्वाच्या चौकटीत राजकीय व्यवहार करत होती. माधव हा ओबीसी गटदेखील राजकीय भागीदारी या मुद्यावर भाजपशी जुळवून घेत होता. शिवसेना व भाजप या दोन पक्षांमधून असा दावा केला जातो, की ते पक्ष जात घटकाच्या आधारे राजकारण करत नाहीत. तो त्यांचा दावा बहुजन हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व या दोन चौकटीमुळे सुरक्षित राहिला. 

     समरसता हिंदुत्व प्रारूप समकालीन दशकाच्या सुरुवातीला राष्ट्रीय पातळीवरती वापरण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी हे प्रारूप कौशल्यपूर्ण पद्धतीने वापरले (२०१४ व २०१९). परंतु, यामुळे माधव या प्रकारचे संघटन बाजूला गेले. यातूनच मुंडे गट अस्थिर झाला. यानंतर महाराष्ट्रात माधव या संकल्पनेऐवजी देवेंद्र फडणवीस प्रारूप उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी माधव प्रारूपाचा आशय पातळ केला. खुद्द नितीन गडकरी माधव प्रारूपाच्या काळात घडलेले नेतृत्व होते. परंतु, त्यांचाही प्रभाव अव्वल दर्जाचा राहिलेला नाही. 

छोट्या संकल्पना आणि ग्रँड सिद्धांत
 देवेंद्र फडणवीस प्रारूप, माधव प्रारूप या छोट्या छोट्या संकल्पना आहेत. या छोट्या-छोट्या संकल्पना समरसता हिंदुत्व प्रारूपाशी घट्टपणे जोडल्या गेल्या आहेत. तसेच समरसता हिंदुत्व प्रारूपाला ऐतिहासिक मतभिन्नता या प्रक्रियेतूनदेखील बळ मिळत जाते. उदा. रामायणाची संकल्पना ही समरसता हिंदुत्वाशी संवादी भाजप मांडते. बहुजन हिंदुत्व राम मंदिराचा मुद्दा उठवते. परंतु, लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या राम विषयक सार्वजनिकतेशी सध्या बहुजन हिंदुत्व जुळवून घेत नाही. यामुळे समरसता हिंदुत्व आणि बहुजन हिंदुत्व या दोन संकल्पनांमध्ये अंतर पडते. बहुजन हिंदुत्व समर्थकांमध्ये वैचारिक पातळीवरती संभ्रम निर्माण होतो. उदा. भारतात पंचकन्या ही एक कल्पना आहे. पंचकन्या म्हणजे आहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी त्यांचा समावेश होतो. काही श्लोकांमध्ये सीतेऐवजी कुंतीचा समावेश केला जातो. यांमधून महापापाचा नाश अशी एक अस्मिता पुढे येते. यावर स्त्रीवादी अभ्यासकांनी टीका केली आहे. भट्टाचार्य यांनी 'द फाईव्ह व्हर्जन्स ऑफ इंडियन एपिक्स' या पुस्तकात त्यांनी पुरुषसत्ताक समाजाची ही संरचना आहे अशी मांडणी केली आहे. तसेच मीना केळकर यांनी 'सबॉडिनेशन ऑफ वूमेन अ न्यू पर्सपेक्टिव्ह' या पुस्तकातदेखील त्यांनी पुरुषसत्ताक समाज ही संरचना या पंचकन्या यांच्याबद्दल मांडलेली आहे. या संकल्पना सार्वजनिक पातळीवर समरसता हिंदुत्वविरोधी आहेत, असे आकलन तयार होते. यापेक्षा वेगळे आकलन बहुजन आणि बहुजन हिंदुत्व चौकटींना तयार करता आले नाही. तशीच गोष्ट हनुमान चालिसाबद्दलची आहे. हनुमान चालिसा किंवा पंचकन्याची कल्पना ही समरसता हिंदुत्व चौकटीत विचार करण्यास प्रवृत्त करते. बहुजन आणि बहुजन हिंदुत्व या चौकटीत विचार करण्यास प्रवृत्त करणारे राजकीय प्रयत्न होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत हनुमान चालिसा या संकल्पनेचा बहुजन चौकटीत विचार सार्वजनिक पातळीवर मांडला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्पर्धक म्हणून पुढे आला. म्हणजेच समरसता हिंदुत्व हा एक ग्रँड सिद्धांत झाला आहे. या सिद्धांताशी वैचारिक मतभिन्नता नोंदवण्याची संपूर्ण ताकद सकलजनवाद, बहुजनवाद आणि बहुजन हिंदुत्व यांनी कमावलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेतात, हे त्यांना समजत नाही. हीच सध्या भाजपची ताकद आहे. 

