परंपरागत चौकट :  आधुनिक सामाजिक न्याय 

प्रकाश पवार
सोमवार, 5 जुलै 2021

राज-रंग

छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय संकल्पनेमध्ये राष्ट्र- राज्य ही संकल्पना महत्त्वाची आहे. राष्ट्र- राज्य निर्माण झाले तर सामाजिक न्याय देता येईल अशी त्यांची प्रबळ धारणा होती.

जून महिन्यात सांस्कृतिक राजकारण गतिशील पद्धतीने प्रतिकांच्या मार्फत घडत जाते. विशेषतः २६ जून हा छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिन सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो सामाजिक न्याय दिन किंवा सप्ताह साजरा होत राहिला आहे. सामाजिक न्याय आणि राजकारण यांची बरीच सरमिसळ झालेली आहे. मुख्य मुद्दा सामाजिक न्यायाचा आहे. छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्याय विषयक कार्य आणि विचार राजकीय संघटन करण्याच्या खेरीज सामाजिक न्याय म्हणून औचित्यपूर्ण आहेत. त्यांचा विचार हा सतत उत्क्रांत होत जाणारा विचार होता. विशेषतः त्यांचा विचार परंपरेशी संवादी होता. त्यामुळे ‘भवानी-शंकर’, ‘गौरीशंकर’, ‘जगदंब’ या संकल्पनांचा विशिष्ट अर्थ त्या त्या वेळी स्पष्ट आहे.   

भवानी-शंकर 
शाहू महाराजांना सामाजिक न्यायाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेली होती. छत्रपती शाहू महाराज सातत्याने या प्रेरणेचा उल्लेख करत होते. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी शिवरायांचे आदर्श प्रतीक आपला राज्यकारभारात स्वीकारलेले होते. यामुळे ‘भवानी’ हे प्रतीक शिवरायांना आणि शाहूरायांना एकत्र जोडणारा वैचारिक दुवा आहे.  या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचे प्रतीक भवानी हे होते. शाहू महाराजांच्या राजकीय पत्र व्यवहारांमध्ये ‘जय भवानी’ ही संकल्पना सातत्याने येते. तसेच त्यांनी निवडलेल्या प्रतीकांमध्ये गंगा शंकराच्या डोक्यावर झेललेली आहे. गंगा म्हणजे पाणी. पाणी हा भौतिक घटक आहे. शाहू महाराजांनी पाणी हाच सामाजिक न्यायाचा मुख्य घटक आहे हे ओळखले होते. त्यामुळे शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचे बांधकाम केले. शाहू महाराजांनी पाणी हा घटक सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला. हा मुद्दा खरेतर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर जीर्णोद्धारापासून जास्त स्पष्ट होत गेला. मालोजीराजे यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या मंदिरासाठी पिण्याच्या पाण्याचे तळे बांधले होते. थोडक्यात शंकराचे प्रतीक पाणी या स्वरूपाचे आहे.  

पाण्याचा हक्क आणि पाण्याचे मानवतावादी समन्यायी वाटप हा विचार छत्रपती शिवरायांच्या आजी आणि पणजोबांपासून चालत आलेला आहे. तोच विचार शाहू महाराजांनी आपल्या राज्यसंस्थेच्या प्रतिक्रियांमध्ये जय भवानी आणि शंकराच्या डोक्यावर पाणी झेलण्याची संकल्पना ही दोन्ही प्रतीके स्वीकारली होती. या दोन प्रतीकांचा आजच्या आधुनिक काळातील अर्थ भौतिक स्वरूपाचा आहे.  समन्यायी पाणीवाटपाच्या चळवळी आजच्या राजकारणात गतिशील आहेत. त्यांच्यासाठी शाहूरायांचा हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. या अर्थाने छत्रपती शाहूंच्या राज्यकारभारातील भवानी आणि शंकर ही प्रतीके सामाजिक न्यायाची होती. 
स्त्री- पुरुष समतेचे प्रतीकदेखील अर्धनारीनटेश्वर हे आहे. शाहू महाराजांनी महिलांसाठीच्या सामाजिक न्यायाचा विचार मांडला. शाहू महाराजांनी मुलींसाठी सक्तीचे व मोफत शिक्षण हा निर्णय घेतला. त्यांनी महिलांना मालमत्तेचा हक्क, पुनर्विवाहाचा हक्क, घटस्फोटाचा हक्क, आंतरजातीय विवाहाचा हक्क असे क्रांतिकारी निर्णय घेतले. आजच्या काळामध्ये या निर्णयांचे औचित्य असल्याचे दिसते. 

