मतदानाचे टप्पे आणि आक्रमक लोकमत

प्रकाश पवार
सोमवार, 8 मार्च 2021

राज-रंग

केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू या राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर आसाममध्ये तीन टप्पे आणि पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. यामुळे मतदानाचे टप्पे किती असावेत हा सध्याचा वादाचा विषय ठरला आहे. मतदानाच्या या टप्प्यांमध्ये आरंभीचा टप्पा आणि शेवटचा टप्पा यादरम्यान एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे. हा निर्णय अर्थात निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. कालावधीच्या मुद्द्याचा संबंध थेटपणे लोकमताशी येतो. एका टप्प्यात मतदान घेतले तर लोकमत बदलत नाही. आठ टप्प्यांमध्ये मतदान घेतले तर आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला तर लोकमत बदलते का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याने तेथे राजकीय लोकमत बदलण्याचा प्रश्नच उपस्थित झालेला नाही. मतदानाचा पहिला टप्पा आणि नंतरचा टप्पा किंवा टप्पे यांच्या दरम्यानच्या काळात कोणते डावपेच वापरायचे हा प्रश्न येथे उपस्थित होत नाही. एका अर्थाने या तीन राज्यांत निवडणूक प्रक्रिया खुली, स्पर्धात्मक स्वरूपाची आहे. या स्पर्धेत सर्वच पक्षांना जवळपास समान स्पर्धा करता येईल अशा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. परंतु या सारखाच निर्णय आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या संदर्भात घेतला गेला नाही. यामुळे आसाममधील मतदानाचे तीन टप्पे आणि पश्चिम बंगालमधील आठ टप्पे पूर्ण होण्याच्या मधल्या काळात राजकीय पक्षांना लोकमत बदलता येईल का? हा कळीचा प्रश्न आहे. दुसरे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे लोकमत विरोधात गेले तर त्या लोकमताला आकार देता येण्याची क्षमता कोणत्या पक्षांमध्ये आहे? लोकमत विरोधात घालविण्याची क्षमता कोणत्या पक्षांमध्ये आहे? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या युक्तिवादाप्रमाणे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या विरोधात लोकमत जाण्याची शक्यता घडवली जाईल. या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा सामाजिक आधार इतर पक्षांकडे वळण्याची भीती वाटते, म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या टप्प्यांच्याबद्दल मतभिन्नता व्यक्त केली आहे.

आसाम आणि पश्चिम बंगाल 
आसाम आणि पश्चिम बंगाल हे दोन्ही राज्ये एका अर्थाने राजकीय वाद तीव्र असणारी राज्ये आहेत. यापैकी आसाममध्ये भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी मिळवायची आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला शिरकाव करण्याची संधी आहे. या दोन्ही राज्यांत भाजपचे राजकीय नियंत्रण निर्माण करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व प्रयत्न करत आहे. भाजपने संघटनात्मक पातळीवरती निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना आखलेली आहे. भाजपच्या या निवडणूक व्यूहरचनेला पूरक ठरणारा मतदानाचा तीन आणि आठ टप्प्यांचा  निर्णय झाला असे भाजपच्या प्रतिस्पर्ध्यांना वाटते आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपचा निर्णय आहे असे प्रतिस्पर्ध्यांना वाटते, हा मुख्य मुद्दा आहे. भारतीय राजकारणात लोकमताचा प्रवाह वळविण्याची क्षमता भाजप या पक्षाकडे आहे, हे असे वाटण्याचे एक कारण. समकालीन काळातील लोकांची नाडी ओळखण्याची क्षमता  भाजपकडे आहे. लोकधारणा घडवणे हे भाजपचे कौशल्य आहे. अर्थातच लोकधारणा घडवणे ही गोष्ट काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या हातून सुटलेली गोष्ट आहे. लोकसंग्रह ही संकल्पना प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आकाराला येते. लोकसंग्रह करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागते. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे आक्रमक भूमिका घेण्याची क्षमता आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या तुलनेत इतर पक्षांकडे ही आक्रमकता दिसत नाही.

