लोकप्रियतेच्या पुढे असंतोषाची आव्हाने

प्रकाश पवार
सोमवार, 7 जून 2021

राज-रंग

भारतीय राजकारणात लोकप्रियतेचे एक चतुष्ट सुस्पष्टपणे दिसते. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या चार नेत्यांची लोकप्रियता एकत्रित पाहिली तर हे चतुष्ट म्हणजेच लोकप्रियतेचे वेगवेगळे चार प्रकार दिसतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सात वर्षांचा कालखंड पूर्ण केला. त्यामुळे भारतीय राजकारणातील लोकप्रियतेचे हे चतुष्ट आकाराला आले. भारतीय राजकारणात आतापर्यंत चार पंतप्रधानांनी सात वर्षांचा कालखंड पूर्ण केला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी हे चार पंतप्रधान इतरांच्या तुलनेत लोकप्रियतेच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्णही ठरले. हे चारही पंतप्रधान अनुक्रमे ‘लोकशाही समाज’ (पं. नेहरू), ‘जशास तसा समाज’ (इंदिरा गांधी), ‘जागतिक समाज’ (मनमोहन सिंग) आणि, ‘नवआकांक्षी समाजा’मध्ये (नरेंद्र मोदी) वेगवेगळ्या कारणांसाठी लोकप्रिय राहिले. परंतु त्या प्रत्येकाच्या लोकप्रियतेचा प्रकार वेगवेगळा होता. त्यास `लोकप्रियता चतुष्ट’ असे म्हणता येईल. सात वर्षांनंतर या पंतप्रधानांना जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. म्हणजेच लोकप्रियतेचे प्रारूप वेगवेगळे असूनदेखील जनतेच्या असंतोषाला वळसा घालता आला नाही. ही वस्तुस्थिती या चारही लोकप्रिय नेत्यांच्याबद्दल दिसून येते.

आरंभीची लोकप्रियता
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची लोकप्रियता व्यापक स्वरूपाची होती. पंडित नेहरू यांना दोन लोकशाही समाजात (Democratic society) लोकप्रियता मिळालेली होती. लोकशाही संस्थांची जडणघडण हा नेहरूंच्या लोकप्रियतेचा एक नैसर्गिक स्रोत होता. आजच्या भाषेत लोकशाही संस्थांची उभारणी हे नेहरूंच्या नेतृत्वाचे नैसर्गिक इंधन होते. एक, नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेला स्वातंत्र्य चळवळीचा एक आधार होता. दोन, स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय लोकशाहीचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली होती. थोडक्यात नेहरू यांच्या लोकप्रियतेला आरंभीच्या लोकशाही लाटेचा (First democratic wave) भक्कम आधार होता. परंतु तरीही पन्नाशीच्या दशकाच्या शेवटापासून जनमत नेहरूंच्या विरोधात जाऊ लागले. साठीच्या दशकांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेला बऱ्यापैकी ओहोटी लागलेली होती. पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये नेहरूंच्या नेतृत्वाला आव्हान मिळाले होते. विशेषतः राजकीय क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी नेहरूंना विरोध केला होता. 

नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधी यांनी आरंभीची पाच वर्षे पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी दुसरी दोन वर्षेही पूर्ण केली. त्यांच्या लोकप्रियतेचा आधार ‘जशास तसा’ या प्रकारचा समाज होता. आक्रमकता हे इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेचे नैसर्गिक इंधन होते. एक, इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या तुलनेत आक्रमक भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे बदललेल्या नवीन वर्गाला त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे वाटत होते. दोन, भारत-पाकिस्तान युद्ध इंदिरा गांधी यांनी जिंकले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा जनमानसात दिव्यवलयांकित नेतृत्व या प्रकारची होती. या पार्श्वभूमीवरती त्यांना पक्षातून विरोध झाला. तसेच १९७५पासून जनमत त्यांच्याविरोधात गेले. सत्तरीच्या दशकात आणीबाणी आली. यामुळे एका अर्थाने सत्तरीच्या दशकात लोकशाहीविरोधी लाट निर्माण झाली होती. यानंतर ऐंशीच्या दशकात देखील लोकशाहीविरोधी लाट कृतिशील होती. तरीही शेवटी त्यांनी लोकशाही राजकीय प्रक्रियेची बाजू ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला घेतली.

