‘पाळत समाज’ आणि राजकारण

प्रकाश पवार
सोमवार, 3 मे 2021

राज-रंग

नेटकरी, ऑनलाइन शिक्षण, सीसीटीव्ही, ऑनलाइन बातमीपत्रे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, व्हॉट्सॲप डॉक्टर, व्हॉट्सॲप हॉस्पिटल, ई-कॉमर्स इत्यादी रचना म्हणजे ‘पाळत समाजाची’ (surveillance society) जडणघडण आहे. यातून सुरुवातीला पाळत समाज उदयाला आला. त्यानंतर पाळत राजकीय समाज उदयाला आला. 

राजकारण कुठे घडते? हा साधा परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकारण आकाशात घडत नाही. राजकारण नेहमीच समाजात घडते. मात्र तो समाज कोणता आहे? ही धारणा महत्त्वाची ठरते. कारण यथा समाज तथा राजकारण. ‘आधुनिक समाज’ (modern society) अशी कल्पना दोन शतकांपूर्वी केली गेली. अठराशे अठरा पासून पुढे भारतात आधुनिक समाज होता अशी धारणा होती. अठराशे अठराच्या आधीचा समाज सरंजामी स्वरूपाचा होता, अशी धारणा होती. विसाव्या शतकातील ऐंशीच्या दशकानंतर भारतीय समाज उत्तर आधुनिक काळामध्ये रूपांतरीत होत गेला. त्यामुळे त्या समाजाला ‘आधुनिकोत्तर समाज’ (post modern society) म्हणून ओळखले जाते. आधुनिकोत्तर समाजातून ‘पाळत समाजा’ची (surveillance society)  निर्मिती झाली. नव्वदीच्या दशकानंतर या पाळत समाजाचे राजकारण हळूहळू पुढे सरकत राहिले. एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात पाळत समाजाला बाळसे आलेले दिसते. ‘यथा पाळत समाज तथा पाळत राजकारण’, हा नियम नव्याने उदयास आला. यथा समाज तथा राजकारण. म्हणजेच जसा समाज तसे राजकारण. ज्या प्रकारचा समाज त्याच प्रकारचे राजकारण उदयाला येते. म्हणजेच आज कालचा समाज पाळत समाज आहे. त्या समाजाचे राजकारण देखील पाळत राजकारण आहे. त्या समाजाची राज्यसंस्था ‘पाळत राज्यसंस्था’ आहे. म्हणजेच आधी पाळत समाज निर्माण झाला आणि नंतर पाळत राज्यसंस्था उदयाला आली. त्यानंतर राज्यसंस्थेची चर्चा ‘पाळतखोर’ म्हणून केली जाऊ लागली.

पाळत समाजाचे राजकारण
नेटकरी, ऑनलाइन शिक्षण, सीसीटीव्ही, ऑनलाइन बातमीपत्रे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, व्हॉट्सॲप डॉक्टर, व्हॉट्सॲप हॉस्पिटल, ई कॉमर्स इत्यादी रचना म्हणजे पाळत समाजाची जडणघडण आहे. यातून सुरुवातीला पाळत समाज उदयाला आला. त्यानंतर पाळत राजकीय समाज उदयाला आला. म्हणजेच पाळत समाज ही पाळत राजकीय समाजाची जननी आहे, तर तंत्रज्ञान हा पाळत राजकीय समाजाचा आधार आहे. तंत्रज्ञानाचा विकास अति जलद गतीने होत गेला. तंत्रज्ञानामुळे ज्ञानी समाज निर्माण होणे अपेक्षित होते. परंतु असा अपेक्षित असणारा समाज निर्माण होत नाही. जसे आधुनिक समाजाला प्रतिक्रिया म्हणून पुनरुज्जीवनवादी समाजाची निर्मिती झाली. पुनरुज्जीवनाच्या चळवळीतून एका बाजूला अविवेकी समाजही निर्माण झाला. त्याच पद्धतीने तंत्रज्ञानी समाजातून एक प्रतिक्रिया घडून आली. ती प्रतिक्रिया प्रगतिशील असण्याऐवजी अधोगतीशील समाजाच्या जन्माची रोचक कथा ठरली. यामुळे भारतीय राजकारणात पाळत समाज आणि ‘पाळत राजकीय समाज’ अशा दोन समाजांनी मिळून आधुनिक समाज आणि आधुनिक मूल्यव्यवस्था यांच्याविरोधातील राजकारण घडवले. पाळत समाज आणि पाळत राजकीय समाज हा आधुनिक राजकीय समाजाने घडवलेल्या आधुनिक राजकीय संस्थांच्या विरोधी सातत्याने भूमिका घेतो. पाळत राजकीय समाजाला आधुनिक राजकीय समाज त्याचा प्रथम क्रमांकाचा शत्रू वाटतो. जसे सरंजामी समाजाचा पूर्ण अंत झाल्याशिवाय आधुनिक समाज निर्माण होणार नाही ही एक धारणा होती. तशीच धारणा आज काल निर्माण झाली आहे. परंतु ही धारणा आधुनिक समाजाच्या विरोधातील आहे. आधुनिक समाजाचा पूर्ण अंत झाल्यानंतर पाळत समाजांचे वर्चस्व निर्माण होणार आहे. यामुळे भारतातील पाळत समाजाने घडविलेला राजकीय पाळत समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये कृतिशील झालेला आहे. पाळत समाजाने भारतीय लोकजीवनातील जवळपास सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. म्हणजेच थोडक्यात भारतीय समाज हा आजच्या संदर्भात पाळत समाज झाला आहे. राजकारणाच्या संदर्भात भारतीय समाज हा पाळत राजकीय समाज झाला आहे. हा प्रचंड मोठा भारतीय राजकारणामध्ये बदल झाला आहे.