गौरीशंकर
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक सलोखा हा सामाजिक न्यायाचा आधार मानला होता. हिंदू-मुस्लीम सामाजिक सलोखा, ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांच्यातील सामाजिक सलोखा या गोष्टींना शाहू महाराजांनी सामाजिक न्याय या अर्थाने महत्त्व दिले होते. संगीत, कुस्ती, मल्लविद्या अशा प्रकारच्या विद्यांचा विकास म्हणजे सामाजिक न्याय, अशी छत्रपती शाहूंची धारणा होती. त्यांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेषतः फासेपारधी, रामोशी, बेरड अशा समाजांमध्ये त्यांनी सामाजिक न्यायाचा विचार पसरविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. संगीताच्या क्षेत्रामध्ये अल्लादिया खॉंसाहेबांना राजाश्रय होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित भास्कर बुवा बखले, मंजी खॉं, हैदर खॉं, केसरबाई, मोगूबाई इत्यादी अनेक लोक संगीताच्या क्षेत्रात उदयास आले. अल्लादिया खॉंसाहेब यांना गौरीशंकर म्हणून ओळखले जाते. ही परंपरा सामाजिक सलोख्याची आहे. सामाजिक सलोख्याच्या परंपरेतून शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा एक प्रवाह गतिमान केला. 

जगदंब 
छत्रपती शाहू महाराजांनी भवानीशंकर, गौरीशंकर, जगदंब अशा संकल्पना समाजशास्त्रीय संदर्भात स्वीकारल्या होत्या. विशेषतः कोल्हापूरचे अंबाबाईचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ विश्वबंधुत्व असा होतो. म्हणजेच जगदंबा हा शब्द ‘जगत्’ आणि ‘आई’ अशा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. जगदंब या शब्दाचा अर्थ ‘जगाची आई’ असा होतो. याच शब्दाचा अर्थ आधुनिक संदर्भात विश्वबंधुत्व, बंधुभाव असा होतो. शाहू महाराजांना गरीब आणि वंचित समूहाबद्दल प्रचंड कळवळा होता. शाहू महाराजांनी वंचित समूहाला सतत आईचे प्रेम दिले. शाहू महाराजांनी वंचित समूहाशी बंधुभावाने सार्वजनिक जीवन जगण्याची ओळख दिली. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना सत्यशोधक हॉटेल काढण्याची प्रेरणा दिली. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायासाठी संसाधनांचे वाटपही केले. तसेच छत्रपती शाहू महाराज हे गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून जात. चहा विकणारे गंगाराम कांबळे विक्रेते होते तर चहा पिणारे शाहू महाराज ग्राहक होते. हा आधुनिक पद्धतीचा बदल शाहू महाराजांनी आईच्या वात्सल्य भावनेतून  घडवून आणला.  यामुळे खरेतर संपूर्ण जीवनात शाहू महाराज ‘जगदंब’ या स्वरूपात जीवन जगले. शाहू महाराज दीनदुबळ्यांची आई झाले. त्यामुळे त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये जगाची आई होण्याचा एक आशय दडलेला आहे. या अर्थाने छत्रपती शिवरायांमध्ये बीजरूपाने विश्वबंधुत्वाची कल्पना होती. ती संकल्पना जगदंब या रूपात व्यक्त झाली होती. त्या संकल्पनेचे जीवन छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केले. शाहू महाराजांनी फ्रेंच राज्यक्रांतीची ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही घोषणा वेगळ्या रूपात कोल्हापूर संस्थानामध्ये आणली. ही प्रचंड मोठी सर्जनशीलता शाहू महाराजांकडे होती. या प्रकारच्या सर्जनशीलतेमुळे शाहू महाराज हे बंधू भावाच्या नात्याने सर्वच चळवळींशी व्यवहार ठेवू शकले. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यातील वादाची चर्चा खूप होते. परंतु शाहू महाराजांनी लोकमान्य टिळक आजारी असताना त्यांची चौकशी केली होती. तसा पत्रव्यवहार केला होता. एवढेच नाही तर लोकमान्य टिळक यांच्या देहावसानानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या कार्याचा योग्य गौरव केला. शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय संकल्पनेमध्ये राष्ट्र- राज्य ही संकल्पना महत्त्वाची आहे. राष्ट्र- राज्य निर्माण झाले तर सामाजिक न्याय देता येईल अशी त्यांची प्रबळ धारणा होती. राष्ट्र राज्य निर्मितीचे काम हेदेखील महत्त्वाचे आहे. हे शाहू आणि लोकमान्य टिळक यांच्यातील या संबंधातून अधोरेखित होते.  थोडक्यात शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचार प्रचंड गुंतागुंतीचा आहे. शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचार त्यांच्या धारणा समजून घेतल्याशिवाय समजू शकत नाही. ‘छत्रपती शिवाजी महाराज हेच सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत’ ही छत्रपती शाहू महाराजांची मुख्य धारणा होती. त्यामुळे शाहू महाराजांनी ‘भवानीशंकर’, ‘गौरीशंकर’, ‘जगदंब’ या संकल्पनांमध्ये भौतिक जीवन मूल्य उतरविण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळात ही दृष्टी फार उपयुक्त ठरते. किंबहुना राजकारण गतिशील होण्यासाठी हा दृष्टिकोन औचित्यपूर्ण ठरतो.

संबंधित बातम्या