पश्चिम बंगालचे लोकमत
पश्चिम बंगाल आणि आसामचे लोकमत आक्रमकतेला प्रतिसाद देते. पश्चिम बंगालमध्ये तर कालीची उपासना केली जाते. एका अर्थाने ही आक्रमकतेची उपासना असते. हा मुद्दा भाजपने हेरलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका मध्यम मार्गी राहिली. त्यांना प. बंगालची आक्रमकता नीटनेटकेपणे आणि दीर्घ काळापर्यंत ओळखता आलेली नाही. लोकमताचे संघटन करण्यासाठी मार्क्सवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांच्या भूमिका तीन प्रकारच्या राहिलेल्या आहेत. एक, मार्क्सवादी पक्षाने एका बाजूने डावी भूमिका घेतली तर दुसऱ्या बाजूने त्यांनी आक्रमक संघटन केले होते. दोन, ममता बॅनर्जी यांनी प्रदेशवादी भूमिकेबरोबर आक्रमक भूमिकाही राबवली होती. पश्चिम बंगालच्या राजकारणामधील हे दोन मुख्य प्रवाह आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे, जनतेमधील हा मुख्य प्रवाह भाजपने सध्या ओळखला आहे.

भाजपने विकासाच्या बरोबर पश्चिम बंगालमध्ये आक्रमक भूमिकादेखील स्वीकारलेली दिसते. यामुळे भाजपचे राजकारण एका अर्थाने लोकमताला प्रतिसाद देणारे राजकारण घडत आहे. आक्रमकता हे लोकमताचे वैशिष्ट्य आहे. मार्क्सवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि भाजप असे तीन पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहेत. म्हणजेच लोकमतापुढे तीन पर्याय उपलब्ध आहेत. या तीन पर्यायांपैकी एक पर्याय मतदार निवडणार आहेत. परंतु मार्क्सवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपची आक्रमकता ताजी आणि टवटवीत आहे. दुसऱ्या शब्दात मार्क्सवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसची आक्रमकता थोडी जुनी झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या आक्रमकतेतील अनुभव मतदारांनी अनुभवलेला आहे. गेली लोकसभेची निवडणूक वगळता भाजपच्या आक्रमकतेबद्दल पश्चिम बंगालच्या मतदारांना उत्सुकता आणि जिज्ञासा आहे. खरेतर या तीन पक्षांच्या आक्रमकतेची तीन स्वरूपे पश्चिम बंगालच्या आठ टप्प्यांमध्ये कशी राहणार? यावरतीच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. 

काँग्रेस पक्षाला तर मध्यममार्गी भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला सुरुवातीलाच हा भाजपचा एक कुटिल डाव आहे असे वाटणे साहजिक आहे. काँग्रेस पक्ष आपली भूमिका लोकशाही चौकटीत राहून आक्रमक स्वरूपाची म्हणून विकसित करू शकत नाही हेच यावरून दिसते. ममता बॅनर्जी यांची प्रादेशिक चौकटीत राहून आक्रमक होण्याची पद्धत मर्यादित झालेली आहे. एका अर्थाने ममता बॅनर्जींच्या आक्रमकतेमध्ये एक प्रकारची स्थितीशीलता आलेली आहे. मार्क्सवादी पक्ष डाव्या चौकटीत राहून आक्रमकतेसह  पुढे जात होता. परंतु आजचा कालखंड एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातील आहे. या काळात डावी भूमिका आणि आक्रमकता यांमध्ये पेचप्रसंग उभा राहिला आहे. डाव्या भूमिकेच्या ऐवजी उजवी भूमिका आणि आक्रमकता असे मिश्रण जागतिक पातळीवरती निर्माण झाले आहे. यामुळे मार्क्सवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस या दोन्ही छावण्यांमधील आक्रमकता ही एका अर्थाने जनतेला आकर्षित करत नाही. भाजपची आक्रमकता मात्र लोकमत संघटित करते आणि लोकांना भाजपशी जोडते. या गोष्टीला आठ टप्प्यांमध्ये संधी मिळत जाणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे, असे भाजप विरोधकांना वाटते. यामुळे मुख्य मुद्दा हा निर्माण होतो की, लोकमताचे स्वरूप समजून घेणे आणि लोकमताला आकार देणे या गोष्टींमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस कमी पडत आहे.  

लोकमत कसे घडवायचे याचे प्रतीक काँग्रेसकडे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या रूपाने उपलब्ध आहे. परंतु त्यांनी हे दोन्ही प्रकार कालसुसंगत स्वरूपात विकसित केलेले नाहीत. यामुळे केवळ प्रतिस्पर्ध्यावर टीका करणे यापेक्षा वेगळी भूमिका यातून पुढे येत नाही.

संबंधित बातम्या