महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 

प्रकाश पवार 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

राज-रंग

राजकीय पक्ष आणि सर्व निवडणुका एकसारख्या नसतात. परंतु त्यांचे मोजमाप एकाच पद्धतीने केले जाते. हे दोन मुद्दे नव्याने समजून घेतले पाहिजेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सर्वसाधारण व विशेष निवडणुका अशा दोन म्हणून परिचित आहेत. परंतु सामान्यपणे त्याकडे एकाच मोजपट्टीने पाहिले जाते. सर्वसाधारण विधानसभा निवडणुका हा एक प्रकार आहे. उदा. १९६७, १९७२, २००४ व २००९ या चार निवडणुका सर्वसाधारण प्रकारच्या झाल्या आहेत. १९५६, १९६२, १९७७, १९८०, १९८५, १९९०, १९९५, १९९९, २०१४ व २०१९ या निवडणुका विशेष या प्रकारच्या आहेत. या दोन्ही निवडणुकांची कथा वेगवेगळी आहे. 

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६२ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली. या विधानसभा निवडणुकीने महाराष्ट्रातील काँग्रेस व्यवस्थेचा पाया घातला. या निवडणुकीने एक पक्षपद्धती महाराष्ट्रात सुरू केली. हे या निवडणुकीचे खास वेगळे वैशिष्ट्य होते. इतर पक्षांना मिळून फारच कमी जागा मिळाल्या. कोणत्याही पक्षाला साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. तसेच संयुक्त महाराष्ट्र स्थापनेमुळे विरोध करण्याचे कारण शिल्लक राहिलेले नव्हते. या निवडणुकीनंतर रजनी कोठारी यांनी विश्लेषण केलेल्या काँग्रेस व्यवस्थेप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राज्यपातळीवर काँग्रेस व्यवस्था आकाराला आली. ही एक महत्त्वाची राजकीय प्रक्रिया या निवडणुकीने घडवून आणली. १९६७ विधानसभा निवडणूक १९६२ च्या विधानसभा निवडणुकीचे सातत्य राखणारी होती. या अर्थाने १९६७ निवडणूक ही सर्वसाधारण याप्रकारची आहे. विशेष म्हणजे १९६२ पासून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रयोग राबवला गेला. त्यामुळे नवीन नेतृत्व उदयाला आले होते. १९६७ ची निवडणूक पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर झालेली महाराष्ट्रातील पहिलीच निवडणूक होती. परंतु या १९६७ च्या निवडणुकीवर यशवंतराव चव्हाणांचे नियंत्रण होते.  यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेस व्यवस्था महाराष्ट्रात पक्की केली. कारण पक्षाला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. बिगर काँग्रेसवाद उदयास आला होता. परंतु तो राज्यात प्रभावी ठरला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षांची पोकळी दिसून आली. परंतु जनसंघाला पक्ष म्हणून दोन नंबरची मते मिळाली होती. त्यांच्या जागा केवळ चार निवडून आल्या होत्या. 

नंतर १९७२ ची विधानसभा निवडणूक १९६७ च्या निवडणुकीसारखी सर्वसाधारण या प्रकारची आहे. कारण काँग्रेस पक्षाला २०० पेक्षा जास्त जागा आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली. यामुळे १९६२ ते १९६७ या निवडणुकांचे सातत्य दिसून आले. परंतु १९६९ पासून पक्षामध्ये इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये वैचारिक मतभिन्नता दिसून येऊ लागली होती. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या गटाचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये बदल होण्यास सुरुवात झाली होती. काँग्रेसमधील बदलामुळे संघटना नेतृत्व आणि विचारप्रणाली या सर्वच पातळ्यांवर बदल होत होते. १९७२ च्या निवडणुकीनंतर वसंतराव नाईक, चव्हाणांपासून थोडे दूर गेले. त्यांनी इंदिरा गांधी गटाशी तडजोड करून मंत्रिमंडळ स्थापन केले. १९७२ च्या निवडणुकीतदेखील विरोधी पक्षांना फार यश मिळाले नाही. परंतु काँग्रेसविरोधी शक्तींचे एकत्रीकरण करण्याचा विचार जनसंघ करत होता. 