पाळत यंत्रणांचे राजकारण
पाळत यंत्रणा राजकारण घडवीत आहेत. पाळत यंत्रणांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा विविध संस्थांचा ताबा घेतला आहे. या राजकीय संस्थांवरती पाळत समाजाचे नियंत्रण वाढलेले आहे. या संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाळत यंत्रणा कृतिशील झाला आहे. मतदान प्रक्रियेचे रेकॉर्डिंग करणे किंवा मतदान केंद्रांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावणे हे प्रकार घडत आहेत. प्रचाराचे रेकॉर्डिंग केले जाते. तसेच संस्थांमधील कामकाजांचे रेकॉर्डिंग करून त्याचे प्रसारण करणे यावरती भर दिला जातो. समाजामध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्या वर्तणुकीचे पॅटर्न समजून घेण्यासाठी पाळत यंत्रणांचा वापर केला जातो. राजकीय समाजाखेरीज नागरी समाजामध्ये देखील पाळत यंत्रणा कृतिशील झालेल्या आहेत. नागरी समाजामध्ये पाळत यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवातीस आल्या. प्रसारमाध्यमे व शिक्षण व्यवस्थेमध्ये पाळत यंत्रणांचा दबदबा वाढलेला आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये पाळत यंत्रणा राजकारण घडविण्यामध्ये अति कृतिशील झालेल्या आहेत. यामुळे राजकीय नेते आणि राजकीय पक्ष राजकारण घडवतात ही वस्तुस्थिती कमी झालेली आहे. राजकारण घडवण्याची मुख्य जबाबदारी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातील पाळत यंत्रणांकडे सरकलेली आढळते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांबद्दल राजकारणाला भीती वाटत होती. परंतु एकविसाव्या शतकामध्ये राजकारण आणि पाळत यंत्रणा यांचा समझोता झाला. हळूहळू वीस वर्षात पाळत यंत्रणाच राजकारण करू लागल्या. यामुळे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते हे पाळत यंत्रणांवरतीही अवलंबून राहू लागले. यामुळे गृह खात्याचे महत्त्व प्रचंड वाढले. गृह खात्याकडे सत्तेचे केंद्रीकरण होत गेले. केंद्रीय पातळीवरती आणि प्रत्येक राज्यामध्ये गृह खाते म्हणजेच खरी सत्ता असे स्वरूप प्राप्त झाले. कारण पाळत यंत्रणा आणि गृह खाते यांच्यामध्ये एक प्रकारचे सलोख्याचे नाते निर्माण झाले. ही सत्तेची नवीन जोडगोळी आहे. आधुनिक समाजात फार तर संरक्षण खाते, परराष्ट्र संबंध, कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती म्हणून हेरगिरीला महत्त्व होते. परंतु एकविसाव्या शतकाच्या दोन्ही दशकांमध्ये असे दिसू लागले आहे की पाळत यंत्रणा जवळपास सर्वच खात्यांमध्ये कृतिप्रवण झालेल्या आहेत. तसेच तळागाळातमध्ये  कार्यकर्ता वर्ग सांभाळण्यासाठी पाळत यंत्रणांची कॉन्ट्रॅक्ट उपयोगाला येतात. पाळत यंत्रणांमधून नवीन कार्यकर्ता वर्गही उदयाला येतो. म्हणजे कार्यकर्ता वर्ग हा समाज सेवक आणि राजकीय चळवळ करणारा आज काल राहिला नाही. समाजसेवा आणि सामाजिक कार्य ही दोन कामे आधुनिक राजकीय समाजामधील कार्यकर्ता करत होता. पाळत समाजातील राजकीय कार्यकर्ता केवळ सर्वांची देखरेख करतो. त्याला विवेकी नागरिक दिसत नाही. पाळत समाजातील नेतृत्व देखील कटकारस्थाने प्रकारचे उदयास 
आले. या प्रकारच्या घडामोडी दैनंदिन जीवनात दिसतात.

संबंधित बातम्या