राजकारणाच्या अंतरंगातील बदल 

प्रकाश पवार
सोमवार, 18 जानेवारी 2021

राज-रंग

राजकारणातील रंग सतत बदलत असतात. परंतु राजकारणातील रंगाबरोबर राजकारणाचे अंतरंगही बदलते. राजकारणाचे अंतरंग सूत्रांवर आधारित आणि तत्त्वांच्या आधारे विकसित होत जाते. अशा महत्त्वाच्या सूत्रांमध्ये बदल सध्या घडून येत आहेत. राजकारणाच्या अंतरंगामध्ये म्हणजेच सूत्रांमध्ये बदल घडणारी तीन राज्यांमध्ये तीन उदाहरणे पुढे आलेली आहेत. त्या तीनही उदाहरणांमधून केवळ राजकारणाचा रंग बदलत नाही तर अंतरंगही बदलते आहे असेच दिसते. ही कथानके प्रचंड बदल घडवणारी म्हणून ओळखली जातात.
 
सामाजिक न्यायाचे सूत्र
सामाजिक न्यायाचे कथानक जुने आहे. परंतु त्याचा संदर्भ ताजा आहे. माधवसिंह सोळंकी हे गुजरात राज्यातील सामाजिक न्यायाचे सूत्र विकसित करणारे एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. माधवसिंह सोळंकी यांनी 1985 मध्ये राज्यात  विधानसभेच्या 182 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या.  हा विक्रम मानला जातो. तसेच या निवडणुकीतून क्षत्रिय, हरिजन,आदिवासी, मुस्लीम यांना एकत्र आणण्याचे एक सूत्र विकसित झाले. अर्थातच हे सूत्र काँग्रेस पक्षाने विकसित केले होते. त्या सूत्राचे शिल्पकार माधवसिंह सोळंकी हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. परंतु विशेष म्हणजे नरेंद्र मोदींच्या राजवटीत आणि नरेंद्र मोदींच्या वारसदारांकडून माधवसिंह सोळंकीचे सूत्र बाजूला ठेवले गेले. माधवसिंह सोळंकी यांचे सूत्र आणि गुजरात मधील  नरेंद्र मोदी राजवट यांच्यामध्ये एक अंतराय होता. माधवसिंह सोळंकी यांनी त्या पेचप्रसंगावर नव्वदी नंतर भक्कम तोडगा काढला नव्हता. त्यामुळे गुजरातच्या राजकारणाचा केवळ रंगच बदलला नाही. तर गुजरातच्या राजकारणाचे अंतरंग देखील बदलले. यामुळे गुजरातचे राजकारण द्वीपक्षीय स्पर्धेचे असूनही नरेंद्र मोदी राजवटीच्या वर्चस्वाचे म्हणून देखील ओळखले जाते. हा बदल १९९० पासून जवळपास तीस वर्ष गुजरातच्या राजकारणात दिसत आहे. म्हणजेच राजकारणातील घडामोडी या रंगाबरोबर अंतरंगातही बदल करणाऱ्या असतात.

वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच
माधवसिंह सोळंकी यांनी गुजरात मध्ये नवीन राजकारणाचे सूत्र विकसित केले होते. तसाच बदल राजस्थान मध्ये अनेक दिवसांपासून घडत आहे. परंतु निर्णायकपणे बदल मात्र होत नाही. राजस्थानमधील राजकारण राजघराण्याच्या वर्चस्वाखाली घडत आलेले आहे. परंतु राजस्थानमध्ये राजघराणे आणि आम जनता यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. यातूनच राजस्थानमध्ये सत्तांतर घडले. भाजप आणि वसुंधरा राजे यांच्यामध्ये  राजकीय अंतराय धूसर स्वरूपात स्पष्ट झाला. हा अंतराय वाढत चालला आहे; कारण राजस्थानात वसुंधराराजे समर्थकांनी नवीन संघटना स्थापन केली आहे. आत्ता इतक्यातच, जानेवारीच्या ९ तारखेला ही नवी संघटना -वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच -स्थापन झाली. वसुंधरा राजे समर्थकांनी या मंचाच्या रूपाने नवी संघटनात्मक संरचना निर्माण केली. राजस्थानातल्या पंचवीस जिल्ह्यांमध्ये या संघटनेचे पदाधिकारी आहेत. या घडामोडीमुळे भाजपमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून सुंदोपसुंदी वाढलेली दिसते. हे सूत्र छोटे असले तरी राजकारणाच्या अंतरंगात बदल करणारे आहे. अशा सूत्रांमुळेच पक्षाची ताकद कमी होत जाते. वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंचाने २०२३ साठी उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. ते उद्दिष्ट आहे वसुंधरा राजे यांना पुन्हा सत्तेमध्ये आणण्यासाठीचे. ह्या उद्दिष्टा मुळे राजे विरोधी आम जनता ह्या संघर्षशील राजकारणाच्या पटावर समाजातील एका बाजूला सरंजामदार वर्ग आणि दुसऱ्या बाजूला आम जनता यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष सुरू आहे. हे राजस्थानच्या राजकारणाचे सूत्र महत्त्वाचे म्हणून सध्या विकसित होत आहे. या सूत्राच्या संदर्भात राजकीय पक्षांना आपली भूमिका स्पष्ट करावे लागणार आहे.
 
लोकशाहीच्या अंतरंगात बदल
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या संदर्भात उमेदवारांसाठी सातवी पासची अट लागू केलेली आहे. उमेदवार किमान सातवी पास असावा ही बाब वरवर छोटी आहे. परंतु ती राजकारणाच्या अंतरंगामध्ये प्रचंड बदल करणारी आहे. कारण सातवी पास नसणारा जवळपास पंचवीस ते तीस टक्के वर्ग आहे. त्यांना यामुळे  राजकारणातून वगळले जाणार आहे. लोकशाहीचा अर्थ समावेशक लोकशाही असा होता. त्याऐवजी ‘वगळणारी लोकशाही’ असा नवीन अर्थ महाराष्ट्रात विकसित होत आहे. याबरोबरच लोकशाही म्हणजे स्वतःचे प्रतिनिधित्व स्वतः करणे होय. परंतु सातवी पास नसणाऱ्या समूहाला स्वतःचे प्रतिनिधित्व स्वतः करता येणार नाही. म्हणजेच महाराष्ट्रातील राजकीय प्रतिनिधित्वाची संकल्पना बदलली आहे. राजकीय प्रतिनिधित्व सुशिक्षितांनी करावे. अशिक्षितांचे राजकीय प्रतिनिधी सुशिक्षित असतील, असा बदल लोकशाहीच्या अंतरंगात घडत आहे. हे सूत्र देखील प्रतिनिधित्वाची संकल्पना अंतर्गत पातळीवर बदलणारे आहे. या बदलामध्ये विशेष मुद्दा म्हणजे सातवी पास व्यक्ती विवेकी असणार आहे आणि सातवी पास नसणारी व्यक्ती अविवेकी असणार आहे, असा आहे. म्हणजे विवेक मोजण्याची फुटपट्टी सातवी पास ही राजकारणात आलेली दिसून येते. विवेक म्हणजे शहाणपण आणि सारासार विचार करण्याची क्षमता या गोष्टी मात्र सातवी पासच्या निकषावर आधारित रद्दबातल ठरल्या आहेत. पन्नास आणि साठीच्या दशकात अशिक्षित लोकांनी लोकशाही यशस्वी केली. तेव्हा अशिक्षितांमध्ये शहाणपण आणि सारासार विचार करण्याची क्षमता होती, या गोष्टीवरील विश्वास सत्तर वर्षांनंतर संपलेला दिसतो. त्याऐवजी सातवी पास म्हणजे विवेक अशी राजकारणाची नवीन व्याख्या पुढे आली आहे. सातवी पासचे सूत्र राजकारणाच्या मुख्य पायाला बदलवणारे आहे. वर नोंदवलेल्या तिन्ही घटना छोट्या आहेतच परंतु त्या राजकारणाचे तत्त्वे आणि सिद्धांत यामध्ये बदल करतात त्यामुळे त्या जास्त गंभीर आहेत

संबंधित बातम्या