सारासार विवेक

प्रकाश पवार
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सारासार विवेकानुसार वागणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनापेक्षा राज्यसंस्था आणि मानवी सारासार विवेक या दोन्ही गोष्टी सार्वजनिक आरोग्यापुढे कशाप्रकारे आव्हान उभे करत आहेत, याविषयी चर्चा... 

महाराष्ट्र शासन कोरोना संदर्भात जास्त जागृत व अतिकृतिशील झाले आहे, असे दिसते. इतर राज्य आणि इतर देशांच्या तुलनेत ही गोष्ट स्पष्टपणे दिसते. सरकारी यंत्रणांमधील लोक त्यांचा जीव धोक्यात घालून कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, राज्यसंस्थेच्या विरोधात एकाच वेळी अनेक घटक काम करत आहेत. यामुळे राज्यसंस्थेची कामगिरी केवळ कोरोना निमूर्लनाशी संघर्ष करणारी राहिलेली नाही. कोरोनाच्या मदतीने राज्यसंस्थेवर इतर संस्थांनी हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यसंस्थेला जास्त ताकदीने काम करावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते, की या सरकारच्या कसोटीची अजून वेळ आली नाही. परंतु, कोरोनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या कसोटीची वेळ आली आहे. या सरकारचा मुख्य संघर्ष कोरड्या विवेकाविरोधी सर्वात जास्त आहे, असे कोरोनाच्या निमित्ताने दिसते. मानवाला जीवनामध्ये संघर्ष हा अटळ आहे. मानवी जीवनातील संघर्षात मानवी विवेक व राज्यसंस्था सर्वात जास्त मदतीस येते. हे दोन्ही घटक दोन टोकांची बाजू घेऊ लागले, तर मानवी जीवनातील संघर्ष वाढत जातो. याची अनेक उदाहरणे कोरोना विषाणूमुळे दिसून आली. चीन, इटली, अमेरिका इत्यादी देशातील राज्यसंस्था या बेफिकीर होत्या. त्यांनी सारासार विचार करणारी भूमिका घेतली नाही. तशीच अवस्था मानवी विवेकाची झाली आहे. सुशिक्षित वर्ग सारासार विवेकानुसार त्यांचे दैनंदिन वर्तन करत नाही. ही वस्तुस्थिती भारतात दिसते. यामुळे कोरोना विषाणूपेक्षा राज्यसंस्था आणि मानवी सारासार विवेक या दोन्ही गोष्टी सार्वजनिक आरोग्यापुढील मोठी आव्हाने झाल्या आहेत. या दोन्ही गोष्टी कोरोनाच्या निमित्ताने दररोज दिसत आहेत.

कोरोनाचा प्रसार 
    कोरोना विषाणूच्या प्रसाराचे महत्त्वाचे कारण सारासार विवेकाचा अभाव हे एक आहे. हे केवळ कारण आहे, परंतु त्याचा कार्यकारणसंबंध महत्त्वाचा आहे. त्याचा कार्यकारणसंबंध म्हणजे भारतात मध्यम वर्ग, सुशिक्षित वर्ग सध्या आकाराने मोठा आहे. या वर्गातील लोक विवेकशील आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, ते सारासार विवेकशील नाहीत. हा फरक भारतात कोरोनाच्या निमित्ताने दिसतो. कारण विदेशातून आल्यानंतर ज्यांचे विलगीकरण केले, ते सर्व लोक शिक्षित होते. नुसते शिक्षित नव्हे, तर उच्च शिक्षित होते (कुलगुरू, अधिष्ठाता, प्राध्यापक, कलाकार, आयआयटीतील नवीन बुद्धिजीवी). त्यांच्याकडे कोरोनाबद्दलचे ज्ञानदेखील आहे. कोरोनाची विनाशी ताकद त्यांना माहीत आहे. तरीदेखील अशा व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येतात. विशेष प्रसिद्ध व उच्च पदावरील विवेकी व्यक्तींनी असा व्यवहार केला. त्यांचे विलगीकरण करण्याचा प्रयत्न राज्यसंस्था करत होती. तरीही असा व्यवहार या विवेकी व्यक्ती का करत होत्या. त्याचे कारण म्हणजे सारासार विवेकाचा अभाव हेच आहे. विवेकी असणे ही गोष्ट सामूहिक हिताची असतेच अशी नाही. मात्र, सारासार विवेक ही गोष्ट सामूहिक हिताची असते. विवेकी गोष्ट व्यक्तिगत प्रतिष्ठा, सहकारी प्रयत्नांचा अभाव व ज्ञानाची घमेंड अशी तिहेरी आहे.  