लोकप्रियतेची नवीन  प्रारूपे
दुसऱ्या लोकशाही लाटेतून खरेतर अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांची लोकप्रियता वाढत गेली. ऐंशीच्या दशकाच्या शेवटी आणि नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला दुसरा लोकशाही उठाव घडून आला, असे वर्णन योगेंद्र यादव यांनी केलेले आहे. परंतु हा दुसरा लोकशाही उठाव सुरू असतानाच लोकशाही विरोधी लाटदेखील प्रचंड गतीने सुरू झाली. जमातवादी आणि धर्मांध राजकारण ही नव्वदीच्या दशकातील लोकशाही विरोधी लाटेची उदाहरणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आधारित एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा पहिला कालखंड पूर्ण केला. त्या काळाची ओळख जागतिक समाज (Global society) अशी केली जाते. त्यांनी ‘युपीए’मधीलदेखील सात वर्षांचा काळ पूर्ण केला. विद्वत्ता हे त्यांच्या लोकप्रियतेचे नैसर्गिक इंधन होते. या काळातील त्यांच्या नेतृत्वाची दोन वैशिष्ट्ये दिसतात. एक, मनमोहन सिंग यांनी आघाडी सरकारचे नेतृत्व केले होते. ते काही काळ नवआकांक्षी समाजाचे (New  aspirational society) नेते होते. दोन, मनमोहन सिंग हे जागतिकीकरणाच्या काळात कल्याणकारी योजना राबविणारे नेते होते. या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे त्यांना नेहरू आणि  गांधी यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. सरकारचे सात वर्ष नेतृत्व केल्यानंतर मात्र जनमत सिंग यांच्या विरोधात गेले. नवआकांक्षी समाजाचे दोन घटक नवमध्यमवर्ग आणि प्रसार माध्यमे त्यांच्या विरोधात गेले. नवमध्यमवर्ग आणि प्रसार माध्यमांनी मनमोहन सिंग यांचे नेतृत्व अमान्य केले होते. त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. 

या पार्श्वभूमीवरती नेतृत्वाच्या लोकप्रियतेचे चौथे प्रारूप पुढे आले. लोकप्रियतेच्या चौथ्या प्रारुपाचे नेतृत्व अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. व्यवस्थापन हे त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य नैसर्गिक इंधन आहे. त्यांच्या नेतृत्वाची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक, राजकीय व्यवस्थापन हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे नवीन वैशिष्ट्य होते. त्यांनी नवआकांक्षी समाजाचे व्यवस्थापन केले (गुगल, व्हाट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम). दोन, भाषण कौशल्य हे त्यांच्या नेतृत्वाचे द्योतक आहे. या दोन वैशिष्ट्यांमुळे नवआकांक्षी समाजाने त्यांना पाठिंबा दिला. परंतु सात वर्ष राज्यकारभार केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाच्या पुढे असंतोषाचे आव्हान उभे राहिले. त्यांच्या लोकप्रियतेमध्ये काहीशी घट होऊ लागली. विशेषतः तीन पातळ्यांवर लोकप्रियतेत घसरण झालेली दिसते.  एक, सध्या जागतिक पातळीवरती त्यांची लोकप्रियता घटलेली आहे. याचे एक कारण भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन, भारतातील वेगवेगळ्या राज्यांत त्यांच्या लोकप्रियतेची घट होत आहे. उदाहरणार्थ, पश्चिम बंगाल. तीन, नवआकांक्षी समाज मौन बाळगून आहे. परंतु तरीही नवआकांक्षी समाजाचा अपेक्षाभंग झाला आहे. म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाच्या चारही प्रारूपाच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला दिसतो. तरीही सलग तिसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पंडित नेहरू यांनी स्पष्ट बहुमत मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांना मात्र सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत साधे बहुमतदेखील मिळविता आले नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडे अजून तीन वर्षांचा कालावधी आहे. या काळात असंतोषाचे व्यवस्थापन त्यांना करण्यास पुरेसा अवकाश उपलब्ध आहे. परंतु एकूण लोकप्रियता चतुष्ट असंतोषाला सामोरे गेलेले दिसते.

संबंधित बातम्या