कोरोनानंतरची आव्हाने

प्रकाश पवार
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राज-रंग

कोरोना विषाणू अजूनही कुठेकुठे डोके वर काढीत असला तरी यापुढच्या काळात कोरोना महामारीचे परिणाम पुसून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. 

कोरोनाच्या साथीच्या धोका अजून टळला नसला, तरी मर्यादित काळाकरिता का असेना मुंबईची लोकल सुरू झाली आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. बाजारपेठा तर याआधीच सुरू झाल्या होत्या. परंतु महामारीच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा संकोच झाला. राजकीय संस्थांचे अधिकार कमी झाले. राजकीय संस्थांनी बिगर लोकशाही पद्धतीने काही निर्णय घेतले. याच काळात गैरव्यवहारांची काही उदाहरणे पुढे आली. या सर्वातून बाहेर पडून एक चांगले आणि उन्नत जीवन लोकांना पुन्हा मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र या गोष्टी पुन्हा लगेच मिळतील इतकी सोपी ही महामारीची लाट नव्हती. 

महामारीची लाट एका अर्थाने लोकशाही विरोधातील लाट होती. हा मुद्दा समजून घेण्यासाठी थ्युसीडाईडस यांनी लिहिलेला इतिहास समजून घेतला पाहिजे. थ्युसीडाईडस हे एक ग्रीक इतिहासकार आहेत. त्यांना वास्तववादी इतिहासकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी युद्धाचा इतिहास आणि साथीचा इतिहास यांची तुलनाही केली आहे. पेलोपोनेशियन युद्धाचा इतिहास त्यांनी लिहिला. अथेन्स आणि स्पार्टा या दोन देशांमध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर दोन वर्षात महामारीची साथ आली. महामारीच्या साथीमुळे अथेन्समधील लोकशाही संस्कृती नष्ट झाली, अनेक लोक मरण पावले. लोक मरण पावले यापेक्षाही जिवंत राहिलेल्या लोकांची इच्छाशक्ती मरण पावली. जिवंत राहिलेल्या लोकांच्या लोकशाहीच्या इच्छा अपेक्षा आणि आकांक्षा दुर्बल झाल्या. लोक महामारीच्या साथीमुळे अत्यंत स्वार्थी झाले. कायद्याचे राज्य गेले आणि बेबंदशाही निर्माण झाली. कायद्याचे राज्य नसल्यामुळे अराजक निर्माण झाले. सर्वत्र अंदाधुंदी दिसू लागली. या नवीन वातावरणात महामारीतून वाचलेल्या लोकांचे स्वभाव बदलले. मानवी स्वभावामध्ये झालेला बदल बराच काळ टिकणारा होता. विवेकी स्वभावाची जागा स्वार्थी स्वभावाने घेतली. लोकांनी मानवी मूल्यांच्या ऐवजी प्रचंड स्वार्थी वृत्ती जोपासायला नव्याने सुरुवात केली. या बदलाच्या सामाजिक वातावरणात लोकशाहीचा अथेन्स मधील प्रयोग पूर्णपणे नष्ट झाला. प्राचीन इतिहासाच्या कोशांमध्ये आपणाला इसवी सन पूर्व पाचव्या शतकातील ही कथा सापडते. त्यानंतर जागतिक समाजाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यामुळे आजच्या काळातील महामारीच्या साथीतून या गोष्टीवर मात करून माणूस लोकशाहीसह बाहेर पडू शकतो. विज्ञानाने हा एक सकारात्मक आशावाद पेरलेला आहे. परंतु मानवी स्वभावावरती, राजकीय संस्थांवरती आणि मूल्य व्यवस्थेवरती झालेले परिणाम काही प्रमाणात टिकून राहणार ही वस्तुस्थिती आहे.

राजकीय संस्थांवरील परिणाम
राजकीय संस्थांच्या संदर्भात स्थानिक पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळे परिणाम झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. विधानसभा आणि विधान परिषदांचे कामकाज बरेच कमी केले होते. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज कमीच झाले होते. महामारीच्या साथीनंतर लगेच या गोष्टींमध्ये सुधारणा होतील. परंतु महामारीच्यामुळे कामकाजापासून दूर राहण्याची पडलेली प्रथा सहजासहजी मोडली जाणार नाही. ही प्रथा मोडण्यासाठी पुन्हा नव्याने काही काळ घालवावा लागेल. कारण चांगल्या प्रथा अंगवळणी पडण्यास वेळ लागतो. वाईट प्रथा मात्र सहजासहजी पचविल्या जातात. दुसरा मुद्दा म्हणजे जागतिक पातळीवरील सर्वेक्षणानुसार राजकीय संस्थांमध्ये एकसष्ट टक्क्यांपर्यंत अधिसत्तावादी प्रवृत्ती बळावली होती. भारतही या प्रक्रियेपासून दूर नव्हता. शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा पातळीवरील ही अधिसत्तावादी संस्कृती बाजूला करून तेथे लोकशाही संस्कृती लगेच सुरू होऊ शकत नाही. लोकशाही संस्कृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक पातळीवरती प्रयत्न करावे लागतील. राजकीय अभिजन वर्ग आणि लोक यांच्यामध्ये अंतर पडले होते. महामारीच्या साथीतून बाहेर पडल्यानंतर नव्याने राजकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा वेळी देखील राजकीय अभिजन आणि नोकरशाही हे दोन्ही घटक लोकांच्या प्रश्नांना तोंड देण्याच्या ऐवजी अडचणीच्या वेळी क्वारन्टाईन होताना दिसतात. म्हणजेच राजकीय संस्थांचे काम सरळपणे सुरू झाले असा याचा अर्थ होत नाही. या अडथळ्यांना महामारीच्या साथीमुळे बळ मिळाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक लोकशक्तीच्या दबावाची गरज आहे.