सारासार विवेकामध्ये आत्मप्रतिष्ठेबरोबर समूहांच्या अस्तित्वाचे भान असते. ज्ञानाबद्दल विनय असतो आणि सहकारी प्रयत्नांना अग्रक्रम दिला जातो. या सारासार विवेकाच्या प्रांतात भारतातील मध्यम वर्गातील एक गट जात नाही. असा हा विचार डावा अगर उजवा असो तो अतिरेकी आहे. तो केवळ अतिरेकी नव्हे, तर राष्ट्र घातक, देशविरोधी, मानवी अस्तित्वविरोधी आहे. विवेकी व्यक्तीने सारासार विवेकाच्या प्रांतात जाऊ नये अशी सोयच आपल्या शिक्षण व्यवस्थेने केली आहे. राज्यसंस्थेने शिक्षण हे केवळ प्रसार आणि विस्ताराचे धोरण ठेवले. त्यामुळे त्यातून केवळ विवेकाची जागृती झाली. सारासार विवेकाकडे दुर्लक्ष झाले. यामुळे आज उपद्रव मूल्य असलेला प्रश्‍न अशिक्षित लोकांचा फार कमी आहे. त्यांच्या तुलनेत शिक्षित लोकांमध्ये सत्य परिस्थितीचे ज्ञान नाही ही खरी कोरोना विषयक समस्या आहे. म्हणूनच अशिक्षित लोक त्यांच्या सुशिक्षित लोकांना म्हणतात, की शिकला तो हुकला. अशाच या हुकलेल्या वर्गाचा आकार मध्यम वर्गात मोठा आहे. हे लोक राज्यसंस्थेच्या आदेशाच्या बरोबर उलट कृती करतात. राज्यसंस्थेने वर्क फॉर्म होम म्हटले, तर विवेकशील वर्ग कामाच्या जागेचा आग्रह धरतो. अर्थकारणाचा समतोल ढासळतो असा युक्तिवाद करतो. मात्र, कामाच्या जागेवर कामचुकारपणा करतो. यांची कथा कधीच लक्षात घेत नाही. योग्य परिस्थिती असते, तेव्हा तो आळशी असतो. म्हणून तर लोकमान्य टिळकांना कर्मयोगाची कथा सांगावी लागली होती. ही गोष्ट आज आयटी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, नोकरदार वर्ग यांच्यामध्ये नव्याने सांगण्याची गरज आहे. या सर्व क्षेत्रातील लोक विवेकी आहेत. परंतु, सारासार विवेकी नाहीत. लोकांनी सारासार विवेकी असावे असे राज्यसंस्था तहान लागल्यानंतर सांगते. म्हणजे तहान लागल्यानंतर आड खोदण्याचा विचार राज्यसंस्थेला सुचला आहे. हा कार्यकारण भाव मुख्य आहे. म्हणून कोरोनाशी संघर्ष हा जास्त अवघड झाला आहे. तो केवळ भारतात नव्हे, तर जगातील सर्वच देशांमध्ये हे विवेकाचे पीक उदयास आले आहे. 

