समरसता हिंदुत्व

प्रकाश पवार
सोमवार, 25 जानेवारी 2021

राज-रंग

अस्मिता ही घडामोड सामाजिक व राजकीय कृतीतील दुवे समजून सांगते. विशिष्ट लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामध्ये राजकीय अस्मितेचे राजकारण उदयास येते. पश्चिम बंगालमध्ये निर्वासित समूहामध्ये अस्मितांचे राजकारण संसाधने व हक्कांच्या वाटपाचा दावा करणारे उदयाला आले. त्यांची ओळख सामाजिक, स्वयम् निश्चित व वंश आधारितदेखील व्यक्त केली जाते. 

अस्मितेचे राजकारण दोन प्रकारे व्यक्त होते. एक, सामाजिक, आर्थिक, राजकीय हितसंबंध सामूहिक म्हणून ओळखले जातात. दोन, त्यांचा एक गट तयार होतो. संघटना स्थापन होतात. तसेच ओळख स्थिर होते. त्या ओळखीचे मोजमाप करण्याइतपत रचना उदयाला येतात. म्हणजेच गटांचे सदस्य आणि गटाबाहेरील सदस्य असे दृश्य रूप दिसते. या गोष्टींमधून राजकीय कृती, पक्षांचे समर्थन, विशिष्ट पक्षाला मते देणे, विशिष्ट धोरणाचे समर्थन करणे अशा कृती घडत असल्याने पक्ष अस्मितेच्या राजकारणाशी जुळवून घेतात, अस्मितेच्या राजकारणाला पाठिंबा देतात. भारतीय राजकारणात हे दररोज घडत असते. परंतु विचारप्रणालीच्या संदर्भात अस्मितेचे राजकारण घडवले जाते. अशीच घटना पश्चिम बंगालमध्ये सध्या मागास समूहामध्ये घडत आहे. मागासवर्ग आणि सामाजिक समरसता यांचा संबंध पश्चिम बंगालच्या राजकीय प्रक्रियेत जोडला गेलेला आहे.

सामाजिक समरसता ही संकल्पना रा.स्व. संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मांडली. या संकल्पनेच्या मांडणीची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय पातळीवरती कृतीशील आहे. बाळासाहेब देवरसदेखील राष्ट्रीय पातळीवर कृतिशील होते. परंतु त्यांनी समरसता संकल्पनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यापासून केली. ही संकल्पना महाराष्ट्रानंतर गुजरात आणि हळूहळू हिंदी भाषिक भागांमध्ये विस्तारत गेली. पश्चिम बंगालमध्ये मात्र संकल्पना अगदी अलीकडच्या काळात स्वीकारली जात आहे. या संकल्पनेचा पश्चिमेकडून पूर्वेकडील प्रवास घडण्यास खूप दिवस लागले. जवळजवळ चाळीस वर्षानंतर ही संकल्पना पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये दृश्य स्वरूपात घडताना दिसते. थोडक्यात महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंतचा प्रवास करण्यास या संकल्पनेला चाळीस वर्षे लागली. म्हणजेच पश्चिम बंगालने सामाजिक समरसता हिंदुत्व हा विचार आणि राजकीय प्रक्रिया स्वीकारण्यास खूपच काळ घेतला.

मागास समूहातील प्रतिक्रांती 

 पश्चिम बंगालमधील मागास समूहामध्ये विचार आणि मूल्य या संदर्भात फेरबदल होत आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणात मार्क्सवादी क्रांतीपासून ते सामाजिक समरसता हिंदुत्व क्रांती पर्यंतचे मोठे बदल होत आहेत. पश्चिम बंगाल शक्तीपूजक आहे. सहमतीपेक्षा शक्तीपूजक राजकारण हा पश्चिम बंगालचा गुणधर्म आहे. त्यामुळे सहमतीच्याबरोबर शक्ती असे मिश्र तात्त्विक राजकारण पश्चिम बंगालमध्ये घडते. लोकशाही चौकटीत मार्क्सवादी पक्षदेखील आक्रमक भूमिका मांडत होते. तसेच प्रदेशवादाच्या चौकटीत ममता बॅनर्जीदेखील आक्रमक भूमिका मांडतात. यामुळे लोकशाहीच्या चौकटीमध्ये शक्तीचे समर्थन आणि आक्रमकता या गोष्टी पश्चिम बंगालने स्वीकारल्या, हे पश्चिम बंगालच्या राजकारणाचे खास वैशिष्ट्य आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला वर्ग संघर्षाचा मुद्दा मध्यवर्ती होता. त्याला ‘लाल सलाम’ म्हटले जात होते. यामध्येदेखील शक्तीपूजक राजकारण घडले. यानंतर राजकारणात ‘मॉ, माटी, मनुष्य’ असा नवीन प्रवास सुरू झाला. तो बदलदेखील होऊन एक दशक उलटून गेले आहे.  