फडणवीस प्रारूप
देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने सामाजिक आणि जातींच्या संदर्भात समरसता हिंदुत्व प्रारूपाची डागडुजी केली. त्यांनी घडवलेली वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. १) यशवंतराव चव्हाण प्रणीत बहुजनवाद या प्रारूपाला त्यांनी विरोध केला. त्यामुळे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय बांधणीला त्यांनी विरोध केला. २) बहुजन हिंदुत्व या चौकटीतील ब्राह्मणेतर जातींना फडणवीस यांनी समरसता हिंदुत्व चौकटीमध्ये सामील करून घेण्याचा कार्यक्रम राबविला. 
३) पश्चिम महाराष्ट्रातील मराठा घराणे त्यांनी भाजपमध्ये आणली. उदाहरणार्थ विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील इत्यादी. मराठा कॉन्फेडरेसी (confederacy) अशी संकल्पना फडणवीस यांनी घडवली. मराठा संघ ही संकल्पना राष्ट्रीय मराठा या संकल्पनेच्या विरोधी अर्थाने वापरण्यात आली व कृतिशील करण्यात आली. 
४) अस्पृश्यतेला विरोध या तत्त्वाच्या आधारे समरसता हिंदुत्व आणि अनुसूचित जाती यांच्यामध्ये एक नवीन राजकीय सहकार्याचा पूल बांधला गेला. याचे एक उदाहरण म्हणजे रामदास आठवले यांना दिल्लीच्या राजकारणात सामील करून घेतले. तसेच २०१९ च्या महाराष्ट्र राज्यातील देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारात आठवले गटाचा एक मंत्रीही करण्यात आला. हे प्रारूप तळागाळात वाढले होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील १७ महानगरपालिकाच्या निवडणुकांत २३५ जागा अनुसूचित जातींसाठी होत्या, या २३५ पैकी १२३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा तीन पट जास्त जागा भाजपने जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जवळजवळ अकरा पट जास्त जागा मिळवल्या होत्या. म्हणजेच शहरी भागात अनुसूचित जाती भाजपकडे फडणवीस यांनी वळवल्या. ही शहरी भागात दलित वर्गात समरसतेची राजकीय क्रांती झाली होती. ग्रामीण भागात भाजपने जिल्हा परिषदेच्या ३० टक्के जागा अनुसूचित जाती गटातील जिंकल्या होत्या. २२७ पैकी ६८ जागा अनुसूचित जाती गटातील भाजपने जिंकल्या होत्या. या उदाहरणावरून असे दिसते, की ग्रामीण भागातदेखील समरस हिंदुत्व विचारांचा प्रसार अनुसूचित जातीत २०१७ मध्ये झाला होता. ५) भाजपने ग्रामीण भागामध्ये पक्षाचा विस्तार तळागाळात केला. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप २०१७ मध्ये पुढे आला. कारण भाजपला एक चतुर्थांशपेक्षा जास्त जागा मिळाल्या. विशेषतः भाजपला १५१० पैकी ४०१ जागा मिळाल्या होत्या (२६.५५ टक्के). थोडक्यात ग्रामीण भागातील ब्राह्मणेतर जाती भाजपकडे २०१४ ते २०१९ या दरम्यान फडणवीस यांनी वळवल्या होत्या. जिल्हा परिषदेतील ओबीसींच्या जागा भाजप (२५.२४ टक्के) आणि राष्ट्रवादीच्या (२५.९९ टक्के) जवळजवळ समसमान निवडून आल्या होत्या. यामुळे भाजप हा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्पर्धक झाला होता. ६) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राखीव मतदारसंघात इतर पक्षांच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या. भाजपला इतर पक्षांच्या तुलनेत जादा मते मिळाली. म्हणजेच समरसता हिंदुत्व ही संकल्पना बहुजन जातींचे संघटन करण्यात यशस्वी ठरली. या प्रकारच्या चौकटीने जात संघटनांचे राजकारण समकालीन दशकामध्ये जवळजवळ संपुष्टात आणले. परंतु, तरीही जातीवर आधारित संस्थांची स्थापना समरसता हिंदुत्व चौकटीने केली (सारथी).

संबंधित बातम्या