नंतर १९७८ ची विधानसभा निवडणूक ही विशेष या प्रकारची आहे. कारण या निवडणुकीत काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. इंदिरा काँग्रेस व काँग्रेस संघटना असे दोन गट उदयाला आले. यामुळे काँग्रेस पक्षाला प्रथम कमी जागा मिळाल्या. परंतु जनता पक्ष अशी एक काँग्रेस विरोधी आघाडी स्थापन झाली होती. बिगर-काँग्रेसवाद या विचारांचे आघाडी नेतृत्व करत होती. या आघाडीला ९९ जागा आणि २८ टक्के मते मिळाली. यामुळे काँग्रेस पक्षाला पर्याय देता येतो. असा विचार या निवडणुकीतून पुढे आला. या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम केले. कारण काँग्रेसची फूट वाढत गेली. विरोधी पक्षातील काही गट यामुळे सत्तेत आले. लोकशाही आघाडीचे सरकार या निवडणुकीनंतर स्थापन झाले होते. या निवडणुकीने काँग्रेस व्यवस्था या संकल्पनेचा ऱ्हास घडवला. इंदिरा गांधी यांनी अनुसूचित जाती अल्पसंख्याक यांना बरोबर घेऊन राजकारण सुरू केले. इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रातील प्रभुत्वशाली  जातीच्या विरोधात राजकारण करू लागली. याची सुरुवात या निवडणुकीने करून दिली. 

यानंतरची १९८० ची विधानसभा निवडणूक विशेष याप्रकारची आहे. कारण या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचा गट प्रभावी ठरला. इंदिरा काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. यामुळे इंदिरा काँग्रेस हाच खरा काँग्रेस आहे अशी प्रतिमा पुढे आली. या निवडणुकीवर  इंदिरा गांधींचे नियंत्रण होते. इंदिरा गांधी यांनी मराठाविरोधी राजकारण या निवडणुकीतून घडविले. या अर्थाने ही निवडणूक १९७८ च्या निवडणुकीचे सातत्य राखणारी आहे. विरोधी पक्षांची अवस्था पुन्हा एकदा दुबळी झाली. विरोधी पक्ष विखुरले गेले. जनसंघाला फार कमी जागा मिळाल्या. इंदिरा गांधी यांनी इंदिरा काँग्रेसची व्यवस्था काँग्रेस व्यवस्था म्हणून घडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काँग्रेस सावरली गेली. काँग्रेसपासून दूर राहून राजकारण करता येत नाही अशी प्रतिमा या निवडणुकीने तयार केली होती. १९८५ ची विधानसभा निवडणूक इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षातील स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. या निवडणुकीने काँग्रेसमधील एक गट काँग्रेसपासून वेगळे राहून राजकारण करण्याची परंपरा निश्चित झाली. भारतात ही परंपरा १९७८ च्या निवडणुकीतून पुढे आलेली होती. महाराष्ट्रात बहुपक्ष पद्धतीची सुरुवात १९८५ च्या निवडणुकीने केली. भाजपला प्रथमच १६ जागा मिळाल्या. 
 

जागतिकीकरणाचा टप्पा आणि निवडणुका 
नंतरची १९९० ची विधानसभा निवडणूक १९८५ च्या तुलनेत वेगळी आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची युती झाली. यामुळे काँग्रेस पक्षाला प्रबळ विरोधक तिच्या रूपाने या निवडणुकीतून पुढे आला. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेस पक्षाला कसेतरी बहुमत सिद्ध करावे लागले. भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये आणि मतांमध्ये वाढ झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस व्यवस्थेची पुनर्रचना झाली नाही. भाजप-शिवसेना युती मात्र काँग्रेस विरोधी राजकारणाचा भाग म्हणून उदयास आली. त्यांनी बहुजन हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व विचारांची युती केली होती. १९९५ ची विधानसभा निवडणूक ही खास निवडणूक मानली जाते. कारण या निवडणुकीने प्रथमच महाराष्ट्रात बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. काँग्रेस पक्षाचा निर्णायक पराभव झाला. काँग्रेस पक्षाला ८० जागा आणि केवळ ३०.४ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तिसऱ्या आघाडीला फार यश आले नाही. भाजप आणि शिवसेनेच्या मतांची टक्केवारी तीस टक्के होती. तसेच त्यांना अपक्ष गटाने पाठिंबा दिला होता. राजकीय अर्थकारणामुळे या निवडणुकीमध्ये मोठा बदल झाला. १९९१ ला आर्थिक सुधारणाचा पुरस्कार महाराष्ट्रात केला गेला. त्यास मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. आर्थिक सुधारणांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाविरोधी भूमिका सर्व विरोधी पक्षांनी घेतली होती. तसेच काँग्रेसमध्ये पवार गट व काँग्रेस यांच्यामध्येदेखील संघर्ष सुरू होता. 