या दशकभरात शक्तीची अनेक उदाहरणे घडली. त्यानंतर गेल्या दशकात भाजपने नव्याने समरसता हिंदुत्व पद्धतीचे संघटन सुरू केले. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे मागास जाती आणि हिंदू अस्मिता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न भाजपने केला. उदा. पश्चिम बंगालमध्ये मतुआ हा मागास समाज आहे. अनुसूचित जाती या वर्गवारीतील हा समाज बांगलादेशातून आला. पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या जवळपास अठरा लाख आहे. या लोकसंख्येत मतुआ समाजाची लोकसंख्या सतरा टक्के आहे. त्यांचे संघटन १९४७ पासून केले जाते. मतुआची महासभा ही संघटना आहे. त्याच्या कितीतरी आधी, १८६०मध्ये, मतुआ महासंघ ही धार्मिक चळवळ सुरू झालेली होती. उत्तर-दक्षिण चोवीस परगणा, नंदिया भागांत हा समूह निर्णायक आहे. या भागातल्या २९४ पैकी ९० विधानसभा मतदारसंघांत त्यांचा प्रभाव दिसतो, असा अंदाज व्यक्त केला जातो. मतुआ समाजाचे संघटन हरिश्चंद्र ठाकुर यांनी केले. राजकारणाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. हरिश्चंद्र यांचे नातू प्रमथा रंजना ठाकुर १९५२मध्ये काँग्रेसचे आमदार होते. हा समूह १९७७मध्ये काँग्रेसकडून डाव्या पक्षांकडे वळला. पुढे नागरिकत्व आणि जमिनीच्या हक्कामुळे डाव्यांवर नाराज झाल्याने २०१०मध्ये हा समूह ममता बॅनर्जी यांच्या पक्षाशी जोडला गेला. बोरो हे त्यांचे महत्त्वाचे नेते ममता बॅनर्जी यांच्या पक्षाबरोबर होते. ममता बॅनर्जी यांनी २०१८ मध्ये मतुआंसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. परंतु गेल्या दशकात ह्या समूहाचा राजकीय कल भाजपकडे झुकलेला आहे. खुद्द नरेंद्र मोदी बिनपानी देवी यांना भेटले होते. मार्क्सवादी पक्ष, काँग्रेसची मध्यम विचारसरणी, तृणमूल काँग्रेसचा प्रदेशवाद असा प्रवास करत हा मतुआ समूह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचा समर्थक म्हणून मोठ्या प्रमाणावरती कृतिशील झालेला दिसतो. हा पश्चिम बंगालच्या राजकारणातील  मागास समूहांच्या संदर्भात मोठा वैचारिक फेरबदल झाला. या बदलाला डावी विचारसरणी प्रतिक्रांती म्हणून ओळखते. तर संघ आणि संघपरिवार यास सामाजिक समरसता क्रांती म्हणून ओळखतो. 

हिंदुत्व अस्तित्वभान

मागास समूहातील प्रतिक्रांतीचे स्वरूप हे आक्रमक आणि हिंदुत्व अस्तित्वभान देणारे आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्व अस्तित्वभान निर्माण करण्यासाठी शनी पूजा व लक्ष्मी पूजा अशा पूजा विधींचा कार्यक्रम वाढला आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकत्ता परिसरातील औद्योगिक व बिगर औद्योगिक भागात, बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यातील शहरे गावांमध्ये लहान लहान पूजा कार्यक्रम वाढले आहेत. शनी पूजा व लखी (लक्ष्मी) पूजा असे कार्यक्रम दर आठवड्याला आयोजित केले जातात. प्रत्येक पूजेचा दिवस निश्चित केलेला असतो. या धार्मिक कार्यक्रमांमुळे मागास समूहामध्ये संघ आणि भाजप विस्तारत गेला. चोवीस परगणा, उत्तर चोवीस परगणा, नंदिया, मुर्शिदाबाद, मालदा, दक्षिण दिनाजपूर, उत्तर दिनाजपूर, जलपाईगुडी, आलीपूरदुआर, कुचबिहारमध्ये साप्ताहिक पूजा कार्यक्रमांचा कल वाढला. येथे मागास समूहाला हिंदुत्व अस्तित्वभान प्राप्त झाले आहे. कारण त्यांनी हिंदुत्व ही ओळख स्वीकारली आहे. तसेच त्यांनी मूळ आक्रमक ओळखदेखील कायम पुढे चालू ठेवली आहे. म्हणजेच पश्चिम बंगालच्या आक्रमक स्वभावावरती हिंदुत्व अस्तित्वभान या संकल्पनेने जन्म घेतला आहे. म्हणून हिंदुत्व अस्तित्वभानाचे राजकारण भाजप पश्चिम बंगालमध्ये करत आहे

संबंधित बातम्या