‘रालोआ’ आणि ‘संपुआ’चे अभिसरण

प्रकाश पवार
सोमवार, 5 एप्रिल 2021

राज-रंग

एकविसाव्या शतकाच्या आरंभीच्या दोन दशकात राबवल्या गेलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रयोगांच्या संदर्भाने या दोन्ही व्यवस्था नव्या संदर्भात नवीन पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. नवे राजकीय मित्र आणि नव्या राजकीय प्रणालींमुळे भारतीय राजकारणातील आघाड्यांचे एक पर्व संपले आहे. या नवीन टप्प्यावर आता नव्या आघाडी पर्वाच्या जुळवाजुळवीच्या शक्यतेचा अंदाज घेतला जात आहे. ही प्रक्रिया आघाड्यांच्या राजकीय अभिसरणाची आहे.

भारतीय राजकारणात काँग्रेस वर्चस्वशाली होती तेव्हा गैर काँग्रेसवाद मांडला गेला. सध्याच्या काळात भाजप वर्चस्वशाली आहे, त्यामुळे गैर भाजपवादाची चाचपणी केली जात आहे. या विचारसरणीतून राजकीय आघाड्यांची देखील पुनर्रचना होत चालली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (National Democratic Alliance -NDA, रालोआ) स्थापना विसाव्या शतकाच्या शेवटी झाली. या आघाडीचे नेतृत्व पक्षीय पातळीवरती भाजपने केले. शिवसेना या आघाडीचा एक सदस्य पक्ष होता. परंतु एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात राजकीय पक्ष या आघाडीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे संयुक्त पुरोगामी आघाडीची (United Progressive Alliance - UPA, संपुआ) स्थापना सन २००४मध्ये झाली. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस पक्षाने केले. सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा आहेत. सध्या या आघाडीची पुनर्रचना करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. साधारणपणे संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी हा प्रयोग एकविसाव्या शतकाच्या आरंभीच्या दोन दशकात राबविला गेला. गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही व्यवस्था नव्या संदर्भात नवीन पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे या दोन्ही व्यवस्था आजच्या परिस्थितीशी मिळत्याजुळत्या नाहीत असे चित्र पुढे आले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 

भारतीय राजकारणात आघाडीशिवाय पर्याय नाही. हा मुद्दा नव्वदीच्या दशकामध्ये भाजपने प्रथम आत्मसात केला होता. या आघाडीच्या मार्फत भाजपने गैर काँग्रेसवाद ही विचारप्रणाली घडवली होती. परंतु त्याबरोबर भाजपचे दोन वैचारिक मित्र होते. त्यापैकी एक होता शिवसेना आणि दुसरा पक्ष पंजाबमधील अकाली दल हा होता. अकाली दल आणि शिवसेना आता केंद्रातील सत्तेमधून बाहेर पडले आहेत. औपचारिकपणे केंद्रातील सत्ता राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आहे. त्या सत्तेवरती पूर्णपणे भाजपचे नियंत्रण आहे. भाजपला केंद्रात पूर्ण बहुमत मिळालेले आहे. मात्र भाजप आणि त्यांचे हे दोन मित्र यांनी परस्परविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. या कारणामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची व्यवस्था मागे पडत चालली आहे. त्याजागी भाजपा व्यवस्था (BJP Dominant Party System) ही नवीन व्यवस्था काम करू लागली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजप व्यवस्था या दोन वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. भाजपा व्यवस्थेचा उदय राष्ट्रीय लोकशाही आघाडी व्यवस्थेतून झाला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही सामूहिक नेतृत्वाची संकल्पना होती. भाजप व्यवस्था ही केवळ भाजपमधील वर्चस्वशाली नेतृत्वाची संकल्पना आहे. आजच्या भाजपला वर्चस्वाच्या बरोबर लोकमान्यता देखील आहे. या गोष्टीचा परिणाम म्हणून भाजप हा पक्ष इतर पक्षांशी जुळवून घेत नाही. यामुळे भाजपची नवी व्यवस्था उदयाला आली आहे. या प्रक्रियेतून आघाडीची पुनर्रचना होत आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी दोन (United Progressive Alliance II)
एकविसाव्या शतकातील आरंभीच्या दोन लोकसभा निवडणुका संयुक्त पुरोगामी आघाडीने आपल्याकडे खेचून आणल्या. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान दिले. त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीची दोन सरकारे सत्तेवरती आली होती. परंतु एकविसाव्या शतकातील दुसरी (२०१४) आणि तिसरी (२०१९) लोकसभा निवडणूक संयुक्त पुरोगामी आघाडीला जिंकता आली नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी नेतृत्व सामाजिक आधार, विचारसरणी, कार्यक्रम अशा विविध पातळ्यांवर पर्यायी राजकारण उभे करू शकले नाही. त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचे औचित्य नेमके कोणते आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची पुनर्रचना करण्याचा विचार सातत्याने मांडला जात आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीबद्दल तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. 

  1. संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे द्यावे. म्हणजेच थोडक्यात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वामध्ये बदल करावा. हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जात आहे.
  2. संयुक्त पुरोगामी आघाडी या नावाने परंतु ‘संपुआ’ दोनची (UPA-II) स्थापना करावी. असाही मुद्दा मांडला जात आहे. म्हणजे थोडक्यात ‘संपुआ’ एकचे विसर्जन करावे, अशी भाषा अप्रत्यक्षपणे वापरली जात आहे. आणि
  3. ‘संपुआ’ने नवीन सदस्य किंवा नवीन मित्र मिळवावेत. या गोष्टीची चाचपणी सुरू झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना हा ‘संपुआ’चा सदस्य होण्याबद्दल चाचपणी केली जात आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपबरोबर जुळवून घेत होते. आत्ता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संयुक्त पुरोगामी आघाडी बरोबर जुळवून घेता येईल का? याबद्दलचे अंदाज घेतले जात आहेत. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीची विचारसरणी मध्यम मार्ग आणि डावीकडे झुकणारी आहे. यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते शिवसेनेच्या नेतृत्वाबरोबर जुळवून घेणार का? याचे देखील अंदाज घेतले जात आहेत. ही राजकीय प्रक्रिया सुरू झालेली आहे. 

म्हणजेच थोडक्यात संयुक्त पुरोगामी आघाडीची पुनर्रचना करण्याबद्दलचा विचार पुढे येत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये जुळवाजुळव होत नसेल तर संयुक्त पुरोगामी आघाडी दोनची स्थापना करण्याचा विचार शिवसेनेकडून पुढे रेटला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत याबद्दलची भाष्य वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. या घडामोडी नव्याने घडत आहेत. तसेच भाजप विरोधातील आघाडी नव्याने बांधण्याचा किंवा जुन्याच संयुक्त पुरोगामी आघाडीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे भारतीय राजकारणातील आघाड्यांचे एक पर्व संपले आहे. आता भारतीय राजकारणात गैर भाजपवाद या नवीन टप्प्याची सुरुवात झाली आहे. तसेच भाजप विरोधातील आघाडी पर्वाची जुळवाजुळव करता येईल का? या गोष्टीचा अंदाज घेतला जात आहे. ही प्रक्रिया आघाड्यांच्या राजकीय अभिसरणाची आहे.

संबंधित बातम्या