नंतरची १९९९ ची विधानसभा निवडणूक १९९५ पेक्षा वेगळी होती. कारण काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष उदयाला आले. या दोन्ही काँग्रेस शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात लढल्या. तरीही या निवडणुकीनंतर सत्तांतर घडून आले. विशेष म्हणजे परस्परांच्या विरोधात लढणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीनंतर आघाडी करून सरकार स्थापन केले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना विरोधी पक्षांमध्ये गेले. हा महत्त्वाचा बदल १९९९ च्या निवडणुकीने घडविला. या निवडणुकीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीचे राजकारण सुरू केले. हा या निवडणुकीचा सर्वांत मोठा परिणाम होता. २००४ ची विधानसभा निवडणूक सर्वसाधारण याप्रकारची आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पुन्हा सत्ता मिळवली. भाजप आणि शिवसेना युतीला सत्तेमध्ये येता आले नाही. राजकारण दोन आघाड्यांमध्ये विभागले गेले. ही वैशिष्ट्ये १९९९ च्या निवडणुकीनंतर उदयाला आली होती. तीच वैशिष्ट्ये पुढे टिकून राहिली. २००९ ची विधानसभा निवडणूक सर्वसाधारण याप्रकारची आहे. कारण १९९९, २००४ प्रमाणेच या निवडणुकीतदेखील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जिंकण्याचे सातत्य दिसून आले. भाजप-शिवसेना युतीला सत्तांतर घडवून आणता आले नाही. 

नंतरची २०१४ ची विधानसभा निवडणूक १९९५ प्रमाणेच खास आणि वेगळी ठरली. या निवडणुकीमध्ये चार पक्षांच्या परस्परांशी असणाऱ्या युती आणि आघाडी मोडल्या. चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. या निवडणुकीतून सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपला शिवसेनेबरोबर समझोता करून सरकार स्थापन करावे लागले. या निवडणुकीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. विशेषतः या निवडणुकीतून काँग्रेस व्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास  झाला. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था वेगवेगळी झाल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडला. यामुळे महाराष्ट्रात संरचनात्मक बदलदेखील घडवून आले. संरचनात्मक बदल म्हणजे सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला. शिवसेना-भाजप यांची युती मोडली गेली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती या निवडणुकीत मोडली गेली होती. या निवडणुकीनंतर समरसता हिंदुत्व आणि बहुजन हिंदुत्व या हिंदुत्वाच्या मुख्य चौकटीत घडू लागले. काँग्रेसची मूल्यव्यवस्था हिंदुत्वाच्या या चौकटींना विरोध करण्यास अपुरी पडू लागली. निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा निर्णायक पराभव झाला. शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होऊनही भाजपइतके प्रचंड यश शिवसेना पक्षाला मिळाले नाही. या निवडणूक निकालांचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय पक्षाच्या स्पर्धेमध्ये फेरबदल झाले आहेत. २०१९ ची विधानसभा निवडणूक २०१४ च्या निवडणुकीचे सातत्य राखणारी असली तरी ही निवडणूक वेगळी आहे. २०१९ च्या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीतून भाजप-शिवसेना हे दोन पक्ष दोन टोकांना गेले. या निवडणुकीच्या निकालामुळे बहुजन हिंदुत्व हा शिवसेना पक्ष सत्ताधारी झाला. तर समरसता हिंदुत्व हा भाजप पक्ष विरोधी पक्ष झाला. बहुजन हिंदुत्व या पक्षाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जुळवून घ्यावे लागले. विशेषतः भाजपचा प्रभाव असताना महाराष्ट्रात सत्तांतर घडून आले. हे या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य आहे. या निवडणुकीत पुन्हा नव्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी घडून आली.

संबंधित बातम्या