सार्वजनिक क्षेत्र
लोक सार्वजनिक क्षेत्रात सहभाग घेऊ लागले. यामुळे सहभागाच्या दृष्टिकोनातून महामारीच्या साथीचे महत्त्व संपले. परंतु लोक विवेकी दृष्टिकोनातून सहभाग घेत नाहीत. म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी पुन्हा जुन्या पद्धतीने अस्वच्छतेला सुरुवात झाली आहे. सहजासहजी लोक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये बदल झाला, हा मुद्दा खूपच वरवरचा आहे. लोक ही संकल्पना पोकळ असून चालत नाही. लोक म्हणजे नागरिक. नागरिक हा शब्दप्रयोग जबाबदार नागरिक असाही आहे. तसेच लोक या शब्दात सर्व नागरिकांना समान पातळीवरील निसर्गसिद्ध वागणूक असाही अर्थ घेतला जातो. परंतु महामारीच्या काळात लोक ही संकल्पना भेदभावपूर्ण पद्धतीनेही पुढे आली. उदाहरणार्थ मानवी हक्कांचे उल्लंघन झाले. स्त्रियांच्या हक्कांचे उल्लंघन झाले. त्यांची मनःस्थिती बदलली. गरिबांच्या हक्कांचे उल्लंघन झाले. कामगारांना दुय्यम वागणूक मिळाली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना वेगवेगळी वागणूक मिळाली. एकाच राज्यातील स्थाईक नागरिकांना त्यांच्या हक्कांना संरक्षण मिळाले. तर स्थलांतरित कामगारांच्या हक्कांना संरक्षण मिळाले नाही. यामुळे कुटुंबात, राज्यात, समाजात भेदभाव झाला. या गोष्टी मानवी मनावर कोरल्या गेल्या आहेत. या गोष्टींपासून  जोपर्यंत मुक्ती होत नाही, तोपर्यंत लोकशाही मूळ पदावर आली असे म्हणता येणार नाही. लोकशाहीला मूळ रूळावर आणायचे असेल तर यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. नाहीतर लोकशाहीमध्ये हा एक रोग खूप खोलवर रुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
महामारीच्या काळातील एक वर्ष अत्यंत महत्त्वाचे होते. त्यापेक्षा जास्त महत्त्व इथून पुढील एक वर्षाच्या काळातील असेल. कारण वेगवेगळ्या प्रकाराने स्वातंत्र्यावर आलेली नियंत्रणे काढून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.  शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, वृत्तपत्रे यांनी या कामात पुढाकार घेतला तर मनावर झालेले संस्कार दूर होण्याची शक्यता आहे. राजकीय चळवळींचा राजकीय संस्थांवरती दबाव असतो. एक वर्षाच्या काळात राजकीय चळवळी बऱ्यापैकी शांत होत्या. शेतकरी आंदोलनाचे एकमेव उदाहरण चळवळ कृतिशील असल्याचे दिसत होते. यामुळे चळवळ आणि राजकारण यांचे सांधेजोड नव्याने करावी लागणार आहे. तरच या नंतर एक वर्षानी लोकशाही विरोधातील महामारीची लाट ओसरेल. मानवी बुद्धीला जाणीवपूर्वक वेगळे वळण लावावे लागते. हीच इथून पुढील काळात महामारीच्या परिणामांच्या विरोधातील लढाई ठरेल. कारण मृत्यूच्या वेदनेपेक्षा स्वातंत्र्याचा शेवट जास्त वेदनादायक ठरण्याची शक्यता असते. ही वस्तुस्थिती समजून घेऊन नवीन प्रबोधन चळवळ सुरू करणे ही काळाची गरज आहे. हे नवीन आत्मभान म्हणजे पुढील काळातील राजकारण होय, असा सूर थ्युसीडाईडस या ग्रीक इतिहासकाराच्या वास्तववादी इतिहासातून निघतो.

संबंधित बातम्या