राजकारणाच्या तळ्यात...

प्रकाश पवार
सोमवार, 12 एप्रिल 2021

राज-रंग

तंत्रज्ञान आणि सोशल नेटवर्किंगमध्ये रंगत असण्याबरोबर ‘गुड सेन्स’मध्ये देखील पारंगत असावे लागते, ही गोष्ट भारतीय समाजाच्या अंगवळणी पडलेली नाही. भारतीय नागरिकांना या प्रकारचे प्रशिक्षण कधी दिले जात नाही. याबद्दलचे अनुभव सतत येत राहतात. 

राजकारण  घडवणे ही एक कला आहे. तसेच राजकारण घडवताना वैचारिक कसरती कराव्या लागतात. त्यामुळे समाजाच्या धारणेप्रमाणे राजकीय पक्षांची स्वतःची एक भाषाशैली तयार होत जाते. धर्म, धर्मनिरपेक्षता, धार्मिक सहिष्णुता, धर्मांधता हे केवळ शब्द नाहीत. तसेच त्यांचे अर्थ बंदिस्तही नाहीत. या शब्दांना समाजाच्या धारणांशी जोडून घेतले जाते. तसेच समाजाच्या धारणा बदलतात त्यानुसार या संकल्पनांचे अर्थही बदलत जातात. भारतीय राजकारणात ही घडामोड अनेक दिवसांपासून घडत आलेली आहे. समकालीन काळात याची अनेक उदाहरणे दैनंदिन राजकीय जीवनात दिसतात. परंतु यामुळे भारतातील राजकारण गाळात रुतलेले दिसते. कारण राजकीय तळ्यात धर्मनिरपेक्षतेचा गाळ साठला आहे. त्या गाळामध्ये पक्षांचे राजकारण रुतले आहे. 

निवडणूक प्रचार
निवडणूक लोकशाहीला आधार देते. परंतु निवडणूक प्रचारात लोकशाहीविरोधी भूमिका घेण्याचा कल उजव्यांबरोबर डाव्यांचाही राहिलेला दिसतो. भारतीय राजकारणात धर्मनिरपेक्षता विरोध आणि धर्मनिरपेक्षता समर्थन अशा दोन्ही पद्धतीने राजकीय प्रक्रिया घडवली जाते. या दोन्ही प्रक्रिया लोकशाहीला आत्मबळ पुरवत नाही. उलट लोकशाही मूल्यांचा आणि लोकशाही राजकीय प्रक्रियेचा संकुचित अर्थ घेतला जातो. विशेषतः आसामच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मनिरपेक्षता खेळाने देशाचे मोठे नुकसान केले अशी भूमिका मांडली. तर दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी प्रचारात केरळ धर्मनिरपेक्ष विचारांचा बालेकिल्ला आहे, असा मुद्दा मांडला. तामिळनाडूमध्ये अमित शहा यांनी तमीळ संस्कृती अण्णा द्रमुक व भाजप जपू शकते असा प्रचार केला. थोडक्यात धर्मनिरपेक्षता विरोध हा भाजपने निवडणुकीसाठी मुख्य प्रवाह म्हणून घडवला आहे, तर डाव्यांनी धर्मनिरपेक्षता हा मुख्य प्रवाह मानलेला आहे.

निवडणूक राजकारणाच्या आखाड्यातील धर्मनिरपेक्षता विरोध हा प्रमुख मुद्दा आहे. धर्मनिरपेक्षता विरोध या मुद्द्यांच्या अवतीभवती राजकीय प्रक्रिया घडत जाते. धर्मनिरपेक्षता विरोध या मुद्द्याला केवळ धर्मनिरपेक्षता समर्थन आज पर्याय ठरू शकतो का? पी विजयन यांच्या भूमिकेनुसार धर्मनिरपेक्षता विरोध या मुद्द्याला पर्याय म्हणून धर्मनिरपेक्षता समर्थन हा मुद्दा मांडला जात आहे. खरेतर असे द्वैत राजकारणाचा अवकाश आणि राजकारणाचा आशय कमी करते, याचे भान दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षांना राहत नाही. या चौकटीत परस्पर विरोधी भूमिका घेण्यामुळे खरेतर लोकशाही विरोधातील राजकीय प्रक्रिया घडत जाते. लोकशाही आणि राजकारण म्हणजे केवळ डावपेच इतका संकुचित अर्थ घेतला जातो. परंतु धर्मनिरपेक्षता विरोध आणि धर्मनिरपेक्षता समर्थन या संकुचित क्षेत्राच्या बाहेर एक मोठे राजकारणाचे क्षेत्र आहे. या संकुचित क्षेत्रातून बाहेर पडून एका मोठ्या क्षेत्रातील राजकारणाला भिडण्याची क्षमता विकसित केली गेली नाही. यामुळे निवडणुकांच्या राजकारणामध्ये आणि प्रचारामध्ये हे दोन मुद्दे कळीचे मानले जात आहेत. याला काही पर्याय आहे का? हा एक सर्जनशील प्रश्न आहे. 