विविध संस्थांचे आव्हान 
   कोरोनाच्या उपद्रव काळात राज्यसंस्था व्यक्तीच्या सारासार विवेकाला पुन्हा पुन्हा आवाहन करत आहे. उदा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा सारासार विवेकावर भर देणारी पत्रकार परिषद घेताना दिसले. या खेरीज त्यांच्यापुढे विरोधी पक्ष, समाजव्यवस्था, अर्थकारण अशा व्यवस्थांनी मोठी आव्हाने उभी केली. समाजव्यवस्था सारासार विवेक सोईस्करपणे बाजूला ठेवते. अशा प्रकारचा विवेक हा कोरडा विवेक आहे. तो केवळ कामाच्या जागी दिसतो असे नव्हे, तर जन्म दिन, नामकरण विधी, लग्न समारंभ, दहावा आणि तेराव्यामध्ये दिसतो. त्यामुळे कधी एकत्र यावे आणि कधी येऊ नये यामधील सारासार विवेकाचे सूत्र समाजव्यवस्थेत जवळपास हद्दपार झाले आहे. कोरोना कशामुळे बरा होतो. या गोष्टीची समाजव्यवस्था अविवेकी चर्चा करते. तसेच अविवेकी माहितीचे प्रसारण केले जाते. थोडक्यात समाज कोरोनापासून भीतिमुक्त समाज करण्याऐवजी भीतियुक्त समाज करतो आहे. धर्मश्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे. धर्मश्रद्धेचा आदर करावा. परंतु, धार्मिक क्षेत्रांशी संबंधित लोक धर्मश्रद्धेऐवजी अंधश्रद्धेचा प्रसार कोरोनाच्या मदतीने करताना दिसले. अविवेकी औषध उपचार सुचवले गेले. या विरोधी राज्यसंस्थेला भूमिका घ्यावी लागली. म्हणजे धार्मिकतेमध्येदेखील सारासार विवेकावर आधारलेली धर्मश्रद्धा आणि केवळ उपयुक्ततावादी विवेकी अंधश्रद्धा असा समाजात दररोज फरक दिसत आहे. कोरोनाच्या निमित्ताने राज्यसंस्थेचा संबंध व्यापार-सेवा क्षेत्राशी आला. सर्वात जास्त या क्षेत्रात राज्यसंस्थेला काम करावे लागले. बाजारपेठा बंद कराव्या लागल्या. तसेच विविध सेवांवर निर्बंध घालावे लागले. व्यापारी वर्गाने राज्यसंस्थेला सारासार विवेकी प्रतिसाद दिला. परंतु, एकूण बाजारपेठा-सेवा क्षेत्रांशी संबंधित भांडवली अर्थकारण असते. यामुळे राज्यसंस्था आणि व्यापारवाद-भांडवलवाद यांचा मुख्य संघर्ष सुरू झाला. राज्यसंस्थेला व्यापारवाद-भांडवलशाहीवर नियंत्रण घालण्याचा अधिकार आहे. त्यांचे महाराष्ट्रात आत्मभान राज्यसंस्थेला दिसले. परंतु, भारतीय राज्यसंस्था चीन, इटली, अमेरिका या पद्धतीने व्यवहार करत होती. महाराष्ट्रातील राज्यपातळीवरील आणि स्थानिक राज्यसंस्था या दोन आठवड्यांत अतिगतिशील दिसली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कॅबिनेट मंत्रिमंडळ, आरोग्य यंत्रणा यांनी चीन, इटली, अमेरिकेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, सारासार विवेकबुद्धीच्या अभावामुळे आपली राज्यसंस्था काय करत आहे, यांचे आत्मभान व्हॉट्‌सॲप विद्यापीठाच्या नवबुद्धिजीवी वर्गाला