नवीन सामाजिक समीकरण

प्रकाश पवार
सोमवार, 15 मार्च 2021

राज-रंग

पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये राजकारणात नवीन राजकीय रसायन आणि रणनीती वापरली जात आहे. ही राजकीय प्रक्रिया या तीनही घटक राज्यांना नवीन दिशा देऊ शकते.

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची राजकीय प्रक्रिया सुरू आहे. या चार राज्यांपैकी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या तीन राज्यांमध्ये मुस्लिम राजकारण नवी अस्मिता धारण करत आहे. पश्चिम बंगाल आसाम आणि केरळ या तीनही राज्यांमध्ये राजकारणात नवीन राजकीय रसायन आणि रणनीती वापरली जात आहे. अर्थातच ही कथा नवी आहे. 

आसाम
आसाममध्ये जवळजवळ ३५ टक्के मुस्लिम समाज आहे. तेथे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) हा पक्ष प्रभावी आहे. या पक्षाचे लोकसभेत तीन खासदार आणि आसामच्या विधान सभेत तेरा आमदार आहेत. बद्रुद्दीन अजमल हे एआययूडीएफचे मुख्य नेते आहेत. त्यांनी आसामच्या राजकारणात २००५मध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाची स्थापना केली होती. एआययूडीएफ आणि काँग्रेस यांच्यामध्ये गेली १५ वर्षे तीव्र स्पर्धा सुरू होती. परंतु गेल्या पाच वर्षांपासून भाजप हा आसामच्या राजकारणात मुख्य स्पर्धक म्हणून उदयास आला. यामुळे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाच्या भूमिकेत बदल घडला. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट हा फक्त मुस्लिमांचा पक्ष नाही अशी भूमिका फ्रंटने घेतली. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा दावा करताना एआययूडीएफ विधानसभेसाठी पंचवीस-तीस हिंदूंना उमेदवारी देतो अशी भूमिका पक्षाने मांडली. म्हणजेच हा पक्ष मुस्लिम आणि हिंदू यांचा संयुक्त आहे, असा बदल नोंदविला जात आहे. शिवाय धर्मनिरपेक्षतेचा दावा केला जात आहे. आसामच्या राजकारणातील हा नवा प्रवाह आहे.

पश्चिम बंगाल
आसाम नंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मुस्लिम समाजाची लोकसंख्या संख्यात्मक दृष्ट्या प्रभावी ठरणारी आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. विशेषतः मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर हे जिल्हे मुस्लिम लोकसंख्या प्रभावी ठरणारे आहेत. या जिल्ह्यांमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट या नवीन पक्षाची स्थापना झालेली आहे. इंडियन सेक्युलर फ्रंट २९४ पैकी ३७ जागा लढवणार आहे. विशेषतः दक्षिण बंगालमधील भागात इंडियन सेक्युलर फ्रंट प्रभावी आहे. या पक्षाचे नेतृत्व अब्बास सिद्दीकी करत आहेत. ब्रिगेड परेड मैदानावर त्यांनी नुकतीच एक रॅलीही आयोजित केली होती. विशेष म्हणजे काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्याबरोबर इंडियन सेक्युलर फ्रंटची आघाडी आकाराला येते आहे. यामुळे पश्चिम बंगालचे द्विध्रुव राजकारण अचानकपणे त्रिकोणी स्वरूपाचे झाले आहे. म्हणजेच भाजप, तृणमूल काँग्रेस आणि तिसरी आघाडी अशा तीन गटांमध्ये त्रिकोणी सत्तास्पर्धा होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा परिणाम पश्चिम बंगालमध्ये तीन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. एक, पश्चिम बंगालच्या राजकारणात इंडियन सेक्युलर फ्रंट यांची धर्मनिरपेक्ष अशी भूमिका विकसित होणार आहे. यामुळे धर्मनिरपेक्ष शक्तींचे एकत्रीकरण हा एक नवीन प्रयोग आहे. धर्मनिरपेक्ष या मूल्यांवर आधारित राजकारण करण्याची इच्छाशक्ती यामुळे व्यक्त झाली आहे. दोन, पश्चिम बंगालच्या राजकारणाची चर्चा भाजप आणि तृणमूल काँग्रेस अशी होत होती. परंतु इंडियन सेक्युलर फ्रंट, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यामुळे पश्चिम बंगालची राजकीय चर्चा त्रिकोणी स्वरूपाची झाली आहे. म्हणजेच पश्चिम बंगालचा राजकीय आखाडा सरळ सरळ लढतीचा राहिलेला नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंटने धर्मनिरपेक्ष भूमिका घेतल्यामुळे अस्मिता नेमकी कशी व्यक्त होणार हा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची राजकीय प्रक्रिया गतिमान होऊ शकते. यामुळे एका अर्थाने तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठे आव्हान मिळू शकते. इंडियन सेक्युलर फ्रंट किती गंभीर भूमिका घेतो यावर या तीनही गोष्टी अवलंबून आहेत. परंतु अब्बास सिद्दिकी यांनी इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षाच्या मार्फत राजकारणामध्ये नवीन प्रक्रिया घडवण्याची इच्छा व्यक्त केलेली दिसते. हा नवीन प्रवाह आसाम प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील उदयास आलेला आहे. 

केरळ
आसाम, पश्चिम बंगालप्रमाणे केरळमध्येदेखील मुस्लिम राजकारण घडते. केरळच्या लोकसंख्येत जवळपास २७ टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. केरळच्या राजकारणात मुस्लिम लीग हा पक्षही प्रभावी आहे. केरळच्या राजकारणात मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांचा समझोता आहे. थोडक्यात केरळच्या राजकारणात मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे आघाडीचे राजकारण घडवले तर लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) आणि  संयुक्त लोकशाही आघाडी (युडीएफ) या दोन आघाड्यांमध्ये सत्ता स्पर्धा होणार आहे. यामुळे या राज्यात भाजप ख्रिश्चन समूहामध्ये सामाजिक आधार शोधत आहे. ख्रिश्चन समूहातून काही आधार भाजपकडे सरकला तर केरळच्या राजकारणात भाजपला चंचुप्रवेश करता येईल. भाजपसाठी ही एका अर्थाने लिटमस टेस्ट आहे. 

मुस्लिम राजकारण धर्मनिरपेक्षता या नवीन मुद्द्याकडे वळल्याचे आसाम, केरळ आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातील या तीन उदाहरणांवरून दिसते. याआधी एआयएमआयएम या पक्षाने उभे केलेले राजकारण वेगळे होते. आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार या राज्यांमध्ये एआयएमआयएम पक्षाचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे घडले. या पक्षाने महाराष्ट्रात दलित आणि मुस्लिम युतीचा सामाजिक प्रयोगही केला. यापेक्षा इंडियन सेक्युलर फ्रंट, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि मुस्लीम लीग या तीन पक्षांचा प्रयोग वेगळा आहे. या प्रयोगामुळे हे तीन पक्ष आणि ओवेसी यांचा एआयएमआयएम या दोन गटांमध्ये एकूण मुस्लिम राजकारणाचे चित्र वेगवेगळे दिसणार आहे. इंडियन सेक्युलर फ्रंट ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि मुस्लिम लीग हे तीनही पक्ष काँग्रेसबरोबर आणि डाव्यांबरोबर समझोता करत आहेत. ही राजकीय प्रक्रिया या तीनही घटक राज्यांना नवीन दिशा देऊ शकते. मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची ताकद वाढू शकते.

संबंधित बातम्या