सहिष्णुता
धर्मनिरपेक्षता समर्थन आणि धर्मनिरपेक्षता विरोध या दोन्हीही संकल्पना धर्म विरोधी आहेत. कारण धर्मातील प्रवाहीपणा त्यामुळे नष्ट होतो. धर्मातील श्रद्धा जास्त संवेदनशील राहण्याच्या ऐवजी त्या श्रद्धा आक्रमक होत जातात. यामुळे या दोन्ही गोष्टींना पर्याय सहिष्णुता आहे, अशी भूमिका भारतामध्ये वेळोवेळी मांडण्यात आली आहे. त्यांनी भारतीय राजकारणाचा अर्थ व्यापक केला. एक, सम्राट अशोक यांनी धार्मिक सहिष्णुता हे धोरण स्वीकारले. त्यामुळे राजकारण या संकल्पनेचा अर्थ व्यापक झाला. तसेच सम्राट अशोकाचे स्थान डळमळीत झाले नाही. दोन, सम्राट अकबराने सहिष्णुता हे धोरण स्वीकारले. त्यांच्या धोरणामुळे एकूण राजकारणातील अनेक गोष्टी व्यापक अर्थाने विकसित झाल्या. तीन, महात्मा गांधी यांनी सहिष्णू राजकारणाचे प्रारूप स्वीकारले. त्यांनी हिंसेचा पराभव अहिंसेने केला. त्यांनीदेखील राजकारणाचा अर्थ व्यापक केला. चार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी गौतम बुद्धाच्या विचारांचे समर्थन करत सहिष्णुतेचा मार्ग मान्य केला. या पद्धतीने त्यांनी बहिष्कृत भारताचे प्रश्न ऐरणीवरती आणले. पाच, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक हिंसक प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न चाळिशी दशकाच्या अखेरीस व पन्नाशीच्या दशकात सहिष्णुतेचा मार्गाने सोडविण्यात आले. थोडक्यात हा प्रचंड मोठा सहिष्णुतेच्या यशाचा राजकीय इतिहास आहे. परंतु हा इतिहास बाजूला ठेवून धर्मांधता, आक्रमकता आणि परस्परविरोधी भूमिका घेतल्या जात आहेत. अशी परिस्थिती उभी राहिली तेव्हा भारतीय संदर्भात सहिष्णुतेच्या राजकारणाची नव्याने मांडणी आशिष नंदी आणि टी.एन. मदन यांनी केली. 

गुड सेन्स
सहिष्णु जीवनशैली हा एक ‘कॉमन सेन्स’चा प्रकार आहे. अशी जीवनशैली सहजासहजी धर्मांधतेत रूपांतरित होते.  उदा. संमिश्र धार्मिक समूह सलोख्याने राहतात. परंतु असे समूह निवडणूक काळात परस्पर विरोधी भूमिका घेतात. यामुळे केवळ सहिष्णुतेमुळे लोकशाही वातावरण टिकून राहत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सातत्याने प्रत्येक व्यक्तीने सहिष्णू जीवनशैली ‘गुड सेन्स’मध्ये रूपांतरीत करावी लागते, असा युक्तिवाद राजेंद्र व्होरा यांनी केला होता. सार्वजनिक जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता हादेखील ‘कॉमन सेन्स’ प्रकारचा एक गुण आहे. परंतु या गुणांचे चांगल्या प्रघातांमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न होत नाहीत. 

तंत्रज्ञान आणि सोशल नेटवर्किंग विद्येत पारंगत असण्याबरोबर ‘गुड सेन्स’मध्ये देखील पारंगत असावे लागते, ही गोष्ट भारतीय समाजाच्या अंगवळणी पडलेली नाही. भारतीय नागरिकांना या प्रकारचे प्रशिक्षण कधी दिले जात नाही. याबद्दलचे अनुभव सतत येत राहतात. यामुळे सरधोपटपणे डावे-उजवे आणि भरकटलेले मध्यममार्गी हे सर्वच कोणत्यातरी एकाच गोष्टीचा सतत पुरस्कार करत राहतात. त्यामुळे राजकारण व्यापकतेकडे सरकत नाही. ही मोठी मर्यादा भारतीय राजकारणाला पडलेली आहे. या अर्थाने भारतीय राजकारण धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतलेले आहे.

संबंधित बातम्या