राहिले नाही. त्यामुळे हा व्हॉट्‌सॲप विद्यापीठाचा नवबुद्धिजीवी वर्ग पुन्हा पुन्हा राज्यसंस्थेला कोरोना संदर्भात आव्हान देतो, असे दिसते. विविध संस्था आणि राज्यसंस्था यांच्यामध्ये कोरोनाच्या विषयावर संघर्ष सुरू आहे. यांपैकी शैक्षणिक संस्था, आयटी क्षेत्रातील कंपन्या यांचा समावेश होतो. राज्यसंस्थेच्या परिपत्रकांचे अर्थ या संस्थांनी त्यांच्या सोईनुसार लावले. राज्यसंस्थेचा आदेश या संस्थांनी पाळला नाही. त्यामुळे आरंभी सौम्य शब्दांत राज्यसंस्थेने कारवाईची भाषाशैली वापरली. परंतु, तरीही या संस्था राज्यसंस्थेचा आदेश पाळत नव्हत्या, त्यामुळे सरतेशेवटी पोलीस यंत्रणेमार्फत नियंत्रण घातले. पोलीस यंत्रणा आणि या विविध संस्था यांच्यामध्ये वादविवाद झाले. याचा अर्थ राज्यसंस्थेच्या आदेशाचे पालन विविध संस्था करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे ही राज्यसंस्थेच्या पुढील सर्वांत अवघड कामगिरी आहे. एकूण राज्यसंस्थेला कोरोनाच्या निमित्ताने अशा विविध संस्थांनी कोंडीत पकडले आहे. त्यामुळे राज्यसंस्थेच्या पुढे महायुद्धासारखी परिस्थिती उद्‌भवली आहे. थोडक्यात महाराष्ट्र सरकारमधील सहकारी प्रयत्नांच्या कसोटीची ही कथा सुरू झाली आहे. ज्ञानाची घमेंड न बाळगता केवळ सारासार विवेकाला जागृत करण्याची महत्त्वाची कामगिरी करावी लागत आहे. उदा. कोरोनावर औषध नाही, परंतु इतर औषधांचा कौशल्याने उपयोग करण्याच्या क्षमतांची ही परीक्षा आहे. उदा. एचआयव्ही संबंधीची औषधे सारासार विवेकाच्या आधारे उपयोगात आणली गेली. तसेच लोकांमध्ये सावळा-गोंधळ व अराजक निर्माण होऊ नये म्हणून सतत उद्धव ठाकरे- राजेश टोपे यांची सारखे संवादी राहण्याची कसोटी सुरू झाली. या आघाडीवर सध्या तरी महाराष्ट्र सरकारने नांगर टाकून काम सुरू केले आहे. परंतु, पुढे-पुढे यापेक्षा मोठी समस्या उभी राहणार आहे. ती समस्या कोरोनामुळे जशी उभी राहणार आहे, तशीच ती राज्यसंस्थेच्या खेरीजच्या इतर संस्था उभ्या करणार आहेत. यामुळे राज्यसंस्थेपुढे विवेक, समाजव्यवस्था, कोरडी अंधश्रद्धा, विविध सांस्कृतिक संस्थांचे मोठे आव्हान आहे. या गोष्टी जास्त उपद्रवमूल्य निर्माण करणाऱ्या आहेत. कारण त्यांचे विचार स्वातंत्र्य आणि माहितीचे प्रसारण करण्याचे स्वातंत्र्य उपकारक ठरण्याऐवजी अपकारक ठरत आहे. यावरील सर्वात चांगला उपाय म्हणजे नागरिकांनी सारासार विवेकबुद्धी जागृत केली पाहिजे. तसेच राजकीय पातळीवरील तिभंगलेपण कमी केले पाहिजे. तसेच राजकारण विरोधी अर्थकारण या द्वैताची धार कमी केली पाहिजे, नाहीतर मानवाच्या अस्तित्वाऐवजी अर्थकारणाची काळजी म्हणजे राष्ट्र घातक आणि मानवता घातक ठरेल.

संबंधित बातम्या